महापुरुषांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणं, त्यांच्याशी निगडित वास्तूंना भेटी देणं, यातून सापडलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण तपशिलांच्या आधारावर कार्यक्रमांचं सादरीकरण करणं. यासाठी केलेल्या स्वतंत्र अभ्यासामुळे वेगळीच ऊर्जा मिळते. सतत नवनवा अभ्यास घडत जातो आणि विविध विषयांचे नवे कंगोरे सापडत जातात. तो इतिहास पुन्हा जगताना माझ्यामध्ये पु.ल. देशपांडे यांचे ‘हरितात्या’ संचारतात…
हिमाचल प्रदेशामध्ये बद्दी नावाचं मुळातलं छोटं गाव, अलीकडे नावारूपास आलं आहे ते तिथल्या औषध कंपन्यांच्या कारखान्यांमुळे. काही महिन्यांपूर्वी, ‘इंडोको रेमेडीज’ या कंपनीच्या अधिकारी नेतृत्वासाठी कार्यशाळा घेत होतो. त्या संदर्भात इतिहासातली अनेक उदाहरणं येणं क्रमप्राप्त होतं.
प्रशिक्षण घेणाऱ्या व्यवस्थापकांमध्ये भारताच्या विविध भागांतून आलेली मंडळी होती. त्यातील तीन-चार जण होते प. बंगालचे. बोलण्याच्या ओघात, स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र यांच्या कथा तर आल्याच, पण रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत राय यांचे उल्लेखही झाले. चहापानाच्या मध्यंतरात हे चार जण मला म्हणाले, ‘‘इतक्या साऱ्या बंगाली महानायकांची, तपशीलवार माहिती तुम्हाला कशी?’’
‘‘कारण ते सारे माझ्या घरातले आहेत. कुटुंबातले आहेत. विवेकानंदांना चहा कसा लागायचा, तिखट किती आवडायचं हे मला ठाऊक असायला नको का? आपले आजोबा, काका, मामा असतात त्यांच्या खास गोष्टी लक्षात ठेवायला कष्ट कशाला पडतील?’’ हे उत्तर मी अर्थातच ठरवून किंवा छाप पाडण्यासाठी दिलेलं नव्हतं.
बर्लिनमध्ये एकटं पोहोचून तिथे काही महिन्यांमध्ये एक संपूर्ण व्यवस्था तयार करणारे नेताजी मला दिसतात. ‘मिठाचा सत्याग्रह’ या सूत्रावर सतत विचार करणारे गांधीजी दिसतात. राजे-नवाबांसोबत संवादकौशल्याची पराकोटी करणारे सरदार पटेल जाणवतात. अमेरिकेत विद्यापीठ वाचनालयाचा पुरेपूर उपयोग करणारे बाबासाहेब आंबेडकर, स्थानबद्ध असतानाही विचार-जाणिवांना मुक्तता देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकच्या तुरुंगात भारतीय संस्कृतीचं चिंतन करणारे साने गुरुजी हे सारे मला भेटतात. एकेका महापुरुषाला मर्यादित कक्षेमध्ये जखडून टाकायचं की, सारे पूर्वग्रह दूर ठेवून त्यांना छान, मन:पूर्वक घट्ट भेटायचं ही आपली निवड असते. अशा भेटींसाठी भावनिक स्वास्थ्याचे दालन किती ऐक्यवर्धक आहे!
महात्मा गांधीजींच्या जीवनावर माझ्याकडून रचला गेला तो ‘दांडी यात्रे’चा केस स्टडी. छान साडेतीन तास चालतं हे सादरीकरण. दांडी यात्रेची पार्श्वभूमी, गांधीजींच्या मनातून तयार झालेली रूपरेखा, आंदोलनाची मांडणी, कार्यवाही, त्याचे परिणाम असा हा पट. पोर्तुगीज प्रदेशातील मिठावर कर बसवून कोकणातल्या मिठाला प्रोत्साहन देणारे कोण होते तर अर्थात शिवछत्रपती. या सादरीकरणामध्ये संपूर्ण वसाहतीकरणाचा इतिहास आहे, काँग्रेस चळवळीची आणि नेत्यांची वाटचाल आहे आणि त्यातले अंतर्गत कलहसुद्धा.
माझा अभ्यास सुरू होता तेव्हा माझ्या आईने सांगितलेले तपशील आठवले की, माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आरवली शिरोळ्याला मोठा सत्याग्रह झाला होता. मी ‘गूगलनेट’ला भिडलो आणि खजिना सापडला. त्या काळातली गॅझेट्स, गुप्तचर खात्याचे अहवाल… त्यातून एक स्वतंत्र अभ्यास जन्मला. सप्टेंबर १९३० ते डिसेंबर १९३० या चार महिन्यांमध्ये महाराष्ट्रात काय घडलं? अगदी जिल्हा पातळीवरचं राजकीय नेतृत्वसुद्धा तुरुंगात असताना ही जनचळवळ कशी बनली, हे मी पुराव्यानिशी अनुभवत होतो. म्हणजे हा ऐवज होता आधुनिक जगातल्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ या विषयावरचा. मी तेव्हापासून, अगदी देशभर, संपूर्ण दिवसाची ही कार्यशाळा घेत असतो. ‘एस.पी. जैन मॅनेजमेंट संस्थे’पासून ते ‘रिलायन्स’, ‘सीमेन्स’ अशा मोठ्या कंपन्यांपर्यंत.
आपल्या मराठी मातीमध्ये रुजलेल्या कंपन्या आणि संस्थासुद्धा बोलावतात. नाशिकची ‘निर्मिती-प्रगती कंपनी’ त्यातली एक. विवेक कुलकर्णी ‘आयपीएच संस्थे’मध्ये रुग्ण म्हणून आला तो त्याच्या कंपनीच्या विकासासाठी मी काय करू शकतो त्याची चर्चा करायला. आज एक तपानंतरही त्याच्यासोबत काम करताना या ऐतिहासिक प्रशिक्षणाने मोठीच कामगिरी केली आहे.
आमच्या सायकिअॅट्रिस्ट अर्थात मनोचिकित्सक बांधवांची, पश्चिम विभागीय परिषद होती नागपूरमध्ये. उद्घाटन होतं २ ऑक्टोबरला. काळ होता करोना साथीचा. मला त्यांनी विनंती केली की, गांधीजींनी स्वत:च्या मनाच्या केलेल्या अभ्यासावर सादरीकरण कर… अभ्यासाला आवतण मिळालं. चार महिन्यांच्या मेहनतीनं तयार केलं, ‘महात्मा अॅण्ड माइंड’ हे सादरीकरण. गांधीजींचे प्रयोग त्यांच्या वैयक्तिक मनापुरते मर्यादित नाहीत. तुम्हा-आम्हा सर्वांसाठीच ते महत्त्वाचे. एका कालखंडात अतिशय सामान्य कुवतीच्या म्हणता येईल अशा माणसाने काय महान प्रयोग केले स्वत:च्या मनावर, ज्यामुळे आज तुम्ही त्याला टाळू शकत नाही? त्याच्या विचारांच्या बाजूने किंवा विरोधात स्टॅण्ड घ्यावाच लागतो. तो का बरं?…
‘वन मॅन टू आर्मी’ हे सुभाषबाबूंच्या जीवनातील २८ महिन्यांच्या काळाचं सादरीकरण. स्वत:च्या कलकत्त्याच्या (आता कोलकाता) घरातील स्थानबद्धतेतून ते निसटतात, येथे ही कथा सुरू होते आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या सिंगापूरमधल्या शपथविधीपर्यंत येऊन संपन्न होते. या अभ्यासादरम्यान मी सुभाषबाबूंच्या कलकत्त्याच्या घराला भेट दिली. फार थरारक अनुभव होता तो. ते कोणत्या दरवाजातून कसे बाहेर पडले ते मला ठाऊक होतं. ती पावले अनुभवणे ग्रेट होतं. कारण हीच ऊर्जा मग सादरीकरणात उमटते. ‘इंडियन स्ट्रगल’ हे नेताजींचं पुस्तक वाचताना जाणवतं की, समकालीन इतिहासावर लिहिताना, तोच इतिहास निर्माण करणारी व्यक्ती मध्येमध्ये एवढीच टिप्पणी करते की, ‘लेखकाच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित.’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यासाठीचे संस्कार त्यांनी कधी केले ठाऊक आहे? जर्मनी ते सिंगापूरदरम्यानच्या पाणबुडीच्या प्रवासात. युरोप सोडण्याआधी इंधन भरण्याचा शेवटचा थांबा जिथे होता तिथून ही स्क्रीप्ट प्रकाशकांना पाठवण्यात आली. हे छोटे तपशील मला भूल पाडतात. चार महिन्यांच्या आपल्या मुलीला, अनिताला, शेवटच्या वेळी हातात घेताना काय वाटलं असेल नेताजींना? आणि एमिलीला? असाच अनुभव विवेकानंदांशी निगडित वास्तू पाहताना आला. या संन्याशाचे मन स्वत:च्या आईच्या स्वास्थ्यासाठी पोळत होतं. स्वामीजींच्या निर्वाणाच्या आठवडाभर आधी शेवटचं न्यायालयीन प्रकरण मिटलं त्या कुटुंबावरचं. एका बाजूला विशाल ध्येयासाठीचे अविश्रांत कष्ट आणि दुसरीकडे हे नाजूक धागे. संन्यासी म्हणून त्यांनी या जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत. हे माणूसपण लोभस असतं. शिकवणारं असतं. आगऱ्याहून राजगडावर पोहोचल्यानंतर शंभूराजांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा म्हणून त्यांच्या मृत्यूची बातमी पसरवताना महाराजांना काय वाटलं असेल? आणि हो, संन्याशांवर खास लक्ष ठेवण्याची राज्यकर्त्यांची सवय शिवाजी महाराजांपासून सुरू झाली, असा एक उल्लेख विवेकानंदांच्या तोंडी सापडतो. हे ‘कनेक्शन्स’ जबरदस्त असतात. भारतभ्रमणादरम्यान स्वामीजी आणि टिळकांची भेट… किती काय काय सांगू? स्वामीजींच्या त्या जगप्रसिद्ध भाषणाची संपूर्ण पार्श्वभूमी सांगणारं सादरीकरण आहे, ‘तो महामानव, तो संवाद!’ तसेच विवेकानंद-रामकृष्ण नात्याचा वेध घेणारा कार्यक्रमही दोन तासांचा. ‘पगडी आणि टोपी’ हे सादरीकरण लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांच्यातील नात्याचा वेध घेणारं!
माझ्यासाठी हा सारा अभ्यास म्हणजे उत्खनन कार्य असतं. दैनंदिन कामातून मोकळा वेळ मिळाला की मन गेलंच या विषयावर. ‘‘सध्या बाबा कोणाच्या मागे लागलाय?’’ असा प्रश्न मुलं, पत्नीला विचारत असतात. अहो, ही माणसंच अशी. एकदा भेटली की साथ सुटत नाही. विनोबा पण असेच. साहित्यरूपात रोज सहित चालत असतात, माझ्या आणि सर्वांच्या हितासाठी. ते भेटले प्रथम ‘गीता-प्रवचने’ या पुस्तकातून. त्याला २७ वर्षं झाली. विनोबांचा दाखला तोंडात येत नाही असा दिवस आता जात नाही.
अलीकडे ‘ओपीडी’मध्ये माझ्या एका सरळ, भोळ्या स्वभावाच्या रुग्णाला, स्वत:च काढलेल्या व्यवसायात अपयश आलं. ‘स्वत:च्या क्षमता-कमतरतांची ओळख’, या विषयावर चर्चा चालली होती. संस्था चालवणं, निधी संकलन-वितरण यातील कसब ‘आपलं’ नाही हे सांगताना स्वत:बद्दल विनोबा म्हणतात, ‘हे म्हणजे तुकोबांना बँकेचं मॅनेजर करण्यासारखं होईल.’ माझा रुग्ण आणि त्याची पत्नी खळाळून हसले. विनोबांवरच्या अभ्यासातून ‘स्वचे विसर्जन’ ही मालिका आता ‘यू-ट्यूब’वर आहे. पण मुळात हा तीन तासांचा कार्यक्रम मी अनेक शहरांमध्ये केला. ठाण्यामध्ये कार्यक्रमाला इतके लोक आले की, मध्यंतरानंतरचा भाग दुसऱ्या मोठ्या सभागृहात घ्यावा लागला. वाईमध्ये विनोबांनी व्यतीत केलेल्या एक वर्षाची शताब्दी साजरी करायची होती. त्यानिमित्तानं ‘प्राज्ञ पाठशाळे’त कार्यक्रम करण्याचं भाग्य लाभलं. माझी ज्येष्ठ मैत्रीण सुमित्रा भावे खास त्यासाठी आली होती. आणि साताऱ्याहून डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरसुद्धा. गेल्यावर्षी विनोबांच्या ‘चार पुरुषार्थ’ या लेखावर दीड तासांचा कार्यक्रम तयार केला. तो कल्याणमध्ये केला. याच विषयावर साने गुरुजींचा दृष्टिकोन हाती लागला आहे. तो आता त्यात सामील होईलच. ही मजा असते. ‘बुद्धाची गोष्ट’ या नावाने तयार केलेलं सादरीकरण सुरुवातीला ४४ चौकटींचं ‘पीपीटी’ होतं. आता ते १८०चं झालं.
नवा नवा अभ्यास घडत जातो. नवे नवे कंगोरे सापडत जातात. बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित, स्वरचित कवितांचा एक दोन तासांचा कार्यक्रमही मी करू लागलो आहे. ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ असं या सादरीकरणाचं शीर्षक आहे. हे सारे कार्यक्रम करण्याची मला खुमखुमीच असते म्हणा ना. यंदाच्या वर्षात, पहिल्या दोन महिन्यांतच या इतिहास मालिकेतील विषयांचे पाच जाहीर कार्यक्रम आहेत, याचं मला अप्रूप असतं.
आता तीन सादरीकरणं खुणावू लागली आहेत. ‘ज्ञानसूर्य आंबेडकर’ हे पहिलं. या माणसाच्या अफाट बुद्धिमत्तेच्या विविध आविष्कारांना वाहिलेला तीन तासांचा कार्यक्रम. साहित्य जमवतो आहे. दुसरा विषय आहे, ‘स्थानबद्ध (?) सावरकर’… कंसातले प्रश्नचिन्ह, तुम्हाला उत्तर दाखवेल दशकभराचा काळ सावरकरांनी कसा व्यतीत केला आणि कोणते परखड अभ्यास आणि कार्य केले त्याविषयी. आणि तिसरा विषय आहे, ‘संस्कृती शिक्षक : साने गुरुजी.’ गुरुजींचं ‘संस्कृती’ या विषयावरचं लेखन एकत्र करून ते आजच्या काळासाठी सुसंगतपणे मांडणं. हे जाहीरपणे लिहितोय तेसुद्धा मला कार्यसन्मुख करणारा दट्ट्या मिळावा म्हणून. अनेक शहरांमधल्या हजारो मनांसोबत संवाद साधण्याची संधी मला इतिहास आणि भावनिक आरोग्य या मीलनातून मिळत असते. अभ्यासाचा प्रत्येक क्षण, संवादाची प्रत्येक संधी मला प्रगल्भतेकडे नेत असते. हे सारे एकपात्री प्रयोग करतानाचे कष्ट त्यापुढे तोटके असतात.
अशा वेळी माझ्यामध्ये पु.ल. देशपांड्यांची हरितात्या ही व्यक्तिरेखा संचारत असावी. कारण बोलतानाचा माझा नूर तसाच असतो … ‘‘आम्ही हे असे, दरबारात उभे आणि’’…
© The Indian Express (P) Ltd