डॉ. अंजली जोशी
‘स्थळं पाहून’ लग्न जुळवण्याच्या पद्धतीत आजही एका मर्यादेपलीकडे बदल झालेला नाही. त्यातही ‘आधुनिक’ मुली ही निवड करताना फारच नखरे करतात, असा सर्वत्रिक आक्षेप असतो. या प्रक्रियेत लग्नाला रूढ मान्यतेनुसार अपेक्षित वय वाढत जाणं, निवडीचे पर्याय कमी होत जाणं, हे आलंच. पण याचा दोष केवळ मुलींवर टाकण्यापूर्वी त्यांचीही काही बाजू असू शकेल की नाही?तीही समजून घ्यायला हवी..
खोलीत जाऊन मी दरवाजा धाडकन लावून घेतला. डोकं भणभणत होतं. मला कुणाशीच चर्चा नको होती. मला माहीत होतं, की या स्थळाला नाही म्हटल्यावर गदारोळ होणारच आहे. तसा तो माझ्या प्रत्येक ‘नाही’ला होतो. आईबाबांच्या बोलण्यात स्फोटकं भरलेलीच असतात. मी नुसतं नाही म्हणायचा अवकाश, धडाधड माझ्यावर कोसळतात. आणि माझा गुन्हा काय? तर त्यांच्या दृष्टीनं उत्तम असलेल्या स्थळाला मी नाही म्हटलं. त्यासाठी एवढं ऐकवण्याची गरज काय? दरवेळेला माझीच चूक! मलाच नीट निवड करता येत नाही. कशाला प्राधान्य द्यायचं ते म्हणे ठरवता येत नाही. स्वत:वरच्या या टीकेचा मला आता वीट आलाय. शांत बसावंसं वाटतंय. पण या घरात शांतता कुठली मिळायला? दार बंद केलंय तरी आईचा फोनवरचा चढा आवाज ऐकू येतोय.
‘‘आता मात्र हद्द झाली! नेहापुढे आम्ही हात टेकले आहेत. एकही मुलगा पसंत पडत नाही हिला. प्रत्येकात काहीतरी खोडय़ा दिसतातच. आता वय वाढत चाललंय. कुठेतरी तडजोड नको का करायला? पण ही ऐकूनच घेत नाही. सांगायला गेलो की हेडफोन लावून बसते. हिच्या अपेक्षांमध्ये परफेक्ट बसणारा नवरा मुलगा या पृथ्वीतलावर असला तर पाहिजे ना! आणि असला तर त्यानंही हिला पसंत केलं पाहिजे ना? अगं, आता आलेलं स्थळ इतकं चांगलं होतं. मुलगा अमेरिकेत नोकरी करतोय. बोलण्या-वागण्यातही चांगला आहे. पण हिचा मात्र नन्नाचा पाढा! इतर मुली अमेरिकेला जाण्यासाठी वाट बघत असतात, तर ‘मी नोकरी सोडून तिथे जाणार नाही’ हे हिचं पालुपद कायम. आम्हाला इतका मनस्ताप होतो म्हणून सांगू! सगळी मुलं ही नाकारते हे पसरायला लागलं तर कुणी स्थळं तरी सुचवेल का? तू बोलून बघ बाई तिच्याशी.’’
आईचं बोलणं थांबतच नव्हतं. मी कानांवर हेडफोन चढवला. हा फोन शमामावशीला असणार. शमामावशी आईची जवळची मैत्रीण. ती मला लहानपणापासून ओळखते. तिच्याशी माझं जमतं हे खरं असलं, तरी आता मला तिच्याशीच काय, कुणाशीच बोलायचं नाही. तिचा फोन आता येत राहील. मी शमामावशीचा फोन नंबर थोडय़ा वेळापुरता ब्लॉक करून टाकला. मुलं बघायची का, असं आईबाबांनी विचारलं तेव्हा ‘हो’ म्हटलं ही चूक तर झाली नाही ना? मला लग्न करायचं होतं आणि कुणाबरोबर जमलंही नव्हतं. मग ‘अॅलरेंज मॅरेज’ हा एकच पर्याय डोळय़ांसमोर होता. पण प्रत्यक्षात योग्य मुलगा मिळणं एवढं अवघड असेल अशी मात्र कल्पना नव्हती. कमी का मुलं पाहून झाली आतापर्यंत? पण अजून एकही मनासारखा भेटला नाही. काही जणांच्या बाबतीत मीटिंग्ज झाल्या, पण त्या लग्नापर्यंत पुढे गेल्या नाहीत. अर्थात सगळय़ांनाच काही मी नकार दिला नाही. मुलांकडूनही नकार आलेच की! तरीही लग्न न ठरल्याचं खापर आईबाबा अजून माझ्यावरच फोडतात. ‘‘तुझे नखरेच खूप! अस्साच हवा आणि तस्साच हवा, अशा अपेक्षाच भरमसाट. तुला कुठली तडजोड करायला नको, पडतं घ्यायचं तर नावच नको,’’ असं येताजाता सुनावत असतात. मग हेडफोन लावण्याशिवाय कोणता पर्याय आहे?
तडजोडीचं महत्त्व मला कळत नाही का? मी नोकरी करतेय, मला प्रमोशन मिळतंय, टीम लीडर आहे, १५ जणांची टीम मी मॅनेज करतेय, ते इतरांना सांभाळून घेतल्याशिवाय शक्य होईल का? वैयक्तिक असो नाहीतर व्यावसायिक, संबंध टिकवून ठेवायचे असतील तर तडजोड करावी लागते, हे मला चांगलं माहीत आहे. पण हे ज्या गोष्टींवर तडजोड करायला सांगतात ते मला मान्य नाही.
आताच ज्यावरून खडाजंगी झाली त्या अमेरिकेतल्या मुलाशी मी तडजोड करावी असं त्यांना वाटतं. हा मुलगा ‘एच-वन बी’ व्हिसावर अमेरिकेत आहे. त्याच्याशी लग्न करायचं म्हणजे मला सध्याची नोकरी सोडावी लागणार. ‘डिपेंडंट’ व्हिसावर राहावं लागणार. आताच्या नोकरीच्या तोलामोलाची दुसरी नोकरी मिळणं तर सध्याच्या नोकरकपातीच्या परिस्थितीत फार मुश्कील आहे. थोडक्यात म्हणजे मला एकतर ‘हाऊस-वाइफ’ म्हणून राहावं लागेल, नाहीतर तिकडच्या कुठल्यातरी कोर्सला प्रवेश घेऊन काहीतरी शिकत बसावं लागेल. यातलं काहीही मला नको आहे. अशी भलतीसलती तडजोड करून केवळ लग्नासाठी माझं सध्याचं उंचावत जाणारं करिअर वाऱ्यावर उधळून देण्याची माझी तयारी नाही. असली तडजोड करण्यापेक्षा लग्न उशिरा झालं किंवा अगदी नाही झालं तरी हरकत नाही. पण आईबाबांना पटेल तर ना?
‘हल्लीची पिढी तडजोड करत नाही’ म्हणून खुशाल शिक्का मारून ते मोकळे होतात. पण त्यांच्या तडजोडीचे आणि आमच्या तडजोडीचे निकषच वेगळे आहेत, हे ते का लक्षात घेत नाहीत? आधी एकदा टक्कल पडलेल्या मुलाचं स्थळ आलं होतं तेव्हाही हेच! ‘तू तडजोड करत नाहीस’. त्यांचं आपलं एकच तुणतुणं- ‘हल्ली मुलांना लवकर वयातच टक्कल पडतं. वय वाढत चालल्यामुळे तुला आता मोठय़ा वयाची मुलं पाहावी लागतात ना. त्यांना टक्कल असणारच. त्यात काय एवढं मोठंसं? आणि समजा आता टक्कल नसलं आणि दोन वर्षांनी पडलं तर? त्याला सोडून देशील?’’
‘‘या कारणासाठी सोडून देण्याएवढी मी पोरकट नाही. पण ती नंतरची गोष्ट झाली. पण मला जर टक्कल आवडत नाही, तर मुद्दामहून असा मुलगा का बघा?’’‘‘बाकी सगळं जमत असेल तर त्या गोष्टीत तडजोड करायला काय हरकत आहे?’’ आई बाबा त्यांची बाजू लढवत म्हणाले होते, ‘‘पुरुषांमध्ये शारीरिक रूप बघायचं नसतं.’’
त्या परक्या मुलाची बाजू इतकी उचलून धरण्यापेक्षा पोटच्या मुलीची बाजू तिच्या नजरेतून पाहायचा जरा प्रयत्न तरी करा ना. मग कळेल तुम्हाला की तुमच्या दृष्टीनं बिनमहत्त्वाची असलेली गोष्ट माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. मला मुळीच नाही आवडत टक्कलवाला अकाली प्रौढ दिसणारा मुलगा! माझ्या ज्या काही ‘रोमान्स’च्या कल्पना आहेत त्यात टक्कलवाला मुलगा बसत नाही. त्याच्याकडे पाहून मला उमलून आल्यासारखंच वाटत नाही! शारीरिक रूप महत्त्वाचं नाही असं म्हणता, पण लग्नानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध येणारच ना? मग रूप कसं महत्त्वाचं नाही? आणि हा माझा असा वैयक्तिक निर्णय असू शकतो ना?.. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. त्याबदलही मीच दोषी. इतक्या मुलांना पाहण्याची मला काही हौस आहे का? त्यांच्याकडून नकार घेणं आणि त्यांना नकार देणं हे वेदनादायी असतं. पण नको ती तडजोड करून न आवडलेल्या मुलाच्या गळय़ात माळ बांधण्यापेक्षा या वेदना परवडल्या. पण जेव्हा जेव्हा मी एखाद्याला नकार देते, तेव्हा आईबाबा तो समजून तर घेणं दूरच, उलट माझ्याशी वादच घालत बसतात. एका मुलानं पहिलाच प्रश्न विचारला, की ‘‘तुला स्वयंपाक येतो का?’’ त्याची माझ्याकडून बायको म्हणून काय अपेक्षा आहे, हे इतकं लख्खपणे कळलं असताना उगाच त्याच्याशी पुढे बोलत राहण्यात हशील आहे का? पण नाही! आईबाबा परत परत रेटत राहिले की तू अजून त्याच्याशी बोललं पाहिजेस. इतक्या तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. मग परत वाद-विवाद.
या मुलाची ही तऱ्हा, तर दुसरा एक मुलगा भलताच ‘मॉडर्न’ निघाला. त्यानं दुसऱ्याच भेटीत मला सांगून टाकलं, की ‘‘एकनिष्ठता ही संकल्पना मला मान्य नाही. माझे इतर अनेकींशी संबंध आहेत आणि लग्नानंतरही ते तसेच चालू राहतील. तसे संबंध ठेवायला तूही मोकळी आहेस.’’ एका बाजूला त्याचे हे ‘आधुनिक’ विचार आणि दुसऱ्या बाजूला तो करत असणारा पारंपरिक पद्धतीच्या लग्नसंस्थेचा स्वीकार, यात मला विसंगती दिसू लागली. माझे कुठल्या मुलाशी लग्नापूर्वीही संबंध नाहीत, तर लग्नानंतर असण्याची शक्यता फारच दूर आहे. म्हणजे लग्नानंतर एकतर्फीपणे तो इतर स्त्रियांशी संबंध ठेवत राहणार आणि मी काही बोलले तर म्हणणार, की ‘बघ, मी आधीच नव्हतं का सांगितलं?’ लग्नानंतरही बाहेरख्यालीपणा करण्यासाठी याला राजरोस लायसन्स हवं आहे. मी त्याला नकार दिला. अर्थात आईबाबांना मोजकंच सांगितलं. पण नकार दिल्याबद्दल त्यांनी मलाच बोल लावले.
‘‘तुला पारंपरिकही नको आणि मॉडर्नही नको. हवा कसा तुला मुलगा मग? तुझ्या मनात अगदी स्वप्नातला राजकुमार असला तरी त्यानं पसंत करायला तू कोण मोठी स्वप्नसुंदरी लागून गेलीस?’’
‘‘मी स्वप्नसुंदरी नाही हे मला माहीत आहे, पण म्हणून जो समोर येईल त्याला डोळे मिटून हो म्हणू?’’
‘‘मग तूच शोध की तुला हवा तसा मुलगा! आमचा तरी त्रास वाचेल!’’
‘‘शोधतेच आहे. पण ते काय सोपं आहे हवा तसा मुलगा पुढय़ात येऊन उभा ठाकायला?’’
संभाषणाला असं वळण लागलं की आमच्यातला संवादच खुंटतो. हल्ली आईबाबांना माझ्याशी बोलायला लग्न हा एकच विषय उरलाय. आता या विषयात ते फक्त दोघंच नाहीत, तर आमचे नातेवाईक- काका-काकू, मामा-मामी, आजी-आजोबा, शमामावशी या सगळय़ांनाच त्यांनी यात ओढलंय. म्हणे ‘तुम्ही नेहाला समजावून सांगा!’ हे सगळे माझं बौद्धिक घेत बसतात, की लग्न वेळेवर करणं कसं महत्त्वाचं आहे. लग्नाची पसंती ही इतकी वैयक्तिक गोष्ट आहे, पण ती चव्हाटय़ावर आणून हे सगळे त्याची चर्चा करत बसतात ना, तेव्हा माझा संतापानं अगदी तिळपापड होतो. माझी ओळख फक्त लग्नापुरती संकुचित झाली आहे का?
हे सगळे माझ्याशी चर्चा करतात म्हणजे काय? ‘तुझ्या भल्यासाठी सांगतो’ असं सांगून लग्न वेळेवर झालं नसल्यामुळे एकटय़ा राहिलेल्या मुलींच्या करुण कहाण्या ऐकवतात. त्यांची कशी परवड झाली ते वर्णन करतात. पण चुकीच्या जोडीदाराची निवड केल्यामुळे जीवनाची वाताहात झाली आहे, अशाही स्त्रियांच्या हृदयद्रावक कहाण्या असतातच की! मग त्याही का नाही सांगत? स्वत:ला सोयीची अशी ‘सिलेक्टिव्ह’ उदाहरणंच का निवडतात? कदाचित अशा कहाण्यांत त्यांना स्वत:चीच उदाहरणं सापडतील. म्हणून त्याबद्दल मात्र अळीमिळी गुपचिळी!
म्हणून शांतपणे, एकटीनं बसावंसं वाटतंय मला. कुणाशीसुद्धा बोलू नये. मला जे वाटतंय, ते यातल्या कुणालाही कळणार नाही. पण निदान माझ्या जोडीदारानं तरी मला काय वाटतंय ते समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवली तर ती नक्कीच वाजवी आहे, नाही का?..
anjaleejoshi@gmail.com