सूर्याची सोनेरी किरणं गॅलरीत पसरली. समोरच्या आंब्याच्या झाडाची पानं आपली सावळी सावली त्या किरणांमध्ये हलतडुलत बागडू लागली. रोजचंच दिसणारं हे दृश्य, पण सुजाताला दोन कारणांनी हे फार आवडायचं. एकतर आंब्याच्या पानांच्या सावलीचा हलता खेळ आणि दुसरा छोटय़ा तेजाचे खेळते, बागडते पाय गॅलरीत पडणं. तिच्याबरोबर शुभमपण असायचा. तो मात्र गॅलरीच्या खालच्या पायरीजवळ उभं राहून सुजाता आणि तेजाला ‘बाय’ म्हणून गल्लीच्या टोकाशी असणाऱ्या त्याच्या घरी जायचा.
आताही सुजाता गॅलरीत आली. तेजा धावत सुजाताकडे आली, पण शुभम बाय न करताच सरळ त्याच्या घराकडे चालू लागला. तेजा रोजच्यासारखा तिचा हात धरून घरात शिरली नाही, तर एकटीच आत जाऊन बैठकीतल्या सोफ्यावर तिने दप्तर टाकून दिलं. ‘‘अगं, तेजा, हे काय? तुझं दप्तर तुझ्या खोलीत नेऊन ठेव.’’ ‘‘नाऽऽही. अजिबात नाही.’’ ‘‘का? आणि शुभम, बाय न करताच का गेला? भांडलात का दोघं?’’ ‘‘भांडलोबिंडलो काही नाही, पण आज शुभम मला ‘मूर्ख’ म्हणाला.’’ ‘‘हात्तिच्या इतकंच नं? तू आधी हातपाय धू आणि मग मला सांग, तो तुला मूर्ख का म्हणाला ते!’’
तेजा बाथरूमकडे पळाली. नऊ वर्षांची तेजा आणि ११ वर्षांचा शुभम. तसं दोघेही छोटेच. वयोमानानं तेजा जरा थोराड होती. शुभमची आणि तिची उंची सारखीच होती. शिवाय या वयातच तिच्या अंगावर मुलीच्या काही खाणाखुणा उमटू लागल्या होत्या. अर्थात तेजापेक्षा शुभम थोडा गंभीर होता. तेजाने फार बडबड केली की तो म्हणायचा, ‘‘तेजा, हे चॉकलेट खा. म्हणजे तुझं तोंड बंद होईल.’’ मग दोघं खळाळून हसायचे आणि चॉकलेट खात घरी पोहोचायचे.’’ पण आज हेही दृश्य दिसलं नाही. सुजाता विचार करायला लागली.
तेजा बाथरूममधून बाहेर आली आणि सोफ्यावर सुजाताजवळ बसली. ‘‘हं तेजा, आता सांग काय झालं? शुभम तुला मूर्ख म्हणाला म्हणून राग आला का?’’
‘‘अगं आई, तसं नाही, पण मघाशी आम्ही शाळेतून येत होतो नं, तेव्हा एका बाईजवळ छान बाळ होतं. आई, त्याचे केस खूप मस्त दिसत होते. शुभमलापण आवडले ते. मग मी शुभमला म्हटलं, ‘‘अरे, आपल्या घरात छोटं बाळ कसं येतं रे?’’ तर शुभम म्हणाला, ‘‘माझ्या आजीने सांगितलं आहे की ‘देवबाप्पा आपल्या घरी बाळ देतो. मग आपण त्याला चांगलं सांभाळतो. चांगलं सांभाळलं नाही तर देवबाप्पा बाळाला आजारी पाडतो. मग त्याला आई-बाबा डॉक्टरकडे नेतात, औषध देतात. मग देवबाप्पा बाळाला बरं करतो.’’ ‘‘अगं आई, मग तू मला खोटं कशाला सांगितलंस?’’
‘‘अगं, मी खरं तेच सांगितलं. पुन्हा सांगते, आई-बाबा घरात एकत्र असले की एक दिवस त्यांना बाळ मिळतं.’’ ‘‘पण मग नुसती तू असलीस तर नाही मिळणार बाळ?’’ ‘‘नाही. दोघं एकत्र हवेत.’’ ‘‘तेजा, तुला बाबापण आवडतात. कारण आमच्या दोघांमुळे तू आली आहेस. आता चल, दूध पिऊन घे.’’ तेजा जेव्हा दूध प्यायला बसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विचारांच्या लकेरी उमटताना जाणवत होत्या.
एक दिवस मध्ये गेला. रविवारची निवांत सकाळ उजाडली. तेजा आणि तिचे बाबा रविवारचा बाजार, खाऊ आणायला गेले आणि सुजाता स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आज संध्याकाळी तेजाला घेऊन ते ‘चिंटू’ बघायला जाणार होते. इतक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर दारात शुभमची आई! सुजाताला आश्चर्य वाटलं. ‘‘या!’’ म्हणत तिने शुभमच्या आईला घरात आणलं. स्वयंपाकघरात जाऊन सुजाताने गॅस बंद केला आणि ती बाहेर आली. सुजाताच्या लक्षात आलं की, शुभमच्या आईचा मूड फारसा चांगला नाही. म्हणून ती एकदम म्हणाली, ‘‘विजयाताई, काय काम काढलंत आज सकाळी सकाळी?’’ ‘‘काय करू? शुभम काल घरी आला आणि तो म्हणाला, ‘‘आई, छोटं बाळ आपल्या घरी केव्हा येतं?’’ मी म्हटलं, आजीनं तुला सांगितलं आहे नं की देवबाप्पा बाळाला देतो. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मग तेजाच्या आईने असं का सांगितलं? आणि मग त्याने तुम्ही जे तेजाला सांगितलं ते मला सांगितलं. तेजाची आई, तुम्ही इतक्या लहान मुलांना असलं काय सांगायचं?’’ आता सुजाताच्या लक्षात सगळा प्रकार आला. ती म्हणाली, ‘‘हे पाहा, मी तेजाला फार संयमित भाषेत सांगितलं आहे. जे सांगितलं ते सत्याच्या अगदी जवळचं आहे. त्यांच्या वयाला शोभणार नाही, असा कोणताच खुलासा मी केला नाही. फक्त थोडीशी कल्पना दिली.’’ ‘‘अहो पण, अशाने मुलांच्या डोक्यात काहीही कल्पनांचं पेव फुटेल आणि मुलं नको त्या विचारात गोंधळून जातील.’’ आता सुजातालाही थोडा राग आला. ती स्पष्टपणे म्हणाली, ‘‘अहो, बाळ दवाखान्यातून आणतात, हे तर सगळ्याच छोटय़ा मुलांना माहीत आहे. मग देवबाप्पा दवाखान्यात येतो का? एकाच वेळी इतकी बाळं तो कशी आणेल? मग आपल्याला का दिसत नाही? तेजा-शुभमसारख्या छोटय़ा मुलांना असलं काही सांगून न घडणाऱ्या, न दिसणाऱ्या गोष्टी सांगून काय उपयोग आहे? त्यापेक्षा आई-बाबा एकत्र राहिले की बाळ मिळतं हे सोपं उत्तर मला तरी योग्य वाटतं. थोडीशी वास्तवता व थोडेसे प्रत्यंतर हे अधिक चांगलं नाही का?’’
हल्ली लहान वयात मुलांना प्रेमप्रकरणं, परस्परांची जवळीक चांगलीच समजू लागली आहे. प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमातील स्त्री-पुरुष संबंधांतील भडकपणा त्यांच्या नेहमी डोळ्यांपुढे दिसत आहे. मधल्या वयातील मुलांसाठी लैंगिक शिक्षणाची जाणीव करून द्यायला हवी, असा एक डोळस विचार शालेय जगतात आला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीतील लैंगिक संबंधांचा उघडेपणा, इंग्रजी चित्रपट, मासिके, चित्रं, जाहिराती यांद्वारे मुलांसमोर येत आहे. एकदा आमच्याकडे टीव्हीवर चित्रपट चालू असताना शेजारची पाच वर्षांची मुलगी आली आणि सिनेमा बघू लागली. बघता बघता बंगल्यात उभी राहिलेली नायिका रस्त्यातून स्कूटरवर येणाऱ्या नायकाकडे बघत होती. हे दृश्य चालू असतानाच ती छोटी मुलगी माझ्याजवळ धावत आली आणि म्हणाली, ‘‘काकू काकू, आता ते दोघं नं माया करतील.’’ तिच्या या अचूक तर्कशक्तीपेक्षा मला तिचा ‘माया’ शब्द फार भावला. अंगभूत प्रेमप्रकरणाला या छोटय़ा मुलीने किती सोज्वळ नाव दिलं.
बदलत्या काळातील धोके लक्षात घेऊन थोडीशी जाण येणाऱ्या वयात मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. या शिक्षणाबरोबर स्वच्छता व शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून सगळ्या गोष्टी गांभीर्याने समजून द्यायला हव्यात. केवळ आकर्षणाच्या नादात आपले कर्तव्य, जबाबदारी आणि दूरगामी परिणाम याची जाणीवच नसते. कारण वयात तेवढी परिपक्वता नसते. अशा वेळी मुलांच्या आरोग्याच्या चांगल्या जाणिवांबरोबर, भावनांना चिकटून येणाऱ्या काही धोक्यांची जाणीव करून द्यायला हवी.
शालेय विद्यार्थ्यांना वयवाढीतील बदल आणि धोके यांची शैक्षणिक जाणीव द्यावी, हा विचार शालेय शैक्षणिक जगतात मांडण्यात आला. एका शाळेत कार्यक्रमानिमित्त गेले असताना एका शिक्षकाने एक छोटेसे रोपटे, त्याचे मोठे होणे, त्याला कळी येणे, मग फूल येणे अशा चार आकृत्या काढल्या होत्या. खाली पुंकेसर, स्त्रीकेसर यांची माहिती देऊन शेवटी पुन्हा एक मोठं फूल काढून त्यात हसणारी छोटी मुलगी दाखविली होती. मी ते चित्र बघत असताना सुदैवाने ते चित्रकार शिक्षक तिथेच होते. मी हसले तेव्हा ते म्हणाले, ‘‘आवडलं का चित्र?’’ ‘‘फारच आवडलं. चित्रातली सूचकता मला पटली. आता हाच आधार घेऊन शिक्षकाला अनेक प्रकारे स्पष्टीकरणात्मक ज्ञान देता येईल.’’ एका शाळेत कोंबडी, कोंबडा आणि अंड असं चित्रं काढलं होतं. मुलांचं मन अतार्किक न होता सतर्क व्हावं म्हणून अशा सूचकतेतून स्पष्टपणे नव्हे तर सभ्यपणे मुलांना ज्ञान देता येईल. नाहीतर आमच्या दूधवालीचं म्हणणं पाहा. ‘‘काय गं? इतक्या लहानपणी तुमच्या खेडय़ात मुलींची लग्न करतात, त्यांना संसाराच्या जबाबदाऱ्या नीट समजतात का,’’ माझा तिला हा सभ्य प्रश्न! तर ती म्हणाली, ‘‘न समजाया काय झालं? लहानपणापासून गुरांमागे फिरत्यात, गुरांची समदी रीत पोरीस्नी समजतेया अन् दुधाचा धंदा डोळ्यांम्होरच असतो नव्हं का? आमच्या पोरी मस्त तयार व्हतात अन् टुकीनं संसार करत्यात. तुमच्या शहरासारखी आमच्या खेडय़ात ढीगभर काडीमोड व्हत न्हायी.’’ तिच्या ‘ठाक्क ठिक्क’ उत्तराकडे मी आश्चर्य आणि हसत बघतच राहिले. संभ्रम आणि खुलासा दोन्ही माझ्या ओंजळीत आलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा