प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com
कच्छच्या रणरणत्या रखरखीत हवेत गारवा आणण्याचं काम येथील घरं करतात, भुंगा म्हटलं जाणाऱ्या या घरांच्या भिंतीवरील लिपनकाम ही रबारी जमातींची पारंपरिक कला आहे. या कलेत माती, शेण, आरसे यांच्या साहाय्यानं सुंदर, कलात्मक आकार भिंतींवर तयार केले जातात. वरिष्ठ चित्रकर्ती साराबेन मारा यांनी ही कलापरंपरा, ‘मडवर्क’ जतन केले असून ती इतर स्त्रियांपर्यंत पोहचवून त्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
गुजराथमधील कच्छचं रण जितकं रखरखीत, रुक्ष, तितकेच तिथले लोक रंगांवर प्रेम करणारे, सर्जनशील कलावंत आहेत. इथल्या शुभ्र रणाकडे जाताना आजुबाजूच्या छोटय़ा-छोटय़ा गावांत- गोरेवाडी, होडका, खावड आदीमध्ये सुंदर, विशिष्ट आकाराची घरं आपलं लक्ष वेधून घेतात. या घरांची रचना नेहमीच्या घरांपेक्षा वेगळी आहे. दूूरवरून पाहिल्यावर मला पावसाळी छत्र्यांची आठवण आली. ही घरं म्हणजे कच्छ वाळवंटाची ओळख आहे. या घरांना ‘भुंगा’ असं म्हणतात.
चिखलात घडविलेल्या या घराचा आकार दंडगोलाकृती असतो. त्याचं छप्पर गवताचं असतं. छपराचा आकार शंकूकार असून बांबूच्या पट्टय़ा, गवताच्या दोरखंडानं बांधून ते बनवलं जातं. आतल्या भिंतीसुद्धा गवताच्या पट्टय़ांनी बनवून, त्यात गवत भरलं जातं आणि वरून माती आणि शेण यांच्या मिश्रणाचा थर दिला जातो. अचानक येणाऱ्या भूकंपापासून होणारं नुकसान या घरांच्या विशिष्ट रचनेमुळे होत नाही. ही रचना अखंड असते. खिडक्या छोटय़ा, भिंती फारशा जाडजूड नसतात. आतील गवतामुळे त्या हलक्या वजनाच्या असतात, तर छोटय़ा खिडक्यांमुळे वाळूच्या वादळापासूनही संरक्षण होतं. कमालीच्या उन्हाळ्यातही हे ‘भुंगा’ आतून वातानुकूलित वाटतं. हा थंडावा येतो त्याचं मुख्य कारण त्याची विशिष्ट रचना हे तर आहेच, पण याला बाहेरच्या भिंतीवर केलं जाणारं माती आणि शेणाचं मिश्रण केलेलं विशिष्ट प्रकारचं लिंपणसुद्धा कारणीभूत आहे. पाच, सहा ‘भुंगा’ मिळून एक घर बनतं. घराचा परीघ अठरा ते चोवीस फूट असतो. बैठकीची खोली, शयनगृह, स्वयंपाकघर, मुलांची खोली, धान्य साठवण्याचं कोठार असे वेगवेगळे ‘भुंगा’ मिळून एका कुटुंबाचं घर बनतं. दोन ‘भुंगा’ एकमेकांपासून साधारणत: १० ते १५ पावलांवर असतात. समोर मोकळं अंगण असतं. भुंगांच्या बाहेरील भिंतीवरील लिंपणाला इथे ‘चितरकाम’ किंवा ‘लिंपनकाम’ असं म्हणतात. ही फार पुरातन कलापरंपरा असून तिची सुरुवात कधी आणि कोणी केली याविषयी माहिती उपलब्ध नाही. २००१ मध्ये कच्छमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला. त्या वेळी आधुनिक पद्धतीच्या इमारती जमीनदोस्त झाल्या, पण ‘भुंगा’ मात्र सुस्थितीत राहिले. भुंगाच्या भिंतीवरील लिंपनकाम/ लिपनकाम ही रबारी जमतींची पारंपरिक कला आहे. या कलेत माती, शेण, आरसे (आभला) यांच्या साहाय्यानं सुंदर, कलात्मक आकार भिंतींवर तयार केले जातात. याचीच आधुनिक आवृत्ती म्हणजे ‘मडवर्क’- जे प्लायवूडवर केलं जातं.
लिपनकामात भिंतीला चिकणमातीचा लेप देतात पण तो पृष्ठभाग नितळ ठेवत नाहीत. याचं कारण असं, की मातीत काम करताना जेव्हा पृष्ठभागावर एखादा आकार चिकटवायचा असतो, त्यावेळी दोन्ही पृष्ठभाग गुळगुळीतअसतील तर माती वाळल्यावर तो आकार गळून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे काम करताना माती ओली असताना काळजी घ्यावी लागते. यात चिकटवण्यासाठी गोंद वापरला जात नाही. मातीच थोडीशी पातळ करुन वापरतात. चिकणमाती (‘क्ले’) आणि उंट किंवा जंगली गाढवाचं शेण यांचं ठरावीक प्रमाण असतं. निम्मी चिकणमाती आणि निम्मं शेण असं एकत्र करून चांगलं मळून घेतात. काही ठिकाणी शेणाऐवजी बाजरीचा भुसा वापरतात, कारण शेणाला वाळवी लागण्याची शक्यता असते. कामाला प्रारंभ करण्यापूर्वी मातीची भिंत ओलसर केली जाते. तिच्यावर मातीचा लेप देऊन पृष्ठभाग खडबडीत करतात. नंतर माती आणि शेणमिश्रित छोटासा गोळा तळहातावर किंवा जमिनीवर ठेवून भिन्न-भिन्न जाडी असलेले दोरीसारखे आकार (वळ्या) भिंतीवर चिकटवतात- अर्थात लावतात. रबारी स्त्रिया पारंपरिक भरतकामासाठी प्रसिद्ध आहेतच. हे ‘लिपन’ही त्या कौशल्यपूर्ण करतात. या कामाला सुरुवात करण्यापूर्वी कोणतंही कच्चं रेखाटन किंवा आकार छापून घ्यावे अशी त्यांना जरुरी भासत नाही. भरतकामातील मोर, फुलं-पानं, हत्ती, उंट, पाणी वाहणाऱ्या स्त्रिया, ताक घुसळणाऱ्या स्त्रिया असे दैनंदिन जीवनातले प्रसंग, आंब्याची, खजुराची झाडं हे आकार सहजतेने त्या लिपनकामात करतात. काही वेळा भौमितिक आकारही करतात. हे ‘चितरकाम’ ओलसर असतानाच त्यात छोटे छोटे आरशाचे तुकडे बसवले जातात. त्रिकोणी, चौकोनी, वर्तुळाकार असे आकार असलेल्या या तुकडय़ांना ‘आभला’ म्हणतात. कधी कधी हे लिपनकाम पांढरं ठेवतात, तर कधी कधी लाल, हिरवा अशा भडक रंगांनी काही भाग रंगवून बाकीचा पांढरा ठेवतात.
कच्छमधील वेगवेगळ्या जमाती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हं आणि आकार वापरतात. हे आकार भौमितिक किंवा चित्रांच्या स्वरूपात असले तरी लक्षवेधी असतात. येथील मुस्लीम जमातींच्या चित्रात मनुष्याकृती, प्राणी, पक्षी आढळतात. ‘भुंगा’वरील हे लिपनकाम विशिष्ट ठिकाणी करतात. दरवाजावरील भिंत, कोनाडे यावर ते दिसतं. याखेरीज धान्याचं मोठं कोठार – ‘कोठलो’, पिंपासारखी दंडगोलाकृती आणि रोज लागणारं धान्य ठेवण्याची ‘कोठी’. ही कोठी म्हणजे एक सुंदर कलाकृतीच वाटते. मातीचा, भांडी ठेवण्याचा चौथरा – त्याला ‘उतरोनी’ असं म्हणतात. याखेरीज एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येईल अशी चूल जिथे ठेवतात ती जागा, छोटय़ा मुलांची खोली, फडताळ, ‘सनजिरो’ म्हणजे दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवण्याचं कपाट- ज्याला एक कुलूप लावून ठेवतात आणि आत एका मडक्यात सगळा ऐवज ठेवून देतात. अशा प्रत्येक ठिकाणी लिपनकाम केलेलं दिसतं. जमिनीवर हाताचे तळवे आणि बोटं दाबून पोत करतात. त्याला त्यांच्या भाषेत ‘ओकिल’ असं म्हणतात. यातही आरसे- आभला बसवतात. घराच्या आतील भिंतीवर आरसे बसवल्यामुळे रात्री एकच दिवा लावला तरी या आभलांमुळे त्याचा प्रकाश परावर्तित होऊन संपूर्ण घर उजळून निघतं.
हे चितरकाम करताना कुटुंबातील सर्वजण, शेजारीपाजारी एकत्र येतात. पुरुष माती आणून देण्याचं काम करतात, तर स्त्रिया लिपनकाम करतात. हे करताना एकमेकींची चेष्टामस्करी चालते. एक आनंदी, सहकार्याचं वातावरण असतं. पण आता हळूहळू ही मजा, हे आनंदी वातावरण बदलू लागलं आहे. याचं कारण सिमेंट-काँक्रीटच्या घरांनी ‘भुंगा’ची जागा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चितरकाम किंवा लिपनकामही पूर्वीसारखं होत नाही.
पण ही कला थोडीशी वेगळ्या स्वरूपात जपण्याचं काम भूजमधील एक वरिष्ठ चित्रकर्ती करीत आहेत. त्यांचं नाव आहे साराबेन मारा. साराबेनचा जन्म कुंभार कुटुंबात झाल्यामुळे लहानपणापासून त्या मातीत वस्तू बनवतच मोठय़ा झाल्या. त्यांचे वडील इस्माईल सिद्दीक बुजर्ग हे विविध प्रकारची मातीची भांडी पारंपरिक पद्धतीनं बनवत असत. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना १९८२ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. आईनं आपल्याला कलेची देणगी दिली, असं साराबेन अभिमानानं सांगतात. कारण त्यांची आई आयेशाबेन बुजर्ग यांनाही इंदिरा गांधी यांच्या हस्ते एका विशिष्ट पारंपरिक कलेसाठी पुरस्कार मिळाला होता. त्याच कलेचा वारसा त्यात नवनवीन भर घालून साराबेन अजून पुढे नेत आहेत. कच्छमधील सर्व जातींच्या विवाहप्रसंगी, विधी सुरू असताना, एकावर एक लहान लहान होत जाणाऱ्या नऊ मडक्यांची रचना दोन्ही बाजूला ठेवली जाते. यातलं सर्वात शेवटचं मडकं लहान असून ते वरती असतं. त्यात ‘श्रीफळ’ ठेवलं जातं. या मडक्यांवर विशिष्ट प्रकारचं नक्षीकाम केलं जातं, त्याला ‘चोरीकाम’ असं नाव आहे. बांबूच्या पट्टीपासून ब्रश बनवून त्यानं आणि नैसर्गिक रंगांनी हे काम करण्यात येई. आयेशाबेन या पारंपरिक कलेत वाकबगार होत्या. पण अलीकडे मातीच्या मडक्यांऐवजी स्टीलची मडकी ठेवतात. त्यामुळे ही ‘चोरीकाम कला’ क्वचितच पाहायला मिळते, असं साराबेन म्हणतात.
साराबेन यांचा विवाह अब्दुल रहमान मारा यांच्याशी झाला. ते ‘भुंगा’ घरं बनवण्यात कुशल. त्यांनी पत्नीला खूप प्रोत्साहन आणि सहकार्य दिलं. आईकडून आलेला ‘मडवर्क’चा वारसा या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन बनलं आहे. पूर्वी सिमेंटच्या पत्र्यावर केलं जाणारं हे काम टिकाऊ नसल्यानं आता प्लायवूडवर केलं जातं. २००१ मध्ये कच्छमध्ये मोठा भूकंप झाला. त्या वेळी अस्वस्थ मनस्थिती झालेल्या अनेक स्त्रिया, तरुण मुलं यांना साराबाईंनी आपल्याकडे बोलावून ही कला विनामूल्य शिकविली आणि आज अनेक स्त्रिया घरी बसून हे काम करत आहेत. संसाराला हातभार लावत आहेत. या कामात हव्या असलेल्या आकारांसाठी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा आकारांत प्लायवूड कापून त्यावर बाजारात मिळणारा गोंद लावतात. त्यावर लिपनकामाप्रमाणे भूजच्या पिवळसर सोनेरी मातीच्या वळ्यांच्या साहाय्यानं नक्षीकाम करतात. या मातीत शेणाऐवजी लाकडी भूसा, खडूची भूकटी मिसळतात. त्यानंतर आभला गोंदाच्या साहाय्याने चिकटवतात आणि नंतर बाजारात मिळणाऱ्या तयार अॅक्रेलिक रंगांनी कलाकृती रंगवतात. या मडवर्कचं वैशिष्टय़ म्हणजे हे अत्यंत टिकाऊ असतं. पाच-सहा फुटांवरून खाली टाकलं तरी ते तुटत नाही. पाण्यानं धुऊन स्वच्छ करता येतं. त्यामुळे भूजमध्ये आधुनिक घरांच्या भिंती, मोठमोठी हॉटेल्स या ठिकाणी अलीकडे खूप मोठय़ा प्रमाणात हे ‘मडवर्क’ दिसतं.
साराबाईंची स्वत:ची कार्यशाळा आहे. तिथे त्या विविध प्रयोग करत असतात. त्यांची वयाची साठी ओलांडली असूनही उत्साह वाखाणण्याजोगा आहे. या कार्यशाळेत त्या सकाळी दहा वाजता येतात आणि रात्री दहापर्यंत काम करतात. मोठमोठय़ा मातीच्या भांडय़ांवर लिपनकाम करतात. त्यांनी आठ फूट बाय आठ फुटाचेही लिपनकाम केले आहे. त्यांनी अनेकांना हे तंत्र शिकवून त्यांचं स्वतंत्र कामही सुरू झालं आहे. अनेक स्त्रिया आपलं घर यावर चालवतात याचं समाधान साराबेनना आहे.
अलीकडे ‘मडवर्क’ शिकवण्याचे अनेक छंदवर्ग सुरू आहेत. सर्व आधुनिक साहित्याचा उपयोग करून केलेली ही चित्रं मात्र करकरीत, यांत्रिक, कृत्रिम वाटतात. कधी कधी जमिनीवर लावण्याच्या फरशीप्रमाणे दिसतात. चितरकाम, लिपनकामाची सहजता यात दिसत नाही. मात्र साराबेन यांचं काम पारंपरिक कामातून विकसित झाल्यामुळे त्यात वेगळंच आकर्षक सौंदर्य आहे. अलीकडचं ‘मडवर्क’ पाहिल्यावर साराबाईंच्या पश्चात हे पारंपरिक चितरकामाचं सौंदर्य टिकेल का, अशी शंका मनात आल्याशिवाय राहात नाही.
विशेष आभार- अंजना मनोज दांडेकर