प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

हातमागावर कापड विणणं ही आपली पारंपरिक प्राचीन कला. भारतात शेतीनंतर हातमागावर वस्त्र विणणं हा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर येतो. फार पूर्वी स्त्रियांना हातमागावर वस्त्र विणण्याची परवानगी नव्हती. राजीबेनसारख्या स्त्रियांनी उदरनिर्वाहाची  गरज म्हणून कापड विणण्याला सुरुवात केली खरी, परंतु त्यात नवनवीन प्रयोग करत थेट जागतिक स्तरावर आपली  कला नेली. प्लास्टिक विणकामाला नवीन चेहरा मिळवून दिला. आज त्यांचं नाव एक ‘ब्रँड नेम’ झालं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत १८ वर्षांच्या कृष्णानेही अनेक अडचणींवर मात करत ही पारंपरिक कला फक्त टिकवलीच नाही तर तिची आजच्या काळाशी सांगड घातली. हातमागाची कला आणि या दोन चित्रकर्तीविषयी..

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Indus Culture, Thane , Joshi-Bedekar College
ठाण्यातील नागरिकांना घडणार सिंधु संस्कृतीचे दर्शन, जोशी-बेडेकर महाविद्यालयात साकारले सिंधु संकृतीचे प्रदर्शन
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
mumbai police busts gang printing and selling fake Indian currency notes
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
How the practice of removing shirts in Kerala temples began
Temple dress code reform: केरळच्या मंदिरात शर्ट काढण्याची प्रथा कशी सुरू झाली?
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार

फेब्रुवारी २०२०च्या एका दुपारी दोनच्या सुमारास कच्छमधील अवंतीपूरच्या राजीबेनकडे पोहोचले. त्या हातमागावर होत्या. त्यांच्याभोवती आठ ते दहा तरुण-तरुणींचा घोळका. हे सारे दिल्लीच्या फॅशन डिझायनिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. प्रत्येक जण आपला प्रकल्प घेऊन राजीबेनकडे आला होता. राजीबेन त्यांना काही विणून दाखवत त्यांच्याशी चर्चा करत होत्या. हे दृश्य पाहिल्यावर राजीबेन यांचं शालेय शिक्षण इयत्ता दुसरीपर्यंत झालं आहे यावर विश्वास बसेना.

त्या राजीबेन मुरजी वनकर.  हातमाग आणि विणकाम या विषयावर त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टींची नव्यानं ओळख झाली. प्राचीन भारतात विणकाम करणारा एक स्वतंत्र वर्ग, विणकर समाज होता. संत कबीरही विणकाम करत. त्या  माहिती देत होत्या.. ‘‘फक्त हात तसंच हातपाय दोन्ही वापरून चालवता येणारा माग अर्थात हातमाग. हातमागाची साधारणपणे सुती धागा वापरून विणकाम करणारे माग, खरा किंवा कृत्रिम रेशमी धागा वापरून, तसंच लोकरीचं विणकाम करणारे माग अशी वर्गवारी असते.’’ लोकरीचं विणकाम करणारे माग माफक प्रमाणात कापड निर्माण करतात. सुताचे उभे धागे ताणात ठेवून आडव्या धाग्यांनी (बाणा) विणणं, हे काम माग करतो. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या आकारमानाचे माग आढळतात. भारतात शेतीनंतर हातमागावर वस्त्र विणणं हा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर येतो. काश्मीर, बनारस (वाराणसी), आसाम, कर्नाटक अशा प्रत्येक राज्याची काही ना काही वैशिष्टय़ं या हातमागावरील वस्त्रांत आढळतात. ७ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा केला जातो. सुप्रसिद्ध सूफी गायक, संगीतकार आणि कवी अमीर खुस्रो यांनी भारतीय मलमल वस्त्राचं वर्णन ‘वाहतं पाणी’, ‘विणलेली हवा’ आणि ‘दवबिंदू’ अशा शब्दांमध्ये केलं आहे. सिंधू संस्कृतीमध्येही विणलेल्या वस्त्रांचे नमुने आढळल्याचं सांगितलं जातं.  तर पहिला लेखी पुरावा वेदांमध्ये आढळलेला आहे. यावरून ही हातमागावर वस्त्र विणण्याची कला किती प्राचीन आहे याची कल्पना येते. बौद्धकालीन लेखी पुराव्यांत लोकरी गालिच्यांचा उल्लेख आढळतो.

राजीबेन वनकर या विणकर समाजातल्या असून त्यांच्या लहानपणी स्त्रियांना हातमागावर बसून वस्त्र विणण्याची परवानगी नव्हती. स्त्रिया मदतनीस म्हणून काम करत असत. राजीबेन यांचे वडील उत्तम विणकर होते. ते शेतीही करत. गरिबीमुळे त्यांनी राजीबेनना दुसरीपर्यंत शिकवलं आणि लग्नही लवकर करून दिलं. पण  हातमागावर वस्त्र विणण्याची कला त्या काळात शिकवली हे विशेष. सतराव्या वर्षी लग्न झालेल्या राजीबेन आपल्या पतीबरोबर (मुरजीभाई) कच्छला आल्या, परंतु २००१ च्या भूकंपामुळे कच्छ सोडून त्या अवधपूरला आल्या. मुरजीभाई गवंडी काम करत आणि राजीबेन घरी मुलांना सांभाळत. फावल्या वेळात इतर स्त्रियांप्रमाणे त्या गोधडी शिवत. अवधपूरला त्यांचं कुटुंब स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर असतानाच, त्यांच्या पतीचा मृत्यू झाला साहजिकच तीन मुलांना मोठं करण्यासाठी राजीबेन मोलमजुरी करू लागल्या. सत्तर रुपये रोजगारावर दोन र्वष त्यांनी मजुरी केली.  गावातले ज्येष्ठ विणकर केशवजी काकांना राजीबेनच्या विणकाम कलेची माहिती होती. त्यांनी ‘खमिर’ या स्वयंसेवी संस्थेत त्यांना प्रवेश घेऊन दिला. ‘खमिर’ म्हणजे पारंपरिक कारागिरांची कर्मभूमी आहे. ‘कच्छ हेरिटेज, आर्ट, म्युझिक, इन्फॉर्मेशन अँड रिसोर्सेस’ म्हणजे Khamir. या संस्थेत अनेक देशी-परदेशी कलावंत, अभ्यासक येतात. तिथे अल्प दरात राहाण्याची, जेवणाची सोय होऊ शकते. गावातल्या अनेक स्त्रिया इथे काम करण्यासाठी येतात. इथे सतत नवनवीन कल्पना, प्रयोग, विचारांची देवाणघेवाण सुरू असते. पारंपरिक कला टिकवणं महत्त्वाचं असलं, तरी त्या कलांची सांगड समकालीन कलाप्रवाहांशी घालणंही तितकंच महत्त्वाचं असतं हा ‘खमिर’चा विचारप्रवाह आहे.

राजीबेन हातमागावर सूती कपडे विणण्यात कुशल होत्या. इथे आल्यावर त्या पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांपासून वस्त्र विणायला शिकल्या. हे काम थोडं गुंतागुंतीचं आणि वेळखाऊ होतं. गोळा करून आणलेल्या पॉलिथिन पिशव्या रंगांनुसार वेगवेगळ्या करून, जंतुनाशकानं स्वच्छ करून, वाळवून त्यांच्या समान मापाच्या पट्टय़ा कापून घ्यायच्या, त्यानंतर त्या गुंडाळून त्यांची रंगानुसार गुंडी (बंडल) बनवायची. त्यानंतर हातमागावर त्याचं वस्त्र विणायचं. राजीबेनना या कामाची खूपच मनापासून आवड होती. एकदा ‘खमिर’मध्ये

कॅ टेल गिलबर्ट हे फ्रें च डिझायनर आले होते. त्यांनी राजीबेनना हे ‘प्लास्टिक विव्हिंग’ शिकवलं. त्यांच्याकडे असलेली प्लास्टिकचं विणकाम असलेली बॅग पाहिल्यावर आपणही असं करायला हवं, हा विचार राजीबेननं पक्का केला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. ‘खमिर’मध्ये त्यांनी प्लास्टिक विणकामाला नवीन चेहरा मिळवून दिला. लोकांशी संवाद साधू लागल्या. प्रशिक्षण देण्याचं काम करू लागल्या. नवनवीन नक्षीकामाचे नमुने तयार करू लागल्या. ‘खमिर’ला ‘नाबार्ड’कडून ‘बेस्ट एन.जी.ओ.’ पुरस्कार मिळाला आहे.  इंग्लंडमधील वेल्समध्ये एका प्रकल्पाच्या निमित्तानं जाण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे असताना तिथल्या स्थानिक कारागिरांकडून त्यांनी नव्या गोष्टी शिकून घेतल्या आणि भारतात परत आल्यावर आपल्या कामात एक विशिष्ट उंची गाठण्यात त्या यशस्वी झाल्या.

‘परिसरातील प्लास्टिकची सद्य:परिस्थिती आणि प्लास्टिकचं भविष्य याचा पुनर्विचार’ या विषयावरील ‘नाबार्ड’तर्फे आयोजित परिषदेत प्लास्टिक पिशव्यांपासून विविध कलात्मक आणि उपयुक्त वस्तू बनवणारी उद्योजक या नात्यानं आपला प्रवास सांगणारं सादरीकरण राजीबेननं केलं आणि त्या परीक्षकांच्या स्तुतीस पात्र ठरल्या. राजीबेन यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा आणि आपली प्रगती साधण्याचा निर्णय घेतला. ‘खमिर’ संस्थेनंही त्याला पूर्ण संमती दिली आणि सहकार्य केलं. आज त्या एक ‘बँड्र नेम’ झाल्या आहेत. अहमदाबाद कलादालनात त्यांच्या कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन आयोजित के लं जातं. जागतिक पातळीवर त्यांच्या वस्तूंचे अनेक ग्राहक आहेत. ‘फेसबुक पेज’वरही त्यांनी लोकप्रियता मिळविली आहे. नीलेश प्रियदर्शन यांच्या ‘कारीगर क्लिनिक’चं उत्तम मार्गदर्शन त्यांना मिळालं आहे. राजीबेन यांची कहाणी अनेक स्त्रियांना प्रेरणा देते. जीवनात अनेक अडचणी येऊनही राजीबेननं आपल्या मुलांना उत्तमरीत्या वाढवलं. मुलगी पूजा उच्च शिक्षण घेते आहे. तिला आईचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. मोठा मुलगा एका कंपनीत नोकरी करतो, तर धाकटा आईच्या कामात मदत करतो. अनेक स्त्रियांनी एकत्र येऊन हे काम करावं आणि अडीअडचणींवर मात करून समाजात मानाचं स्थान मिळवावं असं त्यांना मनापासून वाटतं. आताही अनेक अशिक्षित बायका गावातून, कंपन्यांतून प्लास्टिक पिशव्या गोळा करून आणतात. एका किलोचे त्यांना दीडशे रुपये मिळतात. एक पॉलिथिन बॅग परिसरातून उचलली तरी पर्यावरण वाचवायला मदत होते. राजीबेन म्हणतात, ‘‘पैसा मिळवणं हा हेतू आहेच, पण त्याहीपेक्षा पर्यावरण वाचवायला मदत होते हे समाधान मोठं आहे.’’

कच्छमधील सरली नावाच्या गावातील अठरा वर्षांची कृष्णा वेलजी वनकर नामवंत डिझायनर होण्याचं स्वप्न पाहात आहे. सुरुवातीला ती फक्त कापड विणत असे. आता मात्र साडय़ाही विणते. तिची पिढी ही या व्यवसायातील चौथी पिढी आहे. ती सांगते, ‘‘माझे आजोबा विणकर होते. ते रबारी धाबळा (पांघरण्यासाठी वापरायचं लोकरी ब्लँकेट) बनवीत असत. हातमाग छोटा असल्यामुळे ते दोन भाग बनवून हातानं सुईदोऱ्यानं जोडत. या जोडण्याच्या टाक्यांना ‘मझली काटा’ म्हणतात.’’ कृष्णाचे वडील आणि मोठा भाऊ ‘खमिर’मध्ये हातमागावर वस्त्र विणण्याचं काम करत. ती सात वर्षांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला.  कृष्णा एकत्र कुटुंबात वाढली. घरातले सारेच विणकर. त्यामुळे ती याच वातावरणात मोठी झाली. ‘सोमय्या कला विद्या’मधून (एसके व्ही) तिच्या चुलत भावाने, सुभाषने पदवीधर होऊन उत्तम डिझायनर म्हणून नाव कमावलं आहे. तिच्या बहिणीही विणकर आहेत. कृष्णाच्या सरली गावात आठवीपर्यंतच  शिक्षणाची सोय असल्यामुळे तिला शिक्षण आठवीतच थांबवावं लागलं आणि तिनं हातमागावर सराव करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती फक्त ‘काला कॉटन’ म्हणजे हातानं चरख्यावर काढलेल्या सुताचे कपडे आणि ‘यार्डेज’ म्हणजे सुती कापड विणत असे. त्यानंतर ‘एसकेव्ही’मध्ये एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण तिनं केला आणि ती दुपट्टे, साडय़ा विणू लागली. ‘‘चांगला विणकर बिनचूक आणि सौंदर्यपूर्ण डिझाईन्स बनवतो, जे बनवलं की विणकरालाही समाधान मिळतं.’’ असं कृष्णा म्हणते. तिचे आजोबा, वडील त्यांच्या व्यवसायात निपुण आणि शिस्त पाळणारे होते. तेच तिचे आदर्श आहेत. ‘‘भविष्यात विणकामात मी नवनवीन डिझाइन्स करीन, पण ते करताना दर्जा उत्तम राहील याची निश्चितच काळजी घेईन,’’ असं ती आत्मविश्वासानं सांगते. कृष्णाला गुंतागुंतीचं नाजूक नक्षीकाम करायला खूप आवडतं. उत्तम डिझायनर होऊन कुटुंबाचं, गावाचं नाव प्रकाशात आणायचं तिचं स्वप्न आहे. तिला स्वत:चं काम जागतिक पातळीवर न्यायचं आहे. या वयातही तिचं काम उत्तम आहे. ती निश्चितच यशस्वी होईल याची ते पाहून खात्री पटते.

इयत्ता दुसरी उत्तीर्ण राजीबेन जागतिक पातळीवर पोहोचल्या आणि आठवीपर्यंत शिकलेली अठरा वर्षांची कृष्णा त्याच दिशेनं वाटचाल करते आहे. केवळ परंपरा न जपता या दोन्ही विणकर स्त्रिया नवीन दिशेनं वाटचाल करीत आहेत. राजीबेन पर्यावरणाचा तोल सांभाळायलाही हातभार लावत आहेत.

या दोघींकडे पाहिल्यावर एकच विचार मनात येतो. सगळ्यांच्या माथी एकच अभ्यासक्रम मारून आपण काय साधतो? याउलट आपल्या आवडत्या, पारंपरिक विषयाचा अभ्यास आणि व्यवसाय करणाऱ्या या दोन स्त्रिया शालेय शिक्षण पूर्ण न करताही एकाच विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे जागतिक स्तरावर आपली कला पोहोचवू शकल्या आहेत. आपल्या आवडीचा विषय व्यवसाय म्हणून मिळण्याचं भाग्य सर्वाना मिळो ही सदिच्छा!

विशेष आभार-  नीलेश प्रियदर्शन (कच्छ)

Story img Loader