आजच्या आपल्या प्रत्येकावर भावनात्मक दबाव एवढा वाढला आहे की, शरीर कुठल्या ना कुठल्या व्याधीने त्रस्त असतेच. याचे कारण मन, बुद्धी, संस्कार यांनी युक्त असलेल्या आत्म्याचे ध्यान आम्ही ठेवले नाही, त्यामुळे सगळ्या समस्या सुरू झाल्या. आम्ही अस्वस्थता अनुभवतो. आम्ही लवकर थकतो. कारण एक गोष्ट आपण साऱ्यांनीच नजरेआड केली, प्रसन्नता! म्हणूनच आनंद हवा मनी.
मागील लेखात (४ जानेवारी) आपण पाहिले की शारीरिक व मानसिक स्वास्थ्य दोन्हीही महत्त्वाचे आहेत. शारीरिक स्वास्थ्य मिळवायचे असेल तर साधी सोपी गोष्ट म्हणजे मी व्यायाम सुरू केला पाहिजे. पण ही गोष्टदेखील आपण एखाद्या तणावासारखी घेतो. मी काय खायचे? कुठल्या वेळी आणि किती खायचे? किती वेळ व्यायाम करायचा? नको तितके प्रश्न. याची खरंच गरज आहे का?
आम्हाला जास्त मागे जाण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त एक-दोन पिढय़ा मागे जाऊया. आणि आपल्या वाड-वडिलांना अभ्यासू या. ते कधीच जॉिगगला गेले नाहीत. ते कधी मिनरल वॉटर प्यायले नाहीत. त्यावेळेस तर जेवणही साधेच असायचे. नुसती चटणी भाकरीसुद्धा ते खाऊन राहिल्याचे सांगितले जाते. तरीही ते तंदुरुस्त असायचे, मग आपले काय?
आजच्या आपल्या प्रत्येकावर भावनात्मक दबाव एवढा वाढला आहे की, शरीर कुठल्या ना कुठल्या व्याधीने त्रस्त असतेच. याचे कारण हेच की मन, बुद्धी, संस्कार यांनी युक्त असलेला ‘आत्मा’ याचे ध्यान आम्ही ठेवले नाही, त्यामुळे सगळ्या समस्या सुरू झाल्या. समजा, तुम्ही जॉिगगसाठी चाललेले आहात. तुमच्यासोबत तीन-चार व्यक्तीदेखील आहेत. तुमच्या गप्पा जर कुणाविरुद्ध कागाळी करणाऱ्या किंवा परिस्थितीविषयी तक्रारी करणाऱ्या असतील तर आपल्या विचारांचा दर्जा कसा असेल? आपण शरीरस्वास्थ्यासाठी चालतो आहोत, पण मनाने मात्र नकारात्मक विचार निर्माण करीत असू, तर या विचारांचा परिणाम केवळ आपल्या मनावर नाही तर संपूर्ण शरीरावर पडणार आहे हे लक्षात असू द्या. शारीरिक स्वास्थ्यावर मानसिक स्वास्थ्याचा किती खोलवर प्रभाव पडतो याविषयीची जाणीव जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपल्यात खरे परिवर्तन होणार नाही. तेव्हा आपले विचार सांभाळा.
वय वर्षे तीसच्या जवळपास असणारे काही तरुण डॉक्टर्स सांगतात, आमची जीवन जगण्याची पद्धत ठीक आहे. आम्ही दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही, जेवणही शाकाहारीच घेतो, रोज व्यायाम करतो, तरीही आम्ही अस्वस्थता का अनुभवतो? आम्ही थकलेले का असतो? कारण त्यांनी सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले, पण एका गोष्टीला नजरेआड केले, माझी प्रसन्नता!
मला माझी मन:स्थिती कशी ठेवायची आहे, याचा तुम्हीच विचार करायला हवा. आनंद मानसिक स्वास्थ्याचे प्रतीक आहे. जेव्हा मनाला आनंद जाणवत नाही तेव्हा समजून घ्या की, आपले मन स्वस्थ नाही. गेला संपूर्ण दिवस नजरेसमोर आणा. तो दिवस मी कसा घालवला? समजा मी चालण्याचा व्यायाम करीत आहे. माझ्या पायांमध्ये वेदना होत आहेत, त्या वेदनेबरोबर मी चालतच राहतो. तेव्हा कोणी तरी सांगतो, डॉक्टरांना दाखवून बघा. तेव्हा मी म्हणते-तो, हो, दाखवेन. आता माझ्याकडे वेळ नाही. मग हळूहळू मी या विचारापर्यंत येते-तो की, मला तर या वेदनेबरोबरच राहायचं आहे. मी त्या वेदनेला स्वीकारले व तिला सहज म्हटले. परंतु ती सहज नाही. हे स्वास्थ्य नाही. तसेच जेव्हा आपण ताण-तणावग्रस्त परिस्थितीतून जातो, तेव्हादेखील आपण म्हणतो ते सर्व आपोआप ठीक होऊन जातील. आणि आम्ही त्या तणावग्रस्त जीवनालाही स्वीकारतो. कोणी विचारले तर सांगतो, ‘टेन्शन काय फक्त मला एकटय़ालाच नाही, सर्वानाच आहे.’ मला दु:ख होते, वेदना होतात. खूप मानसिक त्रास मी अनुभवते. मी खूप रागावते. चीडचीड करते आणि वर म्हणते मला माझ्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा स्थितीतल्या माणसाला स्वस्थ माणूस म्हणणार का? आणि अशा अस्वस्थेतून खरा आनंद गवसेल का? कधी-कधी या दु:खाला, वेदनेला विसरण्यासाठी आपण विचार करतो की, कोणाशी तरी फोनवर बोलू, टीव्ही पाहू, खरेदी करण्यासाठी जाऊ. म्हणजे मी माझ्या मानसिक स्वास्थ्याला थोडा वेळ विसरून जाईन, याच्याने दु:ख किंवा वेदना गेली नाही, फक्त थोडय़ावेळासाठी आपण तिला बाजूला ठेवले.
म्हणूनच मनाकडे लक्ष द्यायला हवे. मी का दु:खी आहे, याचा नीट विचार करायला हवा. त्यामुळे आयुष्य खेचल्यासारखे वाटणार नाही, तर ती एक सुखद यात्रा म्हणून अनुभवता येईल. जेव्हा आपण एखाद्या मशीनवर काम करतो तेव्हा सुरुवातीला ती मशीन चांगली चालते. पण हळूहळू तिचा आवाज यायला सुरुवात होते. तिच्यात जर का तेल टाकले नाही, तिची योग्यप्रकारे देखभाल केली नाही तर ती किती दिवस चालेल? एक दिवस अचानक ती मशीन बंद पडेल. मग आपणच म्हणू की ही मशीन काम करत नाही. परंतु जेव्हा मशीन खराब होण्याचा सिग्नल मिळाला होता तेव्हाच जर का आम्ही तिला तेलपाणी केले असते, तिची डागडुजी केली असती तर मशीन व्यवस्थित चालू राहिले असते. आज आपण सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. ऑफिस, घर, परिवार अगदी आपल्या गाडीकडेही. गाडी दर महिन्याला सव्र्हिसिंगला पाठवावीच लागते. किती महिने तुम्ही गाडीला सव्र्हिसिंग न करता ठेवू शकाल? तशीच मनाची सव्र्हिसिंग महत्त्वाची. ती कशी करायची ते आपण पाहणार आहोतच.
आज सर्व जण सत्संगात जातात, मंदिरात जातात, प्रवचनांना जातात, धार्मिक स्थळांना भेटी देतात कारण थोडावेळ का असेना, तिकडे जाऊन चांगले वाटते. पुण्य जमा होते. काहींच्या मते धनप्राप्तीही चांगली होते, पण किती जण आपले संस्कार परिवर्तन करण्यासाठी अशा ठिकाणी जातात? एक-दोन तास तिकडे बसल्यामुळे काही चांगल्या गोष्टी ऐकल्या जातात. आणि एकमेकांना म्हणतातदेखील की आता पुन्हा पुढच्या शुक्रवारी भेटू. मग हा शुक्रवार ते पुढचा शुक्रवार दिनचर्या मात्र तशीच. स्वभावही तसाच, विचारही तसेच. परत पुढच्या शुक्रवारी गेलो. दोन तास घालवले, परंतु सर्व काही निष्फळ. कारण जीवन जगण्यासाठीचं मुख्य उद्दिष्टच नाही.
माझ्याकडे लक्ष ठेवायला माझी मुलं आहेत, माझे पती आहेत. माझी मित्रमंडळी आहेत. पण माझ्या मनाकडे मलाच लक्ष द्यायला लागेल. आज माझ्याकडे दोन चपात्या आहेत. मी न खाता त्या दुसऱ्यांना खाऊ घालू शकते. मी आपल्यासाठी नवीन कपडे न घेता मुलांना नवीन कपडे घेऊ शकते. पण आनंदाच्या बाबतीत असे होत नाही. मी स्वत: आनंदी नसताना दुसऱ्यांनाही आनंद देऊ शकत नाही. ही अशी गोष्ट आहे की, जी मी जवळ ठेवूनच दुसऱ्यांना देऊ शकते. म्हणजेच पहिले मला स्वत:कडे लक्ष केंद्रित करावे लागेल. मला आनंदी राहावं लागेल तेव्हाच मी दुसऱ्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकेन. कारण जर का मी माझ्या मनाकडे लक्ष दिले नाही, तर मी कोणाकडेच नीट लक्ष देऊ शकणार नाही.
आनंद हवा मनी
आजच्या आपल्या प्रत्येकावर भावनात्मक दबाव एवढा वाढला आहे की, शरीर कुठल्या ना कुठल्या व्याधीने त्रस्त असतेच. याचे कारण मन, बुद्धी, संस्कार यांनी युक्त असलेल्या आत्म्याचे ध्यान आम्ही ठेवले नाही, त्यामुळे सगळ्या समस्या सुरू झाल्या. आम्ही अस्वस्थता अनुभवतो. आम्ही लवकर थकतो. …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-01-2014 at 07:24 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happiness should be in life