२० मार्चला ‘आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस’ साजरा केला जातो. जगभरातील लोकांचा आनंद आणि त्यांचं कल्याण कशात आहे, किती आहे हे शोधण्याचं ते एक निमित्त… पण, आनंदावस्था ही प्रत्येकालाच कायम हवीहवीशी वाटणारी भावना. त्या आनंदाचे नाना प्रकार आहेत नि त्याला असंख्य पैलू आहेत. मात्र आनंदाला इतर काही भावनांचा एक जरी वेढा बसला तरी त्याला गालबोट लागतं. म्हणूनच कसा वाढवावा आनंदाचा पैस?

स्वत:च्या आडनावाचा आणि नावाचा अर्थ काय असावा, यासंबंधातील जिज्ञासा लहान वयामध्ये बहुतेकांना असते. माझ्या नाडकर्णी आडनावामधले ‘नाड’ म्हणजे ‘भूप्रदेश’ असे माझ्या वडिलांनी सांगितले. जसे की तामिळनाडू किंवा वायनाड, पोयनाड! त्या प्रदेशाच्या महसुलाचा हिशोब ठेवणारे जसे ‘कुळ’कर्णी, तसे आपण ‘नाड’कर्णी. हे लगेच पटले! नावाच्या बाबतीत अशी मजा होती, की माझे ‘खरे’ नाव दत्तात्रय. हे माझ्या आजोबांचे नाव. घराण्यामध्ये दत्तभक्तीची परंपरा होती. ‘‘आपण सतत देत राहणारे, दत्ताच्या आशीर्वादाने झालेले दाते आणि दत्ताप्रमाणेच आपले गोत्र ‘अत्रि.’ म्हणून आपली सगळ्यांशी मैत्री! आणि म्हणून तुझे दुसरे नाव ‘आनंद’. दत्त संप्रदायामध्ये वासुदेवानंदांसारखे सत्पुरुष झाले, त्यांच्या नावापाठी ‘आनंद’; म्हणून तुझे नाव आनंद.’’ कालांतराने माझे दत्तात्रय हे नाव मागे पडले आणि आनंद मात्र टिकून राहिले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – माझी मैत्रीण : अस्पष्ट रेषा!

लहानपणापासूनच रडका, चिडका नसल्यामुळे मी माझ्या नावाला निदान बट्टा लावत नव्हतो हे कळू लागले. सहजपणे मैत्री करणे, छोट्या गोष्टींमध्ये मजा घेणे, विविध उपक्रमांत उत्साहाने सामील होणे असे गुण नावाला पोषक ठरू लागले. परंतु आनंद या भावनेचा अभ्यास करायची वेळ आली ती मनोविकारशास्त्राच्या निमित्ताने. त्या विभागात काम करताना या भावनेचे प्रथमदर्शन चक्क घाबरवणारे होते. शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला ‘मॅनिया’ (उन्माद) म्हणतात, तसा एक रुग्ण समोर आला. माझ्यासारख्या गरीब डॉक्टरवर उपकार म्हणून तो अ‍ॅडमिट झाला. तो आमच्या वॉर्डचा कायापालट करणार होता. मलाही गेलाबाजार एक-दोन गाड्या देणार होता. ‘‘तुमच्यासारख्या डॉक्टरनं कसं ऐटीत राहायला हवं, आमच्यासारखं!’’ तो मला सांगायचा. या नात्याचा फायदा उपचारांना झाला. तीन आठवड्यांनंतर तो कुटुंबीयांबरोबर टॅक्सीने घरी गेला. परंतु या सुखद भावनांना वास्तवाचा भक्कम पाया हवा, हे मला शिकवून गेला.

Boastful (बढाईखोर) आणि Grandiose (अवाच्या सवा, बेफाट आत्मस्तुती करणारा) यांतला फरक कसा समजून घ्यायचा? आमचे डॉ. एल. पी. शहा सर शिकवायचे- ‘‘खिशात हजार रुपये असताना कोटी रुपयांच्या गप्पा मारतो तो बढाईखोर. पण फाटका खिसा असताना, जग विकत घेण्याची भाषा करणारा ग्रॅन्डीओज… त्याला आपल्या उपचाराची गरज असते, कारण He is in his own reality.’’ आणि किंचित थांबून म्हणायचे, ‘‘बढाईखोर जर आलाच मदतीसाठी तर समुपदेशनाचा प्रयत्न करायला हरकत नाही.’’

आनंद या भावनेच्या आविष्काराचे हे एक ‘क्लिनिकल’ टोक, तर दुसरीकडे वाचनात आले- असा आनंद जो सुखापेक्षा वेगळा असतो. कोणत्याही वस्तूची, प्राप्ती-उपभोग-मालकी यांतून मिळते ते सुख. आणि त्या सुखातले क्षणिकत्व कळायला लागले, तर अधिक टिकाऊ सुखाचे रस्ते शोधायला काही जणांचे मन सुरुवात करते. त्यांच्या लक्षात येते, की सुखाचे उगमस्थान वस्तूमध्ये नाही, तर आपल्या मनातच आहे. मनात उत्पन्न होणारी इच्छा (Wish- Desire) प्रथम अगदी निरागस वाटते. त्या इच्छेने आपल्या मनावर पकड जमवायला आरंभ केला की ती होते ओढ (Longing).

इच्छा आणि पूर्ती यांमधले अंतर सहन करण्याच्या पलीकडे जायला लागले, की त्याला म्हणायचे आसक्ती- अर्थात् Craving. या पातळीवरची इच्छापूर्ती म्हणजे पुढच्या पूर्तीसाठीचे निमंत्रण. या निमंत्रणाला म्हणायचे तृष्णा. तृप्तीला छेद देणारी तृष्णा. समाधानाला क्षणिकत्व देते, अल्पायुषी बनवते. आणि आसक्तीच्या पूर्तीमध्ये अडथळा उत्पन्न झाला, तर होतो असह्य मनस्ताप. त्याला म्हणतात क्रोध. आणि पहिला तो लोभ. दोन्ही गोष्टी आनंदाला दूर सारतात.

पूर्तीचा अट्टहास सोडणे ही सुखाकडून आनंदाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. मी जे करत आहे त्याचा अपेक्षित परिणाम माझ्या मनाप्रमाणे व्हायलाच हवा, हा हेका आनंदभावनेच्या मुळावरच प्रहार करत असतो. मुक्कामाच्या हट्टामुळे प्रवासातली मजा घालवणारे किती जण पाहतो आपण (आपल्यासकट) नाही का?

हेही वाचा – माझी मैत्रीण : जीव लावणारी ‘ती’

तर सुखापेक्षा उंच म्हणजे ‘परम’ आनंदाच्या शोधासाठी काही जण संन्यस्त जीवनाचा मार्ग निवडतात. तो जणू त्यांचा नवा जन्मच असतो. म्हणून पारमार्थिक यात्रेच्या सुरुवातीला व्यावहारिक जगातले नाव त्यागून जे नाव घेतात, त्याच्या शेवटी शब्द असतात, आनंद! विवेकानंद, चिन्मयानंद, दयानंद… अशा अनेक महानुभावांची नावे आठवून पाहा.

तर मग आनंदाची प्रतवारी करण्याचे काही प्रकार आहेत का? तसे बरेच आहेत. सगळ्यात सोपा आहे, तो म्हणजे मनातले विचार आणि व्यक्तीचे वर्तन यांवर Happiness Family मधल्या एका नावाची निवड करायची. उदाहरणार्थ, समाधान ही भावना सस्मित आणि सहज, संथ पावले टाकत येईल आणि म्हणेल, ‘सगळे काही आलबेल आहे.’ त्यापुढे जर संवाद आला, ‘जेवढे करण्यासारखे होते ते प्रामाणिकपणे केले. आता मिळवायचे असे काही उरले नाही. जगण्याच्या काठावरून व्यवहाराला न्याहाळायचे.’ या भावनेला म्हणू सार्थकता. समाधानाच्या वरच्या सप्तकामध्ये येईल आनंद. तारसप्तकात येईल हर्ष. इथे वागणे मोकळेढाकळे. पावले थिरकायला लागतील. हास्याचे मजले चढतील. आणि वास्तवाचे भान सुटले तर तो होईल उन्माद.

स्वत:मध्ये असलेल्या क्षमता आणि गुणांच्या प्रभावी आविष्कारातून मिळालेल्या आनंदाभोवती जर कृतज्ञता आणि नम्रतेची झालर असेल, तर ती फलधारी वृक्षाची आनंदावस्था असेल. पण अशा क्षणी, ‘माझ्यासारखा गुणवान नरपुंगव या पृथ्वीवर होणे नाही,’ अशांसारखे विचार आले, तर त्या यशाला तुरा लावला जातो आत्मगौरवाचा. ‘मी किती ग्रेट’ असा विचार आला की आनंदाभोवती गर्वाचे अदृश्य जाळे विणायला सुरुवात होते. म्हणजे आनंदभावनेला समजून घेणे फारच महत्त्वाचे.

आनंदाच्या भावनेची रुजवात ‘मी’पणापासून होणे स्वाभाविक आहे. बालवयातच प्रत्येकाला या मी-पणाची (Identity) जाण येते. बृहदाकारण्यक उपनिषदात एक श्लोक आहे,

‘आत्मनस्तु कामाय, सर्वं प्रियं भवती।’

मैत्रेयीला याज्ञवल्क्य मुनी सांगतात, ‘पतीपत्नीचे एकमेकांवरचे प्रेम वस्तुत: स्वत:पासूनच सुरू होते.’ तसेच मुलांचे, धनाचे आणि ब्रह्मज्ञानाचेसुद्धा. ‘मी’ ही ‘प्रेम करण्यासारखी’ म्हणजे ‘प्रेमार्ह’ गोष्ट आहे, हे माणसाचे गृहीतक आहे. आचार्य विद्यारण्य त्यांच्या ‘पंचदशी’मध्ये सांगतात, की मी ‘असावे’ ही सहजभावना आहे. ‘मी नसावे’ हा स्वाभाविक प्रेरणेतून आलेला विचार मानला जात नाही. म्हणजे अस्तित्वापासूनच आनंदाचा प्रवास सुरू होतो.
मात्र प्रत्येक मानवाला आनंदभावना विस्तारित करण्याची संधी असते. फक्त माझ्या आनंदाकडून अनेकांच्या आनंदात सहभागी आणि सहकारी होता येते. आणि ‘अनेक’ या व्याख्येकडून ‘आपण-सर्व’ या विकसित व्याख्येकडेसुद्धा जाता येते. प्रेमभावनेचा विस्तार व्हायचा, तर ‘मी’पणाचे बंधन विरळ व्हायला हवे, उपभोगांची आसक्ती ताब्यात यायला हवी, इतरांच्या सुखदु:खाबरोबर जोडून घ्यायची वृत्ती वाढायला हवी आणि ‘आनंद’ भावनेवरचा हक्कसुद्धा सर्वा-सर्वांचा व्हायला हवा. इंग्रजी भाषेमध्ये ‘प्रेमात पडणे’ असा शब्दार्थ आहे. हे ‘पडणे’, म्हणजे त्या प्रेमाला परताव्याच्या हट्टामध्ये बांधून ठेवणे. जेव्हा प्रेमभावना निरपेक्ष होईल, तशी अकृत्रिम आनंदाची निर्मिती होईल. त्याला म्हटले आहे स्नेह. To rise in Love आणि त्यापुढची पातळी आहे, To be Love प्रेम आणि आनंदमय होणे! अपेक्षांच्या आणि परिणामांच्या पल्याड जाणाऱ्या या परम अवस्थेला बौद्ध विचारांमध्ये म्हटले आहे ‘पारोमिता’. उत्कृष्टता. ही स्थिती अशा आनंदाची, जी बाह्य जगावर अवलंबूनच नाही.

अद्वैत वेदान्तामध्येही मूलभूत भावस्थितीला ‘अबाधित’ (Nonbinding) अशा आनंदाचीच अनुभूती म्हटलेले आहे. पण या झाल्या तत्त्वज्ञानातल्या गोष्टी. व्यावहारिक जगण्यातला आनंद जपण्यासाठी, वाढवण्यासाठी काही क्लृप्त्या मिळतात का, ते पाहू या.

अनारोग्यकारक साधनांनी दिलेल्या आनंदाला ‘हाय’ किंवा ‘किक’ म्हणतात. दुसऱ्याकडून काही तरी हिरावून घ्यायचे आणि त्यावर आपल्या सुखाचे इमले बांधायचे हासुद्धा शुद्ध आनंद नव्हे. स्वत:च्या वागण्या-बोलण्यात जितकी आस्था आणि ऋजुता निर्माण होईल, तशी आनंदाची समूहभावना वाढेल. स्वभावातली मनन-चिंतनाची सवय वाढेल, तसा अंतर्गत आनंद श्रीमंत होईल. ‘येणे सुखे रुचे एकांताचा वास,’ असे तुकोबा म्हणतात, तेव्हा त्यांना एकटेपणाचाच अंत झाल्याचे जाणवते. ‘नाही गुण दोष अंगा येत.’ म्हणजेच स्वत:च्या क्षमता आणि कमतरतांचा डोळस स्वीकार.

हेही वाचा – जिंकावे नि जगावेही : त्रिसूत्री!

सहवासाचा आनंद- एकत्वाचा आनंद, प्रत्येक कृतीमधल्या गुणवत्तेला न्याय देण्याचा आनंद, निर्मितीचे छोटे क्षण अनुभवण्याचा आणि अवलोकन करण्याचा आनंद, पंचेंद्रियांसोबत मैत्री करून दैनंदिन संवेदनांमधून निर्माण होणारा आनंद… आपण यांपैकी कोणत्याही प्रक्रियेमध्ये रममाण झालो, ‘मी’पण विसरलो की आपणच होणार ती भावावस्था. मग मी तंत्रज्ञ असेन, व्यावसायिक असेन, शेतकरी, कलाकार, शिक्षक, गृहिणी… आनंदाकडे घेऊन जाणारी आमंत्रणे जितकी स्वीकारेन, तितका मला दु:खावरचा उताराही सापडत जाईल.

दु:ख आणि वेदनांकडे आस्थेने पाहून जितके करता येईल तितके करायचे आणि त्यानंतर त्या अनुभवाकडे आदराने पाहायचे… जगातल्या आणि मनातल्या सुख-दु:खाच्या, यश-अपयशाच्या, आशा-निराशेच्या निमित्ताने आतल्या ‘स्व’भावसिद्ध आनंदाला साद घालण्याची संधी आपल्या सगळ्यांकडे नित्य उपलब्ध असते.

माझ्या तर नावातच आनंद आहे, पण ज्यांच्या नावात तो नाही ते सर्वसुद्धा आनंदाच्या यात्रेमधले तेवढ्याच हक्काचे प्रवासी आहेत. थोडक्यात, ज्याचे नाव ‘आनंद’ नाही असा कोणीच या जगात नाही! तेव्हा आज, ‘नावात काय आहे?’ या चर्चेला माझ्यापुरता विराम द्यायला काहीच हरकत दिसत नाही!

anandiph@gmail.com

Story img Loader