जसं वय वाढतं तसं मेंदूमध्ये ‘इन्फ्लेमेशन’ची क्रिया वाढते. तसंच मज्जारज्जूच्या प्रथिनांमध्ये बदल होत जातात, जेणेकरून संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात आणि या दोन्ही क्रियांची गती चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढते. आपल्या राहणीमानामध्ये/आहारामध्ये योग्य ते बदल करायला हवेत..
कधीही गावाला गेले की (अगदी लहानपणापासून) आजीचे करुणाष्टक नेहमी कानावर पडायचे. ‘अचपळ मन माझे, नावरे आवरिता.’ माझं आजोळ खानदेश! तिथे गेल्यावर बाकी इतर मजा-मस्तीमध्ये आजीच्या श्लोकांचा अर्थ कुठे शोधून काढणार? इतक्या वर्षांनी आठवण येण्याचं कारण म्हणजे परवाच अमोघने एक छान पुस्तक आणलं. पुस्तकाचा विषय- मानसशास्त्र. पुस्तकाच्या सुरुवातीलाच हा श्लोक वाचून एकदम विचार आला की मन, मेंदू, विचार आणि आहार यांचा परस्परांशी जो संबंध आहे त्याविषयी आपल्या वाचकांशी संवाद साधायला हवा.
बोलता बोलता अचानक काही शब्द/ माणसांची-जागांची नावं आठवतच नाहीत आणि आपण म्हणतो, ‘‘अरे, नाव अगदी तोंडावरती आहे बघ, पण आठवत नाहीये.’’ पूर्वी असं कोणी म्हटलं की, चटकन म्हटलं जायचं- ‘‘वय झालं का?’’ हल्ली ‘विसरणं’ खूप कॉमन झालंय. कधीही-कुठेही-काहीही विसरायला होतं. मग त्यासाठी ६०-७० वय असायची गरज नाही. याच विस्मृतीला वैज्ञानिक भाषेमध्ये ‘अल्झायमर’ नाव दिलं गेलंय. मनाचा संबंध विचारांशी अतूट आहे. ज्याला ‘मन’ आहे त्याच्या मनात विचार येणारच! मग ते वाईट असोत अथवा चांगले असोत. जगामध्ये सर्वात गतिमान काय? विमान / प्रकाश की मन? बरोबर उत्तर ‘मन’ आहे नं? कारण आत्ता इथे ‘चतुरंग’ वाचत असलेलं मन अमेरिका / लंडन किंवा चंद्रावरती कधी जाऊन पोहोचेल याचा काही नेम नाही. अन्नातील ‘प्राण’ आणि आपल्या मनातील विचार यांचा परस्परांशी संबंध कसा आणि काय आहे ते आपण या लेखमालेमध्ये बोलूच. आज विस्मृती आणि आहार याविषयी गप्पा मारूया. ‘अल्झायमरचा आजार’ लिहायला आणि वाचायला कठीण शब्द आहे. पण हल्ली खूप कॉमन झाला आहे. ‘विस्मृती’ कशी होते? तुम्हाला एक गंमत माहितीये? वयाची ५० र्वष झाल्यावर (कधी कधी ४० सुद्धा) आपण म्हणतो, ‘‘आता वय झालं, म्हातारपण आलं!’’
पण सत्य हे आहे की, वय ‘होण्याची’ प्रक्रिया ही जन्मापासून सुरू होते. जसं वय वाढतं तसं मेंदूमध्ये ‘इन्फ्लेमेशन’ची क्रिया वाढते. तसंच मज्जारज्जूच्या प्रथिनांमध्ये बदल होत जातात, जेणेकरून संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात आणि या दोन्ही क्रियांची गती चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढते.
थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला आहार असा असला पाहिजे; जेणेकरून मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणासारखे आजार होणार नाहीत व मेंदूला सतत, पण योग्य प्रमाणात ग्लुकोजचा पुरवठा होत राहील. म्हणजेच संतुलित आहार, विविध पदार्थानी युक्त आहार जो नैसर्गिक आहे, प्रक्रिया न केलेला आहे आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणात आणि नियमित चलनवलन (मानसिक आणि शारीरिक व्यायाम) पण जरुरी आहे.
सांगितलेले सगळं नीट लक्षात राहील नं? नक्कीच राहील! आपल्या राहणीमानामध्ये/आहारामध्ये योग्य ते बदल केले तर ‘विस्मृती’ हा आजार ‘विस्मृतीमध्ये’ जायला वेळ लागणार नाही. बदलाची सुरुवात कोणत्याही वयामध्ये करायला हरकत नाही. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जसे पालक लहान मुलांसाठी मेहनत घेतात तसेच ‘विस्मृती’शी सामना करण्यासाठी मेहनत घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात आपलं अस्तित्व जपण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. त्याला वयाचं बंधन नाही. मग यासाठी यश / पैसा / स्तुती / प्रसिद्धीच्या टॉनिकपेक्षा योग्य आहार-विहाराचं टॉनिक अधिक उपयोगी पडेल. विश्वास ठेवा!
इंद्रधनुषी सलाड
वाफवलेले बीट
गाजर
भोपळी मिरची
राजमा
कोबी
डाळिंब
पनीर
वाफवलेली पालकाची पाने
लिंबू
कोथिंबीर-पुदिना-आलं-मिरची पेस्ट- १ चमचा
शेंगदाणे-अक्रोड-अळशी दाणे कूट १ मोठा चमचा
सर्व भाज्या बारीक चिरून सम प्रमाणात घ्याव्यात.
सलाड मिक्स करून लगेच खावे.
प्रमाण थोडे जास्त झाले तरी चालेल.
काही वाचकांनी दलिया आणि किनोआच्या पाककृती विचारल्या आहेत. पुढील लेखामध्ये आपल्याला मिळणाऱ्या विविध पदार्थामध्ये कोणते पदार्थ (सुपर फुड्स) खावेत; जेणेकरून आपलं आरोग्य अबाधित राहील याविषयी मी लिहिणार आहे- रेसिपी टिप्ससहित. भेटू या मग १५ दिवसांनी!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा