प्रत्येकालाच सुख हवे असते. संपत्तीची नव्हे तर सुखाची कामना मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तरीही दु:खाचा पूर्ण अभाव असलेले निखळ, परिपूर्ण सुख अस्तित्वातच नसते! हे विधान काहीसे परस्परविरोधी वाटत असले तरी ते तसे नाही.
या विधानाकडे वरवर पाहिले तर अनेक जण असा विचार करतील की, असे सुख अस्तित्वातच नसेल तर त्याचा पाठलाग करायचा कशाला?
पण थोडा धीर धरा, म्हणजे हा विरोधाभास तुम्हाला कळेल.
खूप वर्षांपूर्वी मी ‘सुखी माणसाचा सदरा’ नावाची एक इटालियन लोककथा वाचली होती. सध्या इटालो कॅलव्हिनोने तीच दंतकथा पुन्हा सांगितली. मी ती मूळ कथा तुम्हाला सांगणार आहे :
राजा गिफाड हा एका बलशाली आणि शांतिप्रिय साम्राज्याचा राजा होता. त्याची प्रजा त्याला देवासमान मानायची. त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकायची. त्याच्या साम्राज्यावर सुखाचा चंद्र पूर्ण कलांनी प्रकाशत होता. राजाला जोनाश नावाचा एक राजपुत्र होता. जोनाश देखणा, हुशार तरुण होता. त्याच्यात अनेक गुण होते; पण काही काळापासून तो घोर निराशेच्या मन:स्थितीत होता. राजाला कळत नव्हते की कितीही प्रयत्न केला तरी त्याचा तेजस्वी पुत्र सदासर्वदा इतका दु:खी कष्टी का आहे? राजपुत्र नेहमी त्याच्या खोलीत बसून शून्यात नजर लावून बसून राहायचा आणि त्याच्या अवतीभवती काय चालले आहे यात अजिबात रस घ्यायचा नाही, जणू तो आपल्या महालात, एकटाच आहे.
राजा गिफाडला हे सहन होईना आणि त्याने आपल्या मुलाला विचारले, ‘जोनाश, तू कशामुळे इतका अस्वस्थ आहेस? तुला कशाची कमतरता सलते? मी पाहतोय की तुझं काहीतरी बिनसलंय. काय ते मला सांग म्हणजे मी तुझी मदत करण्याचा प्रयत्न करीन. एखाद्या तरुणीवर तू अनुरक्त झाला आहेस का?’
‘नाही, महाराज. माझ्या खिन्नतेचे कारण कोणी मुलगी नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला स्वत:लाच माहीत नाही की मी इतका दु:खी का आहे, मला कोणत्याच गोष्टीत आनंद वाटत नाही. मला चांगले वाटावे असे खूप वाटते; पण कसे ते कळत नाही.’
राजाला काही हे समजू शकले नाही; पण त्याची खात्री होती की, जर असेच चालू राहिले तर जोनाश औदासिन्याने मृत्युमुखी पडेल. म्हणून राजाने त्याच्या निष्णात वैद्यांना, ज्योतिष्यांना आणि शहाण्या माणसांना हुकूम जारी केला. तीन दिवसांच्या बैठकीनंतर ज्योतिष्यांनी पुढील उपाय शोधून काढला. ‘महाराज’ मुख्य ज्योतिषी जॅन्कलो बोलू लागला, ‘‘या मुद्दय़ावर आम्ही खूप विचार केलाय. आपल्या राजपुत्रासाठी आपल्याला एका खऱ्या सुखी माणसाला शोधायला हवे. असा माणूस जो त्याच्या जीवनात पूर्णपणे समाधानी आणि संतुष्ट असेल. आणि असा सुखी माणूस सापडला की तुम्ही त्याच्याशी सौदा करून त्याचा सदरा राजपुत्रासाठी मागून घ्यायला हवा. मग सगळे ठीकठाक होईल.’’
राजाने या उपायावर विचार केला आणि शेवटी तो मान्य केला. त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र सूचना पाठवल्या की, जो कोणी अशा खऱ्या सुखी माणसाला शोधून आणेल त्याला भरपूर इनाम दिले जाईल. राजाने अशी घोषणा केली आणि त्याचे दूत राज्यात दूरवर पाठवले. लवकरच राजाला भेटायला लोकांनी रांगा लावल्या.
राजासमोर आलेला पहिला माणूस होता एक धर्मगुरू. राजाने त्याला प्रश्न केला.
‘‘महाशय, तुम्ही सुखी आहात?’’
‘‘होय महाराज, मी खूप सुखी आहे.’’
‘‘अस्सं? मग तुम्हाला राजगुरू व्हायला आवडेल का?’’ राजाने विचारले.
हे ऐकून धर्मगुरूंचा चेहरा उजळला. ‘‘अर्थातच, महाराज, तुमची सेवा करण्याइतके सुख मला दुसऱ्या कशातच वाटत नाही!’’
आता राजा संतापला, ‘‘मी तुला कैदेत टाकण्याआधी माझ्या महालातून चालला हो!’’ तू फक्त स्वत:चे हित पाहणारा खोटारडा आहेस. ’’ शोध चालूच होता. पण सगळे व्यर्थ. दोन आठवडय़ानंतर एक बातमी आली की शेजारच्या राज्याचा राजा असाधारणपणे सुखी माणूस आहे, असे म्हटले जाते. त्याला एक सुंदर पत्नी आणि बरीच मुलं आहेत. त्याला कोणीही शत्रू नाही. राजाने त्याची चौकशी करायला आपला दूत पाठवला.
‘राजा गिफाडला सांगा की मला जे जे हवे होते ते ते सगळे मिळाले आहे, हे खरे आहे; पण माझी एक मात्र व्यथा ही आहे की मी लवकरच मरणार आहे आणि मग या सगळ्यांना मुकणार आहे. मला भीती वाटते की, या एकमात्र विचाराने मी इतका चिंतातुर होतो की मी रात्र न रात्र जागून काढतो.’ हे उत्तर ऐकून राजदूताच्या लक्षात आले की या राजाचा सदरा घेऊन जाण्यात काहीच अर्थ नव्हता. राजा गिफाड हताश झाला. त्याचा पुत्र मूर्तिमंत दु:खाचा पुतळा बनला होता आणि तो राजा असूनही त्याला बरे करण्यासाठी तो सदरा सापडेपर्यंत त्याला मदत करण्यास असमर्थ होता.
हा ताण कमी करण्यासाठी राजाने शिकारीला जायचे ठरवले. मैदानात त्याला थोडय़ा अंतरावर एक हरीण दिसला आणि त्याने बाण सोडला; पण बाण हरणाला चाटून निघून गेला आणि दचकलेले हरीण जंगलात पळून गेले. त्या हरणाचा पाठलाग करण्याच्या नादात राजा त्याच्या काफिल्यापासून बराच दूरवर निघून गेला. इतक्यात असे काही घडले ज्यामुळे त्याची पावले थबकली. त्याच्या डाव्या दिशेने एक मधुर आवाज येत होता. राजा त्या आवाजाकडे ओढला गेला आणि आवाजाच्या जवळ पोहोचल्यावर त्याला दिसले की कोणीतरी मजेत शीळ वाजवत आहे. त्याच्यासमोर पसरलेल्या कुरणात एक देखणा तरुण आरामात पहुडला होता. तो सावळा तरुण पाठीवर झोपून आभाळात येणाऱ्या जाणाऱ्या ढगांकडे बघत होता. ‘ए मुला, हो, तूच! जर तुला प्रत्यक्ष राजाच्या खासगी सल्लागारपदी नेमणूक मिळाली तर तुला आवडेल?’ राजाने पृच्छा केली.
‘मी? आणि एक सल्लागार?’ तो तरुण उठून बसला आणि आपली हनुवटी खाजवू लागला. ‘ते तर अत्यंत त्रासदायक पद आहे. मला ते नाही आवडणार. मी इथे जसा आहे तसाच मजेत आहे.’
हे ऐकल्यावर राजाचा चेहरा प्रसन्नतेने खुलला. ‘तो तूच आहेस! तू खरा सुखी माणूस आहेस! ईश्वरा, असा माणूस भेटल्याबद्दल मी तुझा अत्यंत ऋणी आहे! चल चटकन ऊठ!’ राजाने त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि मागे सुटलेल्या आपल्या दरबाऱ्यांजवळ पोहोचला. ‘‘माझा मुलगा आता वाचेल! अजून त्याच्यासाठी आशेचा किरण शिल्लक आहे!’’ तो त्या तरुणाकडे वळला आणि वात्सल्याने म्हणाला, ‘‘तुला माझ्याकडून जे हवे ते मागू शकतोस; पण त्या बदल्यात तुलाही मला काहीतरी द्यावे लागेल हं!’’
तरुण म्हणाला, ‘‘महाराज, तुम्हाला माझ्याकडून जे हवे ते घेऊ शकता.’’
‘‘माझ्या मुला, राजपुत्र जोनाश मरणासन्न आहे आणि केवळ तूच त्याला वाचवू शकतोस. माझ्या जवळ ये, मला तुझा सदरा काढू दे.’’ राजाने त्या तरुणाचे खांदे धरले. राजाने त्याचा सदरा काढायला हात पुढे केले आणि दुसऱ्याच क्षणी तो थांबला. त्याचे हात खाली आले.
सुखी माणसाच्या अंगावर सदराच नव्हता.
तर या कथेचे तात्पर्य असे की, राजाला कळले की खरे सुख, आनंद इतर कोणाकडून तरी मिळवता येत नाही. त्या तरुणाकडे पाहताना त्याला जाणवले की त्याचे आयुष्य राजपुत्राच्या आयुष्यापेक्षा कितीतरी वेगळे होते, तरीही खरे समाधान आणि सुख हे आतून येत असते, त्याच्याजवळ किती संपत्ती आहे, याचा सुखाशी काडीचाही संबंध नसतो.
शेवटी त्याच्या लक्षात आले की, त्याच्या मुलाला बरे वाटावे म्हणून त्याने काय करायला हवे. आपले आयुष्यही तसेच असायला हवे. आपल्याला हे कळायला हवे की प्रत्येक गोष्ट आपल्याजवळ असण्यात खरे सुख नाही, तर आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानण्यात सुख आहे. आपण आधीपण चर्चा केली आहे की, भौतिक संपत्तीत सुख सामावलेले नसते; पण आपली आताची चर्चा ही त्याही पलीकडची आहे. मला सांगावासा वाटतो तो मुद्दा म्हणजे जो माणूस दु:खालाही दु:ख न मानता जे आहे त्यात सुख मानतो तो खरा सुखी माणूस. दु:खाचा अभाव म्हणजे सुख ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की जीवनाने तुमच्या हाती आंबट लिंबू दिले तर तुम्ही साखर टाकून त्याचे सरबत बनवा. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा तुम्ही सुख-दु:खात भेदभाव न करता, दोघांचेही स्वागत बाहू पसरून करता, दोघांनाही समानपणे स्वीकारता.
लक्षात असू द्या की, दु:ख किंवा प्रतिकूलतेचा धिक्कार करायचा नसतो. तसेच त्यांना घाबरायचेही नसते. त्या मानवी चारित्र्याला समृद्ध करतात, आपल्याला धैर्यपूर्वक प्रेरित करतात आणि आपले जीवन जगण्यायोग्य बनवतात. मी जेव्हा आठवून पाहतो तेव्हा ते २० दिवस कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा माझ्या सगळ्या सावकारांनी माझ्यासाठी हात आखडता घेतला होता. तेव्हा मुंबईच्या रेल्वे-फलाटावर मी ते २० दिवस घालवले होते.
शेवटी मला अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे शब्द नोंदवावेसे वाटतात. वॉटरगेट प्रकरणामुळे जेव्हा त्यांना ऑगस्ट १९७४ मध्ये जगातील सर्वोच्च स्थान, अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून अपमानकारकरीत्या पायउतार व्हावे लागले होते तेव्हा त्यांनी राष्ट्रीय दूरदर्शनवरून म्हटले होते.
‘‘जेव्हा तुम्ही खोल दरीच्या तळाशी असता केवळ तेव्हाच तुम्हाला कळते की सर्वोच्च शिखरावर विराजमान होणे किती भव्यतेचे होते.’’
(अनुपम खेर यांनी लिहिलेल्या आणि पुष्पा ठक्कर यांनी अनुवादित केलेल्या साकेत प्रकाशनच्या ‘तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही ’ या पुस्तकातील संपादित भाग )
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा