निर्मळपणे हसणाऱ्या माणसाच्या हातून हत्या घडू शकेल का? हसणाऱ्या आनंदी माणसानं कधी घाणेरडी शिवी हासडल्याचं ऐकलंय? आनंदानं हसणाऱ्या माणसाच्या हातून वाईट तऱ्हेचा अनाचार, व्यभिचार घडल्याचं ऐकलंय का? माणूस मनापासून हसत असतो, त्या क्षणी त्याच्या मनात पाप संभवत नाही.
ची न देशात तीन फकीर होऊन गेले. त्यांना लोक म्हणायचे ‘लाफिंग सेंट्स’ ते सतत हसत असायचे. खूप अद्भुत होते ते. हसणारे फकीर! असं तर कधी पाह्य़लं नव्हतं. ऐकलं नव्हतं. फकीर तर गंभीर असतात. उदासीन असतात. पण हे हसणारे फकीर ठिकठिकाणी गावागावांतून फिरत असत. त्यांचा संदेशही अगदी वेगळा होता. गावातल्या मुख्य चौकात उभे राहात आणि हसायला लागत. एक हसला की दुसरा हसायचा मग तिसरा हसायचा. त्यामुळे एकमेकांच्या हसण्यानं हसणं वाढत जायचं. मग त्यांच्याभोवती गर्दी जमायची. लोक हसायला लागायचे. साऱ्या गावात हास्याचा नाद लहरत जाई. मग लोक विचारत, ‘‘महाराज तुम्ही उपदेशाचे चार शब्द सांगणार का?’’ ते सांगत, ‘‘हसा. आपलं जीवन असं जगा की हसू शकाल. अशा तऱ्हेने जगा की दुसरेही हसू शकतील. अशा पद्धतीनं जगा की सारं जगणं म्हणजे हास्याचा उसळता स्रोत होईल. हीच आमची शिकवणूक आहे. आमच्या कृतीने आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आम्ही दुसऱ्या गावी जाऊ, पण तुम्ही हसत राहा. तुमचं जीवन म्हणजे चेहऱ्यावरचं मधुर स्मित होऊ द्या आणि आसपासच्या लोकांच्या आयुष्यात ते स्मित झिरपू द्या. असं हसा की सारं जीवन म्हणजे हास्यानं उमललेल्या फुलांचा ताटवा होऊन जाईल.’’
हसणाऱ्या माणसानं कधी पाप केलंय का? निर्मळपणे हसणाऱ्या माणसाच्या हातून हत्या घडू शकेल का? हसणाऱ्या आनंदी माणसानं कधी कुणाला रागानं घाणेरडी शिवी हासडल्याचं ऐकलंय? आनंदानं हसणाऱ्या माणसाच्या हातून वाईट तऱ्हेचा अनाचार, व्यभिचार घडल्याचं ऐकलंय का? माणूस मनापासून हसत असतो. त्या क्षणी त्याच्या मनात पाप संभवत नाही. साऱ्या पापासाठी त्याला आधारभूत उदासी, दु:ख, अंधार, ओझ, जडता, क्रोध, घृणा, मत्सर या गोष्टी हव्या असतात. जर आपण सारी मानवजात हसणारी बनवू शकलो तर तत्क्षणी दुनियेतील नव्वद टक्के पापं संपून जातील. ज्या लोकांनी या पृथ्वीला उदास केलं त्याच लोकांनी पृथ्वीला पापांनी भरून टाकलं.
हे तत्त्वज्ञान लोकांना सांगत आणि स्वत: त्याप्रमाणे जगत हे तिन्ही फकीर गावोगाव हिंडत राहिले. त्यांचं पाऊल पडताच गावातील हवा जणू बदलून जाई. ठिकठिकाणी हास्याचे स्रोत जागवीत, जीवन आनंदी आणि निर्मळ करत ते फिरत राहिले. माणसाचं आयुष्य स्वच्छ सुंदर करण्याचा वसा चालत राहिला.
हसणारे तीन फकीर (लाफिंग सेंट्स) हास्याचा वसा अनेक लोकांना देत असतानाच त्यांच्यातील एकाचा मृत्यू झाला आणि या दु:खाच्या समयी सांत्वनासाठी अनेक लोक त्यांच्या झोपडीजवळ जमा झाले. त्यांनी पाहिलं मरण पावलेल्या फकिराच्या ओठांवरसुद्धा स्मित होतं आणि त्याचे दोन मित्र त्याच्याजवळ बसून आनंदाने हसत होते. लोकांनी त्यांना विचारलं, ‘‘हे काय चाललंय? हे काय करता आहात? तिथे तुमचा मित्र मरण पावलाय आणि तुम्ही हसता आहात?’’
ते फकीर म्हणाले, ‘‘त्याच्या मृत्यूमुळे तर सारं आयुष्य हास्य होऊन गेलं आहे. माणूस मृत झाला की जीवन म्हणजे एक निखळ विनोद असल्याचा प्रत्यय येतो. एक गंमतच घडल्यासारखं वाटतं. आपण विचार करत असतो. आपल्याला सदासर्वकाळ जगायचं आहे. आज लक्षात आलं की इथे थोडीशी गडबड आहे. आमच्यातला एक जण संपला उद्या आम्हीपण संपून जाऊ. ज्यांना असं वाटतं की सदासर्वकाळ जगायचंय त्यांना गंभीर होणं परवडतं. इथे गंभीर होण्याचं कारणच उरलं नाही.’’
‘‘आता आम्ही हसतो आहोत. पुऱ्या जीवनाचंच हसू येतं. माणूस आयुष्यात हे करू, ते करू म्हणून आयुष्याबद्दल विचार करीत असतो. पण मामल्याची परिणती शेवटी ही अशी होते. माणूस संपून जातो. एक बुडबुडा फुटला. एक फूल खाली पडलं आणि पाकळ्या विखरल्या. आज हसायचं नाही तर केव्हा हसायचं? सगळं जीवन म्हणजे मृत्यू झालं. आमचा मित्र तर संपून गेला. आम्ही हसलो नाही तर आमच्या मरण पावलेल्या मित्राला काय वाटेल? की अरे, आता खरी हसण्याची गरज असताना हे मित्र धोका देत आहेत. जीवनादरम्यान हसणं सोपं आहे, पण मृत्यूसारख्या घटनेदरम्यान जो हसू शकतो तोच तर खरा साधू.’’
आपल्या मित्राची शवयात्रा घेऊन दोघं स्मशानाकडे निघाले. गावातील माणसं उदास होती, पण हे दोघं हसत निघाले. रस्त्यात त्यांनी म्हटलं, ‘‘ज्यांना उदास व्हायचंय त्यांनी घरी जावं. जो माणूस जिंदगीभर हसत राहिला त्याला श्रद्धांजली म्हणून जर लोक त्याला अंतिम निरोप देताना हसले नाहीत तर आमच्या मित्राचा आत्मा फार दु:खी होईल.’’ पण लोक हसणार कसे? आधी मुळात हसायचीच सवय नाही त्यात मृत्यूसमोर कोण हसणार? मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवून तोच हसू शकतो ज्याला अमृतत्वाचा बोध झाला.
माणसांना धर्म हवाय! हसणारा, हसू शकणारा, हसविणारा धर्म! आजपर्यंत धर्माचं स्वरूप उदास, गंभीर असंच राहिलं आहे. आपलं सारं जीवन म्हणजे खुशी आणि आनंद बनविण्याची इच्छा असलेला माणूस चुकूनही दुसऱ्याला दु:ख देऊ शकत नाही. दुसऱ्याला दु:ख देणं म्हणजे स्वत:च्या दु:खाला आमंत्रण पाठविण्यासारखं आहे हे तो जाणतो. ज्या माणसाला फुलांमध्ये जगायचं आहे तो दुसऱ्या कुणाच्या मार्गावर काटे पसरू शकत नाही. तो जाणतो की, दुसऱ्याच्या मार्गावर काटे पसरणं म्हणजे एक प्रकारे त्याला आव्हान देणं आहे की चल, हिंमत असेल तर तूही माझ्या रस्त्यावर काटे पसर. जो माणूस सदोदित उदास, निराश असतो तोच लोकांशी र्दुव्यवहार करू शकतो. ज्या माणसाला प्रफुल्लित व्हायचं आहे त्याला आपल्या सभोवताली हास्य पसरायला लागेल.
एकटा माणूस उदास, दु:खी राहू शकतो. पण खुषी, आनंद, प्रसन्नता या मनाच्या अवस्थांमध्ये माणसाला सगळ्यांना सहभागी करून घेण्याची उत्कट इच्छा होते म्हणून तो एकटा राहत नाही. तुम्ही एका कोपऱ्यात दु:खी, पीडित, त्रासलेले, गंभीर अशा भावावस्थेत बसलेले असलात तर कुणी असं नाही विचारणार की, एकटाच का बसला आहेस बाबा? फार वेळ दु:ख सांगणं आणि ते ऐकून घेणं माणसाला नकोसं असतं. सुखाचं मात्र अगदी वेगळं टोक असतं!
कारण खुषीची भावावस्था म्हणजे संवाद असतो. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत ती पोहोचते. तो इतरांना त्या आनंदात सहभागी करून घेतो. खुषी ही एक सामाजिक घटना होते. समष्टीची होते. आनंदित होणं म्हणजे शेअरिंग असतं. आनंद वाटावासा वाटतो. ईश्वराचा प्रसाद सगळीकडे वाटावा असंच वाटतं. म्हणून माणूस जितका आनंदी असेल तितके त्याला सुहृदय स्नेही मिळत जातील.
महावीर, बुद्ध, ख्रिस्त, मोहम्मद अशा साऱ्या महामानवांच्या आयुष्याचा क्रम बघितला तर लक्षात येतं की जेव्हा हे लोक दु:खी, गंभीर होते तेव्हा जंगलामधे, पहाडांमधे एकटे विचार- चिंतनासाठी गेले, राहिले. ज्या दिवशी त्यांना दिव्य आनंदाची प्राप्ती झाली त्या दिवशी सगळे लोकांमध्ये आले. हे असं का झालं? आपण सगळ्यांनी बुद्ध, महावीर, मोहम्मद, ख्रिस्त यांना एकांतवासात जाताना पाहिलं आणि तिथून परत येतानाही पाहिलं. एकांताकडे जाणारे हे महामानव जगातल्या दु:खांनी, वेदनांनी गंभीर, दु:खी झालेले होते. उदास होते. पण परतताना ते कुणी वेगळेच होऊन आले. ते आनंदानं भरून गेलेले होते, प्रफुल्लित होते. तो हृदयातून वाहणारा आनंद सगळ्यांना द्यावा, वाटावा म्हणून ते परतले.
परमात्म्यापर्यंत पोहोचायचं तर आक्रसून कसं चालेल? सगळीकडे पसरत जायला हवं. इतकं पसरायला हवं की स्वत:चं वेगळंपण असं उरणारच नाही. सर्व जगत्मात्राचे अणू-रेणूच आपले प्राण पसरतील. सगळ्यांना आपल्या आनंदात असं सहभागी करून घ्यायला हवं की हा सहभाग साऱ्या जगात विस्तार पावेल. सारं जग, चंद्र, तारे, सूर्य, निसर्ग, हे चराचर आपले स्नेही-सोबती बनतील. या साऱ्यांचा जो मूलाधार दृष्टिकोन आहे, जे तत्त्व आहे ते काय आहे? ते आहे एक हसणारं प्रफुल्लित व्यक्तित्व. नृत्यरंगात रंगलेलं एक व्यक्तित्व. तुम्ही जितके आनंदित व्हाल तितका आनंद वाटावा लागेल आणि मग आनंदच तुमच्याकडे वाहत येईल. आपण जे वाटतो, देतो, तेच आपल्याकडे परतून येतं. आपण जे देतो त्याचा निनाद उमटतो.
(मनोविकास प्रकाशनाच्या ‘ओशो विचारदीप’ या माधवी कुंटे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)
हास्याचा वसा
निर्मळपणे हसणाऱ्या माणसाच्या हातून हत्या घडू शकेल का? हसणाऱ्या आनंदी माणसानं कधी घाणेरडी शिवी हासडल्याचं ऐकलंय? आनंदानं हसणाऱ्या माणसाच्या हातून वाईट तऱ्हेचा अनाचार, व्यभिचार घडल्याचं ऐकलंय का? माणूस मनापासून हसत असतो, त्या क्षणी त्याच्या मनात पाप संभवत नाही.
आणखी वाचा
First published on: 09-02-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happyness creating