– शुभदा चंद्रचूड

अशुभ, अभद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरगिला पक्ष्याला ‘पर्यावरण रक्षक दूत’ म्हणून मान्यता मिळू लागण्यामागे आहेत जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमादेवी यांचे परिश्रम. त्यांनी आसाममधल्या २० हजार स्त्रियांची ‘हरगिला आर्मी’ तयार केल्याने नामशेष होऊ पाहणाऱ्या हरगिलांची संख्या आता हजारो झाली आहे. तेथील गमजे आणि मेखला साड्यांवर जरतारी हरगिला स्थानापन्न होऊन कमाई करून देतो आहे. त्या सगळ्यांचे श्रेय जाते यंदाच्या ‘टाइम’ मासिकाच्या ‘विमेन ऑफ द इअर २०२५’च्या यादीत झळकलेल्या डॉ. पूर्णिमा बर्मन यांना. त्यांच्याविषयी…

रगिला म्हणजे हाडं गिळणारा, ‘अ ग्रेटर अॅडज्युटंट’ या करकोचाच्या प्रजातीतल्या आणि आता अगदी दुर्मीळ झालेल्या या पक्ष्याचं हे आसामी भाषेतलं नाव. पूर्वी दक्षिण आशियाई देशात भरपूर संख्येने आढळणारे हे पक्षी आजमितीस जगभरात फक्त आपल्या देशात (आसाम आणि बिहार) आणि कंबोडियात तुरळक संख्येने अस्तित्वात आहेत. मात्र आता ‘पर्यावरण रक्षक दूत’ ठरलेल्या या हरगिलांना वाचवण्यासाठी २० हजार स्त्रियांची ‘आर्मी’ आसाममध्ये तयार झाली असून त्यांच्या जनक वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा बर्मन यांचा ‘टाइम’ मासिकाने यंदाच्या १०० प्रभावशाली स्त्रियांमध्ये समावेश केला आहे. त्यानिमित्ताने ‘हरगिला आर्मी’विषयी जाणून घ्यायला हवं.

हरगिला हा आकाराने भला मोठा पक्षी आहे. सणसणीत पाच फूट उंची, उघडलेल्या पंखांची लांबी जवळजवळ साडेआठ फूट, पिसंविरहित डोकं, नारिंगी रंगाचा लोंबणारा गळा, फिकुटल्या रंगाचे डोळे, लांबुडके-हडकुळे पाय आणि दुर्गंधीयुक्त लाळ हे त्याचं रूप. मृत प्राण्यांना खाणारा तो स्कॅव्हेंजर पक्षी आहे. म्हणूनच त्याला ‘हरगिला’ हे नाव मिळालं असावं. त्याच्या या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे असेल कदाचित, पण या पक्ष्याला आपल्याकडे पूर्वापार अभद्र, अशुभ आणि रोगराईचा दूत मानलं गेलं होतं. ग्रामीण भागात तर हा पक्षी कुठे दिसला तर लोक त्याला दगड मारायचे, ज्या वृक्षावर तो त्याचं घरटं बांधायचा ते झाड त्याच्या घरट्यासकट कापून जाळून टाकायचे.

पण आज मात्र हा पक्षी ‘पर्यावरण रक्षक दूत’ मानला जातो आहे. आसामी लोकांच्या ‘गमशां’वर आणि ‘मेखला साड्यां’च्या पदरावर मोरांऐवजी रेशमी आणि जरीच्या वेलबुट्टीने चितारलेले हरगिला पक्षी ऐटीत, दिमाखात झळकत आहेत. ‘हरगिला’ची जनमानसातली प्रतिमा अशी आमूलाग्र बदलण्याचं संपूर्ण श्रेय आज जगभरात ‘स्टॉर्क सिस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममधल्या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांना जातं.
सुमारे अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट. प्राणीशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन ‘हरगिला’च्या संशोधनात डॉक्टरेट करण्याच्या विचारात त्या होत्या. त्याच वेळी एका घटनेने त्यांना आमूलाग्र हलवलं. एका कापून, उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या फांद्यांमध्ये उद्ध्वस्त झालेली ‘हरगिला’ची घरटी आणि तडफडणारी पिल्लं त्यांच्या नजरेस पडली. त्या सांगतात, ‘‘ते दृष्य बघून जणू काही कुणी माझ्याच मुलींना इजा केली आहे इतका माझा जीव कळवळला आणि मी ठरवलं की या घटकेला हरगिलावर अभ्यासपूर्ण संशोधन करण्यापेक्षा जनमानसातला या पक्ष्याबद्दलचा दृष्टिकोन बदलणं हे अधिक महत्त्वाचं आहे म्हणून मी स्वत:ला हरगिलाच्या संरक्षण-संवर्धनाच्या कामात झोकून द्यायचं ठरवलं.’’

अशा रीतीने २००७ मध्ये डॉ. बर्मन यांनी आपल्या या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. पण निसर्गसंवर्धनाचं बीज मात्र त्यांच्या मनात त्यांच्या लहानपणीच रुजलं होतं. त्या जेव्हा पाच वर्षांच्या होत्या, तेव्हा ब्रह्मपुत्रेच्या तीरावरच्या एका छोट्याशा वस्तीत त्यांना आपल्या आजीसोबत राहावं लागलं. सुरुवातीला पूर्णिमांचं मन तिथे अजिबात रमत नव्हतं. त्यांना एकटं वाटायचं. हे त्यांच्या चाणाक्ष आजीच्या लक्षात आलं आणि मग आजी छोट्या पूर्णिमेला रोज सकाळी भाताच्या शेतात घेऊन जायला लागली. आजीने पूर्णिमाला तिथल्या परिसरात असलेल्या झाडाझुडपांची आणि पक्षी-जगताची, विशेषत: हरगिलाची ओळख करून दिली. ‘‘माझी आजी निरक्षर होती, पण निसर्गाबद्दलची जाणीव, एक अंगभूत शहाणपण तिच्यापाशी होतं. आजीने मला पक्ष्यांच्या गोष्टी सांगितल्या. त्यांची गाणी शिकवली. हळूहळू माझ्या भोवतीच्या निसर्गाशी माझी अतूट मैत्री जमली. माझा एकटेपणा कुठल्याकुठे पळून गेला. कोवळ्या वयात माझ्यावर झालेल्या निसर्गसंवर्धनाच्या संस्कारांमुळेच मी आज इथवर पोचू शकले आहे.’’ असं पूर्णिमादेवी अभिमानाने सांगतात.

हरगिलाच्या संवर्धन, संरक्षणासाठी काम करायचं हे डॉ. बर्मन यांनी ठरवलं खरं, पण जनमानसातले शुभ-अशुभांचे संकेत, ग्रह बदलणं ही फार फार अवघड गोष्ट होती. हा मोठा अडथळा कायमस्वरूपी दूर करण्याकरता त्या उपाय शोधू लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जनमानसातली हरगिलाची ही अशुभ, अभद्र प्रतिमा आमूलाग्र नष्ट करायची असेल तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी आणि तीही घरातल्या स्त्रियांच्या सहभागातून. त्यांची आजी आणि आई यांच्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होताच. या दोघींनी निसर्गाकडे बघण्याचा एक निरोगी दृष्टिकोन त्यांना दिला होता. त्या म्हणतात, ‘‘ग्रामीण भागातल्या स्त्रियांचा सहभाग बदलाच्या आणि संवर्धन-संरक्षणाच्या कामात कळीचा, महत्त्वाचा ठरेल याची पुरेपूर जाणीव मला होती.’’

मग याची सुरुवात कुठून करायची याचा विचार झाला. ग्रामीण भागातल्या घराघरांतून माणसांशी भावनिक संवाद सांधण्याचं काम डॉ. बर्मन यांनी सुरू केलं. त्याकरता त्यांनी अनेक क्लृप्त्या वापरल्या. छोटे-छोटे मेळावे घेऊन हरगिलाची माहिती देणं, मृत प्राणी खाऊन हा पक्षी आपल्या पर्यावरणाला कशी मोठी मदतच करतो हे लोकांना पटवून देणं त्यांनी सुरू केलं. या सोबतच स्त्रियांकरता पाककृती स्पर्धा, छोटे छोटे खेळ, गाणी, गोष्टी असे उपक्रम सुरू केले. अनेक ग्रामीण स्त्रिया यात आनंदाने, उत्साहाने सहभागी झाल्या.

या उपक्रमातूनच हरगिलाचं गर्भारपण साजरं करण्याची, ‘बेबी शॉवर’ची भन्नाट कल्पना त्यांना सुचली. नेस्टिंग हरगिलाचे प्रतीकात्मक पुतळे बनवून घेऊन त्यांनी हा समारंभ गावागावांत सुरू केला. त्यामुळे पारंपरिक आसामी संस्कृतीशी हरगिलाची नाळ जोडली गेली. घराघरातून, हरगिलाचं नाव चांगल्या अर्थाने लोकांच्या मनात आणि ओठांवर रुळायला लागलं आणि रूढार्थाने एका चांगल्या बदलाची नांदी झाली. लोकांच्या मनातली हरगिलाभोवतीची अशुभ, अभद्र छाया हळूहळू विरायला लागली.

या सगळ्या उपक्रमातून हळूहळू या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांचा एक सशक्त गट आकाराला यायला लागला. सुरुवातीला केवळ दहा-बारा स्त्रियांच्या सहभागाने सुरू झालेल्या या गटाचे आज जवळजवळ वीस हजार सदस्य आहेत. ‘हरगिला आर्मी’ या नावाने आज हा संपूर्णपणे स्त्री-सदस्य असलेला गट जगभरात प्रसिद्ध झाला आहे. यात प्रामुख्याने मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या गृहिणींचा लक्षणीय सहभाग आहे. ‘पर्यावरणाच्या शिक्षणाचं काम घरातूनच सुरू होतं’ हे त्यांचं घोषवाक्य आहे.

मुळात हरगिला पक्ष्याबद्दलची आणि पर्यायाने पर्यावरणाबद्दलची जागरूकता वाढीला लागण्याकरता सातत्याने पर्यावरणाबद्दलचं शिक्षण, संकटग्रस्त पक्ष्यांना मदत करून त्यांना त्यातून सोडवण्याचं प्रशिक्षण या सभासदांना दिलं जातं. शिवाय भावनिकदृष्ट्या लोकांना जोडण्याकरता हरगिलाचं गर्भारपण साजरं करण्यापासून इतर अनेक सांस्कृतिक सोहळे वेळोवेळी प्रथेनुसार साजरे केले जातात. शिवाय शेतीकाम, शिवणकाम, विणकाम यांचं व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. यातूनच आता हरगिलाची चित्रं विणलेले ‘गमशे’ आणि मेखला (आसामी साड्या) लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या सगळ्या उपक्रमातून स्वयंरोजगाराची संधी मिळून या स्त्रिया आता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत आणि पर्यावरण रक्षक म्हणून आपली कामगिरी उत्तम रीतीने बजावत आहेत. डोक्यावरती ‘हरगिला टोप्या’ घालून, रिंगण करून गायली जाणारी हरगिलाची गाणी, पथनाट्यं आणि समूहनृत्यं आता तिथल्या तरुणींमध्येही विशेष लोकप्रिय होऊ लागली आहेत.

या भागातलं प्रत्येक घर आणि त्यातली प्रत्येक स्त्री हे वृक्ष आणि पक्षी यांच्या संवर्धनाचे, जपणुकीचे दूत बनावेत हे ‘हरगिला आर्मी’च्या चळवळीचं स्वप्न आहे. आता हरगिला जिथे आढळतात अशा प्रदेशात म्हणजे आपल्या देशात बिहार राज्यात आणि कंबोडियात डॉ. बर्मन यांच्या कामाची व्याप्ती वाढते आहे. खरं तर जगभरातूनच लोकांना, स्वयंसेवी संस्थांना आणि पर्यावरण संवर्धकांना प्रशिक्षण देण्याकरता डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांच्याकडे सातत्याने विचारणा होत आहे. डॉ. बर्मन म्हणतात, ‘‘प्रत्येक जनसमूहाचा खास स्वत:चा असा संस्कृतीचा आणि पर्यावरणाशी असलेल्या त्यांच्या नात्याचा एक गोफ विणलेला असतो. आसाममध्ये जी चळवळ, उपाय यशस्वी झाले ते इतरत्र लागू पडण्याकरता त्यात त्या दृष्टीने उचित बदल करावे लागतील आणि आम्ही तशी विनंती इतरत्र काम करताना करणार आहोत आणि त्या दृष्टीने तिथे प्रशिक्षण देणार आहोत. याकरता जगभरातल्या ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सहभागी करून घेऊन त्यांच्या या संदर्भातल्या विविध उपक्रमांत त्यांच्या भागातल्या प्रथा-परंपरांशी, संस्कृतींशी मिळतीजुळती चळवळ उभारण्याकरता त्यांना प्रशिक्षण देणं, सहकार्य करणं, प्रेरित करणं अशी आमची योजना आहे. अर्थात हे इतर काही बदल अपेक्षित असले तरी पर्यावरण संवर्धन/ संरक्षणाच्या कुठल्याही चळवळीत जनसमूहाची, समाजाची याबद्दलची जबाबदारी, स्त्रियांचं नेतृत्व आणि सांस्कृतिक अभिसरण हे आमच्या दृष्टीने चळवळीचे गाभ्याचे मुद्दे समानच असतील.’’

पूर्णिमादेवींची पुढची पिढीही यात सक्रिय सहभागी आहे. त्यांच्या संस्क्रिती आणि संप्रिती या जुळ्या मुली तरुणाईच्या सहभागातून ‘हरगिला डेस्क’ नावाचं मासिक चालवतात. त्यात त्यांच्या कम्युनिटीमधल्या विविध उपक्रमांची माहिती दिली जाते आणि विद्यार्थ्यांचे लेख प्रसिद्ध केले जातात. पूर्णिमादेवी म्हणतात, ‘‘निसर्ग हा इतरत्र बाहेर कुठे नाही तर तो आपल्या स्वत:तच असतो. निसर्गाचं संवर्धन ही जबाबदारी फक्त कुण्या संशोधकांची किंवा कार्यकर्त्यांची नाही, तर ती आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. त्याकरता आपण निसर्गाचं शहाणपण निसर्गातूनच शिकायला पाहिजे. हरगिला पक्ष्यांनी मला सामर्थ्य, शहाणपण आणि कनवाळूपण शिकवलं. निसर्गातली प्रत्येक प्रजाती आपल्याला काही ना काही धडे शिकवत असते. आपल्या मनातले गैरसमज, संकेत पूर्वग्रह दूर सारून आपल्या मुळांशी आपलं नातं निर्मळ, स्वच्छ मनाने, पुन्हा एकदा घट्ट केलं पाहिजे. मनुष्यप्राणी आणि आपली धरित्री परस्परांच्या सुसंवादातून विकास पावतील अशा भविष्याची आपण बांधणी केली पाहिजे.’’

हरगिलाच्या संरक्षणासाठीच्या आणि संवर्धनाच्या त्यांच्या अथक प्रयत्नांची आणि अजोड कामगिरीची दखल आज जगभरातून घेतली जात आहे. ‘व्हिटली अॅवॉर्ड २०१७/ ग्रीन ऑस्कर २०१७’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. भारतीय स्त्रियांकरता असलेल्या सर्वोच्च सन्मानाने ‘नारी शक्ती पुरस्कारा’ने त्यांना गौरवलं गेलं आहे. तसंच या वर्षी ‘टाइम’ मासिकाच्या ‘विमेन ऑफ द इअर २०२५’च्या यादीत त्यांचं नाव सन्मानाने झळकलं आहे. ‘अरण्यक’ या अशासकीय स्वतंत्र संस्थेत त्यांनी हरगिलाच्या संवर्धनाच्या प्रकल्पावर ज्येष्ठ वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे. त्या आययूसीएच (International union for Conservation of Nature) या करकोच्याच्या प्रजातींविषयी संशोधन करणाऱ्या विशेष गटाच्या सभासद आहेत.

डॉ. पूर्णिमादेवींनी त्यांची डॉक्टरेट २०१९ मध्ये मिळवलीच; पण त्यांच्या सातत्यपूर्ण आणि चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे २००७ मध्ये संख्येने केवळ साडेचारशे असलेल्या हरगिलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन २०२३ पर्यंत ती आता १८०० झाली आहे. त्यांच्या कामाचा हा खणखणीत दाखलाच म्हणावा लागेल.

smcmrc@gmail.com