अहमदनगरजवळील शिंगवे या छोटय़ाशा गावात डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर उभं केलं.
डॉ. राजेंद्र यांच्या वडिलांनी आपली सहा गुंठे जमीन ‘माऊली’ प्रकल्पासाठी दिली आणि आता इथे शंभर महिला आणि त्यांची १५ मुलं कायमस्वरूपी राहतात. त्यांना स्वत:चं हक्काचं घर मिळालं, जिथून कुणीही जा म्हणणार नव्हतं..
एक विकल अवस्थेतील आजीबाई रस्त्यावर पडल्या आहेत.. मरायचं म्हणतायंत, त्यांच्या मुलाने त्यांना त्या मनोरुग्ण आहेत, अपंग आहेत म्हणून रस्त्यावर टाकून दिलंय.. मी त्यांना घरी घेऊन येऊ का?, डॉ. राजेंद्रने आपली पत्नी डॉ. सुचेताला फोन करून हा प्रश्न विचारला. तो तिच्यासाठी कसोटीचा क्षण होता.. खरं तर दोघांच्याही कसोटीचा. सामाजिक कामात झोकून देणं ठीक आहे. रस्त्यावरच्या लोकांना खायला घालण्यासाठी दररोज सकाळी उठून ६०/७० डबे तयार करणं.. रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करणं हेही एक वेळ ठीक. पण अशा घाणीने माखलेल्या, नैसर्गिक विधींचीही शुद्ध हरपलेल्या एखाद्या महिलेला एकदम घरीच घेऊन यायचं म्हणजे जरा कठीण काम होतं. पण सुचेता त्या क्षणी कसोटीला उतरली आणि हो म्हणून मोकळी झाली..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही गोष्ट साधारण आठ वर्षांपूर्वीची. त्याआधी घडलेला आणखी एक प्रसंग.. स्कूटरवरून जात असताना या दोघांनी एक मनोरुग्ण स्त्री (खरं तर तिच्या अवतारावरून कळतंच नव्हतं ही स्त्री की पुरुष आहे ते) उकिरडय़ावर स्वत:चीच विष्ठा खाताना बघितली आणि हे संवेदनशील जोडपं प्रचंड अस्वस्थ झालं. आपण किमान अशांना मनुष्यप्राणी खातो ते अन्न तरी देऊ या म्हणत डॉ. सुचेताने दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळी उठून स्वयंपाक करून डबे भरणं सुरू केलं. त्या वेळी ती एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत होती. डॉ. राजेंद्र यांचं नगरला स्वतंत्र क्लिनिक होतं. आजही आहे.. त्यानंतर हळूहळू काम आकाराला येत गेलं आणि एका जगावेगळ्या प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यांना फक्त अन्न देऊन प्रश्न सुटणार नाही तर त्यांना हक्काचं घर हवं, या ध्यासाने काम सुरू झालं आणि मग समाजातील दानशूरांच्या मदतीने, समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या अशा स्त्रियांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर उभं राहिलं.

अहमदनगरजवळील शिंगवे या छोटय़ाशा गावात डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे हे दाम्पत्य राहतं. वैद्यकीय महाविद्यालयात असताना दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन लग्न झालं. ही दोघं एकुलता एक मुलगा किरण आणि डॉ. राजेंद्रचे वडील असं चौकोनी कुटुंब. राजेंद्रची प्राथमिक शिक्षिका असलेली आई २३ वर्षांपूर्वी अकाली गेली. अत्यंत गरिबीतून शिकून शिक्षिका झालेल्या त्यांच्या आईला प्रचंड सामाजिक जाण होती. गावकुसाबाहेरच्या मुलांना त्या मायेने शाळेत आणत. गरिबीने पिचलेल्या त्यांच्या आयांना आधार देत. त्या बायका आपली सगळी सुखं-दु:खं या मास्तरीणबाईसमोर मोकळी करत. याच आचार-विचारांचा वारसा पुढच्या पिढीत झिरपत आला. डॉ. राजेंद्र यांचे वडीलही प्राथमिक शिक्षकच. त्यांनी आपली सहा गुंठे जमीन ‘माऊली’च्या सध्याच्या प्रकल्पासाठी क्षणाचाही विचार न करता दिली. आता इथे शंभर महिला आणि त्यांची १५ मुलं कायमस्वरूपी राहतात. त्यांना स्वत:चं हक्काचं घर मिळालं, जिथून कुणीही जा म्हणणार नव्हतं..

‘माऊली’तील कामाचं स्वरूप म्हणजे.. महामार्गावर किंवा एखाद्या गावात/ शहरात कोणी बेवारस मनोरुग्ण स्त्री सापडली की तिला तातडीने इथे घेऊन यायचं. इथे आल्यावर प्रथम डोक्यापासून पायापर्यंत तिला स्वच्छ करायचं. सर्व वैद्यकीय तपासण्या करायच्या. मनोविश्लेषण करून त्या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार करायचे. फक्त त्यांची सेवाशुश्रूषाच नव्हे तर त्यांना आयुष्यभर आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून सांभाळायचं. असं हे जगावेगळं काम म्हणजे समाजाच्या दृष्टीने वेडेपणाच. हे कसं शक्य आहे? अत्यंत घाणेरडय़ा अवस्थेत, विविध गंभीर आजारांनी आणि त्याचबरोबर गंभीर मानसिक आजारांनी व्यापून टाकलेल्या या जिवांना माणूस म्हणून स्वीकारण्यासही समाज तयार नसतो. आपल्याच नातेवाईकांनी त्यांना नाकारून रस्त्यावर फेकलेलं असतं. वेडी झाली म्हणून कुणाला नवऱ्याने टाकलेलं तर कधी एखाद्या भावाने बहिणीला वेड लागलं म्हणून हाकलून दिलेलं.. काहींना तर मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिलेलं.

डॉ. सुचेता म्हणते, एखाद्या महिलेचा नवरा मनोरुग्ण झाला तर त्याची पत्नी नशिबाचं दान म्हणून आयुष्यभर त्याच्यावर उपचार करत सेवा करत राहते. मात्र अशी वेळ एखाद्या पुरुषावर आली तर तो मात्र लगेच दुसरी बाई घरात आणून मोकळा होतो. पण फक्त व्यवस्थेवर टीका-टिप्पणी करून मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी दूरगामी परिणाम करणारं सेवाकार्य उभं करावं लागेल ही दोघांची धारणा. आता तर हे आभाळ साधणं दोघांचं जीवितकार्यच बनलंय.

‘माऊली’त आलेली एखादी रस्त्यावर सापडलेली महिला बलात्कारातून गर्भवती झालेली असते. आपल्या पोटात बाळ आहे याची जाणीवही तिला नसते. तिच्या प्रसूतिपूर्व चाचण्या करायच्या. मुळात ती उकिरडय़ावरचं अन्न खाऊन आणि गटाराचं पाणी पिऊन कुपोषित आणि आजारी असते. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानंतर तिचं बाळंतपण. तेही ‘माऊली’तच. मग बाळंतपणातली काळजी आणि पुढे या मुलांना आपलं नाव देऊन त्यांचं पालकत्व स्वीकारायचं. ही मुलं कायदेशीर अडचणींमुळे दत्तक जात नाहीत. त्यांचा सांभाळ आपली मुलं म्हणून करायची. अगदी आयुष्यभर.. त्यांच्या भान हरपलेल्या आयांसह.

तसं बघितलं तर हे महाकठीण काम. पण या दोघांना यात विशेष करतोय असं वाटत नाही. यावर कळस म्हणजे त्यांचा सध्या १२ वीत असणारा मुलगा किरण तोही या कामात एकरूप झालाय. या महिलांच्या नृत्य-गायनथेरपीच्या वेळी तबला/पेटी वाजवतो. आठवीत असताना कुठल्याशा परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्या कुटुंबाविषयीच्या माहितीत या पठ्ठय़ानं दहा बहीण भाऊ असा ‘माऊली’तील त्या वेळच्या मुलांचा आकडा लिहिला होता. शिक्षकांनी गडबडून घरी फोन लावला तेव्हा त्यांनाही तिसऱ्या पिढीत झिरपलेल्या संस्कारांची जाणीव झाली.

‘माऊली’ हे एक खूप मोठं कुटुंब आहे आणि किरण सगळ्यांचा आवडता, लाडका दादा आहे. कुटुंबात जाणवणारे प्रश्न इथेही जाणवतात. जवळजवळ सर्वच जणी लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या. त्यांचे प्रश्न अधिकच टोकदार. त्यांनाही त्यांच्यासोबत कुणी काय केलं, त्या कोण व्यक्ती होत्या हेदेखील आठवत नाही. ‘माऊली’च्या वातावरणात त्यांच्या मनावरची जखम हळूहळू भरली जाते. पण व्रण मात्र तसाच राहतो. त्यांच्या जगण्याला आत्मभान देणं ही खूप वेगळी जबाबदारी दिसते. आजारी असणाऱ्या बऱ्याच महिलांचा मृत्यूही इथेच होतो. वृद्ध, गंभीर आजारी, एड्सबाधित महिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यावर अन्त्यसंस्कारही ही दोघंच करतात.
हातात हात घेणं म्हणजे केवळ , सुख-दु:खांच्या क्षणी साथ देणं आणि सहजीवनाचं नातं निभावणं इतकंच असतं का? खरं तर नातं निभावण्यासाठी विचारांची एकरूपता हवी. कृतिशील विचार आणि एकमेकांची साथ असेल अकल्पित वाटणारी अशी अचाट कामं उभी राहतात आणि समाजाला दिशा देतात.. प्रेरक ठरतात.

या निमित्ताने डॉ. राजेंद्र यांनी एक आठवण सांगितली.. ‘माऊली’त आल्यावर या मनोरुग्ण महिलांचे केस डॉ. सुचेता कापत असे. त्या वेळी त्यांचे उवा आणि किडे यांनी भरलेले केस कापता कापता तिच्याच डोक्यात उवा झाल्या. काही केल्या त्या जाईनात. प्रचंड त्रास होऊ लागला. खूप जालीम उपाय केल्यावर काही काळाने त्या गेल्या. पण तिने कधी साधी कुरबुरसुद्धा केली नाही. सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत अशी कामं क रून माणूस हसतमुख कसं राहू शकतं, या प्रश्नाचं उत्तर इथे मिळत नाही.

डॉ. राजेंद्र व सुचेता यांचं सहजीवन म्हणजे एक जगावेगळी कथा आहे. मुळात काही मिळवायचंच नाही तर मग गमवण्याचा प्रश्नच कुठे येतो? कसलीही अपेक्षा नाही.. कुणी उपेक्षा केली तरी खंत नाही. हा माझा मार्ग एकला.. म्हणत एका वेगळ्या वाटेवरून चालणारं हे दाम्पत्य. दोघांनाही साहित्य, चित्रपट आणि नाटकांची आवड. प्रवासाचं तर खूप वेड. पण ‘माऊली’त गुरफुटल्यापासून गेल्या कित्येक वर्षांत त्यांचं पाऊल बाहेर पडलेलं नाही. (कारण कामाला कोणी मिळत नाही, त्यामुळे सगळी मदार यांच्यावरच). मात्र दोघं मिळून लघुचित्रपट आणि माहितीपट तयार करतात. त्यांनी निर्मिती केलेल्या ‘जना’ या मराठी लघुपटाची बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली. त्यासाठी
मागच्या वर्षी फ्रान्समधून आमंत्रणही आलं. पण यांना जाता आलं नाही.

आता तर ते आपल्या कुटुंबाचा अजून मोठा विस्तार करतायत. अलीकडेच नगरमधील बलभीम पठारे व मेघमाला पठारे या दानशूर दाम्पत्याने त्यांना नव्या प्रकल्पासाठी दीड कोटी रुपये किमतीची तीन एकर जागा दान केलीय. त्यावर ‘मनगाव’ हे ६०० महिलांना व त्यांच्या मुलांना सामावून घेणारं घर बांधायला त्यांनी सुरुवात केलीय. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या या कामाला त्यांनी खिशात १५ लाख रुपये असताना हात घातलाय. माणुसकीची कास धरून निरपेक्षसेवेची आस धरून हा गोवर्धन पर्वत उचलण्याच्या त्यांच्या निर्धाराला आपली गोपाची काठी तरी लागावी एवढीच प्रामाणिक इच्छा.

– संपदा वागळे

मराठीतील सर्व हातात हात घेता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mauli seva pratisthan