तबलानवाज मुकुंदराज देव व कथ्थक नृत्यालंकार मनाली देव यांचं सहजीवन म्हणजे एकमेकांमध्ये समरसून गेलेले सच्चे सूर. त्यांच्या अनेक शिष्यांमुळे गुरूंची छत्रछाया लाभलेल्या ‘देव’घरातून असंख्य विद्यार्थ्यांची जडणघडण झालीय,
होत आहे..
तबलानवाज मुकुंदराज देव आणि कथ्थक नृत्यविशारद (पुढे नृत्यालंकार) लीना शेंडे (मनाली देव) यांचा प्रेमविवाह नुकताच पार पडला होता, ९४-९५ ची गोष्ट असेल ही. दोघांकडेही नियमित उत्पन्न देणारा कोणताच स्रोत नव्हता. मुकुंदराज साथीला जात असे, परंतु त्यातून मिळणारी बिदागीही अत्यंत अल्प. आईवडिलांचा भक्कम आधार हीच काय ती जमेची बाजू. अशा अनिश्चिततेच्या काळात त्याला समजलं की एस.एन.डी.टी. विद्यापीठात तबलावादकाची जागा रिकामी आहे. घरात चर्चा झाली आणि त्याने अर्ज भरला. पद्मभूषण प्रभा अत्रे या त्या वेळी या विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. मुकुंदराज त्यांच्या साथीला जात असे, त्यामुळे त्याला ही नोकरी मिळणार असंच सर्वाना वाटत होतं. पण झालं उलटंच. मुकुंदराजचा अर्ज बघून प्रभाताईंनी त्याला फोन केला खरा, पण त्यांचे शब्द होते, ‘‘इथे तबला वाजवण्यात तू आपलं आयुष्य फुकट घालवावंस असं मला वाटत नाही. तुझ्या भरारीसाठी तर आकाश खुलं आहे..’’ प्रभा अत्रे यांचा हा आशीर्वादच मुकुंदराजसाठी टर्निग पॉइंट ठरला..
आंतरराष्ट्रीय तबलावादक म्हणून तो स्वत: तर घडलाच शिवाय सहधर्मचारिणीलाही नृत्यकलेत पुढे येण्यासाठी घडवत गेला. प्रभा अत्रे, पं. सतीश व्यास, बेगम परवीन सुलताना, पं. जसराज, उस्ताद दिलशाद खान, डॉ. एच. राजम, आरती अंकलीकर-टिकेकर, गोपीकृष्ण, पं. बिरजू महाराज.. अशा गायन, वादन व नर्तन क्षेत्रातील विश्वविख्यात कलाकारांना साथ देण्यासाठी त्याने अनेकदा जगभ्रमण केलंय. यापेक्षाही विशेष म्हणजे मुकुंदराज, मनाली व तबलावादनात वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणारा त्यांचा सुपुत्र रोहित (१८) या तिघांचा प्रवास आज या स्तरावर येऊन पोहचलाय की तबला व कथ्यक यांची जुगलबंदी व स्वतंत्र सादरीकरण या त्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वतंत्र कार्यक्रमाचे गेल्या वर्षी अमेरिकेत सहा ठिकाणी प्रयोग झाले आणि गाजले.
मुकुंदराज यांच्या घरातच कला आहे. त्याची आई म्हणजे सुप्रसिद्ध कथ्यक नृत्यांगना मंजिरी देव. वडील श्रीराम देव हेही उत्तम कीर्तनकार. अशा या कलावंत देव कुटुंबातील मुकुंदराजचा जीव लहानपणीच तबल्यावर जडला आणि त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेता घेता आधी तबलाविशारद व नंतर तबलालंकार ही बिरुदंही मिळवली. सुप्रसिद्ध तबलावादक
पं. ब्रिजराज मिश्रा व पंडित मृदंगराज हे त्यांचे गुरू. आकाशवाणी व दूरदर्शनचा ‘ए’ ग्रेड आर्टिस्ट म्हणून मान्यता मिळालेल्या मुकुंदराजला १९९३ मध्ये सुरसिंगारतर्फे ‘तालमणी’ हा किताब मिळाला. तेव्हापासून सुरू झालेली त्याची पुरस्कारांची मालिका अव्याहतपणे सुरूच आहे. एक महिन्यापूर्वीच मिळालेला ‘पंडित शंकर बापू आपेगावकर तालवाद्य पुरस्कार’ हे त्यातलंच मोरपीस.
मनालीच्या घरची परिस्थिती मात्र अगदी उलट. तिचे वडील विश्वनाथ शेंडे यांचा सगळा भर औपचारिक व शारीरिक शिक्षणावर. शरीराला काहीतरी व्यायाम हवा म्हणून त्यांनी मनालीला ७ व्या वर्षांपासून घराजवळच असलेल्या मंजिरीताईंच्या कथ्थक नृत्याच्या क्लासला घातलं तो क्षण तिच्यासाठी योगायोगाचा. कारण मंजिरीताईंची ही लाडकी शिष्या पुढे त्यांची सून बनली. मुकुंदला कलेची साधना निशंकपणे करता यावी म्हणून लग्नानंतर दोन र्वष तिने नोकरीही केली. मात्र त्यानंतर घरच्यांच्या प्रोत्साहनाने तिने स्वत:ची नृत्यसंस्था सुरू केली. तोपर्यंत छोटय़ा रोहितला घेऊन मुकुंदराजच्या प्रत्येक कार्यक्रमाला जाणं आणि सगळ्या शरीराचा कान करून ऐकणं हाच तिचा दिनक्रम होता. व्यासपीठावर तबला जागवणारा मुकुंद आणि ते बोल तिच्या शेजारी बसून आपल्या छोटय़ा तबल्यांवर उतरवण्याचा प्रयत्न करणारा लहानगा रोहित यांच्या सहवासात तिला नवी प्रेरणा मिळत गेली. नृत्यशिक्षिका ते नृत्यालंकार पदवीप्राप्त नृत्यांगना हा तिचा प्रवास ही याच काळाची देणगी.
त्यानंतर पंडित मुकुंदराज देव यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवायला तिने सुरुवात केली. आश्चर्य वाटलं ना? साहजिकच आहे. कारण नृत्याचं कोणतंच औपचारिक शिक्षण न घेतलेली व्यक्ती नृत्य शिकवते हे पटणं अवघडच. परंतु मनाली म्हणाली, ‘नृत्यकला ही मुकुंदला मिळालेली ईश्वरीय देणगी आहे. त्याच्या अंगात उपजतच ती लय आहे. त्यामुळेच मीच नव्हे तर सात-आठ र्वष नृत्यशिक्षण घेतलेल्या नृत्यांगनाही त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात. नृत्यातील सगळ्या कौशल्यांचा मेळ घालण्याचं तंत्र त्याच्याकडूनच शिकावं..’
नृत्यालंकार मनाली देव आपलं नृत्यकौशल्य धारदार ठेवण्यासाठी आजही दर आठ दिवसांनी आपल्या गुरूंकडून (मुकुंदराज) तालीम घेते. यावेळी त्यांच्यामधील नातं फक्त गुरुशिष्याचं. मुकुंद म्हणाला, ‘भले नवरा म्हणून मी नंतर तिचं काहीही ऐकून घेईन पण शिष्या म्हणून समोर उभी राहिल्यावर मात्र मी म्हणेन ती पूर्व दिशा..’ त्याने असंही सांगितलं की त्याच्या जवळजवळ सर्व कार्यक्रमांना मनाली हजर असतेच आणि मैफलीनंतर ती जे भाष्य करते त्या टिप्स त्याच्यासाठी लाखमोलाच्या ठरतात.
नृत्यशिक्षणातील विविध जागांचा स्वत: अनुभव घेण्यासाठी ३/४ वर्षांपूर्वी मुकुंदांच्या पायात घुंगरू बांधून गडकरी रंगायतनच्या रंगमंचावर अदाकारी पेश केली तेव्हा कुठे आम जनतेला त्यांच्यातील या कौशल्याची जाणीव झाली. अंगभूत प्रतिभेला मेहनतीची जोड दिल्याने मुकुंदराज व मनाली दोघांनीही आपल्या क्षेत्रात अनेक दिग्गजांची वाहवा मिळवलीय. वयाच्या १५/१६व्या वर्षीच अनुभवलेला एक सोनेरी क्षण मुकुंदराजने उलगडला.. भावनगरमध्ये पंडित गोपीकृष्णजींचा कार्यक्रम होता. जगविख्यात तबलावादक पंडित किशन महाराज, पंडित ब्रिजराज मिश्रा व मुकुंदराज असे तिघे जण एकाच वेळी साथीला होते. तेव्हा प्रेक्षकांना उद्देशून पंडित किशन महाराज उद्गारले.. ‘चक्रधार मे (संगीतात एकच चीज ३ वेळा वाजवतात.) पहला पल्ला मेरा परपोता (पणतू म्हणजे मुकुंदराज) बजाएगा, दुसरा पल्ला मेरा पोता और तिसरा मैं खुद बजाऊंगा..’
पंडित बिरजू महाराजांची शाबासकीची थाप अशी.. ‘आप का हम बहुत बार जिक्र करते है, एक हमारे झाकीरभाई है और दुसरे हमारे मुकुंदभाई. जिनकी संगत हमे बहुत पसंद है।’ पंडित सतीश व्यास व बेगम परवीन सुलताना यांची तर मनालीने अनेकदा वाहवा मिळवलीय. परवीन सुलताना यांनी ‘मुकुंद आणि मनाली या दोघांनी सात सुरांना आपल्या आत बांधून ठेवलंय’ अशा शब्दात त्यांचं कौतुक केलंय. असे अनेक अविस्मरणीय क्षण दोघांनीही मनाच्या कुपीत जपून ठेवलेत.
स्वत:ची नृत्यसंस्था, स्टेज शो याबरोबर नृत्यासाठी लागणारे ड्रेसेस भाडय़ाने देण्याचा व्यवसायही मनाली करते. सुरुवातीला (२००६) चार छोटय़ा ट्रंकात मावणाऱ्या, ‘साईराज ड्रेसवाला’ या तिच्या उद्योगाची व्याप्ती गेल्या १० वर्षांत २५ ते ३० गच्च भरलेल्या कपाटांच्या पल्याड गेलीय. या भरभराटीचं श्रेय ती घरच्या पाठिंब्याला देते. याबरोबरच देवांच्या घरची मोठी सून म्हणून तिने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यांचाही मुकुंदराजने आवर्जून उल्लेख केला.
मंजिरी देव यांनी १९९५ पासून आपले गुरू पद्मश्री गोपीकृष्ण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेला गोपीकृष्ण संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांसाठी एक पर्वणीच होय. या महोत्सवात आत्तापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अनेक कलाकारांनी आपली कला सादर केलीय. या घरच्या कार्यात आयोजनापासून सादरीकरणापर्यंत घरातील सर्वाचा सहभाग असतो.
‘गुरुछाया’ या त्यांच्या ठाण्यातील स्टेशन रोडवरच्या दुमजली वास्तूत आई-वडील, मुकुंदराज व अभिजीत हे दोन भाऊ व त्यांचा कुटुंबकबिला असा १० जणांचा परिवार अत्यंत गुण्यागोविंदाने राहतो. गुरूंची छत्रछाया लाभलेल्या या ‘देव’घरातून असंख्य विद्यार्थ्यांची जडणघडण झालीय, होत आहे.
असं म्हटलं जातं की स्वत:ची वेगळी ओळख कायम ठेवून दुसऱ्याशी एकरूप होण्याची किमया तबला या वाद्यात आहे. मुकुंदराज व मनाली यांचं सहजीवनही तसंच आहे. सुधीर मोघे यांच्या शब्दांचीही यानिमित्ताने आठवण..
म्हणोत कोणी या जगण्याला नश्वर वा खोटे
सूर भेटला ज्याला, त्याला परब्रह्म भेटे
संपर्क – मनाली देव
ईमेल- manalideo@yahoo.co.in
waglesampada@gmail.com