रेणू दांडेकर

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकतंच पहिली ते चौथी इयत्तांना गृहपाठ देणं बंद करणार असल्याचं सांगितलं. शिक्षणतज्ञांशी चर्चा करून याविषयी निर्णय होणार आहे. पण केवळ गृहपाठ बंद झाला म्हणजे लहान मुलांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या डोक्याचा ताप कमी झाला, असा अर्थ घेता येईल का? गृहपाठाचं आताचं स्वरूप लक्षात घेऊन त्यावर पुनर्विचार व्हायला नको का? मुलांचं रट्टा मारणं आणि निष्कारण वह्या भरवणं बंद होईल असे आनंददायी गृहपाठ रुजवण्याची कदाचित हीच उत्तम संधी आहे.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन

‘इयत्ता पहिली ते चौथी गृहपाठ बंद करणार’ असा फतवा निघाला नि आमच्या गोंधळलेल्या मनात पुन्हा गोंधळ निर्माण झाला. पालक अस्वस्थ झाले. आता मुलं घरी अभ्यास काय करणार? लिहिणार काय? पण खरं सांगायचं तर, ज्या स्वरूपाचा गृहपाठ आज या लहान मुलांना दिला जातो आहे, तो बंद झाला तर सगळ्यांनाच आनंद होऊ शकेल, कारण या प्रश्नोत्तरांच्या गृहपाठामुळे रट्टा मारण्याचंच काम अधिक होतं, असं दिसतं.
मला वाटतं, या प्रस्तावाचा अर्थ आज ज्या स्वरूपाचा गृहपाठ लहान मुलांना दिला जातो तो बंद करावा असा घेतला तर अधिक चांगलं होईल. गृहपाठाचं स्वरूप बदललं पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सध्याचं स्वरूप बहुतांशी असं आहे -धडय़ाखालचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ हे स्वाध्याय लिहून आणा, १ ते १०० अंक तीन वेळा लिहा. अशा प्रकारचं जे भरमसाठ लिखाण दिलं जातं, ते बंद करायलाच हवं. कारण याचा खरंच कंटाळा, ताण मुलांच्या मनावर येतो.

गृहपाठ म्हणजे मुलांना अनेकदा ओझं वाटतं. कारण इथे नवीन काही करायला, विचार करायला, सर्जनशीलतेला संधीच नसते. शाळेत प्रश्नोत्तरं सांगितली जातात, तीच परत तशीच्या तशी लिहून आणायला सांगितली जातात. अगदी बालवाडीतल्या मुलांनाही (प्री-प्रायमरी) गृहपाठ दिला जातो. यानं नवीन काय घडतं? शिवाय वर्गातल्या मुलांची संख्या पाहता गृहपाठ तपासणं हेही कधी, काही ठिकाणी अवघड असतं. घरी पालकांना मुलांनी अभ्यास केला याचं समाधान मिळतं आणि पालकांना समाधानी केलं याचा आनंद शाळेला असतो. अशा स्वरूपाच्या गृह अभ्यासाचा एक हेतू असावा, आकलनाचं दृढीकरण किंवा सोप्या भाषेत, शिक्षकांनी जे शिकवलं त्याचं दृढीकरण. पण हाही हेतू साध्य होत नाही, कारण मुलं एकाग्रपणे हे करतात का, हा प्रश्नच आहे.

पण मग गृहपाठ कसा असावा याचंही उत्तर द्यायला हवं. काही शाळांत गृहपाठाचा वेगळा विचार केल्याचं मला जाणवलं. मी ज्या वेगळय़ा शाळा पाहिल्या, तिथे तर गृहपाठ पूर्णपणे वेगळा होता. त्यामागची भूमिकाही समजून घ्यायला हवी. शासनाच्या या विचाराधीन प्रस्तावाच्या निमित्तानं गृहपाठ या संकल्पनेचा विचार करता येईल. त्यासाठी पाठय़पुस्तक निर्मितीतले दोन अनुभव सांगावेसे वाटतात.

‘हिरवे पिवळे ऊन कोवळे’ अशा ओळी असलेली एक कविता प्राथमिक वर्गाच्या पाठय़पुस्तकात होती. त्यावरचा स्वाध्याय तयार करताना प्रश्न होता, ‘ऊन कसे असते?’ आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार? मुलांचं उत्तर असतं, ‘हिरवे, पिवळे, कोवळे’! मुलांचं काहीच चुकत नाही, पण म्हणजे कसं, हे मुलांना स्पष्ट होईल? हाच प्रश्न तेव्हा प्राचार्य राम शेवाळकरांनी विचारला होता. त्यांनी सांगितलं होतं, की या ओळींचा अर्थ स्पष्ट होईल असे प्रश्न तयार करा. म्हणजे मुलांना नेमकेपणानं ते कळेल. ‘हिरवे, पिवळे, कोवळे’ हे तीनही संबोध स्पष्ट करणं आणि त्यांचा उन्हाशी काय सहसंबंध आहे, हे स्पष्ट झालं तरच ते शिकणाऱ्या नऊ-दहा वर्षांच्या मुलांना ते कळेल. गृहपाठ अशा प्रकारचा असायला हवा. मला त्यावेळी बा. सी. मर्ढेकरांच्या ‘बन बांबूचे पिवळय़ा गाते’ आणि ना. धों. महानोरांच्या ‘हिरव्या बोलीचा मी शब्द जाहलो’ या ओळींची आठवण झाली. हे शब्द, त्यांचा भावार्थ मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तशा प्रकारचा अभ्यास दिला तरच मुलं रुची घेऊन तो करतील असं वाटतं.

नववी-दहावीचं पुस्तक तयार करताना स्वाध्याय तयार होत होते. याचंही स्वरूप एका वाक्यात उत्तरं द्या, पर्याय निवडा, दोन-तीन वाक्यांत उत्तरं द्या, सात ते आठ ओळींत उत्तरं द्या, रिकाम्या जागा भरा, असंच. त्यानंतर येतो तो भाग खरा महत्त्वाचा- उपक्रम, कार्यक्रम, प्रकल्प, वाचन, कृती.. तेव्हा असं ऐकलं होतं, की हे कोण सोडवतंय? यामुळेच ‘जे परीक्षेसाठी ते महत्त्वाचं’ ही भावना पहिलीपासून सुरू होते नि शालांतापर्यंत ती घट्ट होते. असो. मग गृहपाठ कसा? मुळात गृहपाठ फक्त लेखी असत नाही. गृहपाठ तोंडी असतो. म्हणजे मुलं आपले अनुभव, कल्पना, विचार, निरीक्षणं, परीक्षण वर्गात मांडतील, पालकांशी त्या निमित्तानं संवाद होईल, एका अर्थानं (वेळ नसतो म्हणून) अंग काढून घेतलेल्या पालकांच्या मुलांशी गप्पा होतील. गृहपाठ श्रवणाचा असतो. गृहपाठ वाचनाचा असतो. गृहपाठ स्वयंनिर्मित, सर्जनशील, मुलांना काहीतरी करायला लावणारा असतो. किती पानं गृहपाठ दिला, यापेक्षा तो आनंदाचा किती झाला? तो करताना मुलांना मजा आली का? मुलांनी केवळ एका जागी बसून उतरवून काढणं, असं झालं नाही ना? हे प्रश्न विचारात घ्यावे लागतील. अशा गृहपाठांची निर्मिती करणं हे आव्हान असेल. केवळ एखादा मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे मनोरंजक गृहपाठ नव्हे. शिवाय सर्व विषयांचे असे लेखी गृहपाठ म्हणजे मुलं बोटंच मोडणार. अशा गृहपाठातून बाहेर पडायलाच हवं.

त्यासाठी उदाहरणं खूप देता येतील. उदा. बेरजेची दोन गणितं तयार करा (दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, पाच अंकी, हातच्याची, इत्यादी.) तुमच्या आजूबाजूला गणित कुठे कुठे दिसतं? (स्वयंपाकघरातली आईची मापनं- चिमटी, मूठ, पसा, ओंजळ, गाडय़ांचे नंबर, घरातल्या वेगवेगळय़ा वस्तू, झाडांची पानं), ११ ते २० यातले अंक उलटे करून लिहा, भाषा- आजी, आई, बाबा यांच्याशी त्यांच्या अभ्यासाबद्दल गप्पा मारा आणि उद्या वर्गात सांगा. अमुक एका परिच्छेदावर वा धडय़ावर तुम्ही प्रश्न तयार करा, ‘एक होता कावळा. एक होती चिमणी. एकदा काय झालं, खूप थंडी पडली..’ अशी कल्पना करून तुमची गोष्ट तयार करा, विरूद्धार्थी शब्द एकाच वाक्यात वापरा (उदा. गरीब-श्रीमंत- ‘तो मनानं श्रीमंत होता, पण परिस्थितीनं गरीब होता’), इतिहास- आजोबा, आजीला त्यांच्या आई-बाबांबद्दल विचारा, तुमच्या लहानपणीची गोष्ट आठवा, परिसरावर तर कितीतरी करता येईल. इथे जागेमुळे उदाहरणांना मर्यादा आहेत, पण असे गृहपाठ असतील तर मुलं आनंदानं करतात, त्यांना मजा येते. तंत्रज्ञानातल्या विविध साधनांचा वेगळा विचार वेगळे गृहपाठ देऊन करता येतो.

मुलंही गृहपाठाचं स्वरूप ठरवू शकतात. आणखी खोलवर विचार करायचा झाला तर गृहपाठाचं स्वरूप पालकांनी तयार करावं. (ही नसती डोकेदुखी कशाला? अशी तक्रार पालकांकडून येऊ शकते) पण कदाचित त्यामुळे नाविन्य येऊ शकतं. पालकांचे विषयवार गट तयार करता येतील. एवीतेवी व्हाट्सॲप ग्रुप झालेच आहेत, तर पालकांनी तयार केलेले गृहपाठ एकमेकांना पाठवता येतील. जे मुलं आणि पालक एकत्रपणे घरी करू शकतील. मुलांच्या मूल्यशिक्षणात या निमित्तानं सगळ्यांना सहभाग घेता येऊ शकेल. गृहपाठामुळे मुलांनी बनवलेल्या साधनांची प्रयोगशाळा निर्माण होते. गृहपाठामुळे मुलं निसर्गाच्या जवळ जातात. पाठय़पुस्तकाला धरून, पण पाठय़पुस्तकाबाहेर पडता येतं. गृहपाठ नुसतं उतरवून काढायला लावणारे, निर्जीव, वह्या भरवणारे, रट्टे मारायला लावणारे नसावेत. त्याचं स्वरूप बदलायला हवं. गृहपाठ शब्दाची व्याप्ती वाढवायला हवी. याचा उपयोग मुलांना समजून घेण्यास, मुलांना वाचण्यास आणि मुलं किती कल्पक असतात हे समजायला होतो.
renudandekar@gmail.com

Story img Loader