डॉ. अंजली जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूल होऊ न देणं, ही कुणाची निवड असू शकते यावर आजही अनेकांचा विश्वास नसतो. मूल नाही म्हणजे जोडप्यात काही तरी कमतरता असणार हे गृहीत धरलं जातं. पण खरंच इतकं सोपं आहे का पालक होणं? कारण मुलांच्या संगोपनातली चूक त्यांचं आयुष्य बरबाद करू शकते, तसंच पालकांना ओझं मानणाऱ्या मुलांमुळे आईवडिलांचं वार्धक्य असहाय्य होऊ शकतं. तेव्हा मूल होऊ द्यायचं की नाही, याचा निर्णय प्रत्येक जोडप्यावरच सोडायला हवा.

विमानाने ‘टेकऑफ’ केलं आणि वेगाच्या संथ लयीत माझा डोळा लागला. दिवसभराच्या कामाचा शीण आता बाहेर निघत होता. ठाक्! ठाक्! ठाक्! खुर्चीच्या मागून कुणी तरी जोरात धडका देत होतं. डोळय़ांवरची झोप खाडकन उडाली. कुणाच्या तरी लाडावलेल्या काटर्य़ाचा हा उपद्वय़ाप असेल! मी चिडून मागे पाहिलं. माझा अंदाज खरा ठरला. मागच्या सीटवर बसलेला एक छोटा मुलगा मजेत पायाला झोके देत बसला होता. त्याच्या बुटांच्या लाथा माझ्या खुर्चीच्या मागच्या भागावर दणादण आपटत होत्या. आपला सुपुत्र काही वावगं करतोय, याचा जराही पत्ता नसलेली त्याची आई मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसली होती. मी त्या मुलाकडे डोळे वटारून पाहिलं आणि बोटानं पाय न मारण्याची सूचना केली. झाऽऽऽलं! त्यानं संपूर्ण विमान दणकवून सोडणारं असं काही भोकाड पसरलं, की ज्याचं नाव ते! मग विमान लँड होईपर्यंत त्या उपद्रवी काटर्य़ाला शांत करता करता हवाईसुंदरीच्या तोंडाला फेस आला. घरी परतताना वाटलं, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं म्हणत आपण त्यांना उगीचच मखरात बसवून ठेवलंय. प्रत्यक्षात मुलं ही अत्यंत आगाऊ, बेशिस्त, आणि आत्मकेंद्रित असतात! मी आजूबाजूला पाहते तेव्हा दिसतं, की आईवडिलांनी मुलांना शिस्त लावण्याऐवजी आईवडीलच मुलांच्या पाठी फरफटत चाललेले असतात.

मला आणि गौतमला, दोघांनाही मुलांची आवड नाही. मूल नको यावर आमचं एकमत आहे. पुरुषांना मुलांची आवड नाही हे एकवेळ चालून जातं, पण मी स्त्री असूनही मुलांची आवड नाही? खुद्द माझ्या आईबाबांनाही ते पचवायला जड गेलं तर इतरांची काय कथा? लग्नाला दोन वर्ष उलटून गेली तसं आईनं चाचपून पाहिलं.

‘सोनल, किती वर्ष प्लॅनिंग अजून?’  ‘आम्ही दोघांनीही मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतलाय.’ मी खरं ते सांगून टाकलं.  ‘हे बघा, उगाच जास्त लांबवू नका. वय वाढलं की मग गुंतागुंत होते. ती निस्तरण्यापेक्षा वेळेवर विचार करा.’ आईला बहुधा मला काय म्हणायचंय ते लक्षातच आलं नव्हतं. ‘आई, तसं नाही. आम्ही कधीच मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलंय.’ मी स्पष्टीकरण दिलं.  ‘काय?’ आईला बसलेला धक्का तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘काही समस्या आहे का? हवं तर आपण गायनॅकॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेऊ. हल्ली इतकी अ‍ॅडव्हान्स्ड टेक्निक्स निघाली आहेत की..’ ‘आई, तू नीट ऐकून घेशील का? आमच्या दोघांपैकी कुणालाही शारीरिक समस्या नाही. आम्ही हा निर्णय विचारपूर्वक घेतलाय.’ आई बघतच राहिली. मग तिला जवळ बसवून मी शांतपणे सांगितलं, ‘हे बघ, एकतर मुलाला जन्म देऊन आपण काही ग्रेट करतोय, असं आम्हाला वाटत नाही. ती काही आयुष्याची इतिश्री नाही. दुसरं म्हणजे मी आणि गौतम करिअरच्या ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. दोघांनाही टुरिंग असतं. मूल झालं की या सगळय़ांत तडजोड करावी लागणार. अधिकची जबाबदारी वाढणार. ती उचलण्याची दोघांचीही तयारी नाही.’  ‘एवढंच ना? आम्ही दोघं सांभाळू की तुमच्या मुलाला!’ आई तत्परतेनं म्हणाली.

 ‘नाही आई! त्यावरही आम्ही विचार केलाय. आपण स्वत: मुलांची जबाबदारी घेऊ शकत नसू तर मुलांना जन्म देऊ नये, अशा मताचे आम्ही आहोत. तुम्ही तुमच्या पालकत्वाच्या जबाबदारीतून मोकळे झाले असताना, आमच्या मुलांमध्ये तुम्हाला का अडकवायचं? शिवाय जन्मदाते आईवडील वेळ देऊ शकत नसतील तर मुलांवरही तो अन्याय नाही का?’ आईला काही केल्या ते पटत नव्हतं. ‘अगं, हल्ली करिअर करणाऱ्या मुली काही ना काही सपोर्ट सिस्टीम शोधतातच की!’ ‘पण त्यांची किती फरफट होते हे बघते ना मी! हल्लीचं पालकत्व फार डिमांडिंग झालंय. मुलांच्या देखभालीसाठी फार मोठी किंमत, बहुधा स्त्रियांनाच चुकवावी लागते. कधी ती नोकरीवर पाणी सोडण्याची असते किंवा नोकरी केली तर करिअर आणि मुलं यांचा समन्वय साधताना होणाऱ्या ओढाताणीची असते. कधी आवडीच्या गोष्टी बाजूला सारण्याची असते, तर कधी स्वत:च्या क्षमतेपेक्षा दुय्यम गोष्टी कराव्या लागण्याची असते. इतकी किंमत देऊनही चिंता आणि गिल्टचं ओझं मनावरून कधीच उतरवलं जात नाही. कितीही बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला तरी विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखं  ते परत परत येऊन चिकटतं.’

   आईचा धोशा चालू होता. ‘आता तुम्हाला वाटतंय मूल नको, पण नंतर पश्चात्ताप होईल. म्हातारपणी एकटेपणा येईल.’ मला हसू आलं. ‘मूल म्हणजे म्हातारपणाची काठी, ही कल्पना कधीच हद्दपार झाली आहे. एकदा तुम्ही पालक झालात, की त्यातून बाहेरच पडता येत नाही. तुमचंच पाहा की! तुम्ही मला आणि केदारला वाढवलंत, पण अजून केदारच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या मुलाला सांभाळण्यापर्यंत सर्व करतच आहात! आणि एकटेपणाचं म्हणाल, तर हल्ली मुलं आईवडिलांच्या वाऱ्याला उभी राहतात कुठे? पळून जातात दूरदेशी, नाही तर केदारसारखं स्वतंत्र बस्तान बसवतात. शिवाय म्हातारपणी मुलांचा उपयोग होईल, या विचारातून त्यांना जन्म देणंही चुकीचं नाही का?’ ‘मला वाद घालायचा नाही. पण मी एवढंच स्वानुभवावरून सांगते, की मूल असण्याचं एक सुख असतं. आनंदाचा तो एक स्रोत असतो. मुलांना मोठं होताना पाहणं हाही आनंद असतो. मुलं म्हणजे आपला भविष्यकाळ असतो. त्यांच्यामुळे आपल्याला आशावादी वाटतं. त्यांचा आधारही वाटतो.’ आई म्हणाली.

‘अगं, सुखाचे अनेक स्रोत असतात. मुलं हा एकमेव स्रोत थोडाच आहे? समजा हा नसला तर इतर अनेक उपलब्ध असतातच की! जगरहाटी म्हणून का मुलांना जन्म द्यायचा? मी माझी बाजू मांडली. ‘अगं सगळे जण मुलांना जन्म देण्यासाठी आटापिटा करतात, ते उगीच का? मुलं शिकवतातही आपल्याला बरंच! आपला व्यक्तिमत्त्व विकास होतो मुलांना वाढवण्यामुळे!’ मी परत हसले. ‘म्हणजे आपल्या शिकण्याचं साधन म्हणून मुलांचा वापर करायचा का? शिकायचं असेल तर मुलं कशाला हवीत? इतर अनेक गोष्टींतून शिकणं होतं की!’  आईबाबांशी निदान संवाद तरी होत होता. गौतमच्या आईनं तर हा निर्णय ऐकल्यावर गदारोळच केला. गौतमनं कितीही सांगितलं तरी माझ्या प्रजोत्पादनक्षमतेत समस्या असल्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतोय, याबाबत त्यांना जराही संदेह नव्हता. मला मातृत्वाची ओढ नाही म्हणजे मी कोरडी, पाषाणहृदयी आणि हृदयशून्य आहे, या बाबतीतही त्यांची पक्की खात्री पटली होती.

त्यांची ही प्रतिक्रिया मला अनपेक्षित नव्हती. मातृत्वाचा संबंध वंशवृद्धीसाठी जोडला गेल्यामुळे ते नाकारणं हा जणू काही गुन्हाच आहे, असं समाजानं ठरवलं आहे. लहानपणापासून स्त्रियांवर मातृत्वाचं इतकं ‘कंडिशनिंग’ झालंय, की कालांतरानं ते नैसर्गिकच वाटू लागतं. मातृत्वाच्या ओढीत नैसर्गिकतेपेक्षा सामाजिक प्रभाव जास्त असतो, असं माझं निरीक्षण आहे. ज्यांना मुलांची आवड आहे, त्यांनी खुशाल मुलांचा विचार करावा. पण ज्यांना नाही, त्यांचा कुठलंही लेबल न लावता स्वीकार केला पाहिजे. हा समस्या असण्या-नसण्याचा प्रश्न नाही, तर आवडी-निवडीचा आहे. पालक होण्यासाठी आपण पात्र आहोत का नाही, हा प्रश्न कुणालाच कसा पडत नाही? आपण नैसर्गिकपणे पालक होण्यास पात्र आहोत ही मोठी गैरसमजूत आहे! मुलाला जन्म देता आला म्हणजे पालकत्व निभावता येणं नव्हे. अनेकदा पालकही या भूमिकेसाठी पात्र नसतात आणि असे पालक मुलांच्या आयुष्याचा विचका करू शकतात. 

आज घराघरात मुलांच्या आणि पालकांच्या समस्या आहेत. स्वत:च्या आयुष्यातली ऐन उमेदीची वर्ष पालक मुलांच्या संगोपनात घालवतात, त्यांच्यासाठी खस्ता काढत स्वत:चं आयुष्य पणाला लावतात. एवढं करूनही ‘तुम्ही हे केलं नाही किंवा तुमचं ते चुकलं,’ असं बोट दाखवून मुलं टोचतच राहतात. जवळजवळ प्रत्येक पालकाला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मुलांकडून अपेक्षाभंगाच्या ठोकरा खाव्या लागतात. मग उर्वरित आयुष्य हे अपेक्षाभंगाचं दु:ख कुरवाळत घालवावं लागतं. पालकांचं मानसिक आरोग्य खालावण्याची कारणं बघितली, तर मुलांमुळे आलेला ताण हे कारण अग्रक्रमांकावर येईल. तरीही स्वत:चं मूल जन्माला घालण्याची लोकांची हौस काही कमी होत नाही. एकतर लोकसंख्येत आपला देश आता प्रथम क्रमांकावर झेपावला आहे. तरी लोकसंख्येत भर पडतेच आहे. प्रत्येकाला वाटतं की ही भर इतरांच्या मुलांमुळे पडते. स्वत:च्या मुलांमुळे नाही!

 हल्ली रोजच्या जगण्यातली गुंतागुंत किती वाढलीय! ताण, मानसिक समस्या दिवसेंदिवस लहान वयाकडे सरकत चालल्या आहेत. अशा जगात मुलांना आपणहून का ढकला? यातून आपण नक्की काय मिळवतो? जगात इतकी मुलं आधीच असताना नवीन मुलं जन्माला घालून पृथ्वीवरचा भार का वाढवावा? मूल जन्माला न घालणं म्हणजे स्वार्थीपणा समजला जातो. मुलांसाठी झटणाऱ्या पालकांना खरंतर स्वत: चांगले पालक आहोत हे सिद्ध करायचं असतं! स्वत:ला बाजूला करून निखळपणे फक्त मुलांचा विचार बहुसंख्य पालक करू शकत नाहीत. आपल्या अपुऱ्या इच्छा मुलांद्वारे पुरवून घेणं तर किती क्रूरपणाचं आहे! मात्र हे पालक स्वार्थी नाहीत आणि पृथ्वीचा लोकसंख्यावाढीपासून बचाव करणारे आम्ही स्वार्थी कसे, हा विचार कुणी करत नाही.

मूल होण्याची मानसिकता समाजानं इतकी घट्ट कवटाळली आहे, की मला मूल नाही म्हणजे मी ‘बिच्चारी’ आहे, असं अनेकींना वाटतं. इतकंच काय तर childless म्हणजे अपत्यहीन आणि childfree म्हणजे अपत्य नको असणं, यातला फरकही अनेकांना कळत नाही. कित्येक जण मला न विचारताच स्त्रीरोगतज्ज्ञांची किंवा आयव्हीएफच्या क्लिनिकची नावं सुचवतात. ‘तुम्हाला मुलं किती?’ हा खरंतर वैयक्तिक असलेला प्रश्न थोडय़ाशा ओळखीमध्येही सहजपणे विचारला जातो. स्वत:ला किती मुलं आहेत आणि ती काय करतात हे सांगितल्याशिवाय स्त्रियांना स्वत:ची ओळख पूर्ण झाली आहे असं वाटत नाही. जणू काही मातृत्व हा स्त्रीचा अविभाज्य भाग आहे. मूल नसतानाही व्यक्ती अत्यंत आनंदात राहू शकते, हा विचार समाजाच्या पचनी पडणं कठीण आहे..

घरी आले तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. गौतम ऑफिसमधून लवकर येऊन कँडल-लाइट डिनरची तयारी करून माझी वाट पाहात होता. माझ्या चित्तवृत्ती फुलून आल्या. बिल्डिंगच्या खाली मुलांचा गोंगाट आणि आरडाओरडा चालू होता, पण आमच्यापर्यंत तो पोहोचत नव्हता. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात आम्ही ग्लास उंचावले आणि चिअर्स केलं- ‘आपल्या न जन्मणाऱ्या अपत्यासाठी!’

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Having a child or not decision of parents todays generation chaturang article ysh