ॐ कार उच्चारणाचा त्रिकंठाशी घनिष्ठ संबंध आहे, म्हणून या लेखात त्रिकंठाची माहिती घेऊ या. कंठ ज्याला घसा असेही संबोधले जाते, तो मानवी देहातील महत्त्वाचा भाग आहे. वैद्यकीय परिभाषेत या कंठाला Pharynx अशी संज्ञा आहे. मानवी कंठ तीन भागांत विभागलेला असतो. वैद्यकीय परिभाषेत त्यांना अनुक्रमे Laryngopharynx (स्वरयंत्रा पाठीमागची घशाची पोकळी किंवा ब्रह्मकंठ), Oropharynx (जिभेमागची घशाची पोकळी किंवा विष्णुकंठ) व तिसरा Nasopharynx (नाक मृदू टाळूमागची घशाची पोकळी म्हणजेच शिवकंठ) मानवी जीवनात त्रिकंठाचे महत्त्व यासाठी की, कोणाही व्यक्तीच्या जीवनातील तीन काय्रे कंठामार्फतच होतात. प्रत्येक व्यक्तीची २४ तास चालणारी श्वासोच्छवास क्रिया कंठातूनच होते. अन्न गिळण्याची क्रियाही कंठातूनच होते आणि व्यक्ती कंठातूनच बोलते. तेव्हा श्वास घेणे, अन्न गिळणे व बोलणे या जीवनातील तीन महत्त्वाच्या क्रियांचे प्रवेशद्वार त्रिकंठच आहे. श्वास घेताना शिवकंठ व विष्णुकंठ उपयोगात आणला जातो. अन्नग्रहण करताना विष्णुकंठ व ब्रह्मकंठ उपयोगात आणला जातो. तर बोलण्याच्या क्रियेत तीनही कंठ उपयोगात आणले जातात.
कोणी व्यक्ती त्याच्या कंठाला म्हणजेच घशाला काही आजार झाला तरच डॉक्टरांकडे धाव घेते. परंतु व्यक्तीचा त्रिकंठ गुणात्मकदृष्टय़ा आणि आकारानेही सदोदित खुला असणे हे त्याच्या निरामय आरोग्याच्या दृष्टीने जरुरीचे आहे. असा त्रिकंठ खुला असल्यास व्यक्तीची श्वासोच्छवास क्रिया, अन्नग्रहण करण्याची क्रिया व बोलण्याची क्रिया सहज, खुली व मोकळी होते. दैनंदिन नादचतन्य ओमकार साधनेतून त्रिकंठ खुला होतो, मोकळा होतो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ओमकारातील अकार, उकार, मकार यांच्या शास्त्रशुद्ध केलेल्या उच्चारणातून अनुक्रमे ब्रह्मकंठ, विष्णुकंठ व शिवकंठ म्हणजेच Laryngopharynx, Oropharynx व Nasopharynx खुल्या व मोकळ्या होतात व साधक व्यक्तीस निरामय आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून साहाय्यभूत होतात. त्यामुळेच म्हणावेसे वाटते
‘‘ॐकार साधनेतून त्रिकंठशुद्धी,
त्रिकंठशुद्धीतून आरोग्यवृद्धी’’
डॉ. जयंत करंदीकर