ॐकार या नादचतन्याची दोन रूपे आहेत. सगुण आणि निर्गुण रूप. सगुण रूप म्हणजे गुण दर्शविणारे, दृष्टिस्वरूपात दिसणारे तर निर्गुण रूप म्हणजे कोणतेही गुण नसलेले असे रूप. म्हणून सगुणाला साकार रूप म्हटले आहे तर निर्गुणाला निराकार रूप संबोधले आहे. ॐच्या उच्चारणात ओम् हा वाचिक उच्चार सगुण रूप आहे तर मकारानंतर अतिसूक्ष्म होत गेलेला नाद, संपूर्ण लय पावून शून्यतम, शांत होतो, ती निर्गुण-निराकार अवस्था होय. ॐकार ही भक्ती आहे, भक्तियोग आहे. ॐकार ही भक्ती असली तरी भक्तिमार्गातून, सात्त्विक कर्माच्या माध्यमातून मुक्तीकडे नेणारी वाटचाल आहे म्हणूनच ॐकार उच्चारणात सगुण व निर्गुण नादचतन्याचे अपूर्व मिलन आहे.
तेव्हा ॐकार साधनेत जसा सगुण व निर्गुण साधनेचा संगम होतो तसेच भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीनही योगांचे अपूर्व मिलन होते. कारण – ॐनादचतन्य साधना सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारी वाटचाल आहे, शब्दाकडून नि:शब्दाकडे नेणारा हा सहज प्रवास आहे, स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे व व्यक्त नादचतन्यातून अव्यक्त नादचतन्याकडे सहज जाणारा व आपल्या परमशुद्ध स्वत्वाचा अनुभव देणारा प्रवास आहे. ॐ नादचतन्य ही खरे तर शक्ती आहे, शांती आहे, भक्ती आहे, मुक्ती आहे. परंतु ही नादचतन्य साधना करता करता साधक व्यक्ती शक्ती व शांती कशी प्राप्त करतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. ॐनादचतन्य भक्ती करता करता तो ऐहिक जीवनातील रोगमुक्तीची वाटचाल व पारमार्थिक जीवनातील खऱ्या मुक्तीसाठीची वाटचाल कशी करू लागतो हे त्याचे त्याला उमगत नाही पण अनुभवास मात्र येते. ॐ नादचतन्य साधना ही साधकाला नरत्वाकडून नारायणत्वाकडे नेणारी उपासना आहे. त्यामुळेच ॐ नादचतन्य साधनेत संसार व परमार्थ याचा अपूर्व संगम झाला आहे. ॐनादोच्चारात ज्ञानविज्ञान दोन्ही एकवटले आहेत. ॐनादोच्चार साधना, पुरुष, महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती या सर्वासाठी निरामय आरोग्यदायी आहे. कारण, शास्त्रशुद्ध ॐ नादचतन्य साधनेमुळे, मानवी पंचमहाभौतिक देहातील परमशुद्ध अग्नी व वायूचे बल वाढते व देहातील दूषित पृथ्वी व जलतत्त्व बाहेर टाकले जाते. त्यामुळे देहातील रोमारोमाचे आकाश खुलते. ॐकारातील तेजाचा व वायूचा विचार करता ॐकारातील तेज चंद्रासारखे शीतल आहे, पण त्यावर काळा डाग नाही. सूर्यासारखा हिरण्यगर्भस्वरूप आहे, पण दुपारच्या १२ च्या उन्हासारखे तापदायक नाही. ॐ वर्णात महतोमहिमान ओ च्या स्वरूपात व सूक्ष्मातिसूक्ष्म म् च्या स्वरूपात वायुरूप एकवटले आहे.
निरोगी व्यक्तींनी ही ॐ नादचतन्य साधना नित्यनेमे केल्यास त्यांना शक्यतो रोगाचा प्रादुर्भाव होत नाही व काही कारणाने रोग झाला तर त्याविरुद्ध लढण्याचे सकारात्मक वृत्तीचे बळ वाढते. रोगी व्यक्तींना ही साधना स्थिरतात्मक, लक्षणात्मक व पुनर्वसनात्मक उपचार म्हणून उपयुक्त आहे. या साधनेला कोणत्याही जातिधर्माचे बंधन नाही, देशविदेशाचे बंधन नाही. कारण ही साधना परमशुद्ध विश्वात्मक नादचतन्य साधना आहे.
‘नादचतन्यातून आरोग्याकडे’ या लेखमालेतून मी ॐ नादचतन्य साधनेचा मानवी आरोग्याशी का व कसा संबंध आहे, नित्यनेमे केलेल्या ॐ नादचतन्य साधनेतून त्रिकंठशुद्धी, जिव्हाशुद्धी दश:प्राणशुद्धी, श्वासशुद्धी, मन:शुद्धी, आत्मस्वरूप चत्वारवाणी शुद्धी, षट्चक्रशुद्धी, जीवनातील सहजता व लयबद्धता शुद्धी, बाहय़नाद व अंतर्नादशुद्धी या सर्व देह, मन, आवाज, वाणीच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया कशा सहजपणे व लयबद्ध होतात व त्यातून साधक व्यक्तीची आनंददायी, निरामय आरोग्याकडची वाटचाल कशी सुरू होते याचाच वैज्ञानिक दृष्टिकोनातून थोडक्यात परामर्श घेतला आहे. नादचतन्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्याची साधना ही एक जीवनशैलीचा भाग म्हणून प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावी, हाच या लेखमालेचा उद्देश होता.
सारांश – ॐनादचतन्य शक्ती – निश्चित आरोग्यप्राप्ती कारण खुले आकाश – प्रकृती झकास.
डॉ. जयंत करंदीकर -omomkarom@rediffmail.com
( सदर समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा