सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
बाळाचं खाणं हे खूप काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे, तसं ते कसं भरवावं हेही. घरात खूप पाहुणे, परके लोक, खूप गडबड असेल तर बाळाला आतल्या खोलीत, एकांतात जेवू घालणं इष्ट. आई-बाबांनी हे काम आनंदानं, पाहिजे तेवढा वेळ देऊन, गप्पागोष्टी करत पार पाडावं. ‘उरकून’ टाकू नये.- बाळाला पूरक घन आहार कधी? कोणता? हे सांगणारा लेख.
स्तनपानापासून संपूर्ण जेवणापर्यंतचा बाळाचा प्रवास वर्ष-दीड वर्ष तरी चालू असतो. तो सुलभ आणि सुरळीतपणे व्हावा म्हणून बाळाला योग्यवेळी योग्य तो घन आहार देणं आवश्यक असतं. हा पूरक आहार उच्च पोषणमूल्य असणारा आणि बाळाला आवडेल, पचेल असाच हवा. यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांत खूप संशोधन चालू आहे आणि खूप शास्त्रीय माहिती आपल्यासमोर आलेली आहे. आजचे सजग आई-बाबा ही माहिती साक्षेपानं घेऊन बाळाला काय खाऊपिऊ घालतात हे पाहणंही आनंददायक आहे.
बहुतेक तज्ज्ञांच्या मते पहिले सहा महिने तरी बाळ स्तनपानावर वाढलं पाहिजे. बाळाची आतडी परिपक्व होण्यासाठी तेवढा काळ लागतो. बाळाला आवश्यक अशा संरक्षकपेशी आणि प्रथिनं आईच्या दुधातूनच बाळाला मिळत राहतात. मात्र सहा महिन्यांनंतर बाळाच्या वेगवान वाढीसाठी आईचं दूध पुरं पडत नाही. लोह आणि कॅल्शियमची कमतरता भासू लागते. त्यामुळे सहा महिन्यांनंतर पूरक घन आहार सुरू करणं गरजेचं असतं. या नियमालाही क्वचित अपवाद करावा लागतो. सहा महिन्यांच्या आधीच आईला पुरेसं दूध येईनासं होतं. बाळाचं पोट भरत नाही. असं बाळ चार ते सहा महिने यामधील वयाचं असेल, मोठय़ांच्या खाण्याकडे टक लावून पाहात असेल, तोंड उघडून जीभ काढत असेल तर समजावं की त्याची खाण्याची तयारी आहे.
मात्र एवढय़ा छोटय़ा बाळाला दात तर नसतातच, पण हिरडय़ाही मऊ असतात. त्याला चघळून खाणं जमत नाही. एवढंच नव्हे तर जिभेवर ठेवलेला पदार्थ प्रतिक्षिप्त क्रियेनं ते तोंडाबाहेर ढकलतं. म्हणून त्याला जो आहार द्यायचा तो मऊ, गुळगुळीत आणि गिळायला सोपा असला पाहिजे. मग हा आहार बनवण्यासाठी मिक्सर आणि गाळणीचा उपयोग करायला लागला तरी हरकत नाही. चार ते सहा महिन्यांचा हा काळ घन आहाराच्या दृष्टीनं प्रयोगशील म्हणायला हवा. अर्थात या काळातही स्तनपानावर बाळाचं पोट भरत असेल, वरचेवर शू होत असेल आणि वजनही वाढत असेल तर घन आहार देण्यासाठी बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत थांबावं.
पूरक आहाराची तयारी- यासाठी आपल्याला एक मिक्सर, एक स्टीमर किंवा कुकर, किसणी, र्निजतुक बाऊल आणि न टोचणाऱ्या गुळगुळीत कडांचा चमचा या गोष्टी पाहिजेत. बाळ चांगलं बसायला लागलं असेल तर उत्तमच आहे. नाहीतर त्याला बाऊन्सरमध्ये किंवा तिन्ही बाजूंनी उशा लावून बसवावं. उताणं पडलेल्या बाळाला भरवू नये. घास अडकण्याची भीती असते. बाळाला लाळेरं बांधावं म्हणजे कपडे खराब होत नाहीत. बाळ झोपून ताजंतवानं झालेलं असताना, खेळून भूक लागलेली असताना त्याला भरवावं.
सुरुवातीला तांदूळ किंवा ओटमीलचं तयार सीरियल आईच्या दुधात, फॉम्र्युला मिल्कमध्ये किंवा उकळून गार केलेल्या पाण्यात कालवावं. घरी तांदूळ धुऊन, सुकवून, रवा काढून तो मऊ शिजवूनही वापरता येईल. बाळाला चमच्यातला पदार्थ ओढून घेता येत नाही हे लक्षात घेऊन चमच्याच्या टोकावर छोटासा घास घेऊन त्याला भरवावा. त्यापूर्वी तो थोडा स्वत: खाऊन पाहावा म्हणजे तापमानाची कल्पना येते. बाळानं घास गिळलाय ही खात्री झाल्याखेरीज पुढचा घास भरवू नये. सुरुवातीच्या या दिवसांत रोज फक्त एकदाच एकच पदार्थ भरवायचा आहे. असे चार दिवस बिनतक्रार पार पडले की दुसरा पदार्थ देऊन पाहायचा. हा चार दिवसांचा नियम पुढेही लक्षात ठेवायचा. बाळाच्या डायरीमध्ये याची नोंद करावी. नवीन पदार्थ दिल्यावर बाळाची प्रतिक्रिया लिहून ठेवावी.
मऊ शिजणाऱ्या भाज्या आणि फळं यांचा शिजवून लगदा (प्युरी) हा पुढचा आहार आहे. सुरुवातीला पालक, भोपळा, कोहळा, रताळं, गाजर (किसून) अशा भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून मऊ वाफवून घ्याव्यात. त्यात पाणी घालू नये. त्यानंतर त्या चमच्याने मऊ घोटून भरवाव्या. फळांमध्ये सफरचंद (किसून) पेअर, चिकू, केळं हेसुद्धा साल, बिया काढून वाफवून घ्यावं. लक्षात ठेवा, एकावेळी एकच भाजी किंवा फळ द्यायचं आहे.
सहा ते नऊ महिन्यांच्या काळात बाळाची भूक वाढायला लागते. आता त्याला दिवसातून तीन वेळा तरी पूरक आहार दिला पाहिजे. त्यात एक सीरियल (तृणधान्य), एक भाजी आणि एक फळ याचा समावेश करावा. आता आपल्या निरीक्षणावरून बाळाला सोसणारे पदार्थ एकत्रसुद्धा देता येतील. उदा., गाजर-टोमॅटो, पालक-वाटाणा, केळ-स्ट्रॉबेरी, सफरचंद-सीरियल अशी कॉम्बिनेशन्स करता येतील. यामुळे बाळाला विविध पदार्थाच्या नैसर्गिक चवीची ओळख होते. तांदळाबरोबर मूगडाळ, मसूरडाळ, नाचणी हेसुद्धा देता येतं. आहारातून लोह मिळवण्यासाठी जरदाळू, खजूर,  मनुका (बिया काढून) शिजवून देता येईल. या गोष्टी सीरियलमध्ये मिसळल्यास पदार्थाची गोडी वाढून बाळ आनंदानं खाईल. उच्च प्रकारच्या स्निग्धतेसाठी अंडय़ाचा पिवळा बलक, घरचं लोणी किंवा साजूक तूप देता येईल. आता बाळाला खाताना मध्येमध्ये किंवा खाण्यानंतर वाटी चमच्यानं उकळून गार केलेलं पाणीही पाजलं पाहिजे. या वयात बाळ व्यवस्थित बसू शकतं, त्यामुळे  त्याच्यासाठी साध्या खुर्चीवर बसवता येणारी हाय चेअर सीट जरूर आणावी.
नऊ महिने ते वर्षांपर्यंत बाळाचं पूरक अन्नाचं प्रमाण वाढवून दिवसातून पाच वेळा ते दिलं पाहिजे. तसंच त्याचा पोतही आता गुळगुळीत नसावा. शिजवलेलं अन्न नुसतं चमच्यानं घोटून घ्यावं. त्यामुळे बाळाला चघळण्याची सवय लागते आणि हिरडय़ा घट्ट होतात. आता दोन-चार दातही आलेले असतात. उकडलेला गाजराचा तुकडा, तूप लावलेला पोळी/ भाकरीचा तुकडा त्याला द्यावा. बिस्कीट देऊ नये. त्याऐवजी सीरियलचेच तोंडात विरघळणारे तुकडे मिळतात ते द्यावेत. बाळ अंगठा आणि तर्जनीचा वापर करून तुकडा उचलून तोंडात घालायला शिकतं. यशस्वीपणे तोंडात असे पदार्थ घालणाऱ्या बाळाला चमचासुद्धा द्यायला हरकत नाही. आता बाळ खूप सारं सांडत का होईना, थोडंफार अन्न ‘आपलं आपलं’ खाऊ शकतं. आता त्याला उपमा, तांदळाची उकड, घावन, इडली, डोसा, चिकनसूपही देऊ शकता.
मात्र हा सगळा पूरक आहार आहे. छोटय़ा बाळानं दूध तर प्यायलाच हवं. एक वर्षांच्या  छान जेवणाऱ्या बाळानंसुद्धा दिवसभरात ६०० मि.ली. दूध प्यायला पाहिजे.
आता बाळाला आपल्याबरोबरच हाय चेअरमध्ये जेवायला बसवा. त्याला भरवताना तुम्हीपण जेवा. त्याला दिसेल अशा पद्धतीनं बोटांनी किंवा चमच्यानं घास घ्या, तोंडात घाला, चावा-चघळा, हसून ‘आ, हा, छान..छान..’असे आवाज काढा. पाणी प्या. बाळ अनुकरणशील असतं. जेवण ही कुटुंबाबरोबर आनंदानं करण्याची गोष्ट आहे हे त्याला समजू द्या.
मात्र घरात खूप पाहुणे, परके लोक, खूप गडबड असेल तर बाळाला आतल्या खोलीत, एकांतात जेवू घालणं इष्ट. आई-बाबांनी हे काम आनंदानं, पाहिजे तेवढा वेळ देऊन, गप्पागोष्टी करत पार पाडावं. ‘उरकून’ टाकू नये. बाळाच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती भरवू नये. त्या वेळी टीव्ही, कार्टूनची सवय लावू नये.
बाळ वर्षांचं होईपर्यंत काही पदार्थ त्याला देऊ नयेत. ते म्हणजे अंडय़ाचा पांढरा भाग, मीठ, साखर, तळलेले पदार्थ, मध, शेंगदाणे, काजू, पिस्ते (याला अ‍ॅलर्जी येऊ शकते), गाईचं दूध, चहा, कॉफी, कोलासारखी पेयं वगैरे. नऊ महिन्यांच्या पुढे बाळाला दुग्धजन्य पदार्थ सुरू करावेत. दही, पनीर, तूप, लोणी इत्यादी. चीज मऊ, फ्लेवर नसलेलं असावं. पनीर घरी बनवलेलं असावं. बाळाच्या आहाराला गोडी फळांनी किंवा खजूर-जरदाळूनं आणावी. बालवयातील स्थूलता टाळण्यासाठी साखर देऊ नये.
एक वर्षांच्या बाळाला तुम्ही घरात शिजवता ते सर्व जेवण खाता आलं पाहिजे. अर्थात त्यामध्ये तळलेले पदार्थ, लवंग, मिरची, तमालपत्र आदी नसावं. पदार्थाना चव आणण्यासाठी हिंग, सुंठ, जिरेपूड, धणेपूड, दालचिनीचा वापर करावा.
आजच्या करिअरिस्ट मुली पूरक आहाराची सारी वैशिष्टय़ं समजून घेऊन शनिवार- रविवारच्या दिवशी भाज्या, फळांच्या प्युरीज बनवून छोटय़ा काचेच्या बरण्यांत भरून फ्रीजरमध्ये ठेवताना दिसल्या की विश्वास वाटतो, पुढची बालकाची पिढी नक्कीच सुदृढ आणि निरोगी होणार!

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Story img Loader