डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com
अनेक व्यक्तींवर , नात्यांवर आपण फार जीव लावतो. एखादं काम प्राण ओतून करतो. त्याच वेळी समोरून मिळणारा प्रतिसाद मात्र आपल्या भावनिक गुंतवणुकीला साजेसा आणि तुल्यबळ नसतो. कित्येकदा तर आपल्या कळकळीची साधी दखलही घेतली जात नाही. अशा वेळी वाईट वाटून न घेता आणि ‘कशात भावनिक गुंतवणूकच नको,’ असा टोकाचा विचार न करता मानसशास्त्रातलं एक तंत्र आत्मसात करता येईल. हे तंत्र आहे ‘निरोगी विलगता’- म्हणजेच ‘हेल्दी डीटॅचमेंट’.
‘‘श्रेया आमची एकुलती एक मुलगी आहे. शिक्षण पूर्ण करून आता ती नोकरी करते. आमच्यात मोकळा संवाद आहे. रोज कितीतरी गोष्टींवर आम्ही एकत्र चर्चा करतो. पण मागच्या आठवडय़ात तिनं स्वत:चं लग्न ठरवल्याचं कळवल्यापासून मी अस्वस्थ आहे. तिच्या निवडीवर माझा पूर्ण भरवसा आहे, पण मला याचं वाईट वाटतंय की दोन र्वष नातेसंबंधात असून तिनं मला त्याचा थांगपत्ताही लागू दिला नाही. तिच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच केलं असतं. लग्नासारखी महत्त्वाची गोष्ट तिला आधी सांगावीशी वाटली नाही. इतक्या सहजासहजी तिनं आम्हाला तिच्या आयुष्यातून वजा केलं, याचं शल्य मला लागून राहिलंय.’’ श्रेयाची आई सांगते.
संदीप म्हणतो, ‘‘मी एका स्वयंसेवी संस्थेत काम करतो. तिथे मी दोनदा पदाधिकारी म्हणून निवडून आलोय. मी संस्थेला नवी ओळख दिली, झोकून देऊन काम केलं, प्रसंगी स्वत:ची पदरमोड करून संस्था कशी वाढेल ते पाहिलं. कित्येक स्वयंसेवकांनाही जोडून घेतलं. नवीन उपक्रम सुरू केले. अनेक देणगीदार मिळवून दिले. मात्र नवीन समिती निवडून आल्यावर मी सुरू केलेले काही उपक्रम त्यांनी बंद केले. निराळी कार्यपद्धती सुरू केली. देणगीदारांना दुखावलं. सांगायला गेलो, तर ऐकून न घेताच ते अपमान करतात. जिवाचं रान करून फुलवलेल्या संस्थेची ही दुर्दशा मी उघडय़ा डोळ्यांनी पाहू शकत नाही. मला याचा फार त्रास होतो.’’
श्रेयाची आई आणि संदीप यांच्या अस्वस्थतेची कारणं वेगवेगळी असली तरी ते अनुभवत असलेली तीव्र भावनिक निकटता (अटॅचमेंट) हा त्यांच्यामधला समान धागा आहे. श्रेयाच्या आईची भावनिक निकटता ही मुलीबाबत आहे, तर संदीपची संस्थेबाबत आहे. दोघांनाही अपेक्षाभंगाचं दु:ख आहे. श्रेयाच्या आईप्रमाणे आपणही जवळच्या व्यक्तींसाठी जीव लावून झटतो किंवा संदीपप्रमाणे एखाद्या कामात सर्वस्व ओततो. पण आपण दर्शवत असणाऱ्या भावनिक निकटतेचा तुल्यबळ प्रतिसाद आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून मिळत नाही. कधी कधी तर साधी दखलही घेतली जात नाही. मग आपण अस्वस्थ होऊन म्हणतो, की जीव ओतून करण्यातच अर्थ नाही!
अपेक्षाभंगाचं दु:ख कमी करण्यासाठी नातेसंबधांपासून ते सर्व वस्तूंपासून विलगता (डीटॅचमेंट) शिकावयास हवी, हे अनेक ठिकाणी तत्त्वज्ञानात सांगितलं आहे. पण तीव्र भावनिक निकटता ही विलगता अंगीकारण्यात अडथळा आणते. विलगतेवरील संशोधन मानसशास्त्रात तुलनेनं नवीन आहे. भावनिक विलगता आणि भावनिक बधिरता हे शब्द समानार्थी असल्यासारखे वापरल्यानं विलगतेकडे आतापर्यंत फारसं सकारात्मकतेनं पाहिलं जात नव्हतं. परंतु नवीन संशोधनात भावनिक विलगतेची सकारात्मक बाजू सामोरी येत आहे. तिला ‘निरोगी विलगता’(हेल्थी डीटॅचमेंट) म्हणतात. आपण जेव्हा नात्यांत फार मोठी भावनिक गुंतवणूक करतो, तेव्हा एका टप्प्यावर आपल्याला जाणीव होते की त्या गुंतवणुकीची पूर्वीची गरज आता राहिली नाही. अशा वेळी स्वत:ला अस्वस्थ न करता त्या गुंतवणुकीतून बाहेर कसं पडायचं हे निरोगी विलगता शिकवते.
जीवनात सर्वानाच कधी ना कधी तरी, कशापासून तरी भावनिदृष्टया विलग व्हावं लागतं. अगदी प्रियतम व्यक्ती असल्या तरी त्यांचं अस्तित्व आपल्यापेक्षा वेगळं असतं. आपण १०० टक्के समान नसतो. ज्यामध्ये समान नसतो, त्यामध्ये विलगता येणं अपरिहार्य असतं. ही विलगता श्रेयाच्या आईसारखी जिवलग नात्यापासूनची असू शकते, नाही तर संदीपसारखी स्वत: भरभराटीला आणलेल्या संस्थेपासूनची असू शकते, आपण भूषवलेल्या एखाद्या पदाबद्दलची नाही तर भूमिकेबद्दलची असू शकते किंवा ध्यास घेऊन उभारलेल्या एखाद्या वास्तूबद्दलचीही असू शकते. अशा वेळी निरोगी विलगता मदतीस येते.
निरोगी विलगता म्हणजे सर्वातून निवृत्त किंवा विरक्त होणं नव्हे किंवा भावना गोठवून घेणं किंवा काहीच न वाटून घेणंही नव्हे. श्रेयाच्या आईला वाटतंय की श्रेयापासून भावनिकदृष्टय़ा विलग होणं म्हणजे तिच्यावरचं प्रेम कमी करणं किंवा अलिप्त होणं. संदीपला वाटतंय की संस्थेपासून भावनिकदृष्टय़ा विलग होणं म्हणजे संस्थेबद्दलची कळकळ आटवणं. निरोगी विलगता म्हणजे समोरील व्यक्तीवरील स्वत:चं नियंत्रण सोडून देणं. श्रेयानं मला विचारूनच तिचे निर्णय घेतले पाहिजेत किंवा संस्था माझ्या विचारांनुसारच पुढे गेली पाहिजे असे हट्ट न धरणं म्हणजे नियंत्रण सोडून देणं. भावनिक निकटता ठेवूनही नियंत्रण सोडता येतं. श्रेयाची आई तिच्यावरची माया तशीच ठेवून किंवा संदीप संस्थेबद्दलची कळकळ तशीच ठेवूनही नियंत्रण सोडू शकतात आणि निरोगी मानसिकता आत्मसात करू शकतात. त्यासाठी पुढील अंतर्दृष्टी त्यांनी मनात रुजवणं आवश्यक आहे.
अस्तित्व पणाला न लावणं
श्रेयाच्या आईनं आणि संदीपनं भावनिक निकटतेत स्वत:चं अस्तित्व पणाला लावल्यामुळे श्रेयानं निर्णय घेताना मला न विचारणं म्हणजे माझ्या स्थानाला धक्का पोहोचला आहे किंवा संस्थेबद्दलच्या माझ्या योजना अमलात न आणणं म्हणजे माझा अपमान आहे, असा निष्कर्ष ते काढत आहेत. हे निष्कर्ष अवास्तव आहेत. ‘स्वत:’ला बाजूला काढून त्यांनी घडलेल्या घटनांकडे पाहिलं तर श्रेयाची आई असा वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढू शकते, की श्रेयाला निर्णय घेताना पूर्वी जेवढी माझी गरज लागत होती तेवढी आता लागत नाही. संदीप असा निष्कर्ष काढू शकतो की संस्थेचा विकास करण्याचे माझे विचार इतरांच्या विचारांपेक्षा भिन्न आहेत. अशा निष्कर्षांमुळे विलग होणं त्यांना सोपं जाईल.
अत्यावश्यक गरजेत रूपांतर न करणं
भावनिक निकटता आनंददायी आहे, पण ती अत्यावश्यक नाही हे श्रेयाच्या आईनं व संदीपनं लक्षात घेतलं, तर प्रेम, माया, कळकळ, अशा भावनांचा आनंद ते उत्कटतेनं घेतील. पण समजा त्यांना अभिप्रेत असलेली निकटता त्यांना समोरील व्यक्तीकडून मिळाली नाही, तरीही ते स्वत:ची पडझड करून घेणार नाहीत. स्वत:ची भावनिक निकटता इतरांवर लादणार नाहीत. ही गुंतवणूक हा आनंदाचा एकच एक स्रोत नाही, हे लक्षात घेऊन स्वत:ची भावनिक ऊर्जा दुसरीकडे वळवतील आणि जिथे तिची गरज आहे तिथे खर्च करतील.
बदलाचा स्वीकार
कुठलेही नातेसंबंध अगदी ते जिवलग असले, तरीही त्यात बदल होत असतो. भावनिक उत्कटतेची केंद्रस्थानं त्यानुसार बदलत जातात. प्रथम आई-वडील, मग मित्रमत्रिणी, जोडीदार, मुलं अशी वेगवेगळी केंद्रस्थानं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महत्त्वाची असतात. श्रेयाच्या आईनं असा विचार केला, की मीही भावनिक निकटतेची केंद्रस्थानं ही वेळोवेळी बदलली आहेत. मग श्रेया त्याला कसा अपवाद असेल? केंद्रस्थान बदलणं म्हणजे निकटता संपणं नव्हे, तर आपल्या भूमिकेत बदल करणं. आघाडीच्या भूमिकेत बदल करून पिछाडीची भूमिका घेणं. थोडक्यात, वाहनाच्या ड्रायिव्हग सीटवरून मागच्या सीटवर जाणं. पण त्यासाठी वाहनातला प्रवास सोडून देण्याची गरज नाही. उलट मागच्या सीटवर बसून रस्त्यावरची गंमत बघण्याचा आनंद अनुभवता येतो आणि मुख्य म्हणजे स्वत:साठी अवकाश मिळू शकतो. संदीपनंही स्वत:ला विचारलं पाहिजे, की आधीच्या लोकांपेक्षा वेगळा विचार केला म्हणून आपण संस्था भरभराटीला नेऊ शकलो. नवीन लोकही तोच कित्ता गिरवत असतील तर आपण का आक्षेप घ्यावा? चुका झाल्या तर ते शिकतील आणि अधिक सक्षम बनतील. ते संस्थेच्या दृष्टीनं अंतिमत: फायद्याचं आहे.
विलगतेचे फायदे
श्रेयाच्या आईनं आणि संदीपनं विलगतेच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित केलं, तर त्यांची अस्वस्थता कमी होऊ शकते. स्वत:चे निर्णय स्वतंत्रपणे घेऊन ते निभावून नेण्यास मूल सक्षम झालं की पालकत्वाची मुख्य जबाबदारी संपते. श्रेया तिच्या संभाव्य जोडीदाराबाबत वाच्यता न करता लग्नाचा निर्णय स्वतंत्रपणे घेत असेल तर याचा अर्थ तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली आहे आणि भावनिकदृष्टय़ा ती आत्मनिर्भर झाली आहे. त्यामुळे पालकत्वाच्या जबाबदारीतून मोकळं झाल्याचा फायदा श्रेयाच्या आईला विलगतेमुळं झाला आहे. संदीपची इच्छाही संस्थेची भरभराट व्हावी अशीच आहे. कुठलीही संस्था नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन दृष्टिकोन जितके जास्त सामावून घेईल तेवढी तिची प्रगती होईल. नाही तर तिला साचलेपण येईल. हे विचार ऐकून घेण्याची संधी विलगतेमुळे संदीपला प्राप्त झाली आहे. श्रेयाच्या आईनं आणि संदीपनं या फायद्यांवर लक्ष केंद्रित केलं तर त्यांचा आत्मविकासही होऊ शकेल.
नकारात्मकता काढून टाकणं
श्रेयाच्या आईनं तिच्याबद्दल जर असा ग्रह करून घेतला, की तिनं मला मुद्दामच डावललं किंवा पोटची मुलंही अप्पलपोटी असतात आणि गरजेपुरता आपला फायदा करून घेतात, तर तिचे श्रेयाबरोबर असलेले नातेसंबंध बिघडतील आणि नात्यातल्या बलस्थानांकडे तिचं दुर्लक्ष होईल. तिनं जर असा प्रश्न स्वत:ला विचारला, की एका प्रसंगावरून असा निष्कर्ष काढणं उचित आहे का, तर कदाचित आपण करून घेतलेला ग्रह अतिशयोक्त आहे असं तिच्या लक्षात येईल. समजा श्रेया अनेक प्रसंगांत अप्पलपोटेपणानं वागत असेल तरीही श्रेयाच्या आईनं निकोप विलगता अमलात आणल्यास श्रेयाला दोष न देता स्वत:ची फरफट होण्यापासून ती स्वत:ला थांबवू शकेल. नकारात्मकता नसेल तर ती श्रेयाच्या भूमिकेतूनही विचार करू शकेल. कदाचित श्रेया असाही विचार करत असेल, की संभाव्य जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचतील की नाही याबाबत मीच अनिश्चित होते. आधी सांगितलं असतं, तर आईबाबांना उगीच काळजी लागून राहिली असती. म्हणून नक्की झाल्यावरच कळवलं. संदीपनंही नकारात्मकता काढून टाकली तर नवीन समितीतले लोक कदाचित मुद्दाम खलप्रवृत्तीनं वागत नसतीलही, या पर्यायाचा तो विचार करू शकेल. समजा ते मुद्दाम तसं वागत असतील, तर ती त्यांची समस्या असेल, माझी नाही, असा विचार करून तो निरोगीपणे विलग होऊ शकेल.
निरोगी विलगता जेवढी लवकर शिकू तेवढा जास्त फायदा होईल. त्यासाठी श्रेयाची आई आणि संदीपच्या जीवनात घडलेल्या प्रसंगांसाठी थांबायची गरज नाही. वयाच्या सर्व टप्प्यांवर ती उपयोगी पडू शकते. दैनंदिन जीवनात तर ती फार कामाला येऊ शकते. आपण कित्येकदा न विचारताही इतरांना परत परत सल्ले देतो. मायेपोटी का होईना, पण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतो. कधी स्वत:चं म्हणणं हट्टानं पकडून बसतो, तर कधी बदललेल्या भूमिका नाकारत राहातो. कधी घडून गेलेल्या घटना उगाळत राहतो, तर कधी समस्येतून बाहेर पडण्याऐवजी तिच्याचभोवती घुटमळत राहतो. निरोगी विलगता आत्मसात केली असेल तर अशा प्रत्येक प्रसंगी वेगळ्या प्रतिसादाचा पर्याय तुम्हाला दिसू लागेल. कारण त्या वेळी तुम्ही फक्त इतरांपासूनच नाही, तर ‘स्वत:’चाही विलग होऊन विचार करणं शिकला असाल.