‘‘त्या फोनमुळे माझं मन हरखलं. काय सांगू, त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मला पतीच्या सहवासात राहण्याची संधी मिळण्याची शक्यता होती. मनाला उभारी देत मी धडपडत उठले आणि मुलांना घेऊन नागपूर-वर्धा बसमध्ये चढले. बस वध्र्याच्या दिशेने धावू लागली, पण..’’ आणीबाणी काळातील एका जिद्दीच्या विलक्षण पाठलागाची मन हेलावून लावणारी सत्यकथा.
‘‘वृन्दा! काही जीवघेण्या आठवणी इतक्या विदारक असतात की त्या जीवनभर डंख मारत राहतात,’’ बुलढाण्याच्या माझ्या थोरल्या जाऊबाई उषाताई(देशपांडे) मला त्या विलक्षण हृदयद्रावक अनुभवाविषयी सांगत होत्या..
‘‘२६ जून १९७५ ला आणीबाणी घोषित झाली आणि फार मोठं धरपकड सत्र सुरू झालं. त्या काळात माझ्या जीवनात घडलेल्या एका समरप्रसंगाची हृदयद्रावक कथा आजही आठवली की काळीज गलबलून येते. घशात आवंढे आणि डोळ्यांत अश्रू येतात. त्या काळात अनेकांना रातोरात अटक करून विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आलं. अटक करण्याकरिता काही फारसं सबळ कारणच असलं पाहिजे असा काही दंडक नव्हता. साधी संशयाची सुईदेखील पुरेशी ठरायची. एवढंच कशाला ‘अमका तमका तमक्या अमक्या विरोधकाबरोबर दिसतो. एवढं कारणदेखील अटकेला पुरेसं ठरायचं. पु. ल. देशपांडे, दुर्गाबाई यांनी या अन्यायाविरुद्ध पोटतिडिकेनं आवाज उठवला खरा; पण तोदेखील दाबला जाण्याची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली. काही जण अटकेच्या भीतीनं भूमिगत झाले.
त्या काळात माझे पती भास्करराव (देशपांडे) हे अकोल्याला काही कामाकरिता गेले होते. ७ ऑगस्ट १९७६ रोजी त्यांना अकोल्याला परस्पर अटक करून नाशिक रोड येथील तुरुंगात डांबण्यात आले. त्या प्रसंगी आम्हा कुटुंबीयांना त्यांची साधी भेटदेखील घेता आली नाही. त्यांना अकोल्याला अटक करून नाशिक रोड येथील तुरुंगात नेल्याची कटू वार्ता समजली तेव्हा आम्हा सगळ्यांवर फार मोठा मानसिक आघात झाला. पण प्राप्त परिस्थितीला तोंड देणं भाग होतं; नव्हे माझा तसा पक्का निर्धार झाला होता.
आणीबाणीच्या या काळात परिचित लोक आम्हाला टाळू लागले होते. नातेवाइकांनीदेखील पाठ फिरवलेली होती. त्यांना भीती हीच की, आमच्याशी संबंध ठेवला तर सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळेल आणि त्रास होईल. बुलढाण्याच्याच नव्हे तर विदर्भाच्याही दूरवरच्या भागापर्यंत ह्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा नावलौकिक पसरला होता. बुलढाण्याला ‘अजिंठा जििनग प्रेस’ काढून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिलं होतं. बँकिंगच्या क्षेत्रातही त्यांनी स्पृहणीय स्वरूपाची कामगिरी केली होती. बुलढाण्याला गर्दे वाचनालय हे जुनं ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय
जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर होतं. त्यांनी ते नावारूपाला आणलं. एकप्रकारे त्याचं पुनरुज्जीवन केलं. वाचनालयाच्या क्षेत्रातील त्यांची ही कामगिरी शासनदरबारी रुजू झाली, त्यांचा सत्कार झाला. पारितोषिक मिळालं..’’
पुढील हकीकत उषाताईंचे पती भास्करराव सांगू लागले, ‘‘मला ७ ऑगस्ट १९७६ रोजी मिसाखाली अटक झाली. या अटकेविरुद्ध मी नागपूर हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केलं. त्याकरिता १६ फेब्रुवारी १९७७ रोजी मला नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर हजर व्हायचं होतं. त्याकरिता मला १४ फेब्रुवारीला पोलिसांसमवेत नाशिक रोड येथील तुरुंगातून नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जावं लागणार होतं. मला अकोल्यात अटक झाल्यापासून मी उषाला किंवा मुलांना भेटू शकलो नव्हतो. माझ्या अटकेला सहा महिने झाले होते. वारंवार विनंती करूनही उषाला भेटीची परवानगी मिळू शकली नव्हती. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की नाशिक ते नागपूर या प्रवासात मलकापूरला जर उषा आली, तर ती पोलिसांच्या मेहेरबानीने मलकापूर ते नागपूर असा जवळ जवळ सहा तास माझ्यासमवेत माझ्या डब्यात बसून प्रवास करू शकेल. तेवढा वेळ तिच्याशी बोलता येईल. ख्यालीखुशाली विचारता येईल. घरच्या व्यावहारिक कामासंबंधी काही सूचना देता येतील. म्हणून मी नाशिक रोड जेलमधून घरी उषाला फोन केला. ‘‘तू मलकापूरला १४ फेब्रुवारीची सेवाग्राम एक्स्प्रेस गाठण्याच्या दृष्टीने ये. नागपूपर्यंत बरोबर प्रवास करता येईल.’’ त्याप्रमाणे पोलिसांसमवेत मी नाशिक रोड जेलमधून नाशिक रोड स्टेशनवर पोलिसांसमवेत आलो. समोर प्लॅटफॉर्मवर सेवाग्राम एक्स्प्रेस उभी होती. पण पोलिसांना त्या गाडीची तिकिटे मिळू शकली नाहीत. डोळ्यासमोर गाडी धाडधाड करत नागपूरच्या दिशेने निघून गेली आणि मग मला ब्रह्मांड आठवलं. वाटलं, उषा मुला-बाळांना घेऊन, मलकापूरच्या रेल्वेस्टेशनवर आली असणार आणि मी तिला त्या गाडीत दिसणार नाही. तेव्हा तिची किती प्रचंड निराशा होईल? ..’’
पुढची सूत्रे उषाताईंनी स्वत:कडे घेतली.. म्हणाल्या, ‘‘आम्ही धडपडत बुलढय़ाण्याहून निघालो आणि मलकापूर रेल्वे स्टेशनवर येऊन पोहचलो. माझी मोठी मुलगी स्मिता स्टेशनवरच थांबली, ती माझ्यासोबत मलकापूपर्यंत आली होती. सेवाग्राम एक्स्प्रेस मलकापूरला जवळजवळ मध्यरात्री येते. नंतर ती सकाळी मिळेल त्या एस. टी.नं बुलढाण्याला निघून जाणार होती. नियोजित वेळी मध्यरात्रीच्या सुमारास मलकापूरला सेवाग्राम एक्स्प्रेस आली. फेब्रुवारीतली थंडी, डब्याचे दरवाजे बंद. अशा स्थितीत मी माझ्या दोन लहान मुलांना घेऊन मिळेल त्या डब्यात शिरले. अकोला, बडनेरा, वर्धा अशा स्टेशनांवर गाडी जास्त वेळ थांबते, तेव्हा त्या स्टेशनांवर यांचा शोध घेऊ आणि नागपूपर्यंतचा राहिलेला प्रवास त्यांच्यासोबत करू, असा मी मनाशी विचार केला. डब्यात प्रचंड गर्दी होती. माझ्या कडेवरची लहान मुलं पाहून एका सद्गृहस्थाने मला जेमतेम बसण्यापुरती जागा करून दिली. थंडी मी म्हणत होती. गारठय़ामुळे मुलं कुडकुडत होती. मी मोठय़ा स्टेशनवर उतरून यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. हे त्या गाडीत बसू शकले नाहीत, हे मला कळणार तरी कसं? मी पहाटे कुडकुडत दोन मुलांना घेऊन नागपूरच्या बहिणीचं घर गाठलं.’’
नंतरची हकीकत भास्कररावांकडून.. म्हणाले, ‘‘सेवाग्राम एक्स्प्रेस चुकल्यावर मी मागाहून नाशिक रोडला हावडा एक्स्प्रेसमध्ये बसलो. मलकापूर स्टेशनवर गाडी आली, त्यावेळी स्टेशनवरच थांबलेली माझी मोठी मुलगी स्मिता माझ्या डब्याजवळ आली. कोणीतरी स्टेशनवर ओळखीचं दिसेल या वेडय़ा आशेने मी बाहेर डोकावून पाहात होती. स्मिता धावत डब्याजवळ आली. तिनं पोलिसांसमवेत मला चहापाणी दिलं. तेवढय़ा थोडय़ा वेळात थोडंफार बोलणं होऊ शकलं. गाडी सुटली. हात हलवत निरोप घेणारी स्मिता नंतरही बराच वेळ डोळ्यांसमोर येत होती.
स्मिताने फोन करून अकोल्याला कळवलं. तेव्हा अकोला स्टेशनवर भाऊ आला. त्यावेळी त्याने स्टेशनवर आमची जेवणाची व्यवस्था केली होती. कौटुंबिक ख्यालीखुशालीच्या गप्पागोष्टी झाल्या आणि गाडी नागपूरच्या दिशेने धाडधाड करत निघाली. भावाने उषाला नागपूरला फोन करून कळवले. ‘‘दादा हावडा एक्स्प्रेसने नागपूरला येत आहेत. तू ताबडतोब वध्र्याला जा. ‘वर्धा ते नागपूर’ असा सुमारे दीड तासाचा प्रवास तुला दादांबरोबर करता येईल.’’
पुन्हा उषाताई .. ‘‘त्या फोनमुळे माझं मन हरखलं. त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. थोडा वेळ मला पतीच्या सहवासात राहण्याची संधी मिळण्याची शक्यता होती. मनाला उभारी देत मी धडपडत उठले आणि मुलांना घेऊन नागपूर-वर्धा बसमध्ये चढले. बस वध्र्याच्या दिशेने धावू लागली. जागोजागी थांबत बस वध्र्याला पोहचली. त्यावेळी उशीर झाला होता. वर्धा बसस्थानक ते रेल्वे स्टेशन हे अंतर फारच कमी आहे. मी मुलांना घेऊन
धावतच वर्धा स्टेशनकडे निघाले. स्टेशनवर जाते तो हावडा एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला लागल्याचं दिसलं. पुलावरून गेले तर गाडी निघून जाईल, असं वाटलं. त्यामुळे मी रेल्वे रूळ ओलांडत एक्स्प्रेस गाठण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढय़ात मी ज्या रुळांवर होते त्याच रुळांवर एक मालगाडी धाडधाड करत येताना दिसली. तरीही मी जिवाच्या करारावर रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. अलीकडच्या प्लॅटफॉर्मवरील लोकांना वाटलं, मी मुलांसह गाडीखाली जीव देत आहे. लोक ओरडले, ‘‘बाई! मरायचं आहे का?’’ मुलंदेखील भीतीनं ओरडली, ‘‘आईऽऽ! आईऽऽ!!’’ मी भानावर आले. नाइलाजाने परत फिरले आणि पुलावरून प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचेपर्यंत हावडा एक्स्प्रेस नागपूरच्या रोखाने निघून गेली. त्या वेळी वाटलं, गाडीखाली झोकून घेऊन जीव द्यावा. पण क्षणभरात मी स्वत:ला सावरून घेतलं. कोणत्याही परिस्थितीत पतीला भेटायचंच भेटायचं, हा माझा निर्धार होता. वध्र्याला नाही झाली भेट तर न होऊ दे. मी त्यांना नागपूरला जाऊन गाठते आणि मी परत वर्धा बसस्टँडवर आले आणि नागपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढले.’’
पुढील हकीकतीचा दुवा जोडत भास्करराव सांगू लागले, ‘‘मी नागपूरला आल्यावर पोलिसांना विनंती करून हिच्या बहिणीकडे आणलं. तिचं घर अगदी सेंट्रल जेलच्या जवळच आहे. पोलिसांच्या दयेने आमचं सगळ्यांचं जेवण हिच्या बहिणीच्या घरी झालं. थोडा वेळ मी उषाची प्रतीक्षा केली, पण पोलिसांची घाई सुरू झाली. शेवटी मला तेथून नागपूर सेंट्रल जेलच्या रोखानं निघावंच लागलं. घरापासून जेल जवळ असल्यामुळे आम्ही पायी पायीच जेलच्या दिशेनं निघालो. त्या वेळी वाटत होतं, काहीतरी घडावं आणि अकस्मात कोठूनतरी उषा समोर यावी..’’
पुढे उषाताई सांगू लागल्या, ‘‘वृन्दा! आशा खूप वेडी असते बघ. आमची बस जेल चौकात आली. मी मुलांना घेऊन घाईघाईत खाली उतरले. स्टॉपवर मोठी बहीण होती. ती हळहळत म्हणाली. ‘उषा! अगंऽऽ! दोनच मिनिटांचा उशीर झाला. दादांना घेऊन पोलीस नुकतेच जेलमध्ये गेले आहेत.’ हे ऐकलं आणि तशाही परिस्थितीत मी जेलच्या फाटकाकडे धाव घेतली. त्या वेळी यांची खचलेली पाठमोरी आकृती तुरुंगाच्या दारात पाऊल टाकत असल्याचं दृश्य दिसलं. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या, आमच्या जीवनातील महत्त्वाच्या दिवशीदेखील पतीची भेट होऊ नये, साधी दृष्टादृष्टही होऊ नये, हा केवढा मोठा दैवदुर्विलास. माझी सहन करण्याची हद्द संपली आणि मी नागपूर सेंट्रल जेलच्या प्रवेशद्वाराजवळ उभी राहून भान हरपून ओरडले, ‘‘धरणीमाते! मला उदरात घे.’’ त्याच वेळी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी.. ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ या माझ्या मनात घोळू लागल्या..
.. पण मी त्या आघातानेदेखील खचले नाही. यांना भेटल्याशिवाय जायचं नाही असा दृढ निश्चय केला आणि १६ फेब्रुवारीला सकाळपासून नागपूर उच्च न्यायालयात जाऊन ठाण मांडलं. तेथे पोलीस बंदोबस्तात यांना जेव्हा आणण्यात आलं त्यावेळी मी यांच्याकडे वेगाने धावले. मला पाहिल्यावर यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. विरहानंतर जीवा-शिवाची भेट व्हावी तसं आम्हाला वाटलं. मन सुखावलं..’’
उषाताईंनी सांगितलेल्या या कहाणीने माझे डोळे पाणावले. मी त्यांच्या जिद्दीला मनोमन सलाम करत त्यांचा निरोप घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा