भोवतालच्या समाजाने मला आणि माझ्या मुलांना जे मानसिक बळ दिलं त्याची भरपाई नाही, पण उतराई होण्यासाठी समाजाला काही परत द्यावं, ही भावना नेहमीच मनात होती. याच भावनेतून मी पोहोचले काश्मीरला. कुपवाडा शहरात एका मोठय़ा घरात वय र्वष ५ ते १८ दरम्यानच्या ५२ मुलींबरोबर मी दीड महिना राहिले. मुलींच्या बौद्धिक वाढीच्या दृष्टीने शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त अनेक प्रयोग मी तिथे केले. आणि समाजाचं देणं काही अंशी फेडलं.
काश्मीर, पृथ्वीवरचं नंदनवन! मात्र गेल्या २०-२५ वर्षांत या नंदनवनाचं रूपांतर धगधगत्या ज्वालामुखीत झालं आहे, असं आपण ऐकतो, वाचतो. पण प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जाणून घेण्याची इच्छा होतीच. दरम्यान Borderless World Foundation(बीडब्ल्यूएफ) या संस्थेच्या माध्यमातून तिथे जाण्याची, तिथल्या मुलींबरोबर राहून त्यांना शिकवण्याची संधी मिळाली. काश्मिरी आतिथ्य अनुभवता आलंच, पण आपल्याच देशवासीयांसाठी काही तरी करता आलं याचं समाधान अनुभवाच्या गाठोडय़ात बांधता आलं.
आपण वाढत असताना फक्त आपले पालक आणि कुटुंबाचाच सहभाग नसतो, तर आजूबाजूच्या अनेकांचा हातभार त्यामध्ये असतो. भोवतालच्या समाजाने मला आणि माझ्या मुलांना मोठं होताना जे मानसिक बळ दिलं त्याची भरपाई नाही, पण उतराई होण्यासाठी समाजाला काही परत द्यावं, ही भावना नेहमीच मनात होती. याच भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून विवेकानंद केंद्र, नाशिकमधील आधाराश्रम, प्रबोधिनी संस्था अशा निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून मी हे समाजाचं देणं देते आहे.        
‘बीडब्ल्यूएफ’बद्दल दोन वर्षांपूर्वी कळलं तेव्हाच ठरवले की, यांच्याबरोबर काम करायचं. दरम्यान माझी मुलं मोठी होऊन विचारांनी स्वतंत्र झाली होती. त्यांच्या माझ्याविषयीच्या अपेक्षा कमी झाल्या होत्या; तेव्हा ठरवलं की आता घरापासून लांब जाऊन काम करायला हरकत नाही.
‘बीडब्ल्यूएफ’ फक्त मुलींसाठी काम करते. माझी मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकबाहेर गेल्याला सात वष्रे झाली. विचार केला या मुलींबरोबर राहताना पुन्हा एकदा तिच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे अनुभवता येतील. माझे पती आणि मुलांनी माझ्या काश्मीरला जाण्याच्या निर्णयाबद्दल काहीच आक्षेप घेतला नाही. उलट पाठिंबाच दिला. मात्र सासूबाई आणि मित्र-मत्रिणींना खूप काळजी वाटत होती. ‘तू इथेच काही तरी काम कर’ इथपासून ‘घरात आराम का करत नाहीस,’ असे सगळे प्रश्न विचारून झाले. पण माझा निर्णय ठाम होता. मी काश्मीरमध्ये पोहोचले आणि माझ्या अनुपस्थितीत नाशिकमध्ये घरी गणपतीही छान साजरे झाले.    
मी जुल महिन्याच्या पंधरा तारखेला श्रीनगरला गेले होते. पंचवीस वर्षांनी पुन्हा काश्मीरमध्ये पाय ठेवला. सगळ्यात प्रथम जाणवलं ते, काश्मीरी आजही आतिथ्यशील आहे. गेल्या काही वर्षांत काश्मीरबाहेरून येणाऱ्या लोकांबद्दल साशंकता थोडी वाढली आहे. मात्र त्यांच्या सगळ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली, तेवढा वेळ त्यांना दिला तर त्यापलीकडच्या काश्मिरी अगत्याचा, आपुलकीचा अनुभव मिळतो. हे मी अनुभवलं.
‘बीडब्ल्यूएफ’चे ‘बसेरा-ए-तबस्सुम’ नावाने तीन प्रोजेक्ट्स काश्मीरमध्ये आहेत आणि एक ‘फा’ नावाचा जम्मूमध्ये आहे. या सर्व ठिकाणी अनाथ आणि अतिगरीब मुलींच्या शिक्षण, राहण्याची जबाबदारी संस्थेतर्फे घेतली जाते. शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये या मुली शिक्षण घेतात. नाशिकमध्ये एका ठिकाणी अनाथ मुलींबरोबर काम करण्याचा अनुभव होता. पण काश्मीरमध्ये अनाथ मुलांमध्ये एक वेगळेपणा जाणवला म्हणजे सर्वसाधारण अनाथ मुलांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना दिसली नाही. अनाथ असणं खूपच सहजपणे स्वीकारतात ती मुलं! कदाचित एकूणच समाजात असलेल्या असुरक्षित वातावरणामुळे त्यांना वेगळं वाटत नसावं. तीन घरांपकी एक कुपवाडा शहरात आहे. एका मोठय़ा घरात वय र्वष ५ ते १८ दरम्यानच्या ५२ मुलींबरोबर मी दीड महिना राहिले. मुख्यत्वे मुलींचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मुलींच्या बौद्धिक वाढीच्या दृष्टीने शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतरही अनेक प्रयोग मी तिथे केले. काश्मीरमधली शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत महाराष्ट्रापेक्षा खूपच वेगळी होती. मोठय़ा वर्गानाही शिक्षक तयार उत्तरं लिहून देतात. मी त्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावली. सुरुवातीला खूप विरोध झाला; पण चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले. १५ दिवसांत शाळेतूनच मुलींना कौतुक ऐकायला मिळाल्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. अभ्यास सोडून बाकी सगळ्या बाबतीत मात्र मुलींनी मला लगेच स्वीकारलं होतं. तिकडे गेल्यावर पाच-सहा दिवसांतच एका मुलीने माझी जन्मतारीख विचारली. मी सांगितली आणि कारण विचारलं, तर त्यांना शाळेत आई-वडिलांची जन्मतारीख लिहून आणायला सांगितली होती. तिला आई नव्हती म्हणून तिने माझी जन्मतारीख विचारली. इतक्या पटकन त्या सगळ्यांनी मला त्यांची दीदी/आंटी करून आपलं मानलं.
इतकंच कशाला स्थानिक लोकांकडूनही मला चांगलेच अनुभव आले. मी ज्या दोन गावांमध्ये राहिले होते, कुपवाडा आणि बीरवा, त्या ठिकाणी प्रामुख्याने मुस्लीम राहतात. तिथल्या मुलींनाही मी त्यांच्या धर्माची नाही हे माहीत होतं. त्या मुली मला त्यांचे रीतीरिवाज समजवायच्या. आठवडाभरातच बहुतेक मुलींशी माझं छान नातं निर्माण झालं. एक पाच-सहा वर्षांची मुलगी नवीनच आली होती. खूप खोडकर होती. माझ्याबद्दल तिला अविश्वास होता. वारंवार मला एखादं वाक्य काश्मिरीमध्ये किंवा िहदीमध्ये सांगायची आणि म्हणायची, ‘अब बोलो इंग्लिश में’. दिवसभरात आठ – दहा वेळा तरी इंग्लिश भाषांतर करायला लागायचं. हळूहळू माझ्याविषयीचा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला इतका की नंतर कोणाशी भांडण झालं की आधी मला येऊन सांगायला सुरुवात केली. एकदा आजारी पडली तर माझ्याच खोलीत झोपली. औषधही मी दिलं तरच घ्यायची.
बीरवामध्येही बऱ्याच लहान मुली िहदी येत नाही म्हणून बोलायच्या नाहीत. पण त्यांच्याकडे कोणी तरी दिलेली िहदी गोष्टींची पुस्तकं होती. सुट्टीच्या दिवशी थोडी पुस्तकं घेऊन २-३ छोटय़ा मुली आल्या. काहीच न बोलता पुस्तकं समोर धरली. मी ती वाचायला सुरुवात केल्यावर अजून काही मुली आणि पुस्तकं समोर आली. पुस्तकवाचनाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ २०-२२ गोष्टी वाचून दाखवल्या. काही शब्द शुद्ध िहदीत होते, ते काश्मिरी/इंग्लिशमध्ये समजावून सांगितले. मग हा आमचा सुट्टीच्या दिवसाचा कार्यक्रमच ठरून गेला. सकाळी चहा पिऊन झाला की सात-साडेसातपासून गोष्टी वाचणे सुरू व्हायचे. काही दिवसांनी मी त्यांच्यासाठी चेस, स्क्रबलसारखे बठे खेळ आणले होते; तेही खेळताना सगळ्या मुली अगदी रंगून जायच्या.
कूपवाडा आणि बीरवा, दोन्ही ठिकाणी मुलींच्या बाबतीत एक जाणवलं म्हणजे एखादी नवीन गोष्ट शिकवली आणि ती त्यांना आवडली की, अगदी मनापासून त्या करायच्या. तिकडे शाळेमध्ये चित्रकला विषय नसतो. कुपवाडय़ात असताना रमजानचा महिना असल्यामुळे आम्ही ग्रीटिंग्स तयार केली. आधी येऊन गेलेल्या एका दिदीने मुलींना कोलाजसारखी ग्रीटिंग्स करायला शिकवली होती. मी त्यांना भाज्यांचे काप रंगात बुडवून ठसे उमटवायला शिकवले. साध्या गोष्टीतून किती सौंदर्य निर्माण करता येतं, हे तिथं शिकायला मिळालं! बीरवामधल्या मुलींनाही एका दिदीने पायमोज्यापासून पपेट तयार करायला शिकवलं होतं. मी तिथे असताना एका आर्ट मेळ्याचा निमित्ताने त्यांना त्या कलेचा आविष्कार करण्याची संधी मिळाली. जवळ असलेल्या तुटपुंज्या सामानातून त्यांनी इतकी छान पपेट्स तयार केली आणि स्वत:च संवाद लिहून मस्त सादर केलं. आर्ट मेळ्याच्या परीक्षकांनी खास कौतुक करून मुलींना बक्षीस दिलं. कुपवाडय़ामध्येही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामध्ये बीईटी संस्थेच्या दोन मुलींनी भाग घेतला होता. या सगळ्या ठिकाणी मुलींची पालक म्हणून हजर राहताना मलाही आनंद होत होता, त्याबरोबरच मुलीही खूप खूश व्हायच्या, कारण त्यांच्या घराचे लोक येऊ शकत नसत.
आजही इथल्या सगळ्याच मुली भावनिकदृष्टय़ा माझ्याशी इतक्या जोडल्या गेल्या आहेत की, अजूनही त्यांचे फोन येतात. जवळजवळ प्रत्येकीने मला निघताना पत्र, ग्रीटिंग कार्ड दिली.
मात्र एकूण काश्मिरी समाजात खूप विरोधाभास आढळतो. स्त्री-पुरुष भेदाभेद खूपच आहे. अशिक्षितपणा, गरिबी, मुलांची जास्त संख्या असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत. पण आपल्याकडे सर्रास आढळणारा घरगुती िहसेचा प्रश्न तिथे बऱ्याच कमी प्रमाणात आढळला. दारू पिऊन िझगलेला माणूस तर मी पूर्ण साडेतीन महिन्यांत एकदाही पाहिला नाही. तिथल्या वास्तव्यात बऱ्याचदा शेअर सुमो, बस अशा सार्वजनिक वाहनांतून जाण्याची वेळ आली. शेजारी बसलेल्या पुरुषाकडून कधीही वाईट अनुभव आला नाही. एकदा मुलींना घेऊन रस्त्याने जात होते. अचानक मागून येऊन एका माणसाने विचारले, ‘आप सरपे दुपट्टा क्यो नही लेते? क्या हमारे रिलिजन के रिवाज आपको अच्छे नही लगते?’ मी त्याला शांतपणे उत्तर दिलं, ‘इसमे रिलिजन का सवाल ही नहीं है. म जहांसे आयी हुं वहापर ये रिवाज नही है. इसलिये आदत नही.’ त्यावर त्याला काय वाटले माहीत नाही, त्याने त्याच्या घरी चलण्याचा खूपच आग्रह केला. शेवटी मी आणि माझ्याबरोबरच्या मुली सगळ्या त्यांच्याकडे गेलो. पुढचे दोन तास ते स्वत: रशिदभाई आणि त्यांची बायको आम्ही खूप गप्पा मारल्या. मी कुपवाडय़ातून निघताना मला भेटायलाही आले.
काश्मीरबद्दल अशा अनेक गोष्टी सांगता येतील. राजकीय प्रश्न वेगळे आहेत. वास्तवही वेगळं जाणवतं. आपल्यासारखीच प्रेमळ माणसं तिथे आहेत. त्यांच्यासाठी आपणही काही करू शकतो. त्यांना आपली आणि आपल्याला त्यांची गरज आहे, हे जाणून घेणं यासाठीच फार फार महत्त्वाचं!

Story img Loader