विद्याताई तेरेदेसाई. अमेरिकेतलं निवृत्तीचं जीवन त्यांनी  समाजकार्याला समर्पित केलं आहे. आपल्या जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी त्या स्वत: बाळलेणी करून भारतात पाठवतात, त्यासाठी पोळ्या करून विकतात; एवढंच नाही तर त्यासाठी त्या बनल्या आहेत ‘डबा-बाटलीवाल्या.’ तसेच अमेरिकेतल्या आपल्या असंख्य मुलींसाठी त्या बनल्या आहेत विद्यामावशी. त्यांच्या समर्पित जगण्याविषयी..
निवृत्ती हा अनेकांसाठी शांतपणे आयुष्य घालवण्याचा काळ असतो. परंतु काहीजण मात्र या काळात स्वत:साठी जगणं सोडून समाजासाठी जगायला सुरुवात करतात. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट, परिश्रम घेतात आणि आपल्या जन्मभूमीचेच नव्हे तर कर्मभूमीचेही ऋण फेडायचा प्रयत्न करतात. या आहेत विद्याताई तेरेदेसाई. अमेरिकेत राहून समाजासाठी झटणाऱ्या. उतारवयात कृतिशील असणाऱ्या.
 ४०-४२ वर्षांपूर्वी पती अरविंद तेरेदेसाई आणि आपल्या गीता या दोन वर्षांच्या मुलीसह विद्याताई अमेरिकेत आल्या. विद्याताई बायोकेमिस्ट्री व मायक्रोबॉयॉलॉजी या दोन विषयांत एम. एस्सी. ही पदवी घेतलेल्या, तर अरविंद आय. आय. एम.चे एम.बी.ए. दोघेही उच्चविद्याविभूषित. अमेरिकेत आल्यावर न्यूयॉर्क, नॉरवॉक आदी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नोकऱ्या केल्या. यानंतर त्यांनी स्वत:ची तीन कॅण्डी शॉपस् खरेदी केली. ती उत्तमरीत्या चालविली. नंतर ‘इदं न मम्’ असे म्हणत सगळी विकूनही टाकली. सध्या दोघेही निवृत्त आयुष्य जगत आहेत, पण याचा अर्थ शांतपणे घरी बसून नव्हे तर अनेक सामाजिक कामं करत. आपली जन्मभूमी भारत देशासाठी आणि आपली कर्मभूमी अमेरिकेसाठीही.
या कामांपैकी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ‘बाळलेणी’ वाटणे. दर गुरुवारी  बडोद्यातील ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड हॉस्पिटल’मधील गरीब व गरजू मातांच्या नवजात अर्भकांना बाळलेण्यांची ४२ पॅकेट्स वाटली जातात. तसेच बंगळुरूमधील लहान खेडय़ातील गरीब मातांच्या नवजात बाळांसाठी आंगडय़ा-टोपल्यांची भेट पोहोचवली जाते. विद्याताई हे सगळे अमेरिकेत राहून इतर कोणाची मदत न घेता करीत आहेत. यासाठी त्या स्वत: कमाई करतात. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या वयात विद्याताई स्वत: पोळ्या लाटून, भाजून त्या विकतात व आलेले पैसे जमा करून त्यातून ही बाळलेणी तयार करतात.
निवृत्तीच्या आयुष्यात या बाळलेण्याकडे कशा वळल्या? याची कथा वेगळीच आहे. गोष्ट आहे १९९९ सालची. त्यांची मुलगी गीता गर्भवती होती. अमेरिकेत स्त्री-भ्रूणहत्येचा पश्न नसल्याने प्रसूतीआधीच मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेतले जाते. बाळाच्या जन्मापूर्वीच त्याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होते. मुलगा असला तर त्याचे कपडे व इतर वस्तू निळ्या आणि मुलगी असली तर गुलाबी रंगात असतात. बाळाची खोली सजविली जाते. त्याचा बेड, मऊमऊ गादी, पलंग, भिंतीचा रंग, त्यावर विविध चित्रे, पडदे यांची खरेदी होते. अशीच खरेदी त्यांची लेक करीत होती. सगळी खरेदी अगदी मनासारखी झाली. पण खोलीच्या एकूण सजावटीला मॅचिंग टेबल लॅम्प मिळत नव्हता. जवळजवळ १०, १२ दुकाने मायलेकी फिरल्या. अखेरीस एका दुकानात मिळाला एकदाचा. पण या लॅम्प-शोध प्रवासात त्यांच्या लक्षात आलं ती बाळलेण्यांची गरज. त्यातच एक कारण घडलं आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
मुलीच्या घरच्या सजावटीचा सोपस्कार चालू असताना बंगळुरू येथील विद्याताईंच्या मैत्रिणीचा फोन आला. बंगळुरू येथील साई सेंटरमधील डॉक्टर जवळच्या खेडय़ात जातात, तेथील गरजू गर्भवती स्त्रियांची काळजी घेतात, औषधोपचारही फुकट करतात, पण प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाला घालायला पुरेसे कपडेही नसतात.. विद्याताइईंच्या संवेदनशील मनाला हा विरोधाभास डाचू लागला. इथे अमेरिकेत आपल्या मुलीच्या मुलासाठी म्हणजे नातवासाठी केलेला थाटमाट आणि त्याच्या विरोधात भारतातील खेडय़ातील ही गरिबी. त्यांचं अस्वस्थ मन विचार करू लागलं. आपण काय करू शकतो? कसं करू शकतो ? .. पश्नाच्या चक्रव्यूहात विद्याताई त्यांच्या नकळत शिरल्या. पण त्यांचा अभिमन्यू झाला नाही. त्यांनी मैत्रिणीशी संवाद साधला आणि चक्रव्यूह भेदन झाले. मार्ग सापडला आणि आयुष्यातला एक वेगळाच अध्याय सुरू झाला.
अर्थात विचार सुचला, दिशा मिळाली तरी ही गोष्ट प्रत्यक्षात आणायची तर पैशाचं पाठबळ आवश्यक होतं. पैसे कमविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण काम कोणते करायचे? हा प्रश्न त्या मैत्रिणीनेच सोडवला. ती म्हणाली, ‘‘अगं तू पोळ्या किती छान करतेस. घरबसल्या पोळ्या करून त्या विकता येतील आणि कामाचे पैसेही मिळतील.’’ मार्ग सुचला, पण..  पोळ्या करणे सोपे, मात्र त्या विकायच्या? कारण ‘अन्न हे पूर्णब्रह्म!’ विद्याताईंच्या पापभीरू मनाला अन्न विकण्याची आणि पैसे मिळविण्याची कल्पना फारशी पटेना. मैत्रिणीनेच समजूत घातली, ‘‘हे पैसे स्वत:साठी तर वापरणार ना? मिळालेले पैसे बाळलेण्यासाठीच तर वापरणार ना! मग काय हरकत आहे?.’’ विद्याताईंची समजूत पटली. आता हेही सगळं जमून येईल पण पुढे लगेच दुसरा प्रश्न उपस्थित झालाच, ‘भारतातील बाळांपर्यंत हे सगळे कसे पोहोचणार?’
 पण इच्छा असली की मार्ग सापडतो. भारतातच यावर उपाय शोधू या, असा विचार करून त्या बडोद्याला आपल्या माहेरी आल्या आणि या कामाच्या संदर्भात शोध सुरू झाला. शोधा म्हणजे सापडेल, तसेच झाले. बडोद्यात ‘साईकृपा’ या दुकानाचे मालक भेटले. त्यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनीही यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. २ झबली, २ टोपडी, ४ लंगोट व १ दुपट्टा असा सेट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत द्यायचा, असे ठरले. हे सगळे जमवून येईपर्यंत २००५ साल उजाडले. ‘माघी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली. दिवेआगार येथील गणपतीसमोर नारळ वाढवून संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात आले. २००५ साली २१ सेट्सचे वाटप झाले. दर गुरुवारी विद्याताईंची मैत्रीण शैलजा काळे, श्रीमंत सयाजीराव गायकवाड स्वत: हॉस्पिटलमध्ये हे सेट्स प्रत्येक बाळंतीण स्त्रीच्या हाती देतात. कारण हे सेट्स बाळाऐवजी ‘रांगत’ दुसरीकडे जाण्याच्या शक्यतेची जाणीव त्यांना होती. सध्या दर गुरुवारी ४२ सेट्स वाटले जातात.’
अशी बाळलेणी बंगळुरू येथेही दिली जातात. पण त्याची कहाणी थोडी वेगळी आहे. येथे बडोद्याचा व्यापारीच सेट्स पाठवतो. पण या सेटमध्ये त्यांचे दुपटे नसते. हे दुपटे जाते अमेरिकेहून शिवून. आहे की नाही जगावेगळी कथा. आता ही दुपटी अमेरिकेहून का जातात? अमेरिकेत ती कोण शिवते? कापड कोठून घेतात?  या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच ते म्हणजे ‘विद्याताई’.
 चांगल्या कामाला सुरुवात केल्यानंतर अनेकांचे सहकार्य मिळत जाते, हेच खरे. विद्याताईंची मैत्रीण सुनीता. या मैत्रिणीची मैत्रीण अमेरिकेत चादरी व रजईचा व्यवसाय करते. अमेरिकेत विक्रीची प्रत्येक गोष्ट शंभर टक्के निर्दोष असावी लागते. या चादरी, रजई तयार करताना छोटीशी जरी चूक झाली की तो सेट लगेच परत पाठवला जातो. अमेरिकेत ‘सेकंड’चा माल विकता येत नाही. सदोष म्हणून हे सेट्स टाकून द्यावे लागतात. आपापसात बोलताना विद्याताईंना हे कळले आणि त्यांच्यासाठी खजिन्याचे दारच उघडले. आता या चादरी, रजई त्यांच्याकडे येतात. त्याचे कापड अत्यंत उत्तम दर्जाचे व सुंदर डिझाइनचे असते. यातूनच बाळासाठी छानशी ब्लँकेटस् शिवली जातात. ही ब्लँकेट्स रंगसंगतीसह बेतणे, शिवणे ही सगळी कामे विद्याताई एकहाती, घरातूनच करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘दिवसभर एकतर त्या शिवत तरी असतात, नाहीतर पोळ्या तरी करत असतात.’
पोळ्या करून मिळालेल्या पैशांना जोड म्हणून एक योजना त्यांनी हाती घेतली आहे. अमेरिकेत रिकामी पाण्याची बाटली, कोकचा डबा परत केला तर दर नगामागे ५ सेंट्स मिळतात. यावर विद्याताईंनी विचार सुरू केला. त्या ‘डबे-बाटलीवाली’चे काम करायला सिद्ध झाल्या. अमेरिकेतील सीनिअर सिटिझन्सच्या घरात एकत्रित राहणाऱ्या मंडळींना या प्रकल्पात त्यांनी सहभागी करून घेतले. मैत्रिणीही त्यांच्या मदतीला पुढे सरसावल्या. या डबे-बाटलीतून वर्षांला १००० ते १५०० डॉलर्स जमवतात आणि पोळ्यांच्या कमाईला जोड मिळते.
लोकांना देत असलेल्या या मदतीशिवाय विद्याताई अनेकींच्या विद्यामावशी बनल्या आहेत. अनेकींसाठी आधारवड झाल्या आहेत त्या भावनिक सल्ल्याने. देश कुठलाही असो संसार म्हटला की नाती येतातच आणि नाती म्हणजे त्यातल्या अडीअडचणीही येतातच. पण परदेशसारख्या ठिकाणी जवळचे, जिव्हाळ्याचे कुणी नाही. अडचणी, सोडवायाच्या कशा? त्यावर अनेकींसाठी एकच उत्तर होतं, ते म्हणजे ‘विद्यामावशी!’ म्हणतात ना, ‘माय मरो, मावशी जगो.’ या सगळ्याजणींना माय असतात. पण या आईचा आधार असतो बिनतारी. भेट होते ती टेलिफोनवर. मग प्रत्यक्ष भेटून मन हलके करायला सगळ्या जणी पोहोचतात  ‘विद्यामावशींकडे. कुणाच्या एखाद्या मतीमंद मुलाला २/३ तास सांभाळ, वेळ आली तर त्याला शाळेत पोचव, घरी आणून त्याला त्याच्या कलाने जेवू-खाऊ घाल. नवऱ्याच्या जाचाला, मारझोडीला कंटाळून घटस्फोट घेणाऱ्या मानलेल्या भाचीला फोनवरून बोलून, वेळप्रसंगी घरी आणून मानसिक आधार देण्याचे कामही या मावशीबाई मनापासून करतात. मावशींचं यावर म्हणणं असतं, ‘माझ्या मुलींची लग्ने झाली, त्यांना मुले झालीत, त्यांचे संसार सुखात चाललेत. तेव्हा या माझ्याकडे येणाऱ्या मुली माझ्याच आहेत. त्यांच्या अडचणीत त्यांना मदतीचा हात द्यायलाच हवा.’ आणि याकामी विद्याताईंबरोबर पती अरविंदही प्रयत्नशील असतात. अमेरिकेत घट्टपणे रोवलेल्या या पारिजातकाच्या झाडाची टपोरी सुगंधी फुले मायदेशात बाळलेण्याच्या रूपाने पडतात. असे असले तरी त्या आपल्या कर्मभूमीला विसरलेल्या नाहीत. अमेरिकेतही गरजू मंडळींसाठी काही करावं असं त्यांना वाटू लागलं. मग गाडीतून (कार) इकडे तिकडे जाताना, मॉल अगर अन्य ठिकाणी रांगेत उभे असताना, त्यांच्या हातात ‘लोकर आणि सुया’ दिसू लागल्या. त्यांनी स्कार्फ विणायला घेतले. मॉलमध्ये रांगेत उभ्या असणाऱ्या स्त्रियांशी त्या संवाद साधतात. थोडय़ा गप्पा झाल्यावर विद्याताई विचारतात, ‘तुम्हाला विणता येतं का?’ ‘हो’ असे उत्तर आले की आपली योजना सांगतात. ‘तुम्ही सांगाल त्या वेळी, त्या दिवशी येथेच लोकर आणि सुया आणून देईन, स्कार्फ विणून झाले की फोन करा. परत येथेच येऊन घेऊन जाईन.’ अनेकजणींना ही कल्पना आवडते. पुष्कळ स्कार्फस् जमतात. डिसेंबरमध्ये ख्रिसमससाठी घरच नसणाऱ्या लोकांना यांचे वाटप होते. अलीकडेच त्यांनी ५०० स्कार्फस् वाटल्याचे त्या सांगतात.
त्यांच्या या कामाची दखल अमेरिकेत ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ने २००४ साली घेऊन त्यांचा सन्मान केला, तसेच GOPIO म्हणजे Global Organisation People of Indian Origin-Connecticut  यांनी २०११ साली त्यांना इंडियन अमेरिकन अ‍ॅचिव्हमेंट पुरस्कार  दिला.
अशी ही इथल्या बाळांनी कधी न पाहिलेली परदेशात म्हणजे अमेरिकेतील केनेटीकट राज्यातील नॉरवॉक येथे राहणाऱ्या ‘विद्याआजी’ आणि अमेरिकेतील मुलींची ‘विद्यामावशी’ आणि या आजींना सतत कार्यरत राहण्यासाठी पडद्यामागे राहून साथ देणारे ‘अरविंद आजोबा’ यांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि बाळलेण्यांचा हा ओघ कायम राहण्यासाठी प्रचंड उत्साह मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवी आहे मदत
एखादे काम हाती घेतल्यावर त्यात अडचणी येतातच. सध्या विद्याताईंसमोर एक अकल्पित अडचण उभी राहिली आहे. बडोद्यातील विद्याताईंची मैत्रीण शैलजा काळे यांना काही अपरिहार्य कारणामुळे त्यांच्या घरापासून दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये दर आठवडय़ाला जाऊन या बाळलेण्यांचे वाटप करणे अशक्य झाले आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की ही वाटपाची जबाबदारी घेण्यास बडोद्यातील कोणी व्यक्ती अद्याप पुढे आलेली नाही. म्हणून गेले काही महिने हा प्रकल्प नाइलाजास्तव स्थगित करावा लागला आहे. बडोद्यातील मंडळी हा लेख वाचतील आणि मदतीचा हात पुढे करतील अशी खात्री वाटते. यासाठी यांच्याशी संपर्क साधावा –
अनुराधा नरसाळे
‘डन अपार्टमेंट’ ११ वा मजला,
खोली क्र. ११०४,
जावजी दादाजी मार्ग, ताडदेव,
मुंबई- ४००००७.
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२३८८८३७८,
मोबाइल क्रमांक- ९८७०२०१२२८.

हवी आहे मदत
एखादे काम हाती घेतल्यावर त्यात अडचणी येतातच. सध्या विद्याताईंसमोर एक अकल्पित अडचण उभी राहिली आहे. बडोद्यातील विद्याताईंची मैत्रीण शैलजा काळे यांना काही अपरिहार्य कारणामुळे त्यांच्या घरापासून दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये दर आठवडय़ाला जाऊन या बाळलेण्यांचे वाटप करणे अशक्य झाले आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की ही वाटपाची जबाबदारी घेण्यास बडोद्यातील कोणी व्यक्ती अद्याप पुढे आलेली नाही. म्हणून गेले काही महिने हा प्रकल्प नाइलाजास्तव स्थगित करावा लागला आहे. बडोद्यातील मंडळी हा लेख वाचतील आणि मदतीचा हात पुढे करतील अशी खात्री वाटते. यासाठी यांच्याशी संपर्क साधावा –
अनुराधा नरसाळे
‘डन अपार्टमेंट’ ११ वा मजला,
खोली क्र. ११०४,
जावजी दादाजी मार्ग, ताडदेव,
मुंबई- ४००००७.
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२३८८८३७८,
मोबाइल क्रमांक- ९८७०२०१२२८.