सर्वसाधारणपणे पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा हा काळ आहे. कुठे ना कुठे प्रवेश घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत असतील. त्यांच्यासाठी या हेल्पलाइन्स.
शिक्षणाचा हक्क हा आता मूलभूत आणि अनिवार्य गणला गेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांला किंवा विद्यार्थिनीला त्याला किंवा तिला हव्या असलेल्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. पण कधी कधी हा प्रयत्नही करू दिला जात नाही. उदाहरणार्थ आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांला किंवा विद्यार्थिनीला एखाद्या प्रसिद्ध खासगी शाळेत प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीत मोफत कायदेविषयक सल्ला देण्यासाठी नवी दिल्लीतील ‘सोशल ज्युरिस्ट’ नावाची एक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. भारतातील कोणत्याही भागातील शाळेशी संबंधित अशा प्रकरणात ही संस्था मदत करते. तिच्या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत- ९८६८५२९४५९ अणि ८८२६४५६५६५. या दूरध्वनी क्रमांकांवर रविवार सोडून अन्य दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधता येतो.
‘मुंबई विद्यापीठा’च्या अखत्यारीतील कोणत्याही महाविद्यालयात कोणत्याही शाखेत प्रवेश घेण्यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास त्या संदर्भात मदत करण्यासाठी ‘मुंबई विद्यापीठा’चीच एक हेल्पलाइन आहे. तिचा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे- ९३२६५५२५२५. फक्त विद्यार्थ्यांसाठीच असलेल्या या हेल्पलाइनवर शनिवार व रविवार सोडून सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधता येतो.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातील शिक्षण संस्थांविषयी, तसेच विविध अभ्यासक्रमांविषयी जाणून घ्यायचे असते. त्यांना त्यासंदर्भात माहिती मिळण्यासाठी ‘शिक्षा डॉट कॉम’ नावाची एक वेबसाइट आहे. त्यांच्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे- ०११-३००५२७२७. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ही हेल्पलाइन सुरू असते. भारतातील तसेच भारताबाहेरील पदवी स्तरावरील व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण देणाऱ्या १४ हजारांहून अधिक शिक्षण संस्थांमधील ४० हजारांहून अधिक अभ्यासक्रमांविषयीची माहिती या हेल्पलाइनवरून मिळू शकते.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader