हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने संपर्क साधायच्या हेल्पलाइन्स आपण गेल्या आठवडय़ापासून (९ एप्रिल) जाणून घेत आहेत. आज काही अन्य हेल्पलाइन्स
‘हेल्दी हार्ट फॉर ऑल’ या संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे – १८०० २०९ ५१२३. ही एक चळवळ आहे. या हेल्पलाइनशी संपर्क साधल्यावर रुग्णाला तातडीची मदत तर केली जातेच, पण हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या हेल्पलाइनवरून प्रयत्नही केले जातात. हृदयाची काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन या हेल्पलाइनवरून केले जाते, सल्लाही दिला जातो. ही सेवा विनामूल्य २४ तास उपलब्ध असते.
पुण्यातल्या काही मुख्य रुग्णालयांनी मिळून एक हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचे नाव आहे ‘हार्ट पुणे’. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे – १८०० २३३ ०१०२. पुण्यातील काही मुख्य रुग्णालये या हेल्पलाइनला संलग्न आहेत. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यासाठी रुग्णवाहिकेची मोफत सोय या हेल्पलाइनतर्फे करण्यात येते. तसेच त्या रुग्णालयात रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी सूचनाही केल्या जातात.
रेल्वेने प्रवास करत असलेल्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा झटका आला, तर बरोबर असलेल्या व्यक्तींनी तातडीने १३८ या रेल्वेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधायचा. आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही हेल्पलाइन आहे. देशभरातल्या कोणत्याही ठिकाणी तो रुग्ण असला, तरी त्याच्या मार्गावरील लगेच येणाऱ्या रेल्वे स्थानकावर त्या रुग्णाला उतरवून घेतले जाते. तातडीने जवळच्या रुग्णालयात त्या रुग्णाला भरती करण्यात येते व उपचार केले जातात.
हृदयविकाराचा कोणत्याही प्रकारचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी, तसेच त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यासाठी ‘एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट’चा पुनर्वसन विभाग कार्यरत आहे. त्यांच्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे – ०२२-६६९८६६६५.
‘वोकहार्डट् रुग्णालया’चाही ‘वोकहार्डट् स्ट्रोक सपोर्ट ग्रुप’ आहे. त्यांच्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे – ९१७५०-६६५५५०७. या क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधता येतो.

– शुभांगी पुणतांबेकर

Story img Loader