ग्रामीण भागातील गरीब लोकांना आणि समाजातील वंचित घटकातील लोकांना मदत करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांची माहिती आपण आतापर्यंत घेतली. आता आपण जरा वेगळे काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून घेऊ या. कर्करोगाशी सामना करताना रुग्णांना खूप शारीरिक, मानसिक यातनांना सामोरे जावे लागते. उपचारांदरम्यान इतर परिणामांबरोबरच एक परिणाम म्हणजे केस गळणे. काही रुग्ण तशा स्थितीतही डोक्याला रुमाल बांधून फिरतात. पण काही रुग्ण खोटय़ा केसांचा टोप घालतात. असले टोप महाग असतात. सामान्य आर्थिक स्थिती असलेल्यांना ते परवडत नाहीत. अशा गरजू रुग्णांना केसांचे टोप मोफत देणाऱ्या संस्थांना चांगल्या आणि लांब केसांची आवश्यकता असते. लांब केस कापून आखूड करणाऱ्या स्त्रियांनी आपले कापून टाकलेले केस या संस्थांना दान केल्यास गरजूंना मदत होऊ  शकेल. मात्र केस नैसर्गिक स्थितीतील हवेत. ब्लीच किंवा ट्रीट केलेले केस चालत नाहीत. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या संस्थांशी

संपर्क साधा –

कोप विथ कॅन्सर, मदत चॅरिटेबल ट्रस्ट, मंगल आनंद हॉस्पिटल, चेंबूर, मुंबई ४०००७१. दूरध्वनी क्रमांक – २५५२११११.

हेअर एड – गणेश अपार्टमेंट, फ्लॅट क्र. १, तळ मजला, प्लॉट क्र.४०, पांडुरंग वाडी, रस्ता क्र. ३, सेंट थॉमस स्कूलजवळ, गोरेगाव (पू.), मुंबई ४०००६३.

व्ही केअर फाऊंडेशन – ए-१०२, ओम रेसिडेन्सी, जे. डब्ल्यू. रोड, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलजवळ, परळ, मुंबई ४०००१२. दूरध्वनी क्रमांक – ९८२१९४९४०१.

कर्करुग्णांची राहण्याची व्यवस्था करणारी, त्यांना अन्न पुरवणारी, तसेच मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे. ‘जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट’ हे तिचे नाव. या संस्थेला पुस्तके, कपडे, खेळणी, न वापरलेली औषधे यांची आवश्यकता असते. आपल्याकडच्या चांगल्या स्थितीतल्या या वस्तू आपण या संस्थेला दान देऊन कर्करुग्णांना मदत करू शकतो.

संपर्कासाठी पत्ता – ३/९, कोंडाजी चाळ, जेरबाई वाडिया मार्ग, परळ, मुंबई ४०००१२. दूरध्वनी क्रमांक – २४१५३४५३, २४१२५८४८.

puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader