काही लोक जात्याच सकारात्मक वृत्तीचे असतात की काय कोण जाणे! आमचा एक मित्र आहे. प्रमोद, प्रमोद तिवारी. त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला कधीही काळजी दिसत नाही. आम्हाला भेडसावणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्याला भेडसावत नाहीत. रात्री नाटक, सिनेमाला जायला आम्ही का-कू करतो कारण परत यायला रिक्षा मिळेल की नाही याची काळजी वाटते. पण प्रमोद बिनधास्त असतो. त्याने कधी रिक्षा मिळाली नाही, अशी तक्रार केली नाही. विचारलं तर सांगतो, ‘‘हो, मिळाली की. लगेचच मिळाली.’’ तो थापा मारतोय असं म्हणावं तर त्याची बायकोही त्याच्या म्हणण्याला पुष्टी देते.
प्रमोद माझ्यासारखाच सरकारी बाबू आहे. पण तो सरकार दरबारच्या कामांविषयी कधी तक्रार करीत नाही. त्याची कामं व्यवस्थित होतात. एकदा आमची पगारवाढीची थकबाकी मिळायची होती. ती बरेच दिवस थकली होती. सर्व जण लेखाविभागात चकरा मारायचे, फोन करून विचारायचे. त्यांना संबंधित अधिकारी आश्वासनं द्यायचे. पण कुठलंच आश्वासन कधीच पाळलं गेलं नाही. प्रमोद थंड होता. त्याला विचारलं तर म्हणाला, ‘‘मिळेल की, घाई काय आहे? इतक्यातच काही पशाची गरज नाही.’’ त्यावर आमच्यातल्या काही जणांनी त्याला गळ घातली की त्यानेही प्रयत्न करावेत. त्यात त्यांचा दुहेरी उद्देश होता. काम झालं तर फायदाच होता. नाही झालं तर प्रमोदच्या भोवतालचं वलय नाहीसं झालं असतं. ‘ठीक आहे बघतो मी,’ प्रमोद म्हणाला. दुसऱ्या दिवशी प्रमोदने लेखा विभागाच्या प्रमुखाला पत्र लिहिलं. आपल्या दोस्तांना ते सांगितलं. त्यांनी त्याला वेडय़ात काढलं. ‘‘असं पत्र लिहून कोणी कामं करतं का? आपण आपल्याला आलेल्या पत्रांचं काय करतो?’’ ‘‘बघू. नाही काम झालं तर दुसरं काही तरी करू,’’ प्रमोद म्हणाला.
दोनच दिवसांनी लेखा ऑफिसमधून प्रमोदच्या नावाने एक पत्र आलं. प्रमोदने ते सगळ्यांना दाखवलं. त्यात लिहिलं होतं, ‘‘काम चालू आहे. या महिनाअखेर पगाराबरोबर थकबाकीचंही वाटप होईल.’’ सगळ्यांना नवल वाटलं. ते प्रमोदला म्हणाले, ‘‘तुझ्या पत्राला उत्तर द्यायला त्यांना कसा काय वेळ मिळाला बुवा?’’ प्रमोदने हाताने ‘मला काय माहीत?’ असा अभिनय केला. थकबाकी मिळाल्यावर आम्ही प्रमोदला उचलून डोक्यावर घ्यायचंच बाकी ठेवलं होतं.
तर असा हा प्रमोद. त्याच्या सकारात्मकतेचं आम्हा सगळ्यांना खूप कौतुक (आणि काहींना असूयाही) आहे. तोही सदैव मदत करायला तयार असतो. त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे तशा कशा घडतात, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. पण त्याला त्याचं काही विशेष वाटत असल्याचं दिसत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर माझ्यासकट इतरांना तो वेगळा वाटत असला तरी तो स्वत:ला कोणी वेगळा समजत नाही.
मला त्याच्या नििश्चतपणाचं सीक्रेट जाणून घ्यायचं होतं. म्हणून एकदा ऑफिस सुटल्यावर मी त्याला हॉटेलात चहा प्यायला घेऊन गेलो. चहा-सँडविचची ऑर्डर देऊन मीच बोलायला सुरुवात केली.
‘‘प्रमोद, तू इतका बिनधास्त कसा?’’ मी विचारलं.
‘‘काळजी करून काही होत नाही म्हणून!’’ प्रमोद म्हणाला.
‘‘आपल्याला तर बुवा कितीही नाही म्हटलं तरी काळजी वाटतेच. तू काय कोणी गुरूबिरूकेलायस का?’’ मी विचारलं.
‘‘नाही. अनुभवातूनच शिकलो,’’ प्रमोद म्हणाला.
‘‘कोणत्या अनुभवातून? सांग तर,’’ मी म्हणालो.
‘‘कुठल्या एका अनुभवातून नाही. अनेक अनुभवांच्या मालिकांतून,’’ प्रमोद म्हणाला.
‘‘नक्की किती अनुभवातून शिकलो, नक्की कुठल्या टप्प्यावर मी काळजी करणं सोडून दिलं ते सांगता नाही येणार. पण शिकता शिकता बऱ्याच अनुभवांनंतर एक दिवस मी फ्रान्सिस नावाच्या माणसाच्या लेक्चरला गेलो. ते ऐकून मी काळजीला कायमची सोडचिठ्ठी दिली.’’
‘‘असं काय होतं त्यात?’’ मला विचारायला मुद्दा मिळाला.
‘‘तो म्हणाला, आपल्या प्रत्येकात एक होकायंत्र असतं. कुठल्याही परिस्थितीत ते आपल्याला मार्ग दाखवतं,’’ प्रमोद म्हणाला.
‘‘कुठे असतं हे होकायंत्र?’’ मी विचारलं. मला वाटलं, तो आता ‘डोकं’ किंवा ‘मेंदू’ असं काही तरी उत्तर देईल. पण तो म्हणाला, ‘‘फ्रान्सिसने सांगितलं, होकायंत्र हा अवयव नाही. ते पिढय़ान्पिढय़ा संक्रमित होत आपल्यापर्यंत आलेलं अनुभवांचं शहाणपण असतं. प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला या शहाणपणाचा इन्पुट देत असते. हे इन्पुट पिढय़ान्पिढय़ा साचून आपल्यात सिक्स्थ सेन्स तयार होतो तेच होकायंत्र. हे होकायंत्र नुसतं दिशा दाखवून थांबत नाही तर ते, त्याच्या कामात अडथळा आणला नाही तर, आपल्याला त्या दिशेने घेऊनही जातं. त्यात आपण जाणून बुजून काही करत नाही. आपल्या हालचाली आपोआप योग्य दिशेने होतात,’’ प्रमोद म्हणाला.
‘‘म्हणजे नक्की कसं होतं ते सांग. म्हणजे तुझा एखादा अनुभव घेऊन सांग,’’ मला आता त्याच्या बोलण्यात रस वाटायला लागला होता.
‘‘म्हणजे असं बघ. एकदा काय झालं, मी पुण्याहून मुंबईला टॅक्सीने यायला निघालो. त्या वेळी बूथवर पोहोचेपर्यंत बारा वाजून गेले होते. एकही टॅक्सी दिसत नव्हती. बूथवरचा माणूसही म्हणाला, ‘तुम्हाला चार वाजेपर्यंत थांबायला लागेल.’ त्याला जांभया येत होत्या. बहुतेक आपण गेल्यावर तो झोपेल असा रंग दिसत होता. काय करावं ते सुचेना म्हणून आपल्या आतल्या होकायंत्राची आठवण केली नि सुचेल ते करायचं ठरवलं. समोरच्या टपरीवर जाऊन चहा प्यावा म्हणून निघालो. चहाची ऑर्डर देण्यापूर्वी टपरीवाल्याला विचारलं, ‘काय टपरी बंद करायची वेळ झाली ना?’ त्यावर टपरीवाल्याने रात्रभर चहा चालू असतो म्हणून सांगितलं. ‘पण टॅक्सी तर चारशिवाय चालू होणार नाही ना?’ मी विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘असं काही नाही. ती बघा तुमच्यासाठी टॅक्सी आली.’ आणि खरोखरच बूथकडे एक टॅक्सी येत होती. मी तिला हात केला. चहा घेऊन बूथवर गेलो तशी बूथवरचा माणूस म्हणाला, ‘तुम्ही लकी आहात. आणखी तिघे जणही येतायत.’’
प्रमोदने दिलेलं उदाहरण मला फारच फालतू वाटलं. पण प्रमोदला तसं वाटत नसावं असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. कदाचित मला काय वाटतंय याची त्याला फारशी पर्वा नसावी. त्याच्या होकायंत्राने त्याला तसं सांगितलं असावं.
प्रमोदचा निरोप घेऊन मी घरी आलो. मला पाहून बायको म्हणाली, ‘‘हे काय आज उशीर झाला?’’
‘‘अगं, प्रमोदबरोबर चहा प्यायला गेलो होतो. तिथे वेळ गेला,’’ मी म्हणालो.
‘‘तुमचं बरं आहे. तुम्ही सुटलात,’’ बायको तक्रारीच्या सुरात म्हणाली.
‘‘का? काय झालं?’’ मी विचारलं.
‘‘अहो, सॅरेडॉन आले होते. माझं डोकं खाल्लं त्यांनी. आत्ता पाच मिनिटांपूर्वीच गेले. तुम्ही नाही म्हटल्यावर जास्त थांबले नाहीत,’’ बायको म्हणाली. तिला माझा हेवा वाटल्याचं दिसत होतं. सॅरेडॉन म्हणजे बायकोचा लांबलांबचा मामा. एकदम पकाऊ. बोअर करून डोक्याला जाम ताप देतो. म्हणून आम्ही त्यालाच सॅरेडॉन म्हणतो.
मी सुटकेचा नि:श्वास सोडला. एरवी तोंडात अलगद पडणाऱ्या भक्ष्यासारखा मी सॅरेडॉनच्या तावडीत सापडत असे. मग आज काय झालं? प्रमोद म्हणाला ते बरोबर आहे. माझ्याही आत होकायंत्र आहे.
होकायंत्र
‘‘आपल्या प्रत्येकात एक होकायंत्र असतं. कुठल्याही परिस्थितीत ते आपल्याला मार्ग दाखवतं,’’ प्रमोद म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hokayantra