नुकतीच होळी साजरी झाली.. यंदाची होळी जरा जास्तच रंगली. कारण खूप दिवसांनी आम्ही मुंबईकर गावी एकत्र आलो होतो..पण आता तर ती कायमची आठवणीत राहाणार आहे, कारण या होळीला गाठ पडली ती हडळ आणि मुंजाशी..
‘वहिनी’, यंदा थंडी कडक पडलीय, आपण सगळे गावी आहात, तर ‘पोपटी’ करायची का?’ संतोषभाऊंनी विचारले. सलग तीन दिवस रजा आल्याने यंदा आम्ही होळीला गावी आलो होतो. गावी ह्य़ांचे बरेचसे नातलग जमले होते. प्रत्येकाची गावात ऐसपस घरे होती. अनेक जण मुंबईला स्थायिक झाले होते, पण अधूनमधून सगळे फोनाफोनी करून एकत्र गावी जमायचे. मुलाबाळांच्या परीक्षांमुळे, कामातील अडचणींमुळे हा योग तसा क्वचितच यायचा. पण यंदा योग जुळला होता. आमचा वाडा गावापासून थोडा दूर असल्याने सगळी समवयस्क मंडळी आमच्याच वाडय़ात जमायची. आजुबाजूला फारशी घरे नव्हतीच. समुद्रकिनारीच गाव असल्याने कमालीचा गारवा होता. अशाच एका सायंकाळी माझे मावस, मामे दीर, नणंदा सारे आमच्या वाडय़ात जमले होते. लाईट नव्हती. गावात वीज जवळ जवळ ४-५ तास नसायचीच. टेंभे पेटवले गेले. त्या प्रकाशातच सगळी गप्पा मारत बसलो होतो, अन् त्यातच संतोषभाऊंनी ‘पोपटी’चा विषय काढला. आम्ही सर्वानी ती कल्पना उचलून धरली.
 हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गावोगावी हमखास होणारा ‘पोपटी’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम. ‘पोपटी’ची तयारी सुरू झाली. साधारण एका तासातच बरीचशी सुटी लाकडे, काथ्याच्या दोराची वळकटी, दोन कोंबडय़ा, पोपटीचा पाला व शेंगा, अंडी, हिरवा मसाला असं साहित्य आणलं गेलं. अमृतभाऊंनी येताना मातीचं मडकं आणलं होतं. आम्हा बायकांचं काम नुसत बघ्याचं होतं. पुरुष मंडळीच सगळी कामे करीत होती. शेजारच्या गावातून सायकलवरून गजाभाऊ आले होते. आवारात चर खणला गेला. एकाने पटापट कोंबडय़ा सोलल्या, तर दुसऱ्याने पाटय़ावर हिरव्या मिरच्या, आलं-लसूण, कोथींबीर भराभरा वाटली. कोंबडय़ांचे व्यवस्थित मध्यम आकाराचे तुकडे करण्यात आले. त्याला मीठ व वाटलेला मसाला लावला. वरून िलबू पिळला व मिश्रण तसंच मुरायला ठेवलं. चरामध्ये लाकडं, रशा, गोवऱ्या इतकंच काय, तर कोंबडीची पिसेपण टाकली होती. लाकडं पेटवली गेली. मातीच्या मडक्याला आतून-बाहेरून स्वच्छ धुतलं व आतमध्ये पोपटीच्या शेंगा पाल्यासहीत भरल्या. त्यात मुरायला ठेवलेले कोंबडीचे तुकडे टाकले. त्या शेकोटीत ते मडकं टाकलं व भोवतीनं अंडी टाकली. माझ्या चुलत नणंदेने हळदीच्या पानावर पानग्या केल्या. थोडय़ाच वेळात पोपटी शिजत आली. भाजलेलं मडकं व अंडी शेकोटीच्या आगीतून बाहेर काढण्यात चढाओढ लागली होती. प्रत्येकजण अंडी पळवायचा प्रयत्न करीत होता. ऊन-ऊन असलेली अंडी एकमेकांच्या हातून खेचून घेण्यात येत होती. शेवटी मडकं उघडण्यात आलं. शिजलेल्या कोंबडीचा सुवास मस्तपकी सर्वत्र पसरला. प्रत्येकानं केळीच्या पानात आपापला हिस्सा घेतला. हसत-खेळत जेवण चाललं होतं. भुताखेताच्या गप्पांना ऊत आला होता. सुधाकर तात्या तर अशा गोष्टी सांगण्यात आघाडीवर होते. खवीस, मुंजा, हडळ यांचा उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येत होता. लहान मुले आधीच आपल्या आयांना बिलगून झोपी गेली होती. रात्रीचा दीड वाजत आला होता. जांभया देत काही मंडळी उठली, घरी जायला निघाली. काही वाडय़ातच झोपली. गजाभाऊदेखील सायकलवरून घरी जायला निघाले. झाकपाक करून आम्हीदेखील झोपेच्या स्वाधीन झालो.
   आज होळीचा दिवस. सकाळी उठून आवराआवर करून बाजारहाट करायला निघालो. थोडय़ा अंतरावर गुरुजींचं घर होतं. घराच्या आतून बोलणं ऐकू येत होतं. गुरुजी बायकोला सांगत होते. ‘अगं होळीकरिता आपली जुनी लाकडी खाट गावसमितीला द्यायचं मी कबूल केलं होतं. कालच पडवीला ती लावून ठेवली होती. पण आज खाट दिसत नाही ती कुठे.’ गुरुजींना हाक न मारताच आम्ही तसेच पुढे निघालो. आता त्यांना काय सांगणार, कारण आमच्या कालच्याच ‘होळी’त त्यांची खाट स्वाहा झाली होती. बाजारहाट करून मामांकडे गेलो. भर मंडईत मामांचं दुकान होतं. आत मामांबरोबर गप्पा मारत बसलो. संतोषभाऊ पण तिथेच होते. शेजारच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. मामांना खुणेनेच विचारले, तसे म्हणाले, ‘तिला काय निमित्तच हवं असतं भांडायला, कालपासून तिची कोंबडी हरवली आहे. म्हणून ती होळीच्या आधीच शिमगा करतेय. गावाच्या नावानं’. मला एकाएकी शंका येऊ लागली. काल पोपटीला लागणारे सामान (खाट, कोंबडय़ा) या लोकांनी गावातूनच उचलून आणले की काय. मी चमकून संतोषभाऊंकडे पाहिलं, तर ते निर्वकिारपणे पेपर वाचत होते. मनात म्हटलं, ‘चला, शेजारणीबरोबरच्या कुठल्या तरी जुन्या भांडणाचा वचपा काढलेला दिसतोय.’ मामांचा निरोप घेऊन जायला निघालो, तसे मामा ह्य़ांना म्हणाले, ‘अरे संजू, जरा गजाला बघून ये, मावशीचा फोन आला होता, त्याला बरं नाहीए’. आम्ही ‘बरं’ म्हणून निघालो. जाता जाता ह्यांना सहज मनातली कोंबडीची शंका बोलून दाखवली. तसे हे हसत हसत म्हणाले, ‘मग तुला काय वाटतं, पोपटी कधी आपल्या पशाने करायची असते काय?’ माझी बोलतीच बंद झाली.
 जेवणं आटोपून संध्याकाळच्या सुमारास शेजारच्या गावी जायला आम्ही निघालो, समुद्र किनाऱ्याला लागून असलेली आडवाटच आम्ही निवडली होती. जाताना वाटेत पाराजवळ एका पीरबाबाची कबर होती. त्याला लागूनच अब्दुलचाच्यांची झोपडी होती. अब्दुलचाचा एकटेच राहत असत. पाराला वळसा घालून दहा मिनिटातच गजाभाऊंकडे मोटार सायकलवरून पोहचलो. मावशीच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. म्हणाल्या, ‘अरे काल रात्री तुमच्याकडून जो दोन वाजता आला, तो धापा टाकतच होता. रात्रभर तापाने फणफणला होता. झोपेत सारखा ‘सोड मला, सोड मला’ बोलत होता. सकाळीच डॉक्टरांनी औषध दिलंय. त्यामुळे ताप आताशी कुठं उतरलाय.’ आमचा आवाज ऐकून गजाभाऊ जागे झाले. त्यांच्याकडे बघून क्षीणसे हसले. हे त्यांच्या उशाशी जाऊन बसले, ‘काय झालं?’ विचारले. तसे गजाभाऊ म्हणाले, ‘अरे काल तुमच्याकडून मी जो सायकलवर निघालो, पाराला वळसा घालून जाणार, इतक्यात पजंणाचा छुम छुम आवाज येऊ लागला. नंतर बांगडय़ांची किणकिण ऐकू येऊ लागली. कबरीच्या जवळ एक पेटता दिवा तरंगत होता. मला घाम फुटला, मी जीव घेऊन सायकल मारली. इतक्यात माझी सायकल कोणीतरी मागून ओढून धरली होती. काही केल्या ती पुढे जात नव्हती. मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. देवाचं नाव घेऊन जोर लावला, तेव्हा कुठे त्या पारावरच्या मुंजानं सायकल सोडली. तसाच घरी आलो आणि पांघरुण घेऊन पडलोय.’ आम्ही हे ऐकून चकीतच झालो, पण वाटलं कदाचित काल रात्रीच्या भुताखेतांच्या गोष्टींचा परिणाम असावा. मावशीनं चहा आणला, आम्ही चहा पीत होतो. मावशी गजाभाऊंना म्हणाली, ‘अरे आपली एक कोंबडी दिसत नाही. सकाळपासून तुझ्याच मागे होते. त्यामुळे कोंबडय़ांकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ मिळाला नाही.’ मला चहा पिता पिता उगाचच ठसका लागला. कालच्या पोपटीतील दुसरी कोंबडी कोणाची? हे कोणाला विचारायची मला आता आवश्यकता उरली नव्हती. गजाभाऊ त्याही स्थितीत आमच्याकडे बघून हसले. ‘काळजी घे’ असे सांगून आम्ही त्यांचा निरोप घेतला.
 घरी परतताना कबरीजवळ येताच गाडी थांबवली. समोरून शबनम येत होती. तिला विचारलं, ‘कधी आलीस?’, तर म्हणाली, ‘काल सकाळीच आले. होळीची सुट्टी मिळाली, चाचांनी बोलावलं म्हणून आले.’ शबनम अब्दुलचाचांची पुतणी. मुंबईला असते. अवघी १४ वर्षांची अवखळ पोर. हातात डझनभर काचेच्या बांगडय़ा भरल्या होत्या. मला एकाएकी शंका आली. तिला विचारले. ‘काय गं, काल रात्री तू कबरीजवळ गेली होतीस?’ तर म्हणाली, ‘हो, दिवा विझला होता. चाचा म्हणाले दिवा लावून ये, म्हणून गेले, काय झालं चाची?’ मी हसून म्हटलं, ‘काही नाही, उद्या घरी ये.’ ती ‘बरं’ म्हणून छुम छुम पंजण वाजवत निघाली. मी मागे वळून तिला पाहत होते. हडळीचे ‘गूढ’ उकलले होते.
 संध्याकाळी गावात होळी पेटवली गेली. सगळीकडे आनंदोत्सव चालला होता. आम्ही खूप धमाल करत होतो. गुरुजी आले होते. उगीचच पेटलेल्या होळीत आपल्या लाकडी खाटेचे अवशेष दिसतायत का? ते पाहत होते. ती शेजारीण सगळ्यांकडे मारक्या म्हशीगत बघत आतल्या आत धुमसत होती. आमची हसून हसून पुरेवाट झाली होती. रात्री दमून भागून आम्ही गावजेवण उरकून झोपी गेलो.
   दुसऱ्या दिवशी पहाटेच उठलो. आज धुळवड, रंगांचा सण. रंगपंचमीला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. सर्वजण परत एकत्र आलो होतो. एकमेकांना रंगांनी पुरतं माखून टाकलं होतं. चेहरे ओळखण्याच्या पलीकडे गेले होते. दुपारी समुद्रात आंघोळ केल्यावरच चेहरे पूर्ववत झाले होते. दुपारचं जेवण शेतावर ठेवलं होतं. उकडीच्या तांदळाच्या भाकऱ्या, आंबेमोहर तांदळाचा भात, बोकडाचं मटण, भाजलेल्या वाकटय़ा असा सुग्रास जेवणाचा बेत होता. भरपेट जेवून मनात होळी-रंगपंचमीच्या आठवणी ठेवून मुंबईला परतत होतो. पाराजवळच्या कबरीला वळसा घातला, तोच मोटरसायकल कशाला तरी अडकली. पाहिलं तर, समोरचं मातीचं एक आडवं ढेकूळ वर आलं होतं. अ‍ॅक्सेलेटरवर पाय देऊन त्यांनी गाडीचा वेग वाढवला व गाडी ढेकळावरूनच नेली. अन् क्षणभरात आम्हा दोघांच्याही मनात एक विचार चमकून गेला, कदाचित त्याच ढेकळावर तर त्या दिवशी गजाभाऊंची सायकल अडकली नसेल ना? आणि आम्ही दोघेही हसत सुटलो. पारावरच्या मुंजाचेही कोडे सुटले होते.

Story img Loader