निरंजन मेढेकर

लग्नाचा ‘हनिमून’ काळ संपतो आणि सुरू होतो ‘संसार’ आणि त्याचा सर्वाधिक परिणाम होतो तो जोडप्यांच्या शरीरसंबंधांवर. वैयक्तिक कारणं वेगवेगळी असली, तरी एकूण मानवी कामेच्छा काही ठरावीक शारीरिक-मानसिक कारणांमुळेच कमीजास्त होत असते. खरंच, वय वाढलं की कामेच्छा कमी होते का? त्यात स्त्री-पुरुष भेद असतो का? कोणत्याही वयात कामेच्छा पुन्हा ताजी होऊ शकते का? कामेच्छेचा लंबक कसा स्थिरावता येईल, यावर तज्ज्ञांशी बोलून टाकलेला प्रकाश..

chaturang article
‘भय’भूती: मम भय कोण वारिते?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
unicff report on child sexual abuse
जगाभोवतीचा लैंगिक फास
mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : सच्ची साथसोबत
Loksatta Chaturang article generation of seniors and juniors middle generation
मधल्या पिढीचं ‘लटकणं’!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
constitution of india loksatta article
संविधानभान : अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधित्व

‘‘आमचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. ती खूप सुंदर आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे. सगळं काही छान सुरू आहे. एका गोष्टीशिवाय.. आम्ही सेक्स करत नाही!’’ इस्थर पेरेल या लेखिकेच्या ‘मेटिंग इन कॅप्टिव्हिटी’ या बेस्टसेलर पुस्तकात त्यांच्याकडे काऊन्सिलिंगला आलेल्याचं हे प्रकरण म्हटलं तर अजब अन् म्हटलं तर चारचौघांसारखं!  

 नात्याला, लग्नाला ठरावीक वर्ष झाली की आकर्षण कमी होतं का? शरीरसंबंधांची इच्छा, प्रमाण कमी होतं का? की ते केवळ मानसिक असतं? मुळात कुठलाही एक माणूस जसा दुसऱ्यासारखा नसतो, तसंच कोणतंही जोडपं आणि त्यांचं कामजीवन दुसऱ्यासारखं नसतं. तरीही लग्नातली ‘हनीमून फेज’ ओसरली की रोजच्या धबडग्यात, मुलांच्या संगोपनात, नोकरी-व्यवसायाच्या व्यापात एकदा जोडपी अडकली, की रती, प्रीती, श्रृंगार, प्रणय आणि संभोग हादेखील त्या धावपळीच्या आयुष्यातला कधी तरी करण्याचा, केवळ एक शारीर भाग म्हणून उरतो का? बरं, ही लैंगिक इच्छाही एकाच वेळी दोघांची कमी झाली तर ठीक; नाही तर नात्यात निर्माण होणारे ताणेबाणे आणखीनच त्रासदायक. 

 १८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘देहभान’ सदरात प्रसिद्ध झालेल्या ‘लैंगिक अनुरूपता हवीच!’ या लेखावर आलेला एका डॉक्टरांचा ई-मेल याच संदर्भात आहे. त्या म्हणतात, ‘मी आता ३८ वर्षांची आहे. मला दोन मुलं आहेत. आता या वयामध्ये वाढलेल्या जबाबदाऱ्या, आरोग्याचे प्रश्न, त्यामुळे होणारी चिडचिड, यामुळे लैंगिक इच्छा कमी झाल्याचं जाणवतंय आणि आमच्या नवरा-बायकोच्या नात्यावर त्यामुळे परिणाम होतोय. मला एक स्त्री म्हणून नि:स्वार्थी प्रेमाची अपेक्षा आहे, पण नवऱ्याला वेगळीच. अशा वेळी हा विषय मानसिक ताणाचा ठरत आहे. वास्तविक मी आणि माझा पती दोघंही डॉक्टर. तरीही मानसिकता समजून घेतली जात नाही. मला वाटतं, की वयानुसार प्राधान्यक्रम बदलले पाहिजेत..’

तसं पाहायला गेलं तर या बाईंचं म्हणणं रास्त आहे. जबाबदाऱ्यांनुसार आणि वाढत्या वयानुसार त्यांची शरीरसंबंधांची इच्छा कमी होतेय आणि आपल्या नवऱ्यानं हे समजून घ्यायला हवं, सतत ‘त्या’ गोष्टीसाठी आग्रह करू नये, असं त्यांना वाटतंय; पण खरी गोम इथेच आहे. कारण मुलं झाली किंवा लग्नाला दहा, बारा, पंधरा वर्ष झाली म्हणून इच्छा कमी होते, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. अगदी साठी-पासष्टीतही उत्तम कामजीवन असलेल्या जोडप्यांची माहिती या सदराच्या निमित्तानं डॉक्टरांशी बोलताना मिळते. त्यामुळेच वय वाढल्यावर, मुलं झाल्यावर प्रणय-संभोग कमी करायला पाहिजे, हे शरीर नाही, तर बऱ्याचदा मन, मनात ठाण मांडून बसलेल्या समजुती, समाजात प्रचलित रूढी सांगत असतात. एकूणच शरीरसंबंधांकडे बघण्याच्या निकोप दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळेही असं होत असावं का, असा प्रश्न यामुळे पडतो.

दुसरीकडे, किती दिवसांनी किंवा आठवडय़ांतून, महिन्यातून अमुक इतक्या वेळा समागम करणं योग्य, असं कुठलंच आदर्शवत प्रमाण नाहीये. त्यामुळे कदाचित अशीही शक्यता आहे, की वर उल्लेख केलेल्या डॉक्टरबाईंचे पती शरीरसंबंधांबद्दल जी अपेक्षा करतात, ती त्यांच्या दृष्टीनं योग्यही असेल; पण बाईंचा शरीरसंबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्यानं त्यांना आता ती गोष्ट महत्त्वाची, प्राधान्याची वाटत नाहीये. वास्तविक हे डॉक्टर जोडपं असल्यानं त्यांना शरीरधर्म, शरीराच्या गरजा आणि त्याचं नियमन करण्याचे उपाय व्यवस्थित माहीत असणार. तरीही त्यांच्या विसंवादाचं हे कारण असेल, तर लैंगिकता शिक्षणाबद्दल अज्ञान असलेल्या इतर जोडप्यांची काय व्यथा असेल?

 ‘‘लैंगिक इच्छा कमी होण्यामागे (Low sex desire) बऱ्याचदा कामाचा ताण, चिंता, नैराश्य, अशी मानसिक कारणं असतात. शहरी जीवनशैलीचा विचार करता घरकाम, प्रवासातली दमछाक, रात्रपाळीतलं काम आणि अपुरी झोप हेदेखील कामेच्छेवर विपरीत परिणाम करतात. कामाची किंवा इतर कारणं देत झोपेला महत्त्व न देण्याकडे अनेकांचा कल असतो; पण भूक, तहान आणि झोप या माणसाच्या शारीरिक गरजा आहेत. त्यांची पूर्तता नीट होत असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लैंगिकतेवर होतो,’’ फॅमिली फिजिशियन डॉ. अमित थत्ते सांगत होते.

करोनाकाळात ‘वर्क फ्रॉम होम’चं नवं पर्व सुरू झालं. आज या महासाथीचा फेरा ओसरल्यावरही अनेक कंपन्यांनी घरून काम करण्याची परंपरा वेगवेगळय़ा कारणांनी आणि मुख्यत: खर्चात कपात करण्याच्या सोयीमुळे कायम ठेवली आहे; पण यामुळे पूर्वी दिवसभरात जेमतेम आठ-दहा तास सोबत असणारी जोडपी आता चोवीस तास सोबत आहेत. याचा कामजीवनावर कसा परिणाम झाला, याविषयी बोलताना सायकियाट्रिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. निकेत कासार सांगतात, ‘‘करोनाच्या आधी प्रत्येक व्यक्तीचा ‘वर्क लाइफ बॅलन्स’ वेगळा होता. रोज घराबाहेर पडल्यानं ‘सोशल कनेक्ट’ चांगला होता, तसंच रोजचा ठरावीक वेळच जोडीदारासोबत मिळत असल्यानं कामजीवनही चांगलं होतं. करोनानंतर काही गोष्टी बदलल्या. सुरुवातीच्या काळात अनेक जोडप्यांनी सतत एकमेकांबरोबर असण्याकडे संधी म्हणून बघितलं. त्यामुळे अनेकांचं सेक्स लाइफ सुधारलं; पण कामाचे तास आणि नोकरीच्या असुरक्षिततेमुळे ताण वाढायला लागला, तसा कामजीवनावर विपरीत परिणाम होऊन त्याचं पर्यवसान लैंगिक इच्छा कमी होण्यात झालं.’’

 चोवीस तास सोबत असलेल्या जोडप्यांमध्ये ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ होऊन त्याचा परिणाम लैंगिक इच्छा कमी होण्यात होऊ शकतो का, असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो. ‘मेटिंग इन कॅप्टिव्हिटी’ या पुस्तकातल्या  ‘More intimacy, less sex : Love seeks closeness, but desire needs distance’ या प्रकरणात याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आलंय. प्रेमी युगुलांना बऱ्याचदा एकमेकांचा विरह असह्य वाटत असला, तरी प्रणय आणि संभोगासाठी विरह आवश्यक ठरतो, असा महत्त्वाचा मुद्दा यात उलगडण्यात आला आहे. जोडप्यांमध्ये खूप अंतर असेल, संवाद नसेल तर प्रेम आटू शकतं, हे जसं खरंय तसंच नात्यात करकचून बांधल्याची भावना असेल किंवा औषधापुरताही विरह नसेल तर प्रणयाची ओढही कमी होऊ शकते, असं यात नमूद करण्यात आलंय.  

यावर भाष्य करताना डॉ. निकेत म्हणतात, ‘‘सतत सोबत असलेल्या जोडप्यांमध्ये ‘ओव्हर एक्सपोजर इफेक्ट’ पाहायला मिळतो. एकमेकांच्या सवयी, भावनिकता, लैंगिकता यासंबंधीच्या बारीकसारीक गोष्टी माहिती झाल्या. या अतिपरिचयामुळे ‘इंटिमसी’ कमी व्हायला लागली. दुसरीकडे सामाजिक एकलकोंडेपणामुळे चार लोकांत मिसळण्याचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला. थोडक्यात करोनाकाळातल्या वेगवेगळय़ा ताणांचा कामजीवनावर विपरीत परिणाम झाला.’’

 वेगवेगळय़ा मानसिक विकारांमुळे किंवा शारीरिक व्याधींमुळेही लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. याविषयी बोलताना कन्सिल्टग सेक्सॉलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट डॉ.राजसिंह सावंत सांगतात, ‘‘लैंगिक इच्छा खूप कमी असेल तर त्याला ‘हायपोअ‍ॅक्टिव्ह सेक्शुअल डिझायर डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं. यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. याशिवाय स्त्रियांमध्ये गर्भारपणाच्या आणि स्तन्यपानाच्या काळात लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरातल्या ‘एस्ट्रोजन’ हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं. तर पुरुषांमध्ये वयाच्या ४५ नंतर ‘टेस्टास्टेरॉन’ या हॉर्मोनचं प्रमाण कमी होत जातं. ही दोन्ही संप्रेरकं लैंगिक नातेसंबंधांत महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचं प्रमाण घटल्यास कामेच्छा कमी होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानं या हॉर्मोन्सचं शरीरातलं प्रमाण योग्य राखत लैंगिक इच्छा वाढवता येते. याशिवाय स्किझोफ्रेनियासारखे तीव्र मानसिक आजार असतील तर त्याचाही थेट परिणाम कामेच्छेवर होतो. अति रक्तदाबाच्या रूग्णांमध्येही ठरावीक औषधांमुळे लैंगिक इच्छा घटू शकते.’’

डॉ. विठ्ठल प्रभू लिखित ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकातल्या ‘कामसमस्या’ प्रकरणात स्त्रियांची लैंगिक इच्छा कमी असण्यामागे कामउदासीनता (Female Sexual Arousal Disorder /  Frigidity), योनिआकर्ष (Vaginusmus), कामपूर्तीचा अभाव (Female Orgasmic Disorder) या व्याधींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ‘कामउदासीनतेत कामक्रिया पूर्ण होईस्तोवर स्त्रीमध्ये कामोद्दीपन व कामसलीलनिर्मिती होत नसल्यास अशी स्त्री संभोग टाळण्याचा प्रयत्न करते.   संभोगात उदासीन असलेली स्त्री ‘कोल्ड’ असते हा समज चुकीचा आहे. तिला यथोचित उद्दीपीत करण्यास पुरुष असमर्थ असतो हे खरं कारण असतं,’ असं यात नमूद करण्यात आलंय. याच पुस्तकात ‘काम आणि वय’ या प्रकरणात वयानुसार स्त्री-पुरुषांच्या कामजीवनात आणि कामेच्छेत होणाऱ्या बदलांचाही विस्तृत आढावा घेतला आहे.

एकोणिसाव्या शतकातले प्रसिद्ध अमेरिकी सेक्सॉलॉजिस्ट आल्फ्रेड किन्से यांनी १२ हजार पुरुष व ८ हजार स्त्रियांचा अभ्यास करत लैंगिक इच्छेसंदर्भात महत्त्वाचं संशोधन केलं होतं. यानुसार वयात येईपर्यंत स्त्री-पुरुष दोघांनाही कामेच्छा फारशी नसते. वयात आल्यावर दोघांचीही कामेच्छा वाढत असली, तरी स्त्रीच्या तुलनेत पुरुषाची कामेच्छा तीव्र असते. वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या कामेच्छेचं प्रमाण फारसं बदलत नाही, त्यामुळे तिचा कामआलेख समांतर रेषेत राहतो. याउलट वयात आल्यावर शिगेला पोहोचलेली पुरुषाची कामेच्छा वयानुरूप सावकाश कमी होत जाते. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे, की वय वाढतं तसं दोघांच्या लैंगिक इच्छेतलं अंतर कमी होत जात असलं तरीही ६० वर्षांच्या पुरुषाला १६ वर्षांच्या स्त्रीहून अधिक कामेच्छा असते. लैंगिक इच्छा आणि लैंगिक क्षमता यात मोठी तफावत असू शकते हे इथं लक्षात घ्यायला हवं. 

 ‘‘कामजीवनात तोच तोपणा आल्यामुळेही ते निरस होऊन कामेच्छा कमी झालेली असू शकते. त्यामुळेच यासाठी उपचारांना येणाऱ्या जोडप्यांना मी शरीरसंबंधांकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला सुचवतो. काही नवीन आसनं सांगितली जातात, तसंच स्पर्शाचं आणि एकमेकांना मसाज करण्याचं तंत्र सांगितलं जातं. या साध्यासोप्या उपायांचा जोडप्यांना खूप फायदा होतो,’’असं डॉ. निकेत यांनी सांगितलं. थोडक्यात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही म्हण कामेच्छेबाबतही लागू होते. त्यामुळे आपली आणि आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा ही वेगळी आहे, हे पहिल्यांदा समजून उमजून मान्य करायला हवं आणि त्यात फारच तफावत आहे असं वाटत असेल तर नि:संकोचपणे उपचार घ्यायला हवेत. सुखी कामजीवनाचा मंत्र उलगडताना डॉ. अमित म्हणतात, ‘‘समागमादरम्यान स्रवणाऱ्या डोपामाइन, ऑक्सिटोसिन यांसारख्या हॅपी हॉर्मोन्समुळे शरीरसंबंधांतून सुखसंवेदना निर्माण होत असतात. त्यामुळे प्रणयाकडे सकारात्मकतेनं बघत या निखळ आनंदाची अनुभूती घेण्याची कला ही जाणीवप्रू्वक साधायला हवी!’’