– हिनाकौसर खान
चौतीस वर्षांची रेखा (नाव बदललं आहे) लग्नाच्या सोळाव्या दिवसापासून गेली सहा वर्षे नवऱ्याची मारहाण सोसत होती. अशातच तिला दोन मुली झाल्या. नवरा नोकरी करत नव्हता. दारू प्यायचा. दोन-तीनदा तर त्यानं तिला घराबाहेरच काढलं. एकदा डोक्याला गंभीर जखम झाल्यावर ती जवळच्या रुग्णालयात गेली. डॉक्टर आणि नर्सनं विचारलं, तेव्हा मारहाणीबद्दल न सांगता आपण घसरून पडलो, असं सांगत राहिली. अर्थातच डॉक्टरांना शंका आली होती. त्यांनी रेखाला रुग्णालयातल्या समुपदेशक ताईंकडे पाठवलं. तिथे तिला आधार मिळाला आणि पुढे पाठपुराव्यानंतर तिच्या नवऱ्याला समज देण्यात आली. आता रेखाच्या नवऱ्याच्या वागणुकीत बदल होऊ लागलाय. तिला सुखी संसाराची आशा वाटायला लागलीय.
अशा प्रकारच्या कौटुंबिक हिंसेच्या, मारहाणीच्या घटना आपल्याही आसपास घडतच असतात. काही वेळा स्त्रियांना प्रत्यक्ष मारहाण होत नाही; पण सतत टोमणे मारणं, अपमान करणं, अक्कल काढणं हे प्रकार होतात. (याही ‘हिंसक’ गोष्टीच आहेत.) यातून अशा स्त्रीचा मानसिक ताण वाढतो आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. अलीकडे या प्रकारच्या दुखापती, मारहाण वा अगदी मानसिक दुखण्यावरही उपचार घेण्यासाठी स्त्रिया रुग्णालयात जाऊ लागल्या आहेत; पण आता हे लक्षात येऊ लागलं आहे की, नुसती मलमपट्टी करून भागणार नाही. कारण मारहाण न थांबल्याने ती स्त्री पुन:पुन्हा तिथे येत राहील. अशा वेळी रुग्णालयांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्त्रीला झालेली दुखापत ही अपघात नसून कौटुंबिक हिंसा आहे, हे ओळखून तिला जर रुग्णालयात वेळीच आधार मिळाला, तर कौटुंबिक हिंसेला चाप बसण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका ही मंडळी या अनुषंगानं संवेदनशील आणि जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच त्यांच्या मदतीला प्रशिक्षित समुपदेशक असतील तर हे एकत्रित प्रयत्न हिंसा कमी करण्यास निश्चित उपयुक्त ठरतात. या दृष्टिकोनातून कौटुंबिक हिंसेला रोखण्यासाठी त्यास सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न मानायला हवं, असं स्त्रीवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. केवळ त्या कुटुंबाचा प्रश्न म्हणून त्याकडे न पाहता सभोवतालच्या ज्या ज्या घटकांचा त्याच्याशी संबंध येतो, त्यांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास रेखासारख्या अनेक जणींना आधार मिळू शकतो.
हेही वाचा – नवीन वर्षांचे स्वागत करताना..:प्रकाशाच्या दिशेने..
अशा प्रकारे स्त्रियांना मदत करण्याचे प्रयत्न काही रुग्णालयांमधून केले जात आहेत. मुंबईत ‘सेहत’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या ११ रुग्णालयांमध्ये ‘दिलासा’ हा प्रकल्प चालवला जातो. यामध्ये रुग्णालयात जखम, दुखापत वा दुखणं घेऊन आलेल्या स्त्रीच्या त्या व्रणांमागची कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिला त्या दृष्टीनं आधार दिला जातो. या उपक्रमातलं एक म्हणजे गोवंडी भागातलं ‘पं. मदन मोहन मालवीय शताब्दी जनरल हॉस्पिटल’. या रुग्णालयात समाजविकास अधिकारी म्हणून काम करणाऱ्या छाया कोकरे सांगतात, ‘‘एखादी स्त्री जखमी अवस्थेत रुग्णालयात येते, त्या वेळेस तिच्या जखमांचा अंदाज घेत पोलिसांकडे नोंद केली जाते. अजूनही स्त्रिया ‘घसरून पडले आणि नळ लागला,’ अशी कारणं सांगत कुटुंबीयांनी केलेली मारहाण दडवतात; पण स्त्री रुग्णालयात आल्यानं तिला प्रथमोपचार मिळतो. काही वेळा जबर वा मुका मार असेल, काही तातडीच्या चाचण्या करायच्या असतील तर त्याही वेळेत पूर्ण होतात. डॉक्टरांना स्त्रीच्या शरीरावरील खुणांवरून तिला मारहाण झाली आहे की नाही हे सहज कळतं; पण डॉक्टरांनी विचारपूस केल्यावरही अनेकदा त्या खरं बोलत नाहीत. काहींना डॉक्टरांसमोर बोलणं अवघड जातं, तर काही जणी केवळ रडत राहतात. ‘तुम्हाला नाही सांगू शकत.’ म्हणून काही जणी उपचार घेऊन निघून जातात. या सगळ्यांतून हिंसेचे निर्देश मिळत असतात. ते डॉक्टर वा परिचारिकांनी ओळखणं आवश्यक असतं. काही वेळा आपली चौकशी केली जाईल या भीतीपोटीही स्त्रिया रुग्णालयात न येण्याचा धोका असतो, तरीही डॉक्टरांनी स्त्रीची जखम आणि त्या सांगत असलेली कहाणी, दोन्ही डोळसपणे बघणं, ऐकणं गरजेचं असतं,’’
‘‘आम्ही परिचारिकांची मदत घेण्यावर अधिक भर देतो. रक्तदाब तपासताना, मलमपट्टी लावताना परिचारिका समोरच्या स्त्रीला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी ‘दिलासा’सारख्या प्रकल्पांची मदत होते. संशय आल्यास डॉक्टर वा परिचारिका स्त्रीला समुपदेशकाकडे पाठवतात. पारंपरिक विचारसरणीमुळे अनेकदा स्त्रियांना आपल्यावर अन्याय होतोय हे लक्षात येत नाही. अशा वेळी त्याबाबत त्यांना माहिती दिली जाते. पुन्हा असं काही घडल्यास मदतीसाठी आणि आधारासाठी कुणी तरी आहे, हा दिलासा दिला जातो. लहानमोठ्या तक्रारी असतील तर नवराबायकोचं कौटुंबिक समुपदेशन केलं जातं. त्यातून बरेचसे प्रश्न कमी होतात. स्त्रियांना मानसिक आधार मिळतो. बऱ्याचदा पहिल्यांदा मारहाण झाल्यास किंवा पहिल्यांदाच समुपदेशनासाठी आल्यानंतर त्या कुठलीही मदत घेण्यास तयार होत नाहीत; पण पुन्हा असं घडल्यास कुठे जायचं, ती जागा त्यांना माहिती होते. काही जणींना मन मोकळं केल्यानं हलकं वाटतं. हळूहळू स्त्रिया तक्रारीसाठी तयार होतात. त्यासाठी स्त्रियांना बळ मिळणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ‘आपण मारहाण केली, तर आपल्याविरुद्ध आपली बायको तक्रार करेल’ अशी भीती नवऱ्यांच्या मनात निर्माण होते. त्या भीतीतून हिंसा कमी होण्यास मदत होते. केवळ मारहाण नव्हे, तर जबरदस्ती, बलात्कार, मानसिक शोषण यातही स्त्रियांना आधार देण्याचं काम या प्रकारच्या उपक्रमातून होतं.’’ असंही छाया कोकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा – समकालीनतेचे प्रतिसादरूप!
अशा प्रकारचे उपक्रम फक्त पालिकेच्याच नव्हे, तर प्रत्येक रुग्णालयात प्रशिक्षित समुपदेशक असायला हवेत, कारण मारहाणीनंतर उपचार घेण्यासाठी स्त्रिया रुग्णालयातच प्रथम येणार आहेत. तिथे त्यांना प्रथमोपचारांबरोबर घरगुती हिंसेबद्दल कायदेशीर माहिती आणि आधार मिळाल्यास स्त्रिया सहजगत्या पुढची हिंसा होऊ देणार नाहीत. कुणी तरी जाब विचारतंय, म्हटल्यावर पुरुषही हिंसा करताना बिचकेल, हीदेखील शक्यता आणि आशा आहेच.
greenheena@gmail.com