..अभ्यास करावा असं वातावरणच कित्येकांच्या घरात नव्हतं. पालकांचे प्रश्न, मुलांच्या अभ्यासाची वेळ आणि पालकांचे आपापसातील वादविवाद यांची वेळ एकच होती. मुलं अस्वस्थ! पालक चिंतातुर. ‘मुलांनो, तुम्हाला अभ्यासाला, गप्पा मारायला छान जागा मिळाली तर?’ असं म्हणत शाळेनेच सुचवला एक भन्नाट पर्याय..शाळेत घर की शाळा घरासारखी? त्याचीच ही गोष्ट..
‘माझी आणि पालकांची मैत्री कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं. शेवटी काय? लळा लावला की लागतो. तेव्हा मी तुम्हाला शाळेचं घर झालं, असं म्हणाले होते. तुमच्या दृष्टीने यात काही नवीन नाही. तुम्ही इथे येता, खेळता, गटागटांत बसून गप्पा मारता, कधी अभ्यास करता, कधी वाचता. हे काही एकदम नाही घडलं. घडवून आणलं. त्यासाठी मी अगदी धीराने खंबीरपणे उभी राहिले. कल्पना पुष्कळ असतात. काही अगदी तंतोतंत प्रत्यक्षात येतात. काही कल्पनाच राहतात,’ शाळा बोलत होती. मुलांनी विचारलं, ‘असं का गं?’
 ‘कारण ही एक जागा अशी आहे जिथे माणसांची साखळी आहे, एक वीण विणली गेलीय. या जागेशी ‘स्वप्नं’ बांधली जातात. वेगवेगळ्या वयाची मुलं, त्यांचे पालक, त्यांचा परिसर, त्यांचं मोठं होत जाणं.. हे असं कुठंच नाही घडत..’
‘आज आहे काय? शाळा तू फार भावुक झालीस गं एकदम! हो ना.’
‘एखादी सरळ सहज घडणारी गोष्ट. तिचा भूतकाळ आठवला की नवल वाटतं. किती मतं! किती विचार! किती विरोध! या सगळ्यातून मी गेलेय रे मुलांनो!’ शाळेचं बोलणं ऐकताना मुलंही हेलावून गेली.
 ‘काल कुणी, आज तुम्ही, उद्या कुणी. कुणीही यावं नि मनापासून माझं होऊन जावं. मी त्यांची होऊन जावं. अनेक गोष्टींमुळे, अनेक नावीन्यपूर्ण अन् गरजेनुसार बदलणाऱ्या उपक्रमांमुळे मी मात्र वेगळी आहे. सगळेच जीव रमवून काम करतात. हो ना?’ मुलांनी मानेनं होकार दिला. आज शाळा मुलांना शाळेचं घर कसं झालं याविषयी सांगणार होती. ही शाळा! जिथून मुलं बाहेरच पडत नाहीत. सक्तीने घरी घेऊन जावं लागतं. असं चित्र फार दुर्मीळ असतं. हे चित्र जिथं दिसतं. तिथं शाळा नि घर एकरूप होतात.
शाळा म्हणाली, ‘‘माझ्यासारख्या अनेक जणी जगभरात आहेत. बऱ्याच जणी चारचौघींसारख्या आहेत. काही जणीच स्पेशल आहेत. परदेशात अशीच एक माझी मैत्रीण आहे. ती राहते इंग्लंडमधील लायस्टन गावात. हे गाव लंडनपासून १०० मैलांवर आहे. तिचे नाव आहे समरहिल. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग करणारी म्हणून या शाळेला प्रयोगशील शाळा म्हणतात. आजही ती तशीच आहे. अनेक जणी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतात. मुलांना समजून घेऊन तिनं बदलायचे ठरवलं. तिच्याप्रमाणे तिच्यात फिट होण्यासाठी मुलांनी बदलायचं नाही असं तिचं धोरण. या शाळेनं असं ठरवलं, मुलांत मिसळायचं, मुलांनी शाळेत नाही. घरच्या आठवणीनं व्याकुळ होणारी मुलं इथे नाहीत..’’ शाळेचे हे शब्द, हे सारंच ऐकून मुलं अवाक् झाली.
शाळा पुढे म्हणाली, ‘शाळेचं घर कसं झालं हे सांगणार आहे तुम्हाला..’
‘तुम्हाला नटायला आवडतं, छान छान दिसावंसं वाटतं. वाटतं ना! मला नाही का वाटणार? मला पण वाटतं. आपण छान दिसावं. माझं हे असं नुसत्या भिंतींचं शरीर. कधी कधी खूप कोरडं वाटतं, रूक्ष वाटतं. वाटतं, जरा हिरवळ असती तर! गारवा पण आला असता नि हिरवंगार झालं असतं सगळं! तशी माझी मी एकटीच. कुणाचीच नाही. ना गावची ना रावची. कुणीच काळजी घेत नाही माझी! वर्षांनुर्वष..’ शाळा गहिवरून बोलत होती. तिचं म्हणणं खरं होतं. एकदा का तिचा जन्म झाला की, मग कोण बघतंय! पंचविशीत, पन्नाशीत आली की, कुणाला वाटतं रंग द्यावा. नाही तर तशाच त्या शुष्क भिंती, जळमटं, धुरळा. ना कडेने बंदिस्तपणा. कुठे तरी आपली चार शोभेची झाडं. एरवी कोणीही यावं नि जावं. खेडय़ापाडय़ात तर गुरढोरंही जाऊन बसतात. चार झाडं लावली तर कुंपण नसल्याने गुरंढोरं रोपं खाऊन टाकतात. तशी माणसांची वर्दळ. १० ते ६. म्हणजे २४ तासातले फक्त ७ तास कुणाकुणाचा वावर. एवढी मोठी इमारत तशी पडूनच.
शाळेला वाटायचं, ‘आजूबाजूला अशी खूप मुलं आहेत, ज्यांच्या घरी अभ्यासासाठी जागा नाही, ज्यांच्याकडे टी. व्ही. सतत मोठमोठय़ाने ओरडत असतो, घरात सगळे जण आपापल्या विषयावर बोलतात. मुलांना त्यांचा असा अवकाशच नाही. मुलांचे आईबाबा मुलांना म्हणतात, ‘अभ्यासाला बसा.’ मुलं बसणार कुठे? कसं त्यांचे मन एकाग्र होणार! काय करणार मुलं बिचारी! तरीही लढतात. तशातच अभ्यास करतात, वाचतात, लिहितात, चित्रं काढतात. अजून जर जरा शांतता मिळाली तर खूप काही करू शकतील ती! त्यांच्यात असणारी शक्ती अधिक कारणी लागेल.’
शाळेचे हे फक्त विचारच होते. तिच्या मनात आलं, ‘एवढी आपली इमारत! संध्याकाळ झाली की, कुलूप लावून बंद होते. तिचा उपयोग काहीच नाही. आपण बोलू या मुलांशी याबद्दल.’ केवळ या विचारानेही शाळा खूश झाली. चांगली संधी चालून आली. कारण मुलांनी अभ्यास केला नाही म्हणून काही मुलं वर्गाबाहेर होती. कारण खरं हे होतं की, अभ्यास करावा असं वातावरणच कित्येकांच्या घरात नव्हतं. पालकांचे प्रश्न, मुलांच्या अभ्यासाची वेळ आणि पालकांचे आपापसातील वादविवाद यांची वेळ एकच होती. मुलं अस्वस्थ, पालक चिंतातुर.
 ‘तुम्हाला अभ्यासाला गप्पा मारायला छान जागा मिळाली तर?’ शाळेने मुलांना विचारलं.
 ‘खूपच मज्जा येईल गं, पण ते कसं शक्य आहे?’
 ‘का शक्य नाही? हे पाहा मुलांनो, मी ठरविले तर काहीही घडू शकतं.’
‘तुला आणखी मैत्रीण मिळाली की काय? म्हणजे अजून एक इमारत.’
 ‘इमारत कशाला हवी?’
‘मग इथेच? अगं, आताच आम्ही कसेबसे दाटीवाटीने बसतो. आताची वर्गाची जागा आम्हाला पुरत नाही. त्यात अभ्यास करायला कुठली जागा मिळणार?’
शाळा हसली. मुलं गोंधळली. शाळा कोणती आयडिया सांगणार याबाबत उत्सुकता होती.
‘रात्री तुम्ही इथे यायचं. तुमच्या गल्लीचे किंवा कॉलनीचे गट करायचे किंवा वाडय़ांचे गट करायचे.’
‘आणि?’
‘आणि रात्री इथे यायचं. इथे अभ्यास करायचा.’
‘दिवसभर कंटाळा येतो. पुन्हा रात्री म्हणजे?’
‘तुम्ही आणि मी. आपण दोघेच असणार रात्री. तुमचे सर-बाई असणार नाहीत.’
‘मग रद्दच.’
 ‘पण का?’
‘कारण तुझी ही कल्पना! कारण आमच्यावर लक्ष ठेवायला कुणी नसेल तर आमचे आई-बाबा पाठवणार नाहीत. आम्ही मुलं दंगा करू, मस्ती करू, मारामारी करू, कोण असेल तेव्हा?’
‘शाळेत असताना सर-बाई असले तरी दंगा, मस्ती, मारामारी करताच ना!’
‘हो, पण तेव्हा काही झालं तरी सर-बाई असतात. त्यामुळे आमचे आई-बाबा..’
‘त्यांचंही बरोबर आहे, पण आपण प्रयोग तर करून पाहू.. आणि माझी काय आयडिया आहे तेही मी तुम्हाला सांगते..’
‘ठीक आहे. एक नक्की की तू जे काही सांगशील ते एकदम भन्नाट असेल..’
‘लबाड आहात पोरांनो.’
‘सांग ना आता!’
‘आपण असं करू या. तुम्ही दिवसभर अभ्यास करून दमता. खेळावंसं वाटतं, पण खेळणार कुठं? मैदानंच नाही तुम्हाला. चित्र काढायला घेतली तर मोठय़ांना वाटतं चित्रं काय काढताय? गणितं सोडवा.  तर आपण असं करू या का?’
‘काय गं?’
‘तुमच्याबरोबर तुमचा एक दादा किंवा ताई असेल. एकेकाने वार वाटून घ्यायचे. म्हणजे कुणी तरी लक्ष ठेवणारं असेल. तुम्ही पहिल्यांदा खेळायचं. मग इतर पुस्तकं वाचायची. वर्तमानपत्र वाचायचं. गटागटांत गप्पा मारायच्या. गाणं शिकायचं. या सगळ्यात तुमच्या आई-बाबांनी मदत करायची.. अवघड आहे, पण जमलं तर! मजा येईल. तुमचा कंटाळा जाईल. माझंही एकटेपण जाईल. तुम्हाला जागा मिळेल. मला तुम्ही मिळाल. थोडक्यात शाळेचे घरकुल होईल. .. करू या असं! शिवाय तुम्ही पण यात छान छान काही सुचवा,’
मुलांचे चेहरे खुलले. चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ही सगळी कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होताच. मुलांच्या मनाने या कल्पनेला होकार दिला. कल्पनेला नाव दिलं- ‘शाळेतलं घर.’

Story img Loader