आज काहीजणींचे संसार पाहताना असं वाटतं, की वरवर बघायला त्यांचे संसार दुकटय़ा-तिकटय़ांचे असले तरी खरंतर त्या अगदी एकटय़ा-एकटय़ा पडल्या आहेत. ते एकटेपण धड सांगता येत नाही की मिरवता येत नाही असं भयानक आहे. या एकटेपणाची कल्पनासुद्धा केली नसल्यानं त्यांच्या पूर्ण जगण्यालाच ते व्यापून उरलं आहे. या मैत्रिणींनी काय करायचं? एकटेपण निभवायला शिकायचं का नातेसंबंधांचं भरलेपण पुन्हा यावं म्हणून सगळय़ा आघाडय़ांवर नमतं घ्यायचं? हा मला पडलेला प्रश्न आहे.
‘हे काय, तुम्ही एकटय़ाच!’ कधी बरं ऐकलं होतं हे वाक्य? कितीतरी वेळा! कधी खरंच एकटं असताना आणि कधी अनेक जणी बरोबर असूनही. १९८५मध्ये संधी मिळाली म्हणून ज्ञान प्रबोधिनीतील आम्ही पाच युवती कार्यकर्त्यां एका विक्री उपक्रमाच्या निमित्तानं कन्याकुमारी-त्रिवेंद्रम प्रवासाला गेलो होतो. १८/१९ वर्षांच्या आम्ही पाचजणी काही हजारांच्या मालाचा व्यवहार कन्याकुमारीच्या किरकोळ विक्रेत्यांशी करत होतो. सगळय़ांना आश्चर्य की आम्ही पाच जणी ‘एकटय़ा’ कशा आलो?
त्यानंतर दोनच वर्षांनी पश्चिम बंगालमधील धुमसत्या गुरखा प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी शाळेतल्या नववीच्या ४५ जणींना घेऊन आम्ही सात-आठ कार्यकर्त्यां पश्चिम बंगालमध्ये गेलो होतो. कलकत्त्यात एका राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हाच प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही ५०-५२ जणी ‘एकटय़ाच’ पुण्याहून एवढय़ा लांब आलात? तुमच्याबरोबर शाळेनं एखादा ‘प्यून’ही नाही पाठवला?’’ जणूकाही तो प्यून असता तर आम्ही ५२ जणी एकटय़ाच्या दुकटय़ा होणार होतो! तिसरा अनुभव अगदी अलीकडचा. २००४ मध्ये संवादिनीचा अभ्यास दौरा विदर्भात योजला असताना ‘हेमलकसा’ला जायचं ठरल्यावर ‘तुम्ही बायका-बायका एकटय़ाच चालला आहात! वेड लागलंय की काय? काही गडबड झाली तर!’ अशा ‘सुशंका’ विचारणारे काही जण होतेच. भारतात सुदैवानं कायद्यानं तरी स्त्रीच्या ‘एकटेपणाला’ कुठे आडकाठी आणलेली नाही. बाई एकटीच्या जिवावर आर्थिक व्यवहार करू शकते, साक्षीपुरावे करू शकते, दत्तकसुद्धा घेऊ शकते. अफगाणिस्तान, इराणसारख्या काही कर्मठ देशांत एका बाईच्या न्यायालयीन साक्षीलाही शून्य किंमत आहे. दोन बायका = एक पुरुष असं गणित तिथं आहे. घराबाहेर पडताना एकतरी पुरुष (वय र्वष सातपासूनही चालेल!) सोबत असल्याशिवाय तिला बाहेर पडताच येत नाही. पण तरीही भारतात ‘कायद्यानं’ अनेक अधिकार असलेली बाई कायम ‘कुणासोबत तरी’ अर्थात पुरुषासोबतच असावी तरच ती सुरक्षित, नॉर्मल आणि ‘सभ्य’ही मानली जाते की काय असं वाटण्याजोगे हे सर्व प्रसंग आहेत.
दुसरीकडे बायकांनाही या काल्पनिक किंवा ूल्लूीस्र्३४ं’ एकटेपणाबद्दल काय वाटतं हे समजून घेण्यासारखं आहे.
खूपशा बायकांना ‘एकटं’ राहण्याची ‘एकटं’ पडण्याची मनोमन प्रचंड भीती वाटत असते. त्यांचं जगणं सामाजिक संबंधांनी, विशेषत: निकटच्या नात्यांनी इतकं आच्छादून टाकलेलं असतं, की त्याच्याशिवाय काही काळसुद्धा राहणं त्यांना खूप असुरक्षित वाटू शकतं. कुठलीही गुंतागुंतीची, बिनसवयीची किंवा चाकोरीबाहेरची गोष्ट एकटय़ानं करणं त्यांना फार अवघड वाटतं. नुकताच आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातील नायिकेला जसं सुरुवातीला एकटय़ानं प्रवास करणं, विमानात सुविधा हक्कानं मागणं, अपरिचित भाषेत औपचारिक व्यवहार करणं याचं भयंकर टेन्शन येतं-तसं! त्यातून खूप जणी ‘एकटं’ काहीच न करण्याचा सोयीस्कर पर्याय निवडतात आणि कायम ‘पार्टनर’वर अवलंबून राहायला बघतात. काही जणी मात्र ते टेन्शन पार करून/ स्वीकारून ‘एकटेपणानं’ कृती करण्याचा/ जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतात. तो जमला की मग ‘एकटेपणाचा’ बाऊ जरा कमी होतो. उदा. एखाद्या सेमिनारमध्ये अनेक पुरुषांसमवेत एकटय़ाच स्त्रीनं सहभाग घेतला असेल.
– कुटुंबीयांना/ इतर कुणालाही बरोबर न घेता एकटय़ानंच चित्रपट/ नाटकाचा आस्वाद लुटला असेल.
– कुणाची वाट न पाहता –  रोज स्वमर्जीने फिरायला जाण्याचं व्रत धरलं असेल.
– लांबवरच्या प्रवासासाठी एकटय़ाने जायचे असताना कुणीही स्टेशनवर सोडायला येण्याची गरज मागे टाकून आपलं आपण घरातून बाहेर पडणं असेल..
अशा छोटय़ा छोटय़ा रोजच्या गोष्टींपासून ते व्यक्तिगत आयुष्यातील एकटय़ानं घेतलेल्या (घ्याव्या लागलेल्या) मोठमोठय़ा निर्णयांपर्यंत स्त्रियांना ‘एकटेपणाचा’ सारखा ‘बाऊ’ लागलेला असतो.
माझ्या एका मैत्रिणीचं लग्न ठरलं. (२२ वर्षांपूर्वी) तेव्हा तिला सहज विचारलं होतं. ‘लग्न करण्यामागे तुझा विचार काय?’ तेव्हा उत्स्फूर्तपणे ती म्हणाली होती, ‘कारण मला एकटीनं सगळं आयुष्य नाही काढता येणार!’
आज काही जणींचे संसार पाहताना असं वाटतं, की वरवर बघायला त्यांचे संसार दुकटय़ा-तिकटय़ांचे असले तरी खरंतर त्या अगदी एकटय़ा-एकटय़ा पडल्या आहेत. ते एकटेपण धड सांगता येत नाही की मिरवता येत नाही असं भयानक आहे. अशा एकटेपणाची कधी मनातून कल्पनासुद्धा न केल्यानं त्यांच्या पूर्ण जगण्यालाच ते व्यापून उरलं आहे. या मैत्रिणींनी काय करायचं? एकटेपण निभवायला शिकायचं का नातेसंबंधांचं भरलेपण पुन्हा यावं म्हणून सगळय़ा आघाडय़ांवर नमतं घ्यायचं? हा मला पडलेला प्रश्न आहे.
कधीकधी ध्येयवेडानं भारलेल्या व्यक्ती अपरिहार्यपणे एकटय़ा पडत जातात. अशांमध्ये एखादी स्त्री असेल तर तिचं हे वेगळं एकटेपण स्वीकारतानाही इतरांना खूप जड जातं. (तिनं ते सहजपणे स्वीकारलेलं असलं तरीही!) ‘आवर्तन’ या सानियांच्या कादंबरीत अशी ‘इला’ आपल्याला भेटते. कर्तृत्वाच्या, अनुभवांच्या एका विविक्षित उंचीवर गेल्यावर तटस्थ एकटेपणाचा स्वीकार अशा व्यक्तींना करावाच लागतो असं मला वाटतं.
आज स्वत:हून लौकिकार्थानंही ‘एकटय़ा’ राहणाऱ्या पर्याय निवडणाऱ्या अनेक जणी आजूबाजूला दिसतात. त्यांची आपापली सामाजिक वर्तुळंही असतात. प्रामुख्यानं शहरी भागात त्याचं प्रमाण जास्त आहे आणि ते स्वीकारलंही जात आहे. ‘स्त्री आणि लग्नाचं कुटुंब’ या साच्यातून समाजही हळूहळू बाहेर पडत असल्याचं हे एक लक्षण आहे. समाजधारणेच्या दृष्टीनं या बदलत्या चित्राचा परिणाम काय असेल हे आज १०० टक्के सांगणं अवघड आहे. पण स्त्रीची स्व-प्रतिमा बळकट व्हायला त्याचा उपयोग होत आहे, हे नक्की!
‘एकटेपण’ प्रासंगिक का होईना, पण अनुभवून पाहायला हरकत नाही, असं स्त्रियांना मोठय़ा संख्येनं वाटू लागलं आहे. ते अस्वाभाविक  नाही, ती एक अवस्था  असू शकते/ पर्याय असू शकतो किंवा मनाची गरजही असू शकते, हे हळूहळू इतरांनीही मान्य करायला हरकत नाही असं वाटतं. मग ‘हे काय- एकटय़ाच?’ हा प्रश्न विचारण्याची गरजच राहणार नाही.
आता थोडंसं या सदरामार्फत झालेल्या आपल्या वर्षभराच्या संवादाविषयी..
हे सदर वर्षभर लिहिणं माझ्या दृष्टीनं खूप आनंदाचा, शिकण्याचा आणि व्यक्त होण्याचा भरगच्च अनुभव होता. मानसशास्त्रज्ञ म्हणून, स्त्रीअभ्यासक म्हणून आणि माणूस म्हणूनही मी जे अनुभवत, वाचत, विचार करत होते त्या सगळय़ाचं एकत्रीकरण करण्याची ही एक संधी मला ‘लोकसत्ता-चतुरंग’नं दिली. ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..’ वगैरे आपण ऐकतच असतो. त्याच धर्तीवर ‘जातक’ म्हणजे स्त्रियांच्या जगण्याचे विविध पैलू या निमित्तानं मानसशास्त्राच्या संकल्पनांचा आधार घेत मला मांडता आले. परिचित वाचकांनी तर वेळोवेळी भरभरून प्रतिसाद दिलाच, पण अपरिचित वाचकांनीही वेळोवेळी खटपटीनं संपर्क मिळवून तो नोंदवला, याचं मला खूप अप्रूप वाटलं.
काही लेख गरजेपेक्षा विस्तृत झाले, काही जरा ‘अवजड’ झाले, अशा साक्षेपी टीकासुद्धा अत्यंत आत्मीयतेनं अनेक सुहृदांनी व्यक्त केल्या. त्याचाही माझ्या एकूण मांडणीला वेळोवेळी उपयोग झाला.
शेवटी या सगळय़ा खटाटोपामागचा उद्देश-
 प्रबोधनाचे गीत आज हे मुक्त स्वरांनी गाऊ
पिढय़ा पिढय़ांनी दृढ चाकोरी ओलांडुनिया जाऊ।
या ओळींतून व्यक्त होतो. अशी चाकोरी विस्तारण्याचं, ओलांडण्याचं बळ असंख्य मित्र-मैत्रिणींना मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करून या सदराचा समारोप करते!
(समाप्त)

loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
women responsibility, free Time women , women ,
रिकामटेकडी
dilemma Ramdas Athawale Parbhani case
परभणी अत्याचार प्रकरणी रामदास आठवलेंची कोंडी
Chhagan Bhujbal alone upset minister post NCP ajit pawar
नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ पक्षात एकाकी
Story img Loader