कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्त्वाचं असतं. कसं नसावं हे कोरूनच सुंदर घडवायचं असतं स्वत:ला आयुष्यभर. ‘मी कशी आहे वा मी कसा आहे?’ याचं मोजमाप रंगरूपापेक्षा स्वभाव आणि वागणूक यानेच मोजलं जाणार याची तीव्र जाणीव माणूस बनायची पहिली पायरी मानावी.
             ‘धावत येऊन विचारला आरशाला प्रश्न
             बावळट, मूर्ख, तर कधी वेडी शहाणी  
            घरातल्या साऱ्यांचीच मते किती भिन्न
       मला नाही समजत, मी होते सुन्न
       अशी का तशी? कशी आहे मी?
           तू सांगशील तेच खरं, तेच मला मान्य’
 त्या चिमुरडीला असे प्रश्न पडायचे. कधी सोपे, कधी अवघड. उभी राहायची आरशापुढे. आरशातली ‘ती’ गोष्टी सांगायची. काहीतरी मिळताच स्वारी खुशीत खेळायला धावायची. आरशात असतं प्रतििबब, त्याच्याशी संवाद? त्यानं काय होतं? प्रश्नाचं उत्तर सापडतं?
‘आई गं..’ जोराची हाक ऐकताच शांताबाई दचकल्याच. ‘काय झालं’ म्हणत आवाजाच्या दिशेने पळाल्या. खोलीचं दार नुसतं ढकललेलं. साडेतीन वर्षांची अलका आईला पाहताच बिलगली. भोकाडच पसरलं तिनं. बाबांनी आणलेला मोठ्ठा पावडरचा डबा तिनं आपल्या अंगावर ओतून घेतला होता आणि ‘मी कशी दिसते’ बघायला आरशासमोर जाताच मात्र तिची घाबरगुंडी उडाली.
‘इतकी पावडर? हे काय?’ आईने पदरानंच तिचं तोंड पुसलं.     
‘ताई पावडर लावून गोरी झाली ना. म्हणून मी..’
‘असं नसतं राणी.’
‘होच मुळी. सगळे म्हणतात काळी काळी अलका. मी पावडर लावणार.’
शांताबाईंना गलबलून आलं. ‘तू काळी आहेस म्हणून जास्त छान आहेस. लाडोबा आहेस माझी.’
त्यांनी झरकन् अलकाला कुशीत ओढलं, पापे घेतले, तेव्हाचं ते आईने कुशीत घेणं, पापे घेणं, लाडोबा जाहीर करणं तिला आयुष्यभर पुरलं. अलकाने आपला काळा रंग इतक्या लहान वयात स्वीकारला. जे आपण बदलू शकत नाही त्याचा बिनशर्त स्वीकार हवाच. वाडय़ात कुठूनही ‘ए काळे’ अशी हाक येताच ‘आलेच रे’ म्हणून धावयाची जोमानं.
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्त्वाचं असतं. कसं नसावं हे कोरूनच सुंदर घडवायचं असतं स्वत:ला आयुष्यभर. ‘मी कशी आहे? कसा आहे?’ याचं मोजमाप रंगरूपापेक्षा स्वभाव आणि वागणूक यानेच मोजलं जाणार याची तीव्र जाणीव माणूस बनायची पहिली पायरी मानावी.
  मनातलं आपलं दर्शन धूसर असतं. तेथे प्रतिमा नसते, चेहराही नसतो. असतात फक्त शब्द. ‘मी शहाणी आहे’, ‘मी धीट आहे’, अशी विशेषणं चिकटवली जातात. विचार घोळवले जातात आणि प्रश्न पडतो ‘खरंच मी तशी आहे का?’ याला ‘हो’ म्हणताना पटकन ‘नाही’च पुढे येतं. ‘हो’ म्हणून घ्यायचंच असेल तर नक्कीच चुकीच्या वागण्यात सुधारणा केली जातेच. तरच ‘मी एक चांगला मुलगा- मुलगी आहे’ हे वाक्य उच्चारलं जातं. चांगल्या विचारांच्या अनुषंगाने आपल्या आंतरिक शक्तीला नक्की काय हवं याची जाणीव होते. आपोआप वागणं, बोलणं चांगुलपणाकडे झुकू लागतं. निर्भीडपणे स्वत:च्या प्रतिमेच्या नजरेला नजर भिडते आणि सुधारायची प्रक्रिया सुरू होते. त्याच क्षणी शब्द उमटतात, ‘मी अशी आहे, यापेक्षा मला असं व्हायचंय, काय काय करू’ प्रश्नांकित चेहरा आरसा वाचतो. बघताबघता मार्ग सुचतो. यामध्ये सातत्य लागतं, मार्गदर्शनाने ईप्सित लवकर साध्य होतं.
  बदलापूर्वीचा स्वस्वीकार खूप मोलाचा असतो. आपणच आपल्याला नाकारलं तर प्रगती होणारच नाही. जो स्वत:वर प्रेम करू शकतो, तोच इतरांवर प्रेम करेल. दुर्गुणांसह स्वस्वीकार असलेला सहज इतरांना त्यांच्या दोषांसकट आपलंसं करू पाहतो. मन फार रगेल असतं, वरवर म्हणतं, ‘बरं, मी बदलेन.’ पण प्रत्यक्षात अवघड जातं. स्वस्वीकारात श्रीगणेशा असतो. आपली श्रद्धास्थाने मनोभावे पुजली जातात. माझ्यातील दोष, कमीपणा, नकारात्मकता, सर्व मर्मस्थानं मीच उत्तम जाणू शकतो. स्वत:चं वाईट वागणं आरशातील प्रतिमेला नजर भिडवू देत नाही. वाईटचा त्याग हवाच, म्हणता स्वच्छता मोहीम घेतली जाते. जिद्द घट्ट होताना, आत्मपरीक्षण होतंच. मी इतर कुणाला आवडो, अथवा न आवडो, पण मी मला आवडलंच पाहिजे. मला माझ्या नजरेला नजर भिडवता आलीच पाहिजे. इथंच ध्येयाची वाट सापडून मार्गक्रमणा सुरू होते. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारे, मुळापासून हलविणारे क्षण येतातच अधूनमधून. तेच गुरू बनतात. असं कोणीतरी येईल आणि मी बदलेन, असं म्हणून चालत नाही. गुरूच्या भूमिकेत कधी घरातली, जवळची माणसं तसेच एखादा प्रसंग, पुस्तक, घटना, सिनेमा वा अन्य काही येऊ शकतं. बदलाच्या वाऱ्याला दिशा दिली जाते सगळ्यांकडून. सदसद्विवेकबुद्धी जागृत केली जाते. बरेचदा परिस्थिती आड येते. आत्मबळाची कसोटी साशंक होते.  
तरुण संदीपचंच बघा काय झालं? तो आळशी, झोपाळू, अभ्यासातही बेताचाच. कायम घरच्यांची बोलणी खाणारा. एक दिवस जोराचं वाजलं घरात. वडिलांनी पूर्ण तोंडसुख घेतलं. आईने फोडणीही घातली. हाणून-पाडून वाट्टेल तसं बोलले. संदीपला अपमान असह्य़ झाला, त्याचाही पारा चढला, ‘‘मी आहे हा असा आहे. त्यात माझा काय दोष? तुम्हीच वाढवलेत काय काय खाऊपिऊ घालून. त्यावर तर पोसलो मी. आणि तुम्हीच ओरडता माझ्या नावाने. काही सांगू नका मला. तुम्हीच जरा आरशात जाऊन बघा स्वत:ला.’’ मुलाचं वक्तव्य ऐकून आईबाबा वरमले, काहीतरी कुजतंय आपल्यातच. दोघांनी जाणलं. पण तोच क्षण संदीपने ‘माझा मीच शिल्पकार होणार’ असं म्हणत बदलाचा ठरवला. बाथरूमचं दार बंद करून घेतलं. बसला आरशात स्वत:ला बघत. संताप निवळला. काहीतरी फेकून द्यायचं निश्चयाने ठरवलं, तेव्हाच काहीतरी करायचं पक्कं झालं. मनावर घेतलं तर नक्कीच मी मला हवा तसा होऊ शकेन, हे जाणवलं. यासाठी सातत्याने प्रयत्न करायचं ठरलं. घाण साफ करायची म्हणताच मस्त शॉवर घेतला, झुलपं  उडवली, तुषारांनी सर्वागावर उत्साहाचे रोमांच उभे राहिले, मंद शीळ घुमली आत बाहेर. ‘‘मी इतरांना आवडतो की नाही हे मला माहीत नाही. पण मला मी नक्कीच आवडेन असेच मी वागणार, करणार. मी चुकलो असेन, पण मी मनाने वाईट नाही. एक चांगला माणूस बनून दाखवीन सगळ्यांना. विश्वास ठेवा माझ्यावर. ठेवला विश्वास तर मी लवकर फुलेन. इतकंच.’’ त्याचं त्यानेच ठरवलं.
 आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना स्वत:ला घडूच दिलेलं नाही. कुजतात बिचाऱ्या. बायकांना कोंडलं जातं घरात. घरकाम, चूल-मूल यातच आयुष्याची इतिश्री होते. काही जणींच्या आयुष्यात अचानक सर्व जबाबदारी घ्यायची वेळ येते. उत्तम तऱ्हेने घरदार, मुलं, संसार, व्यवसाय, नोकरी, सारे काही सांभाळतात. त्यांनाच आश्चर्य वाटतं की, मी हे करू शकते? सांभाळू शकते? मग, पूर्वी का नाही करू दिलं मला? नुसती कठपुतली म्हणून पुढे-मागे नाचले. स्वत:चाच राग येतो अशा वेळी. इथं, ‘मी कशी आहे’ हे एखाद्या स्त्रीने ओळखलं असलं तरी ती ते करू शकत नाही ही एक शोकांतिका आहे. आज आपल्याच देशात राजकारणासह अनेक क्षेत्रांत महिलांचं  योगदान मोलाचं दिसतं. स्त्रीशक्तीचा स्वीकार होत नाही, तिला डावललं जातं. स्त्रीला चांगल्या पद्धतीने जगूच देत नाहीत. स्त्री फक्त स्वत:ला प्रश्न विचारीत असते, तेही आतल्या आत. ‘मी कशी आहे, मला असं व्हायचंय.. पण हे नाही म्हणतात’ आणि गाडी थांबते.  
आपलं काय होतं? जागेपणी दुसऱ्याचाच विचार करतो कायम. शब्दांची रेलचेल नुसती. त्याऐवजी आपलंच मन वाचलं तर? कधी कधी राहावं आपण एकटंच, गोंगाटापासून दूर. मनापासून पुसलं जातं माझं मलाच. नव्याने आपलंच एखादं रहस्य उलगडतं. सापडतात काही लपलेले खजिने, धावता धावता खाली गाडलेले. उघडली जातात भारलेली तावदाने, चकाकतात पलूदार हिरे. दिपून जातात डोळे तेजाने. आश्चर्य वाटलं तरी विश्वास बसतो त्यावर. हे माझंच धन आहे. वर्षांनुर्वष बघितलंच नाही, त्या गुणांचं अस्तित्व मला जाणवलंदेखील नाही. चुकलं माझंच, दुर्लक्षच केलं मी माझ्याकडे. आता मात्र मी फुलणार. आणि हसून सांगणार सगळ्यांना ‘मी अशीसुद्धा आहे. सुंदर सुंदर!!’   

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Story img Loader