सासू-सासरे होण्याची तयारी आपली मुले वयात आल्यापासूनच सुरू करायला हवी. अनेक आई-वडिलांना असं वाटतं की, आम्ही आमच्या मुलाला/ मुलीला चांगलं ओळखतो. काही जणांच्या बाबतीत ते खरं असेलही, पण सगळ्यांनीच असा दावा करू नये. आपल्या मुलांचा कल काय आहे हे विचारात घ्यावं. त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू देणं हे त्यातल्या त्यात सोपं आणि मनस्ताप न देणारं असू शकतं.
आपल्या घरात लग्न ठरलं की सगळ्यांचीच धांदल उडते. मग साखरपुडा, खरेदी, लग्नाची तारीख ठरवणं, पसंतीचं कार्यालय त्याच तारखेला उपलब्ध असणं, निमंत्रण पत्रिका छापण्याची घाई, दागिने खरेदी अशा अनेक गोष्टी.. घरातली सगळीच मंडळी या कामी गडबडीत असतात.
पण खरं तर सासू-सासरे होत असताना केवळ या गोष्टींची तयारी केली म्हणजे आपण सासू-सासरे होण्यासाठी सज्ज झालो, असं होत नाही. या पदाच्या जबाबदारीसाठीची मानसिक तयारी करणं, हेसुद्धा काळाच्या ओघात महत्त्वाचं ठरत आहे. आपल्या घरात सून म्हणून येणाऱ्या मुलीला, माझ्या अगदी मुलीसारखी आहे हो, असं म्हणण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ती मुली‘सारखी’ असते, मुलगी नसते, याचं भान कधी कधी सुटलेलं दिसतं. तिला खुबी-खुबीनं आपल्या घरात समाविष्ट करून घेण्याची गरज असते आणि त्यासाठी आपल्या सवयी, आपल्या पद्धती बदलाव्या लागतात…
काही वर्षांपूर्वी जी काही तडजोड करायची ती सुनेनं, असं गृहीत होतं, पण आताच्या सूना सर्व बाबतीत अशा तडजोड करणाऱ्या नाहीत, त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत, याचं भान आताच्या सासू आणि सासऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. बढती मिळते तेव्हा वाढणाऱ्या पगाराबरोबरच जबाबदाऱ्याही वाढतात. अगदी तसंच आहे इथे. सासू-सासरे हा हुद्दा जेव्हा मिळतो तेव्हा अधिक प्रगल्भतेने वागावं, अशी अपेक्षा असते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं, त्याचा अभ्यास करणं आवश्यक असतं.
या बाबतीतला एक छान अनुभव इथे मुद्दाम सांगावासा वाटतो. एक दिवस सुलेखाताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘यायचंय जरा गप्पा मारायला.’ म्हटलं, ‘काय विशेष?’ तर म्हणाल्या, ‘‘अहो राजनचं लग्न ठरलंय ना! सासू होण्याची तयारी नको का करायला? माझ्या सासूबाई माझ्याशी जशा वागल्या तसं वागून चालेल का मला? आत्ताच्या मुली वेगळ्या आहेत. स्वत:ची मते असलेल्या आहेत. त्यांची जीवनशैली पण निराळी आहे. करिअरला प्राधान्य देणाऱ्या आहेत. किती किती गोष्टींची माहिती असते त्यांना?’’ अशा पद्धतीनं आपणहून येणारे पालक तर विरळाच.
सासू-सासरे होण्याची तयारी आपली मुले वयात आल्यापासूनच सुरू करायला हवी. मुले जशी वयात येतात, तेव्हापासून त्यांची क्षितिजं विस्तारत जातात. त्यांच्या धारणा बदलतात. अनेक आई-वडिलांना असं वाटतं की, आम्ही आमच्या मुलाला/ मुलीला चांगलं ओळखतो. काही जणांच्या बाबतीत ते खरं असेलही पण सगळ्यांनीच असा दावा करू नये. अनेक वेळा असं दिसतं की हल्ली मुले/ मुली काही गोष्टी आई-वडिलांना सांगतात, विचारत नाहीत.
अशा वेळी आपल्या मुलाचा कल काय हे विचारात घ्यावं लागतं. त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू देणं हे त्यातल्या त्यात सोपं आणि मनस्ताप न देणारं असू शकतं. आनंद वय २५, त्याचं लग्न अजून व्हायचंय. चांगलं शिकलेला, चांगल्या कंपनीत नोकरी करणारा. गेल्याच महिन्यात त्यानं सांगितलं घरात, की पुढल्या आठवडय़ात उत्तराखंडला चाललोय मदतकार्याला पंधरा दिवस. त्याची आई धास्तावली. कुठेतरी मनातून त्याचा अभिमानही वाटत होता, पण मनातली काळजी काही पाठ सोडत नव्हती. जून महिन्यातले उत्तराखंडचे वर्तमानपत्रातले भीषण फोटो तिच्या नजरेसमोरून तरळून गेले. पण अशा वेळी विरोध करून चालत नाही, कारण हे मदतकार्य करण्यामागची त्याची भूमिका काय आहे ते समजून घ्यायला हवे हे त्याच्या आईला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे त्याला त्याच्या पद्धतीनं काम करून देणं यातच शहाणपणा आहे, हे त्या चांगलंच जाणून होत्या…
अशी आई जेव्हा सासू होईल तेव्हा तिला सुनेशी मत्री करणं नक्की सोपं जाईल, कारण समोरच्या व्यक्तीचा आदर करणं तिला छान जमतंय. हे ज्या आई-वडिलांना कळतं त्यांचं आपल्या मुलांशी/ मुलींशी छान नातं जुळतं आणि ज्या आई-वडिलांचं आपल्या मुला/ मुलीशी परस्पर आदराचं नातं आहे, त्या घरात एकूणच छान सूर जुळलेले दिसून येतात. परंपरेच्या चौकटीतून बाहेर पडल्याखेरीज सासू-सून, जावई-सासरे यांचे सूर जुळणं तसं अवघडच.
निधी- लग्न होऊन सहा महिने झाले होते. तिच्या माहेरी वातावरण आधुनिक. त्यामानाने सासरी थोडे विचार जुन्या पद्धतीचे. निधी आणि तिचा नवरा निशिकांत दोघेही उच्चशिक्षित. पहिल्याच महिन्यात तिच्या सासूबाईंनी सांगितले की, मासिक पाळीच्या वेळी चार दिवस बाजूला बसायला हवे. निधीला ब्रह्मांड आठवले. तरीही तिनं जमवून घ्यायचं ठरवलं. पण ती बाथरूममधून बाहेर आली की, तिच्या सासूबाई बाथरूममध्ये चार-चार बदल्या पाणी ओतत असत. त्यांच्या गावात पाण्याचं दुíभक्ष! तिनं हे सांगून पाहिलं की, असं पाणी ओतून देणं चांगलं नाही आणि मी जास्तीत जास्त स्वच्छता पाळते. पण त्यांनी ते ऐकलं नाही. या ठिकाणी मात्र निधीला जमवून घेणं अशक्य होतं. इतकं पाणी वाया घालवणं तिच्या विचारधारेत कुठेच बसत नव्हतं. साहजिकच वातावरण गढुळायला सुरुवात झाली.
अनेकदा असं दिसतं की, आपल्या घरातली मुलगी जसं वागते तशीच सून वागली तर मात्र चालत नाही. दोघींशी वागताना फरक केला जातो. आपल्या मुलीनं कसेही कपडे घातले तरी चालतात, पण सुनेनं मात्र शालीनच दिसलं पाहिजे अशा अपेक्षा असतात. दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलगी आपल्या मित्र-मत्रिणींमध्ये रमली तरी चालेल, पण सुनेने मात्र घरात राहून घरातली कामे केली पाहिजेत असा आग्रह असतो. हे दुटप्पी धोरण नाते बिघडविण्यास कारणीभूत ठरते.
आता आपल्या मुलाचे लग्न होणार, घरात कुणी नवीन माणूस आता कायमचा राहायला येणार, याचीही मानसिक तयारी करावी लागते. आपल्या सवयी बदलाव्या लागतात. निर्णय घेताना नवीन आलेल्या व्यक्तीला सामावून घ्यायला हवे. कधी कधी सुरुवातीला हे लक्षात येत नाही. सुजाताच्या घरी श्रावणातली सत्यनारायणाची पूजा करायची होती. तिने दिवस ठरवला आणि तिच्या सुनेला- प्राचीला तिने सांगितले. त्या दिवशी रजा घ्यायला हवी हेही सांगितले. प्राची वैतागलीच. म्हणाली, ‘‘आधी का नाही सांगितलं? मला ऑफिसमध्ये विचारायला पाहिजे.’’ सुजाता म्हणाली की, ‘‘अगं त्यात काय विचारायचं आहे. नेहमी मीच ठरवते. पूजा तर व्हायलाच हवी. एक दिवस काढता यायला हवा. परवा नाही अचानक रजा घेऊन तुम्ही दोघं लोणावळ्याला गेला होतात? तेव्हा कशी रजा मिळाली?’’
अशी तुलना तर कधीच करू नये, कारण सत्यनारायणाची पूजा आणि दोघांनी मिळून एखादी सुट्टी एकत्र घालवणं यातला प्राधान्यक्रम प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, नव्हे असतोच. तो जाणून घेण्याच्या क्षमता वाढवायला हव्यात.
नवीन सून घरी आली की, सासऱ्यांना देखील स्वत:च्या सवयी बदलायला लागतात. ओंकारचे लग्न झाल्यावर काही महिन्यांनी प्रथमच त्याचे आई-बाबा त्याच्याकडे राहायला आले होते. ओंकार नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात राहायचा. पहिल्याच दिवशी ओंकारने बाबांच्या हातात एक टी-शर्ट आणि ट्रॅक पँट ठेवली आणि म्हणाला, ‘‘बाबा आता घरात बनियानवर नाही राहायचं आणि बर्मुडा पण नाही घालायची.’’ त्याचे बाबा खुल्या मनाने हसले. त्यांना जाणवले, अरे आता नवीन माणूस आलंय ना घरात? बदलायला हवं..        
(उत्तरार्ध पुढील (७ सप्टेंबर) लेखात..)
 chaitragaur@gmail.com