आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण एकटेपणाचे किती तरी कंगोरे पाहिले. त्यावर मात करता येईल, असे उपायही पाहिले. पण तरीही आपल्याला हे स्वीकारावं लागेल, की आयुष्यात कधी ना कधी तरी हा एकटेपणाचा प्रश्न आपल्याला भेडसावणार आहेच. पूर्वीच्या काळात स्थलांतरं आजच्याइतकी होत नव्हती, शिवाय कुटुंबात आणि आजूबाजूला नातेवाईक पुष्कळ असायचे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर आपण लहानपणापासून बघत आलो असू, तर त्या व्यक्तीत झालेले बदल कोणा ना कोणाच्यातरी नजरेत लगेच यायचे. त्यामुळे इतक्या माणसांमध्ये राहूनही जर एकटेपण आलं, तर ते लपून राहायचं नाही. आता मात्र कुटुंबातली माणसंसुद्धा एकमेकांच्या फारशी संपर्कात नसतात, तिथे व्यक्तीला येणारं एकाकीपण लक्षातच येत नाही. एकाकी पडणाऱ्या व्यक्तीला मदत मिळताना येणाऱ्या अडथळ्यांपैकी हा एक प्रमुख अडथळा आहे. एकाकीपणाचं जर निदानच झालं नाही, तर मदत मिळणंही अवघड होऊन जातं. अशा परिस्थितीत स्वमदत ( self help) खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला स्वत:च स्वत:ला मदत करून या जाळ्यातून बाहेर काढायचं आहे.

अठ्ठावीस वर्षांची वैदेही. तिचं दोन वर्षांपूर्वी कुणालशी लग्न झालं होतं. त्याच्याबरोबर तिची दोन वर्षं खूप मजेत गेली होती. अचानक कुणालला त्याच्या कंपनीनं वर्षभरासाठी दुबईला पाठवलं. वैदेही गावी सासू-सासऱ्यांकडे राहायला आली. तिला कुणालची प्रचंड आठवण यायची. सासू-सासऱ्यांबरोबर किती बोलणार? काम तरी किती करणार? दोन महिने कसे तरी गेले, पण त्यानंतर तिला प्रचंड एकाकीपणा आला. ती कुणालला फोन करून सतत तक्रार करायची. त्यात तिचं एक वाक्य ठरलेलं असायचं, ‘‘मला इथे काही झालं तर कोण जबाबदार?’’ बाकी आठवण येणं वगैरे सगळं ठीक होतं, पण कुणालला या वाक्याचा काही संदर्भ लागायचा नाही. वयाचा विचार केला, तर तिचे सासू-सासरे म्हातारे होते. काही व्हायचं असेल तर ते त्यांना व्हायची शक्यता होती. घरापासून लांब कुणाल होता, त्यामुळे त्याला काही झालं तर घरातलं कोणीच त्याच्या सोबतीला नव्हतं. वैदेहीला का काही होईल आणि जरी झालं, तर घरातले, तिच्या कुटुंबातले लोक होते की! मग वैदेही अशी काय भुणभुण करत राहते सतत?… असं कुणालला वाटायचं. ही भुणभुण वैदेहीमधला एकाकीपणा करत होता.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : पाठपुरावा स्वप्नांचा!

एकाकीपणामध्ये बऱ्याचदा व्यक्ती स्वकेंद्रित होऊन जातात. मला काय त्रास होतोय, मी कसा एकटा पडलोय, मलाच कोणी विचारत नाही, या भावना त्यांच्यात प्रकर्षानं उफाळून वर येतात आणि पर्यायानं ते स्वसंरक्षक (self- preventive) होतात. सामान्यत: जी व्यक्ती मनानं सक्षम आणि निरोगी असते, ती दुसऱ्यांना मदत देऊ करते, स्वत:च्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या प्रश्नांचा विचार करू शकते. पण एकाकीपणामध्ये मात्र तीच व्यक्ती ‘मला काही होऊ नये’ किंवा ‘झालं तर काय?’ याचा विचार करत राहते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर ‘स्वार्थी’ हा सर्वांत सोपा शिक्का मारला जाण्याची शक्यता असते. पण प्रत्यक्षात तो स्वार्थीपणा नसतो, तर एकाकीपणामुळे आलेली स्वसंरक्षक भावना असते. जसजसा एकाकीपणा दूर होईल, तसतशी स्वकेंद्रितताही कमी होते. तोपर्यंत कुटुंबानं आणि समाजानं त्यांना कायमचा ‘स्वार्थी’ हा टॅग देणं बरोबर ठरणार नाही. या उदाहरणातल्या वैदेहीला कुणाची काहीच काळजी नव्हती किंवा स्वत:चीच काळजी होती असं नव्हतं, तर एकाकीपणामध्ये कुणालशिवाय आपलं कसं होणार ही काळजी तिला वाटत होती.

व्हॅली क्रॉसिंगच्या खेळांत तुम्ही पाहिलंय का, की त्या व्यक्तीच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी बेल्टच्या आधारानं ‘सपोर्ट’ दिलेला असतो. उद्दिष्ट हेच, की एखादा बेल्ट तुटला तरी बाकीचे बेल्ट सपोर्टला असतात. असाच काहीसा प्रकार आयुष्यासाठी आहे. हे आयुष्य पार करायलासुद्धा अनेक नात्यांचा सपोर्ट आवश्यक असतो. तिथे एखादा बेल्ट तुटणं म्हणजे नातं तुटण्याचं कारण फक्त मृत्यूच नसतं, तर घटस्फोट, व्यावहारिक कारणांमुळे वेगळं होणं, लग्न, शिक्षण, नोकरी, काहीही असू शकतं. अशा वेळी सगळा बोजा केवळ एका नात्यावर असेल, तर त्या नात्याला ते ओझं पेलेलच किंवा त्या नात्याला तेवढा भार पेलण्यासाठी तेवढी मोकळीक असेलच असं नाही. अवंती फक्त पाच वर्षांची असताना तिचे बाबा वारले. आई बँकेत नोकरीला होती, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फारशा अडचणी आल्या नाहीत, पण सुरुवातीची वर्षं अवंतीच्या आईला आणि अवंतीला खूप अवघड गेली. हळूहळू अवंती मोठी होत गेली, तशी त्या दोघींमध्ये घट्ट मैत्री होत गेली. अवंती तेवीसाव्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचं पहिलं पोस्टिंग कर्नाटकात झालं. अवंती तर नोकरीत व्यग्र झाली, पण आता आईसमोर आव्हान होतं एकाकीपणाचं. पण तिच्या आईनं भविष्यातला हा धोका आधीच ओळखला होता. ती जवळच्या ३-४ कामवाल्या बायकांना लिहायला-वाचायला शिकवायची, बँकेतून घरी आली की या बायका त्यांची कामधामं आटोपून तिच्याकडे यायच्या. त्यामुळे तिचा वेळ मजेत जायचा. तिच्या बहिणींशी तिचं छान मेतकूट होतं. संसाराच्या जबाबदारीतून मोकळ्या झालेल्या या बहिणी मस्त फिरायला जायच्या, नाटक-सिनेमा बघायच्या, एकमेकींना खाऊ घालायच्या. अवंतीसुद्धा आई मस्त मजेत आहे हे बघून निर्धास्तपणे आपल्या नोकरीत पूर्ण लक्ष घालू शकायची. कोणतंही नातं हे एकमेकांची जागा घेऊ शकत नाही, पण त्या त्या नात्याचं महत्त्व असतंच की! अगदी प्रियकर-प्रेयसीचा वियोग झाला, तरी इतर नात्यांच्या मदतीनं आयुष्य पार करता येतंच की! त्यामुळे आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ राहात नसला, तरी जमेल तशी वेगवेगळी नाती जपायचा प्रयत्न नक्की करा.

आणखी वाचा-हवा सन्मान, हवेत अधिकार!

काही व्यक्ती एकाकीपणाला कंटाळून आयुष्य संपवायला निघतात. तुमच्याकडे नाती शिल्लक राहिली नसतील कदाचित, पण तुमच्याकडे सुदृढ शरीर, सुदृढ मेंदू, कदाचित संपत्ती, सगळंच आहे. पण तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कशाचाच उपयोग वाटत नाहीये, तर मग मन मोठं करा थोडंसं. शेवटी आपण समाजऋण मोठं मानतच असतो की! आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या, पैसे कमवण्याची गरज, त्यातून न मिळणारा वेळ, यातून समाजऋण फेडायला किती ओढाताण होते. इच्छा असूनही त्या बंधनांनी करकचून बांधलेले असतात कित्येक जण. तुमच्या एकाकीपणामध्ये ही बंधनं नसतील, तर तुमच्या मनाच्या जवळ असेल अशा कोणत्याही कामात स्वत:ला झोकून द्या. बघा मग आयुष्याच्या त्या सुकलेल्या झाडाला परत एकदा पालवी फुटेल, परत नव्यानं नाती निर्माण होतील!

मी एक ‘आनंदी एकाकीपण’ही पाहिलं आहे. निम्मी वीस वर्षांची. तिच्या लहानपणापासून तिच्या आई-बाबांची खूप भांडणं व्हायची आणि भांडण सुरू झालं की तिची आई तिला खोलीत बंद करायची. त्यामुळे घरात असल्यावर तिला त्या खोलीतच बसून राहायची सवय लागली. निम्मी वयात आली तशी आईला काळजी वाटायला लागली, की ही कुठेच बाहेर जात नाही. मित्रमैत्रिणींबरोबर ‘एन्जॉय’ करत नाही. तिचा अभ्यास, करिअर वगैरे व्यवस्थित चालू होतं. पण तिच्या आईला तिच्या एकाकीपणाची मात्र खूप काळजी वाटायची. मी जेव्हा निम्मीशी प्रथम व्हिडीओ कॉलवर बोलले, तेव्हा तिच्या मागच्या भिंतीवर ‘उकालेले’(एक तंतूवाद्या) टांगलेलं दिसलं. मी त्याबद्दल विचारल्यावर तिनं ते वाजवूनही दाखवलं. निम्मीनं सांगितलं, की ‘‘मी महिन्याच्या १२ तारखेला दुपारी वैदिक गणिताबद्दल एक लेख वाचला आणि इंटरनेटवर माहिती घ्यायला सुरू केली. सलग चार दिवस मी वैदिक गणितात बुडालेली होते. वैदिक गणिताशिवाय माझ्या डोक्यात दुसरं काहीच नव्हतं.’’ एवढं भान हरपून ती नेहमी नवीन गोष्टी शिकायची. मी तिला लाडानं ‘अॅलिस’ म्हणते. गोष्टीतली अॅलिस जशी सश्याच्या बिळात गेल्यावर एक से एक अद्भुत अनुभव घेते, तशी निम्मी तिच्या खोलीत दु:खी वगैरे मुळीच नाहीये. तर त्या खोलीतच ती विणकाम, रामायण, कोडिंग सगळं झपाटून शिकत होती, वाचत होती. जाम खूश होती ती हे सगळं करताना. पण बाहेरून बघणाऱ्याला काळजी वाटणं साहजिकच आहे. निम्मीच्या प्रकरणावरून लक्षात येतं, की आपण एकाकी आहोत की नाही, हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. शेवटी आनंदी राहणं महत्त्वाचं. तिच्यासारखं आनंदी एकटेपणही असू शकतं. स्वत:बरोबर रमणं, नवनवीन गोष्टी शिकणं, शिकत राहणं, छंद जोपासणं, नाती जपणं, या गोष्टी एकाकीपणावर मात करताना मदतीला येतील.

‘एका’ मनात होती’ या सदराचा आज समारोप होतोय. आपण गेल्या सहा महिन्यांत एकाकीपणाचे पाहिलेले कंगोरे, त्यावरचे उपाय भविष्यात तुम्हाला भक्कमपणे उभं राहायला मदत करोत, या शुभेच्छा. पंधरा दिवसांनी याच क्षेत्रातल्या नव्या विषयासह पुन्हा भेटू या!

trupti.kulshreshtha@gmail.com