मेहता पब्लिकेशनमधून फोन खणखणला आणि समोरून विचारणा झाली, ‘‘डेल कार्नेजींच्या पुस्तकांचा अनुवाद कराल का?’’ क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. माझे मन तब्बल चाळीस वर्षे मागे गेले. पुन्हा समोरून ‘हॅलो हॅलो’ असा आवाज आला आणि मी भानावर आले आणि क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं, ‘आनंदाने, तुम्हाला कल्पना नाही डेल कार्नेजींबरोबर माझे काय नाते आहे ते. हा दैवयोग आहे.’’ हे माझे वाक्य ऐकणारी व्यक्ती बहुधा बुचकळ्यात पडली असावी.
साधारण वयाच्या आठव्या वर्षांपासून माझी डेल कार्नेजींबरोबर ओळख आहे. कशी? ते तर १९५५ मध्ये वारले आणि माझा जन्म त्यानंतरचा. त्याचे असे आहे की, माझे डॉक्टर वडील त्यांचे प्रचंड फॅन होते. ते त्यांच्या मित्रमंडळींना येता-जाता ‘हाऊ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ आणि ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ या दोन अजरामर पुस्तकांमधील किस्से, गमतीजमती सांगत. त्यांची मित्रमंडळीसुद्धा ते लक्षपूर्वक ऐकत, त्यावरून त्या वयात मी एवढाच अंदाज बांधला की, डेल कार्नेजी नावाचा कोणीतरी एक हुशार माणूस आहे आणि त्याच्याकडे सर्व समस्यांवर उपाय आहेत. जरा समजत्या वयात वडील त्या पुस्तकांमधील दाखले देऊन आम्हाला उपदेश करीत, जो आम्ही हसण्यावारी नेत असू. आज मात्र त्या आठवणी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
१९३६ साली लिहिले गेलेले ‘हाऊ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ आज ७७ वर्षांनीसुद्धा वाचकांच्या मनावर गारुड घालत आहे. या पुस्तकाच्या जगभरच्या विक्रमी खपाने सर्व रेकॉर्डस् तोडले आहेत. या पुस्तकाने वाचकांच्या मनावर इतके अधिराज्य का केले असावे, याचा शोध घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, या पुस्तकाने मनुष्यस्वभावाची एक दुखरी नस पकडून ती बरी करण्याचे उपाय योजले आहेत. आणखी एक कारण असे सांगता येईल की, हे पुस्तक वाचणे ही लोकांची गरज आहे तसेच हे पुस्तक कमालीचे प्रामाणिक आहे. त्यामधील प्रत्येक उदाहरण खऱ्या नावानिशी बारीक तपशिलासह दिले आहे. ज्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची सोय तुमच्याकडे आहे. खोटे वाटते? गुगल सर्च मारून पाहा. या पुस्तकामध्ये सामंजस्य आणि चातुर्य यांचा मिलाफ कसा घालायचा याचे उत्तम मार्गदर्शन आहे. अत्यंत यशस्वी माणसाच्या यशातसुद्धा १५ टक्के श्रेय त्याच्या तांत्रिक ज्ञानाला आणि ८५ टक्के श्रेय त्याच्या मानवी स्थापत्यशास्त्राला जाते हे डेल कार्नेजी यांनी अगदी कळवळून सांगितले आहे.
‘मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा’ या माझ्या ‘हाऊ टू विन फ्रेण्ड्स’च्या अनुवादित पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रातून फार चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी मला दूरध्वनी करून हे कळवले की, हे पुस्तक वाचण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती; परंतु इंग्लिशमध्ये आणि त्यातून जुन्या इंग्लिशमध्ये असल्याने शक्य झाले नव्हते. परंतु आता मराठीत वाचायला मिळाल्यामुळे सारे काही लख्ख समजले, तर काही लोकांनी मला ‘तुम्हीसुद्धा डेल कार्नेजींसारखी वर्कशॉप्स घ्या’ असा प्रेमळ सल्ला दिला. ठाण्यामधील एका बिझिनेस असोसिएशनने तर त्यांच्या सभासदांना ही पुस्तके वाटली आणि त्यांचे वाचन पूर्ण झाल्यानंतर मला आमंत्रित करून त्यांनी पुस्तकातील तत्त्वांचा वापर करून वैयक्तिक जीवनात कशा समस्या सोडवल्या यांचे अनुभन कथन केले.
खरोखर फार धन्यता वाटली. डेल कार्नेजी खऱ्या अर्थाने त्यांना समजला असेच मी म्हणेन. कारण हे पुस्तक वाचून विसरून जाण्याचे नाही तर त्यातील तत्त्वे आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात वापरून पाहण्याजोगी हे कृतिशील पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल मला आणखी असे सांगावेसे वाटते की, ‘या पुस्तकातील मजकुराशी मी सहमत नाही’ असा लोक जसा डिसक्लेमर छापतात तसा मला क्लेमर छापावासा वाटतो की, या पुस्तकातील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे. अनुवादकाची भूमिका एखाद्या फोटोग्राफरप्रमाणे असते. ज्या गोष्टी जशा आहेत त्या तशाच आणि त्याच स्वरूपात वाचकांपुढे मांडाव्या लागतात. लेखकाशी प्रामाणिक राहून अनुवादकाने पेंटिंग करण्याचा मोह टाळावा लागतो. अर्थात माझी एवढी प्रतिभा पण नाही, की मूळ पुस्तकात मी काही बदल करू शकेन.
डेल कार्नेजी कोणी मानसशास्त्रज्ञ होते का? नाही. पण मानवी नातेसंबंधांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. अनेक मानसशास्त्रज्ञ त्यांचे मित्र होते. त्यांच्याशी ते नेहमी गुंतागुंतीच्या नात्यांची उकल करण्यासाठी सतत चर्चा करीत असत. मानवी नातेसंबंधांबद्दलची जगातील पहिली प्रयोगशाळा डेल कार्नेजी यांनी काढली. आहे की नाही हे अनोखे? ही प्रयोगशाळा आपल्या नेहमीच्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेसारखी नव्हती. तेथे विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली तयार करण्यात येई; कपोलकल्पित समस्या निर्माण करून त्यावरील उत्तरे शोधून काढून अनेक मतमतांतरे घेऊन त्यांचा वैयक्तिक आयुष्यात वापर करून मगच काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येई. सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्या सोडवणारे हे ज्ञान खरोखर अभूतपूर्व होते.
अशा पुस्तकाचा अनुवाद करायला मला मिळणे आणि त्याचा फायदा अनेकांना आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवायला होणे हे नक्कीच धन्यता देणारे आहे.    
shubhada.vidwans@gmail.com

असे शब्द.. असे अर्थ..
‘असे शब्द.. असे अर्थ..’ हे सदर प्रसिद्ध झाले आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्त्री लेखिकांची आणि स्त्रीकेंद्रित अनेक पुस्तके आमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. सूचना – स्त्रियांनी लिहिलेल्या किंवा स्त्रीकेंद्रित पुस्तकांनाच या सदरात समाविष्ट करण्यात येईल. शब्दमर्यादा ५०० इतकी असून त्या पुस्तकाची किंवा ते पुस्तक का लिहावेसे वाटले, याची अगदी थोडक्यात माहिती देऊन पुस्तकामध्ये समाविष्ट न करता आलेले फक्त काही अनुभव, विचार पाठवायचे आहेत. लेखिकांनी आपली येऊ घातलेली किंवा नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तकेच या सदरासाठी पाठवायची असून सोबत ते पुस्तकही पाठवावे. दर पंधरा दिवसांनी हे सदर प्रसिद्ध होणार आहे. कृपया पुस्तकांबाबत कोणताही संवाद साधला जाणार नसून अंतिम निर्णय संपादकांचा राहील.  
प्रकाशक वा लेखक आपली पुस्तके येथे पाठवू शकतात. –
पत्ता- चतुरंग, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०.  किंवा इमेल करा chaturang@expressindia.com