‘स्कीझॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हा एक व्यक्तिमत्त्व विकार आहे. यातलं मुख्य लक्षण म्हणजे स्वभावात येणारी, आणि ती समोरच्या व्यक्तीला जाणवेल अशी अलिप्तता. भावनिक थंडपणा हे त्याचं एक लक्षण. अर्थात याची ३४ लक्षणे दिसली तरच हा विकार मानला जातो. आणि योग्य उपचाराने त्यावर मात करता येऊ शकते.
या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्व विकारांविषयी माहिती घेत आहोत. ही माहिती घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, यामागे लेख वाचून आपल्याला स्वत:चं किंवा कोणाच्याही व्यक्तिमत्त्व विकाराचं निदान करण्याचा अजिबात उद्देश नाही. डॉक्टरही खूप बारकाईनं आणि काळजीपूर्वक हे निदान करत असतात. त्यामुळे ‘जेनो काम तेनो ठाय’ हे लक्षात घेऊन आपण मानसोपचार तज्ज्ञांच्या अधिकार क्षेत्रात लुडबुड करू नये. फक्त योग्य त्या व्यक्तींना वैद्याकीय मदत मिळवून देण्यासाठी आपल्याला एक दृष्टिकोन या सदरामधून मिळणार आहे. आधीच्या लेखात (२० जुलै) सांगितल्याप्रमाणे ‘क्लस्टर ए’मधील विचित्र आणि विक्षिप्त लक्षण समूहांनी व्यापलेले तीन व्यक्तिमत्त्व विकार आहेत. त्यातील दुसरा ‘स्कीझॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ विषयी माहिती घेऊ.
इतर व्यक्तिमत्त्व विकारांपेक्षा हा विकार कमी व्यक्तींमध्ये दिसून येतो. त्याचे कारण म्हणजे हा विकार असणाऱ्या व्यक्ती स्वत:हून किंवा कोणाच्याही मदतीने उपचारासाठी समोर येत नाहीत, हे एक छुपे कारण आहे. निनाद हा त्याच्या आई-बाबांचा एकुलता एक मुलगा. आज तो २८ वर्षांचा होता. अभ्यासात विशेषत: गणितात तो खूप हुशार. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बारावीनंतर निनादनं अभियांत्रिकीला प्रवेशघ्यायचं ठरवलं. कोल्हापूर महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. आतापर्यंत निनादला घरात स्वत:ची खोली होती आणि साधारण नववी-दहावीपासून अभ्यासाच्या निमित्तानं तो खोलीत बंदच असायचा. कोल्हापूरला जायचं ठरल्यावरसुद्धा त्याने आई-बाबांना त्याला एकट्याला फ्लॅटवर राहायचं आहे, असं सांगितलं. तो एरवी खूप कमी बोलायचा. त्याच्या इतर मुलांसारख्या काही मागण्याही नसायच्या, असं लक्षात आल्यानंतर आई-बाबांनी त्याची ही मागणी मान्य केली.
हेही वाचा : दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!
तो कोल्हापूरला गेला तसं त्याच्याशी बोलणं-चालणं आणखीनच मर्यादित झालं. बऱ्याच वेळा तो फोन उचलायचाच नाही आणि उचलला तरी ‘हो’,‘नाही’ अशी तुटक उत्तर द्यायचा आणि फोन कट करायचा. बाबा कामात बिझी असायचे, पण आईला मात्र काहीतरी चुकतंय हे सारखं जाणवायचं. तिला सुरुवातीला वाटायचं तरुण वय आहे. पालकांपेक्षा मित्र-मैत्रिणी जास्त जवळचे असतात. त्यामुळे रमला असेल त्यांच्यामध्ये. म्हणून आपल्याशी जास्त बोलत नसेल, अशी तिनं स्वत:ची समजूत काढली पण तरीही तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत राहिली.
एके दिवशी अंबाबाईच्या दर्शनाचं निमित्त करून ती कोल्हापूरला पोहोचली. दुपारी तीनच्या सुमारास ती निनादच्या रूमवर पोहोचली. त्यानेच दार उघडलं. वास्तविक, इतक्या दिवसांनी आई दिसल्यावर एखाद्यानं मिठी मारली असती. किमान आनंदानं स्वागत केलं असतं, पण निनादच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. त्यानं आईचं सामान आत घेऊन दार लावलं आणि तो त्याच्या कामाला लागला. आईला हे खूप विचित्र वाटलं. ती निनादच्या सरांना भेटायला गेली. त्यांनी सांगितलं, ‘‘निनाद कोणाशीच बोलत नाही. त्याला एकही मित्र नाही. मुलं कॉलेज संपल्यावर फिरायला जातात. कॅम्पसमध्ये वेळ घालवतात, पण निनाद मात्र तडक त्याच्या फ्लॅटवर निघून जातो. आमच्याकडेही अगदी काम असेल तरच येतो. अभ्यासात त्याची काही अडचण नाहीये पण इतरांमध्ये मिळून-मिसळून राहत नाही, ही मात्र एकच तक्रार आहे.’’
निनादचा लहानपणापासूनचाच एकंदर स्वभाव बघता हे घडू शकत होतं, पण वसतीगृहात गेल्यावर तो सगळ्यांमध्ये मिसळेल, मित्र बनवेल अशी जी तिची आशा होती त्यावर पाणी फिरलं होतं. त्याच्या खोलीत त्याने विमानाची प्रतिकृती तयार केलेली दिसत होती. निनाद लहानपणी खिडकीतून विमानांकडे बघायचा. पण आनंदाने विमान दिसल्यावर लहान मुलं ओरडतात तसं, त्याने केलेलं आठवत नव्हतं. एकंदर कोणत्याच गोष्टीचा त्याला खूप आनंद व्हायचा, असं काही नसायचं. आईला खरं तर त्याने तयार केलेली विमानाची प्रतिकृती बघून खूप अभिमान वाटत होता. त्याबद्दल आईनं त्याचं कौतुक केलं, तर त्यानं ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आईला वाटत होतं की, याच्या पोटात आपल्याबद्दल काहीच माया कशी नाही? काय चुकलं होतं माझं? लहानपणी त्याच्या वाढदिवसाला आलेली मुलं जास्त मस्ती करायची, मजा करायची, पण हा केक कापून झाला की, तो थोड्याच वेळात खोलीत जाऊन एकटाच काहीतरी खेळत बसायचा. त्याचा आनंद नेमका कशात आहे, तेच कळायचं नाही.
हेही वाचा : मासिक पाळीतील मानसिक आरोग्य
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्याने नोकरीही ‘वर्क फ्रॉम होम’ असलेली निवडली. त्याला फार क्वचित ऑफिसला जावं लागायचं, त्यामुळे इथेही तो स्वत:तच रमलेला असायचा. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आई-बाबांनी लग्नाचा विषय काढला, तर त्याने एकदाच ‘लग्न करायचं नाही’ असं त्यांना निक्षून सांगितलं. आई-बाबांना वाटायचं याला मित्र नाहीत, भावंडांशी कधीच सलोख्याचे संबंध ठेवले नाहीत, आता लग्नही करणार नाही म्हणतो. मग याला आयुष्यभर कोणाची साथ लाभेल? हा एकटा पडणार नाही का? समाजापासून अलिप्त असा हा किती काळ राहणार?
आणखी एक गंभीर प्रसंग घडला. त्यानंतर आई-बाबांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायचं ठरवलं. निनाद अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून परत आला. त्यावर्षी करोनाची साथ सुरू झाली होती. ऑगस्ट महिन्यात बाबांना करोना झाला. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून आईनेच त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तिथं गेल्यावर बाबांची तब्येत आणखीनच बिघडली आणि आई घाबरून गेली. निनाद मात्र शांत होता. तो रुग्णालयात गेलाच नाही. शेवटी निनादच्या चुलत भावाने सगळी धावपळ केली आणि बाबा आजारातून सुखरूप बरे झाले. नंतर काही दिवसांनी त्याच्या वागणुकीवरून चुलत भाऊ आणि आई त्याला खूप बोलले, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याला काही फरकच पडला नाही. याच प्रसंगावरून आईनं ठरवलं की, आता आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावीच लागेल.
निनाद अर्थातच उपचारासाठी डॉक्टरांकडे आला नव्हता, पण आई-बाबांनी जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यावेळी त्याचे वय साधारण २३-२४ होतं. डॉक्टरांनी संपूर्ण माहिती घेतल्यावर त्याला ‘स्कीझॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हा व्यक्तिमत्त्व विकार असण्याची शक्यता सांगितली. मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकाराचे निदान करण्यासाठी वयाची १८ वर्षं पूर्ण असावी लागतात. निनादचा हा एक निकष पूर्ण होत होता. त्यावेळी डॉक्टरांनी या व्यक्तिमत्त्व विकाराची लक्षणे सांगितली. हा व्यक्तिमत्त्व विकार असणाऱ्या लोकांना जवळच्या नातेसंबंधांमध्ये अजिबात रुची नसते. ‘सोशल फोबिया’ असणाऱ्या या लोकांना इतरांमध्ये मिसळण्याची गरज वाटत असते, पण त्यांना त्याच गोष्टीची प्रचंड भीतीही वाटत असते. इथे या लोकांना इतरांमध्ये मिसळण्याची, जवळचे नवीन नातेसंबंध तयार करण्याची त्यांना गरजच वाटत नसते. बाहेरून बघणाऱ्यांना ते किती गरीब, बिचारे, एकटे आहेत असे वाटू शकते, पण अशा संबंधांची त्यांना गरज वाटत नसल्यामुळे त्या संबंधांच्या अभावी त्यांना एकटं वगैरे वाटत नसतं.
हेही वाचा : सांदीत सापडलेले: आजारपण!
तरुण वय म्हटलं की, आठवतो तारुण्याचा उन्माद, नवीन काहीतरी मिळवण्याची धडपड, मित्र-मैत्रिणींचा सहवास. पण या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींना एकट्यानेच काहीतरी करणं जास्त आवडतं. त्यांना एखादी विशिष्ट गोष्ट एकट्याने करायला आवडते. जसं की, निनादला विमानांच्या प्रतिकृती तयार करणं पण त्यातही त्यांना खूप आनंद मिळतो असं काही नाही. लग्नकार्याला, पार्ट्यांना जाण्यापेक्षा एकट्याने बसून काहीतरी करण्याकडे या व्यक्तींचा जास्त कल असतो. तारुण्य म्हटलं की, लैंगिक संबंधांची गरज तर सगळ्यात जास्त असते, पण ‘स्कीझॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर’मध्ये लैंगिक इच्छा असल्या, तरी त्यांना तसे संबंध इतरांबरोबर ठेवण्याची इच्छा खूप कमी किंवा नाही म्हणावे एवढी कमी असते. हे ऐकल्यावर निनाद लग्न करायला का नाही म्हणाला, हे पालकांच्या लक्षात आले.
विमानाच्या प्रतिकृतीचा विषय निघाल्यावर डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, त्यांना कोणत्याच गोष्टीतून खूप आनंद मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या आवडीच्या जागा मर्यादित असतात. त्यामुळे त्यांची आवडही फारच मर्यादित असते. एखाद्याने अशा प्रतिकृती बनवता येत असतील तर सोशल मीडियावर किती पोस्ट केल्या असत्या आणि किती भाव खाल्ला असता, पण या व्यक्तींना दुसऱ्यांनी केलेल्या कौतुकाचं किंवा टीकेचंही काहीच वाटत नाही.
सोशल मीडियावर ट्रोलिंग झाल्याने सामान्य व्यक्ती खूप दु:खी होतात, अपमानित होतात आणि त्याउलट त्यांना सोशल मीडियावर लाईक मिळणंही खूप महत्त्वाचं वाटत असतं, पण या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्ती असामाजिक आणि अलिप्त, एकलकोंड्या असल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर काही पोस्ट करण्यात रुची नसतेच, शिवाय जरी केलं तरी त्यावर कोण काय म्हणेल याचंही सोयरसुतक नसतं.
हेही वाचा : माझी मैत्रीण: मैत्रीचं माहेरघर
इतर वेळी आपल्याला सगळ्यांमध्ये जायचंय किंवा एकटं राहायचंय हे ठरवणं वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या वडिलांच्या जिवावर बेततंय हे कळल्यावरसुद्धा निनाद एवढा थंड कसा काय होता? या प्रश्नावर डॉक्टरांनी ‘भावनिक थंडपणा’ हे लक्षण स्पष्ट केलं. एखाद्याबद्दल काळजी वाटणं, भीती वाटणं, दु:ख वाटणं, माया वाटणं या सगळ्या भावनांसाठीचा एक थंडपणा (emotional coldness) या व्यक्तींमध्ये असतो. ही सगळी लक्षणं कमी-अधिक प्रमाणात निनादमध्ये दीर्घकाळापासून दिसत होती. साधारण सात-आठपैकी तीन-चार लक्षणं जर ठळकपणे दिसत असतील, तर या व्यक्तिमत्त्व विकाराचं निदान केलं जातं.
आज निनादचं निदान होऊनही चार-पाच वर्षं झाली होती. त्यानं त्याचा व्यक्तिमत्त्व विकार समजून घेतला असावा, पण त्यावर तो काही बोलायचा नाही. त्याच्या पालकांनी मात्र हे स्वीकारलं होतं. योग्य त्या ठिकाणी औषधोपचार आणि योग्य त्या सायकोथेरपीमुळे त्याच्यात काही बदल होऊ शकतात, पण अजून तरी निनाद त्या पातळीपर्यंत पोहोचला नव्हता. पालकांनी मात्र हे स्वीकारल्यामुळे तो असा का वागतो? याचं स्पष्टीकरण मिळाल्यामुळे त्यांच्या मनातला संघर्ष निश्चितच कमी झाला होता.
(तळटीप – या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)
trupti.kulshreshtha@gmail.com
© The Indian Express (P) Ltd