आज मुंबईत विविध कारणास्तव रस्त्यावर राहणारी एक ते दीड लाख मुलं आहेत. या मुलांच्या समस्यांचे स्वरूप समान -अपुरी कमाई, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण ! ‘हमारा फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे या मुलांना विविध सेवा-आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, मनोरंजन, व्यावसायिक मार्गदर्शन, बचत सेवा, समुपदेशन आदी सेवा पुरविण्यात येतात. रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या या ‘हमारा फाऊंडेशन’विषयी सांगताहेत आशा राणे.
खरं पाहिलं तर, समाजसेवेचे बाळकडू मला माझ्या विद्यार्थिदशेतच मिळालं होतं. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये (पूर्वीची हिंगणे स्त्री शिक्षण संस्था) हायस्कूलचे शिक्षण घेताना, भारतरत्न महर्षी धोंडो केशव ऊर्फ अण्णासाहेब कर्वे व बाया कर्वे या महान व्यक्तींना अगदी जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले. आपल्या भावी आयुष्यात दु:खी व दीनदुबळे यांच्यासाठी काहीतरी काम केले पाहिजे या भावनेचे बीज त्यावेळी मनाच्या कोपऱ्यात कोठेतरी रुजले गेले असावे, असे आता वाटते.
१९५९ मध्ये समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत उच्च श्रेणीमध्ये एम.ए. पदवी मिळाल्यानंतर, विद्यापीठात प्राध्यापकपदासाठी सहज निवड होण्याची संधी उपलब्ध असतानाही, मी समाजकार्याचे क्षेत्र निवडले. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात (सध्याचा महिला व बालकल्याण विभाग) निरनिराळय़ा पदावर मी १७ वर्षे काम केले. यामुळे मला अनाथ व वंचित मुले, नैतिक धोक्यांत सापडलेल्या व वाट चुकलेल्या तरुण मुली, बालवेश्या, बाल गुन्हेगार आदी उपेक्षित लोकांसाठी केलेल्या समाजसेवेच्या अनुभवाचे मोठे गाठोडे जमा करता आले.
पुढे माझ्या आयुष्यात १९७० मध्ये चालून आलेली एक सुवर्णसंधी म्हणजे, महाराष्ट्र शासनाने मला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये (TISS) समाजकार्य पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी पाठविले. पुन्हा १२ वर्षांनंतर उच्च शिक्षणास सुरुवात करावयाची होती. तोपर्यंत, संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. टीआयएसएसमधून समाजकार्यामध्ये ‘कुटुंब व बालकल्याण’ या विशेष अभ्यासासह मी एम.ए. पदवी प्रथम क्रमांकाने मिळविली. आता माझ्या समाजकार्याच्या कक्षा अधिकच रुंदावल्या होत्या.
प्राध्यापिका म्हणून १९७६ पासून टीआयएसएसमध्ये काम करताना अध्यापन, संशोधन याबरोबरच प्रत्यक्ष फिल्डवर्कही सुरू होते. ‘भारतातील कठीण परिस्थितीतील मुले’ या विषयावर १९८६-८८ या काळात मी संशोधन करताना माझ्या असे लक्षात आले की, ‘रस्त्यावरील मुले’ (Street Children)) या गटात येणाऱ्या मुलांसाठी कोणतीही शासकीय योजना नाही आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यही अगदी अपुरे आहे.
‘रस्त्यावरील मुले’ या संकल्पनेवर विचारविनिमय करण्यासाठी जानेवारी १९८९ मध्ये मी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये महाराष्ट्र शासन, युनिसेफ, बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या कार्यशाळेतील विचारमंथनातून असा निष्कर्ष निघाला की, मुंबई शहरात रस्त्यांवर जीवन जगणाऱ्या मुलांचा प्रश्न फार गंभीर असून या मुलांची संख्या अंदाजे एक ते दीड लाख आहे. यामध्ये पदपथावर आपल्या कुटुंबीयांसह राहणारी मुले, आपल्या उपजीविकेसाठी रस्त्यावरच निरनिराळय़ा प्रकारची कामे करणारी मुले व आई-वडील अथवा अन्य कोणत्याही पालकांची आसरा नसलेली बेघर मुले यांचा समावेश होतो.
या कार्यशाळेचा पाठपुरावा म्हणून ४ जुलै १९८९ रोजी TISS चा फिल्ड अॅक्शन प्रोजेक्ट म्हणून मी रस्त्यावरील मुलांसाठी ‘हमारा क्लब’ हा प्रकल्प सुरू केला. पुढे या प्रकल्पाचे ‘हमारा फाऊंडेशन’ या नावामध्ये रूपांतर होऊन ही संस्था २००२ मध्ये रजिस्टर झाली.
मुले स्वखुशीने रस्त्यावरचे जीवन पत्करत नाहीत तर ती आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचे बळी असतात. घरची अत्यंत गरिबी, शिक्षणाचा अभाव, धंदे शिक्षणाची उणीव, सुखी कौटुंबिक जीवनाला पारखे होणे (सावत्र आई किंवा दारुडय़ा बापाकडून मिळणारी क्रूर वागणूक, विभक्त झालेले पालक, पालकांच्या रोजच्या भांडणाचे कटू अनुभव इ.) यासारख्या परिस्थितीला कंटाळून, तसेच मुंबई शहराचे आकर्षण यामुळे बरीच मुले देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला पळून येतात. कोवळय़ा वयात त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जीवनाशी संघर्ष करावा लागतो. ऊन, वारा, पाऊस व थंडी या वातावरणांत सतत उघडय़ावर राहणे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न (वडापाव) खाऊन त्यांचे आरोग्य नेहमीच धोक्यात असते. विविध रोगांना ती बळी पडतात. स्वतंत्र व बेदरकार जीवनशैलीमुळे काही मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. थोडेफार पैसे हातांत खेळत असल्यामुळे गुटखा, तंबाखू, जुगार, अमली पदार्थ यासारख्या व्यसनाच्या विळख्यात ती सहज सापडू शकतात. एच.आय.व्ही./ एड्ससारख्या रोगालाही ती बळी पडण्याचा संभव असतो. पोलीस, महापालिका कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून बऱ्याचदा या मुलांचा छळ होतो.
आपल्याला ही मुले ठिकठिकाणी, रेल्वे स्टेशन, सिग्नलजवळ, पुलाखाली, बाजारात, मंदिरे, दर्गा आदीं जवळ दिसतात. ही मुले बसने सहसा प्रवास करीत नाहीत. वेळ पडल्यास रेल्वेचा प्रवास व तोही बऱ्याच वेळा तिकिटाशिवाय! त्यामुळे ती जेथे राहतात किंवा काम करतात त्या जागेपासून जवळच प्रकल्पाची केंद्रे (Contact Points) सुरू केली. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, सिद्धीविनायक मंदिर, हाजी अली दर्गा, दादर व एलफिन्स्टन रोड पुलाखाली, नागपाडा, फोरास रोड या ठिकाणी सुरू केलेल्या केंद्रामार्फत मुलांना विविध सेवा-आरोग्य, पोषक आहार, शिक्षण (अनौपचारिक आणि औपचारिक), मनोरंजन, व्यावसायिक मार्गदर्शन, बचत सेवा, समुपदेशन आदी सेवा पुरविण्यात येतात. या मुलांना आंघोळीसाठी व कपडे धुण्यास जागा नसते, म्हणून ठिकठिकाणी सुलभ शौचालयाचे भाडे भरून मुलांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
याचबरोबर या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील आणि सकारात्मक असावा, तसेच त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या या दृष्टीने समाज प्रबोधनाचा कार्यक्रम चालू असतो. यामध्ये पोलीस कर्मचारी, शिक्षण, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आदींसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मुलांनीच लिहिलेल्या व मुलांनीच बसविलेल्या पथनाटय़ांतून रेल्वे स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवरील मुलांच्या प्रश्नाबाबत समाजात जागरूकता आणण्याचे प्रयत्न केले जातात.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर राहणारी मुले उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात इ. ठिकाणांपासून पळून आलेली असतात. हमाली करणे, पाण्याच्या बाटल्या व अन्य किरकोळ वस्तू विकणे, रेल्वे प्रवास करणाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वेच्या डब्यात जागा मिळवून देणे अशा प्रकारची कामे करणारी; तर सिद्धीविनायक मंदिराजवळ फुले विकणे, भक्तांच्या चपला-बूट सांभाळणे, स्कूटर, टॅक्सी पुसणे इ. कामे करणारी; हाजी अली दग्र्याजवळ रस्त्याच्या कडेला मण्यांच्या माळा, देवादिकांचे फोटो, मक्याची कणसे, चणे-शेंगदाणे विकणे, समुद्रातून मासे पकडणे, सिग्नलजवळ पुस्तके विकणे व काही भीक मागून पोट भरणारी; तर दादर-एलफिन्स्टन पुलाखालची मुले फुलांचा बाजार आणि मच्छी बाजार यांत काम करणारी, नागपाडय़ांतील मुले चिंध्या गोळा करणारी अशी असतात. स्थळभिन्नतेनुसार या मुलांच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असले तरी त्यांच्या समस्यांचे स्वरूप समानच-अपुरी कमाई, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण!
आज आमच्या ‘हमारा फाऊंडेशन’ संस्थेच्या एकूण लाभार्थीपैकी २४० मुले शाळांमधून शिक्षण घेत आहेत. यामध्ये नाइट स्कूलमध्ये दाखल केलेल्या मुलांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ४५ टक्के मुली आहेत. आजपर्यंत संस्थेतून ५० मुले एस.एस.सी. पास झाली असून यंदा ११ मुले उत्तीर्ण झाली. दादर केंद्रातील मीना ७६ टक्के मार्कानी उत्तीर्ण झाली, के.के. मार्ग केंद्रातील ११ मुली आज विद्यापीठात शिक्षण घेत आहेत.
काळाच्या ओघात संस्थेच्या कार्याची व्याप्ती बरीच मोठी झाली असून त्यामध्ये बालवाडी, पौगंडावस्थेतील मुलींच्या विकासासाठी केंद्र, संकटात सापडलेल्या मुलांसाठी १४ तास मोफत हेल्पलाइन (चाइल्डलाइन टेलिफोन नं. १०९८) बाल विकास खजाना (मुलांनी मुलांसाठी चालविलेली बँक) आणि हमारा छोटो ग्राम (कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. हे सर्व प्रकल्प एकमेकांशी निगडित असून त्यामार्फत रस्त्यावरील मुलांचे भवितव्य घडविण्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत.
फोरास रोडवर राहणाऱ्या अत्यंत मागासलेल्या गरीब आणि व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या ‘परदेशी’ समाजातील मुली वेताच्या टोपल्या बनवून व आईसक्रीमच्या कांडय़ा करून रोज फक्त २० रुपये मिळवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. जवळच रेड लाइट एरिया असल्यामुळे त्यांचे भवितव्यही धोक्यातच होतं. १९९८ मध्ये सुरू केलेल्या पौगंडावस्थेत मुलींच्या विकासाकरिता असलेल्या केंद्रामध्ये सुमारे १०० मुलींसाठी शालेय शिक्षणाबरोबर मेंदीचे वर्ग, शिक्षण वर्ग, दागिने करणे, ब्युटिशियन कोर्स आदी व्यावसायाभिमुखशिक्षण देण्यावर भर दिला जातो. के.के. मार्ग येथील केंद्रात बालवाडीत असलेली सुनीता पुढे दहावी पास झाली. सोफिया कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. संस्थेने आर्थिक मदत केली, पण १२ वी पास झाल्यानंतर तिच्या कुटुंबावर आपत्ती कोसळल्यामुळे-भावाला झालेला अपघात, त्यात मेंदूला झालेल्या इजेमुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. या आपत्तीमुळे आईच्याही डोक्यावर परिणाम झाला. यात भर म्हणून वडिलांचे दारूचे व्यसन बळावलेले. या परिस्थितीत सुनीताला अर्थार्जन करणे भाग होते. कॉलेज सोडून तिने काही काळ स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत नोकरी केली, परंतु पुन्हा तिला सोफिया कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला. यंदा ती बी.ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्यामुळे संस्थेची पहिली पदवीधर तर झालीच आहे मात्र तिच्या ‘परदेशी’ समाजातलीही ती पहिली पदवीधर मुलगी ठरली आहे.
नायर हॉस्पिटलमध्ये २४ तास कार्यरत असलेल्या चाइल्डलाइन प्रकल्पामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनेक मुलांना आपापल्या घरी परत पाठविणे, बालकामगारांची मुक्तता, लैंगिक शोषणास बळी पडलेल्या मुलांना सर्वतोपरी मदत व समुपदेशन याचबरोबर या हेल्पलाइनबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. या संदर्भात मला संजयची आठवण येते. १४ वर्षांच्या या मुलाला क्षयरोग झाल्यामुळे वैद्यकीय मदतीसाठी चाइल्डलाइन मार्फत ही केस संस्थेकडे आली होती. मुंबईत त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते. त्याला आपल्या घरचा पत्ताही नीट सांगता येत नव्हता. अकोला येथून घरी कोणालाही न सांगता तो मुंबईला पळून आला होता. त्याचा क्षयरोग अगदी गंभीर अवस्थेत होता. त्याला शिवडी टी.बी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व प्रयत्न करूनही अखेर तो मृत्यू पावला. तेव्हा अकोल्याला बिनतारी संदेश पाठवून त्याच्या आईवडिलांचा शोध लावून त्यांना मुंबईत बोलावून घेतले. आपला मुलगा घरातून बेपत्ता झाल्यापासून ते अगदी हवालदिल झाले होते. त्यात मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील त्या शेतमजूर कुटुंबाकडे मुलाचा अंत्यविधी करण्यासाठीही पैसे नव्हते. संजयचा अंतिम संस्कार संस्थेच्या खर्चाने पूर्ण झाला. संजयच्या आई-वडिलांच्या परतीच्या प्रवासखर्चाचीही सोय करून त्यांना आपल्या गावी परत पाठविण्यात आले. या घटनेमुळे मुलांचा संस्थेवर विश्वास व प्रेम अधिकच वाढले.
बालविकास खजाना म्हणजे बचतीची उत्तम सोय. मुलांनी मुलांसाठी चालवलेल्या बँकेचा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प ‘हमारा फाऊंडेशन’ या संस्थेने शहरात २०११ मध्ये सर्वप्रथम सुरू केला. या बँकेमध्ये एकूण ४०९ मुलांची खाती असून आपल्या कमाईमधून अगदी ५० पैशापासून ते ५०० रुपयांपर्यंत मुलांची बचत करण्याची यात सोय आहे. आंतरराष्ट्रीय बालविकास खजान्यांतील मुलांच्या सभेसाठी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून दोन मुले; दिलीप व सलमा अलीकडेच दिल्लीला गेली होती. या प्रकल्पामुळे मुलांचा बचत केलेला पैसा सुरक्षित तर राहिलाच, पण याबरोबर मुलांचा आत्मविश्वास वाढला. त्यांना उद्योजकतेचे (Enterpreneurship)व जीवन कौशल्याचे ((Life Skills) शिक्षण मिळू लागले. १८ वर्षांवरील मुलांना राष्ट्रीय बँकेत खाते उघडण्यासाठी व पॅनकार्ड मिळवून देण्यासाठी मदत केली जाते.
अपुरा निधी, अपुरे मनुष्यबळ व केंद्र चालविण्यासाठी योग्य जागेचा अभाव यासारख्या अनेक अडथळय़ांची शर्यत पार करून संस्थेने आता २५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मला वैयक्तिक आणि संस्थेलाही अनेक पुरस्कारप्राप्त झाले आहेत. पण ज्यांच्यामुळे संस्थेच्या कामाचा गौरव होतोय, त्यांपैकी काही मुलांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. सिद्धिविनायक मंदिराजवळ स्कूटर पुसणारा विजय हा दारुडा बाप व धुणेभांडी करणाऱ्या आईचा मुलगा. ८ वीत असताना आमच्याकडे आला. संस्थेकडून शिक्षणात मदत मिळाल्यामुळे आमच्या संस्थेचा पहिला एस.एस.सी उत्तीर्ण विद्यार्थी ठरला. पण तो तिथवर थांबला नाही. पुढे शिकतच राहिला. आज तो एका स्वयंसेवी संस्थेमध्ये सोशल वर्कर म्हणून काम करीत असून दरमहा १७ हजार रुपये मिळवीत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत त्याला पक्के घर मिळाले आहे. आमच्याच संस्थेत पूर्वी अकाउंट म्हणून काम करणाऱ्या मंदाशी त्याने नुकताच विवाह केला असून आज त्याचा सुखी संसार पाहाताना फार समाधान वाटते.
महंमद हा उत्तर प्रदेशातील कटीहाल गावातून पळून येऊन हाजी अली दग्र्याजवळ भीक मागणारा नववीतून शाळा सोडलेला मुलगा. वडील नाही, गावी त्यांची आई सात भावंडांचा कसाबसा सांभाळ करणारी. संस्थेच्या प्रयत्नाने दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले. त्याला हाऊस कीपिंगच्या कोर्सचे प्रशिक्षण दिल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून काम करून दरमहा १८ हजार रुपये मिळवीत आहे. आपल्या गावी त्याने एक टेम्पो घेऊन भाडय़ाने लावला आहे. तसेच एक छोटे दुकान चालवून आपल्या कुटुंबालाही सावरले आहे.
आपल्या दोन लहान भावांसह मुंबई सेंट्रल स्टेशनवर राहून हमाली करणारा प्रताप सोलापूरहून आला होता. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हिरावले गेले होते. गरिबीमुळे त्यांची आजी आपल्या नातवांचा सांभाळ करण्यास असमर्थ होती. प्रतापने चौथीमध्येच शाळा सोडली होती. त्याने मोटार ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला. आज तो भाडय़ाची टॅक्सी चालवून आपली उपजीविका करतो आहे. या खेरीज, रात्रीचे वेळी आमच्या चाइल्डलाइन प्रकल्पामध्ये स्वयंसेवक म्हणून कामही करतो. त्याचा भाऊ मनोहर बी.कॉम.पर्यंत शिकला तर दुसरा सुनील एस.एस.सी. पास होऊन दोघेही कमवते आहेत. हे तिघेही जण आता नालासोपारा येथे खोली घेऊन राहतात. स्वकष्टाने त्यांनी आपल्या गावी घरही घेतले आहे.
रस्त्यांवरील मुलांकडून पुष्कळच शिकण्यासारखे आहे. लहान वयात प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देण्याचे त्यांचे मनोबल, आई-वडिलांच्या प्रेमाला पारखे झाल्यामुळे, समवयस्क गटांमध्ये राहून आपुलकी व प्रेम मिळविण्याचा प्रयत्न, प्राप्त परिस्थितीशी तडजोड करण्याचा आटापिटा हे सारे कौतुकास्पद आहे. परंतु रस्त्यावरच्या मुलांसोबत काम करणं एक आव्हानही आहे. ते सर्वाना जमेलच असे नाही. यासाठी सामाजिक बांधीलकी, मुलांबरोबरच काम करण्याची आवड व तळमळ, त्यांच्याशी जवळीक साधून, त्यांचे प्रश्न समजून घेण्याची क्षमता, त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी आणि स्वयंसेवी संस्थेमध्ये मिळणारे तुलनेने अल्प वेतन मान्य करणे याची गरज आहे. आमच्या संस्थेत अशा कार्यकर्त्यांची फळी आहे म्हणूनच या मुलांचे भवितव्य घडविण्याच्या प्रयत्नात यश येते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मला तर या कामातून खूप ऊर्जा मिळते. संस्थेची धुरा सांभाळताना रौप्य महोत्सव वर्ष कधी उजाडले ते समजलेसुद्धा नाही. ल्ल
संपर्कासाठी पत्ता- हमारा फाऊंडेशन, पहिला मजला, खोली क्र. २७, गिल्डर लेन मनपा शाळेची इमारत, मुंबई सेंट्रल स्थानकासमोर, मुंबई सेंट्रल (पूर्व) मुंबई ४०० ००८
दूरध्वनी- ०२२-२३०५४१०८
ईमेल-hamarafoundation@rediffmail.com
वेबसाइट-www.hamarafoundation.com
रस्त्यावरील मुलांचे भवितव्य घडविताना
आज मुंबईत विविध कारणास्तव रस्त्यावर राहणारी एक ते दीड लाख मुलं आहेत. या मुलांच्या समस्यांचे स्वरूप समान -अपुरी कमाई, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण !
आणखी वाचा
First published on: 26-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humara foundation