अबोला ही वादाची प्रतिक्रिया असते. दिवस-दिवस नाही तर आठवडा -आठवडा पती-पत्नी एकमेकांशी वादच काय संवादही करीत नाहीत. त्यांच्यातील नाते ‘हँग’ होत असते. तो नातेसंबंधाचा कॉम्प्युटर ‘रिस्टार्ट’ करण्यासाठी ‘कंट्रोल, आल्टर, डिलीट’ची तीन बटणे वापरायला आणि वादावर ‘पडदा टाकण्याची’ सवय करायला हवी.
दोघेही उच्चशिक्षित होते. माझ्यासमोरच तो सांगत होता, ‘सारख्या सारख्या वादामुळे कामजीवनच थंडावले आहे आमचे. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून खूप टोकाचे वाद होतात आणि माझा सगळा मूड जातो. कालचीच गोष्ट सांगतो. मी डोक्यातील इतर सर्व विषय बंद करून केवळ रोमँटिक विचार करीत बेडरूममध्ये तिची वाट पाहत बसलो होतो. हिने आल्या आल्या कुठला विषय काढला असेल, उद्या ब्रेकफास्टला काय करायचं. मी म्हटलं, मला आवडणारे पोहे कर. ती म्हणाली, नको बरेच दिवस शिरा केला नाही तर तेच करीन. मी म्हटलं, नको. साखर आता कमी करायचं मी ठरवलंय. तू पोहेच कर. तरीही ही म्हणाली, नको. कमी साखरेचा शिरा करते. जवळजवळ पंधरा मिनिटे या वादात आम्ही घालवली. जोरदार वाद केला. ‘तू तुझंच खरं करायचा प्रयत्न करतोस, तू नेहमीच मला हवं त्याच्या विरुद्धच ठरवतेस’, वगरे एकमेकांना बोलून रोमँटिक मूड घालवून झोपलो. सकाळी उठून बघतोय तर हिने ब्रेकफास्टला काय केले तर उपमा. डॉक्टर, वैताग येतो हो या सगळ्या गोष्टीचा. काउन्सेलिंग हवंय आम्हा दोघांनाही.’
रोमँटिक मूडचे आणि वादविवादाचे नाते हे कापूर आणि काडेपेटीची पेटलेली काडी यांच्यासारखेच आहे. कामजीवनाला क्षणार्धात ‘होत्याचे नव्हते’ करणारी ‘वाद’ ही बाब पती-पत्नी नात्याचा अविभाज्य भाग आहे ही गोष्ट वादातीत आहे. म्हणून ‘वाद’ परिस्थिती टाळता येत नसली तरी ती आटोक्यात आणणे ही एक कला असून प्रत्येक विवाहिताने ती मोठय़ा कष्टाने आत्मसात केली पाहिजे.
नव्वद टक्के वादांना आपला जोडीदारच कारणीभूत असतो असे एक ‘त्रिकालाबाधित सत्य’ प्रत्येक जण डोक्यात ठेवूनच वागत असतो. प्रत्येक वादप्रसंगात आपला ‘सिंहाचा वाटा’ असतो हे प्रत्येकानेच लक्षात ठेवले पाहिजे. वादामध्ये आपला वाटा ‘खारीचा वाटा’च राहील इतपत वागायचा प्रयत्न प्रत्येक नवरा-बायकोने केला पाहिजे. नाही तर प्रसिद्ध आंग्ल लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आयुष्यातील खरा आनंद लग्नानंतरच कळला..पण तोवर वेळ निघून गेली होती!’ अशी मन:स्थिती होईल.
वरील उदाहरणाप्रमाणे काही वाद जरी ‘आ बल मुझे मार’ अशा बेसावधपणे स्वनिर्मित असले तरी वाद होण्याचे मूळ कारण म्हणजे पती-पत्नींमध्ये असणारी मतभिन्नता. दोघेही वेगवेगळ्या वातावरणातून आपले विचार, आपली मते आणि आपल्या कल्पना घेऊनच विवाह-बंधनात अडकतात. थोडक्यात लग्न मुळातच दोन व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्त्वांचे असते आणि केवळ लग्नसंस्थेमुळे ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे एका छताखाली राहायला लागतात. पण आपल्यात मतभिन्नता असणारच हे गृहीत धरून जर दोघांनीही संवादाचा प्रयत्न केला तर वादाचा ‘भडका’ उडणार नाही किंवा तो कमीत कमी राहील. वादाचा भडका होण्याचे कारण केवळ मतभिन्नता नसून ‘आपली मते जोडीदारावर लादायचा होणारा प्रयत्न’ हे असते.
उपजत ‘ईगो’ प्रवृत्तीमुळे माणसाच्या मनात नेहमीच एक वाक्य असतं, ‘तू कोण मला शिकवणार. मला काही अक्कल नाही?’ आणि याचमुळे पती-पत्नी नात्यात कुठल्याही संवादामध्ये लगेचच बंडाची िभत उभी राहते. या ‘ईगो-बंडा’मुळे कान बंद होतात आणि नात्यातील श्रवणशक्ती कमी होत जाते. काही नवऱ्यांना असे वाटते की, आदर्श नवरा तोच जो बायको बोलत असताना शांत राहून केवळ मान डोलावण्याचे काम करत असतो. आणि मग ते ‘कान-बंद कला’ आत्मसात करतात. परंतु विधायक, सकारात्मक वैवाहिक जीवनाला असे हानीकारक असते हे लक्षात ठेवा. कारण त्या वेळच्या स्थितीमधील स्फोटकता टाळली तरी जोडीदाराशी संवाद कलाच विकसित न केल्याने नातेच कच्चे राहत असते. आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे टाळणेच जरुरीचे असते.
वादाचे सातत्य हे नात्यातील उद्वेगाचे महत्त्वाचे कारण असते. आणि मग भलभलते विचार डोक्यात येऊन नात्यातील थोडेफार असणारे माधुर्यही रसातळाला जाते. टोकाचे वाद हे कामजीवनच नाही तर वैवाहिक जीवनही उद्ध्वस्त करतात. घटस्फोटाचे कारण बनतात. वाद होण्याची कारणे प्रासंगिक, क्षणिक व क्षुल्लक असली तरी ‘प्रश्न तत्त्वाचा आहे’ अशा आविर्भावात व पुष्कळदा भूतकाळाला उगाळत दाम्पत्य आपला वेळ घालवत, आवाजामधे वरचढ कोण याची स्पर्धा लावतात. एकमेकांचे बोलणे ते दोघेही ऐकत नाहीत आणि शेजारी मात्र कान टवकारून शब्दन् शब्द मजेत ऐकत राहतात. त्यांना दोघांचा भूतकाळही ऐकायचा योग लाभतो व अशा बिनपशाचा तमाशाचा लुत्फ़ ‘मज़्‍ो तमाशाके आ रहे हैं’ अशा मन:स्थितीत ते घेत असतात. भूतकाळाची आठवण कडवट असल्याने वादातील भूतकाळी उल्लेख टाळले पाहिजेत. ते कमी करण्याचा महत्त्वाचे साधन म्हणजे पती-पत्नी दोघांनीही या बाबतीतली आपली स्मरणशक्ती जाणीवपूर्वक कमजोर केली पाहिजे.
यासाठी भूतकाळावर पडदा टाकणेच योग्य असते व योग्य ठरते. दु:खी किंवा वेदना देणाऱ्या क्षणांवर ‘पडदा टाकणे’ म्हणजे ते क्षण विसरले जाणे नव्हे (मेमरी गॅ्रन्यूल्समध्ये, स्मरणिबदूंमध्ये, मेंदूत आपल्या ‘स्व’ने ते ऑलरेडी साठवून ठेवलेले असतात) तर त्या क्षणांना भविष्यात मुद्दाम उकरून न काढणे. उदाहरणार्थ, आपल्याला आपल्या विद्यार्थीदशेत आपल्या कुठल्या तरी शिक्षकांनी शिक्षा दिलेली असते, ती आता आठवायला सांगितले तर तो प्रसंग डिटेलमध्ये पण आठवतो. परंतु आता विचारेपर्यंत त्या गोष्टीवर आपण कळत नकळत पडदा टाकलेला असतो. आपण तो प्रसंग विसरलेलो नसलो तरी! हे असे जमणे सवयीने शक्य असते व ते जमतेही. आणि समजा तरीही तो प्रसंग आठवलाच तर त्याक्षणी तो ठामपणे ‘बाजूला करायचा’. मनोनिग्रह आणि सततच्या सेल्फ टॉकने, स्वगत संभाषणाने हे जमू लागते. कारण अशा दहापकी नऊ वेळा तरी क्षुल्लक क्षुल्लक कारणांनी असे प्रसंग घडलेले असतात.
अबोला ही वादाची प्रतिक्रिया असते. दिवसन् दिवस नाही तर आठवडान् आठवडा पती-पत्नी एकमेकांशा वादच काय संवादही करीत नाहीत. थोडक्यात त्यांच्यातील नाते ‘हँग’ होत असते. तो नातेसंबंधाचा कॉम्प्युटर ‘रिस्टार्ट’ करण्यासाठी ‘कंट्रोल, आल्टर, डिलीट’ची मी तीन बटणे वापरायला माझ्या केसेसना सांगतो. पहिले बटण ‘सॉरी’चे. म्हणजे जोडीदाराला मिठीत घेऊन हलके चुंबन देऊन ‘सॉरी’ म्हणायला शिका. ‘सॉरी’ म्हणणे म्हणजे तुम्ही चुकलात असे नसून तुम्ही तुमच्या नात्याचा आदर करीत आहात हा आहे.
दुसरे बटण म्हणजे ‘माफ कर’, फर्गीव मी, म्हणायला शिका. जोडीदारासारख्या जीवलगाची माफी मागणे हा तुमच्या मनाचा मोठेपणा असतो की, तुम्ही तुमचा ईगो कॉम्प्रमाईज करायला व तडजोडीचे भान ठेवायला शिकता. असे वारंवार जगायला लागणे म्हणजेच परिपक्वता येणे. आणि आपण परिपक्व होत चाललोत याचा तुम्हाला स्वत:ला यामुळे अभिमान वाटायला काहीच हरकत नाही.
आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे ‘डिलीट’ बटण म्हणजे जोडीदाराला जादूकी झप्पी देऊन ‘आय लव यू’ म्हणायचे वळण तुमच्या नाठाळ जिभेला द्या. जिभेला कदाचित असे सोपे जोडाक्षरविरहित शब्द उच्चारायला अवघडले जात असेलही. कारण ‘अ‍ॅरेंज्ड मॅरेज’ प्रकारात जीभ अशी सहजासहजी वळवळत नाही. (आणि पंचाऐंशी टक्के लग्ने अजून याच प्रकारात मोडतात). हे वळण आपल्या जिभेला लावाच.
नातेसंबंध पुन्हा सुरू होण्यासाठी या तिन्ही बटणांचा उपयोग वारंवार करावा लागला तरी करीत राहा. एकदा घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली की मग वैवाहिक जीवनाचा पुढील प्रवास सुरळीतपणे सुरू होतो. परंतु वादावर पडदा टाकणेही तेवढेच आवश्यक असते. कारण नंतर प्रसंग आठवेनासा होतो पण त्या प्रसंगाचा राग मात्र मनात घर करून राहतो. वादाचे हे मनातील घर ‘मेणाचे’ न राहता ‘शेणाचे’ होऊन वाहून जावे म्हणून प्रेमाच्या पावसाची एक तरी सर जोरात आली पाहिजे. आणि हा पाऊस मिठीतल्या मिठासमध्ये जोडीदारावर हलक्या चुंबनांच्या वर्षांवाने तुम्ही आणू शकता.
शिल्लक राहिलेले वादाचे अवशेष पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकला नाहीत तरी त्यावर पडदा टाकण्यासाठी माझी ‘स्वानुभवा’तून विकसित केलेली ‘डॉ. सामक टायमर मेथड’ वापरणे उपयुक्त ठरेल. दाम्पत्याने पहिल्यांदाच ठरवायचे की, कितीही वाद झाले तरी पुन्हा एकत्र येण्याचे सूत्र पाळायचे. नाते ‘हँग’ होऊ द्यायचे नाही. ‘टायमर मेथड’मध्ये वादानंतर ‘पंधरा’ मिनिटांनी वादावर ‘पडदा टाकून’ दोघांनीही एकमेकांशी बोलायला लागायचे आणि पुन्हा तो वादाचा विषय उकरून काढायचा नाही. हे एकदा जमायला लागले की, ती ‘पडदा टाकण्याची’ वेळ पाच मिनिटांवर आणायची आणि जणू काही घडलेच नाही अशा थाटात वागायचे. हे ही दोघांना अंगवळणी पडले की ती ‘पडदा टाकण्याची’ वेळ वाद झाल्या झाल्या आणायला शिकायची. हे सहज जमू शकते जेव्हा दोघांच्याही लक्षात येते की आपण फालतू कारणांनी वाद करत आहोत. रक्त आटवत आहोत. ‘पडदा टाकण्याची’ सवय होणे नितांत आवश्यक असते. आणि ती होतेही. ‘पडदा टाकण्याचा’ उत्तम वार्षकि दिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस. सर्व वादांना तिलांजली देऊन हा दिवस साजरा केला तर लग्नाची गाठ गळफास वाटणार नाही.
प्रत्येक दाम्पत्याने ही तत्त्वे जर नियमितपणे अमलात आणली तर दाम्पत्यजीवनात सुख सुख म्हणतात ते काय असते हे कळायला लागेल. कारण सुख म्हणजे दु:खाचा अभाव नसून, शांत डोक्याने दु:खाचे अस्तित्व मान्य करून त्रयस्थपणे जगण्याचा अनुभूती घेणे हेच असते. वादाची तीव्रता कमी करायला शिकले की ही ‘डोक्याची शांतता’ मिळणे अजिबात अवघड नसते. हे स्वानुभवाचे बोल आहेत. मी कोणी फार मोठा बिनचूक ज्ञानी आहे म्हणून नाही तर कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त चुकांचा, घोडचुकांचा अनुभव आम्हाला जास्त असल्याने तुम्ही ही तत्त्वे ऐकून वापरावीत एवढेच. ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ न्यायाने व्यावसायिक व वैयक्तिक अनुभवजन्य ज्ञानाचा फायदा तुम्हालाही व्हावा हीच माफक अपेक्षा. आणि ही जबाबदारी तुम्हा दोघांचीही असते हे सांगणेही न लगे.

Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
donald trump and joe biden meet at the white house
ट्रम्प-बायडेन यांच्यात दोन तास चर्चा; सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही, ‘व्हाइट हाऊस’चे निवेदन
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…