‘पती, पत्नी और वो’ यांच्या बाबतीत गमतीची बाब म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव जणांनी हे गृहीतच धरले होते की ‘वो’ म्हणजे ‘ती’!  जो प्रगत(?) समाज स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो त्याच समाजाची मानसिकता अशी का आहे याची चर्चासुद्धा त्या काळात वा नंतरही कधी झाली नाही. ‘वो’ म्हणजे ‘तो’ का असू शकत नाही? याचे कारण मुळातच काही सामाजिक गृहीतांमधे आहे. ही गृहीते परंपरेने समाजात घट्ट मुळे रोवून आहेत. अशी ‘वो’ परिस्थिती, विवाहबाह्य़ संबंधस्थिती ही मुळातच पुरुषाकडूनच अपेक्षित ठेवली गेली आहे.
‘डान्स लिटील लेडी डान्स’ टीना चार्ल्स गात होती आणि एका मोठय़ा कॅसेट प्लेअरवर ते गाणं ऐकत संजीवकुमार नाचत होता. गडी एकदम खुशीत दिसत होता. त्याच्या खुशीचं कारणही त्या सिनेमाच्या टायटलमधेच दडलेलं होतं.‘पती, पत्नी और वो’. ज्यांनी हा सिनेमा पाहिला असेल त्यांच्या डोळय़ांसमोर हे सगळं येईलच. निर्मात्याने सिनेमाच्या नावामुळेच कित्येक पती-पत्नींना सिनेमाकडे खेचले होते. किती ‘वो’नी तो सिनेमा पाहिला असेल कोण जाणे, पण मध्यमवर्गीयांना त्याने आकर्षति केले होते हे मात्र निश्चित.
    एका ‘वो’मुळे लोकांची मानसिकता किती मोठय़ा प्रमाणात चाळवली जाते याचे मूर्तिमंत दर्शन त्या सिनेमावेळी घडले. मानवी मानसिकता आहेच मुळी अशी. त्या सिनेमाच्या नावातील ‘वो’ जर काढूनच टाकला असता तर? तर नुसत्या ‘पती और पत्नी’साठी लोकांनी एवढी धाव घेतली असती का, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
आणखी एक गमतीची बाब म्हणजे शंभरपकी नव्याण्णव जणांनी हे गृहीतच धरले होते की ‘वो’ म्हणजे ‘ती’! म्हणजे पती-पत्नी नात्यात दुसरं कोणी ‘वो’ असूच शकत नाही! काय गंमत आहे बघा, जो प्रगत(?) समाज स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो त्याच समाजाची मानसिकता अशी का आहे याची चर्चासुद्धा त्या काळात वा नंतरही कधी झाली नाही. ‘वो’ म्हणजे ‘तो’ का असू शकत नाही? आणि त्यावर अशाच प्रकारचा व अशाच धाटणीचा सिनेमा का झाला नाही किंवा होऊ शकला नाही, याचा साधा विचारही कोणा निर्मात्याच्या किंवा कोण्या सामान्याच्या वा कोण्या असामान्य विचारवंताच्या मनात का बरे नाही आला? याचे कारण मुळातच काही सामाजिक गृहीतांमधे आहे. ही गृहीते परंपरेने समाजात घट्ट मुळे रोवून आहेत. अशी ‘वो’ परिस्थिती, विवाहबाह्य़ संबंधस्थिती ही मुळातच पुरुषाकडूनच अपेक्षित ठेवली गेली आहे.
नुकतेच घडलेले एक उदाहरण देतो. पुण्यातील एका स्त्रीरोगविज्ञान परिषदेसाठी ‘सेक्सॉलॉजी’चे व्याख्यान द्यायला मला आमंत्रित केले होते. नंतरच्या ‘एक्स्पर्ट पॅनल’ चच्रेवेळी अध्यक्ष महिलेने, ज्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या, त्यांनी उपस्थित स्त्रीवर्गाला गंमतीने का होईना, पण सल्ला दिला ‘आपापल्या पतीदेवांकडे जरा लक्ष द्या. सध्या ‘अफेअर्स’ फार वाढत चालली आहेत.’ मी लगेचच या वाक्याला आक्षेप घेऊन सर्वच श्रोत्यांना कळण्यासाठी त्या अध्यक्ष महिलेला विचारले, ‘तुम्ही पतीदेवांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलात यामधे थोडी गल्लत होतीय असं मला वाटतं. वेश्यागमन वा कॉलगर्ल, बारगर्ल यांच्याशी असणारे संबंध ही काही ‘अफेअर्स’ होत नसल्याने तुमच्या मते असे दहापकी किती विवाहित पुरुष आहेत ज्यांना ‘अफेअर्स’साठी ‘अविवाहित’ मत्रिणी मिळतात असे तुम्हाला वाटते?’ त्या एकदम गप्पच बसल्या. त्यांना उत्तर द्यायचे सुचेना. मी त्यांना जरा विश्लेषण करून सांगितले की, ‘माझ्याकडे आलेल्या दहापकी आठ विवाहित पुरुषांशी ‘अफेअर्स’ करणाऱ्या स्त्रिया विवाहितच आहेत. याचाच अर्थ विवाहित स्त्रियाचेही ‘अफेअर’ असते. म्हणजेच विवाहित स्त्रियांचे ‘अफेअर्स’ असू शकत नाहीत किंवा त्यांना तसा अधिकारच नसतो अशी धारणा चुकीची आहे. विवाहित स्त्रियांवर ही विचारधारणा समाजाने लादलेली आहे. थोडक्यात विवाहित स्त्री-पुरुष दोघेही विवाहबाह्य़ संबंधात जवळ जवळ सारख्याच प्रमाणात गुंतलेले आहेत. आणि हे वास्तव आहे, नाकारू नका. त्या अध्यक्ष महिला काही बोलू शकल्या नाहीत. हा मुद्दा त्यांच्या लक्षातच आला नव्हता आणि त्या नाकारूही शकत नव्हत्या.
असो. आणि सध्या ‘अफेअर्स’ फार वाढत चालली आहेत हेही फारसे बरोबर वाक्य नाही. या गोष्टी पूर्वापार महाभारत काळापासूनच तशा प्रसिद्ध आहेत (ऋग्वेदातही उल्लेख आहेत). पण सध्याच्या काळात त्या ‘ओपननेसमुळे’ जास्त लक्षात येऊ लागल्या आहेत एवढेच. स्त्रियाही आता ‘जशास तशा’ झाल्या आहेत. एका पतीदेवांने आपल्या बायकोला जरा चेष्टेत विचारले, ‘तू दशरथ राजाचे नाव ऐकलंस?’ ती म्हणाली,‘हो, मग?’ तो म्हणाला,‘नाही, त्याला तीन राण्या होत्या माहीत आहे?’ तिने कपाळावर आठय़ा पाडून विचारलं, ‘बरं मग?’. पतीदेव जरा हसून म्हणाले, ‘काही नाही. मलाही सध्या तसं वाटतंय.’ तिने लगेच त्याला विचारले, ‘तू द्रौपदीचं नाव ऐकलंस?’ पतीदेव गडबडून म्हणाले, ‘तू ना प्रत्येक बोलणं मनावर घेतेस.’ राजा पतीदेवांनी तलवार लगेचच म्यान केली. आपल्याला मत्रीण असावी, पण बायकोला मित्र? शांतं पापम्. पुरुषी ईगो हा असा असतो. असे बरेच नवरे मनातून राजासारखी स्वप्ने पाहात असतात. या राजांना आपली एक राणी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत असतात. पण हौस मात्र दांडगी.
कुठल्याही गोष्टीची अभिलाषा ही नसíगक गोष्ट असू शकते. विशेषत निसर्गाने प्राण्याच्या मेंदूत नोंदवलेल्या मूलभूत प्रेरणांना (तहान, भूक इ.) तृप्त करणारी कुठलीही गोष्ट त्याला मिळवावीशी वाटते. मनुष्य प्राण्यामधे वेगळं काही घडत नाही. मेंदूतील ते मूलभूत प्रेरणांचं उत्तेजित झालेलं केंद्र ती अभिलाषा पूर्ण होईपर्यंत शांत होत नाही. आणि ‘सेक्स’ तर प्राणीजगतातील सर्वात बलवत्तर अशी दुसरी मूलभूत प्रेरणा आहे. (सर्वात बलवत्तर पहिली मूलभूत प्रेरणा असते ‘स्वरक्षण’.) परंपरेने आपण तिच्या अभिलाषेला ‘वासना’ म्हणतो.   
इतर प्रेरणांपेक्षा ‘सेक्स’ची मूलभूत प्रेरणा आणखीनच वेगळी असते. ती मानवात शारीरिक, मानसिक, भावनिक अशा तिन्ही स्तरांवर कार्यरत असते. त्रिबंधात्मक असते. ती टाळल्यास वा तिची तृप्ती न झाल्यास, शारीरिक, मानसिक व भावनिक बिघाड हा होणारच हे लक्षात ठेवले पाहिजे, ते नसíगक आहे आणि निसर्गाविरुद्ध लढणे अवघड असते. या  प्रेरणेवर काही काळ ताबा ठेवता येऊ शकतो, पण ती सर्वस्वी टाळता येत नाही.
‘प्रेअरी व्होल’ या प्राण्यासारखी एकनिष्ठा इतर प्राण्यांमधे क्वचितच आढळते. या एकनिष्ठेला कारण असते ‘व्हाजोप्रेसीन’ हॉर्मोनच्या मेंदूतील ‘व्हेंट्रल पॅलीडम’ या भागात असणाऱ्या ‘रिसेप्टर्स’ वा ग्रहणिबदूंचे मुबलक अस्तित्व. असे ‘व्हाजोप्रेसीन’च्या ‘रिसेप्टर्स’चे घनदाट ‘एकनिष्ठा’ जाळे मनुष्य प्राण्यात क्वचितच असते. किंबहुना नसतेच. म्हणूनच अशी एकनिष्ठा निसर्गदत्त जरी नसली तरी समाजबांधणीसाठी निर्माण केलेल्या लग्नसंस्थेच्या मूलसंहितेमधे ती अभिप्रेत केलेली आहे. मुळात नसíगक नसलेली एकनिष्ठा विवाहितांवर बंधनकारक केली गेली. यालाच वैवाहिक नीतिमत्ता म्हटली जाते.  
परंतु या नीतीमत्तेची सांगड लंगिकतेशी असमान पद्धतीने घातल्याने सामाजिक गोंधळ उडाले आहेत. कारण या एकनिष्ठेला केवळ योनीपावित्र्यात अडकवल्याने व िलगपावित्र्याचा विचार सामाजिक व्यवस्थेत पुरेशा गांभीर्याने न केल्याने ‘विवाहित पुरुष उधळणारा सांड असला तरी विवाहित स्त्रीने मात्र स्वतला पूजनीयच ठेवले पाहिजे, अशी सामाजिक मनोधारणा बनून गेली. गंमत म्हणजे ही धारणा बनवणारे बहुतांशी पुरुषच होते आणि स्वतला अशा बंधनात ‘कुठल्याही स्थितीत’ धन्य मानणाऱ्या स्त्रिया आपण कामभावनेचे लोणी जवळ बाळगून आहोत हे विसरून गेल्या. फक्त पुरुषी विस्तव जवळ यायचाच काय तो अवकाश.
अशा कित्येक विवाहित केसेस माझ्याकडे आल्या आहेत ज्यांना त्यांच्या जोडीदाराकडून सेक्समधील समाधान सोडून द्या, त्याचा अनुभव देणे पण टाळले जाते. अशा स्त्री-पुरुषांना मूळ समस्या असते ती म्हणजे त्यांच्या सेक्सभावनेची होणारी कुचंबणा आणि मग इतरत्र लक्ष जाऊन होणारी मनाची कुतरओढ. या समस्येला सर्वात पहिला उपाय म्हणजे त्या विवाहित दांपत्याचे काउन्सेिलग करणे, नात्यामधे जोडीदाराला मिळालेल्या कायदेशीर व समाजमान्य ‘लग्नसिद्ध अधिकारा’ची जाणीव करून देणे, लंगिक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी उद्युक्त करणे आणि ‘सेक्सला नकार देणे’ हा जोडीदारावर होणारा मानसिक अत्याचारच आहे हे मनावर िबबवणे.
या ‘नाकारल्या गेलेल्या लग्नसिद्ध अधिकारा’मधे समाजाला कल्पनाही नाही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्त्रिया आहेत. म्हणजेच पुरुषही असा अत्याचार करण्यात आघाडीवर आहेत. त्यातील काहीजण ‘होमोसेक्शुअल’ किंवा ‘बायसेक्शुअल’ही असून लोकलाजेखातर लग्न केलेले असतात. स्त्रीविषयी आकर्षण त्यांना नगण्य असते अथवा अजिबात नसते. अशांच्या कुढणाऱ्या स्त्रिया जेव्हा तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या जोडीदाराने त्यांची केलेली ‘वैवाहिक फसवणूक’ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. मुळात अशांचा तो ‘विवाह’ संपन्नच झालेला नसतो. त्यामुळे संपूर्ण वैवाहिक जीवनाविषयी वा केवळ कामजीवनाविषयी हवा तो निर्णय घेण्यास त्यांना पूर्ण मोकळीक मिळालेली असते.  
    कारण वैवाहिक जीवनातील सेक्सची ‘मागणी’ हा केवळ पुरुषाचा अधिकार नसून तो स्त्रीचाही तेवढाच अधिकार आहे, याविषयी स्त्री आता जास्त जागरूक झालेली आहे.  तिने तसे असायलाही पाहिजे. प्रत्येक विवाहित स्त्रीने जाणून घेतले पाहिजे की, सेक्स ही तिच्याही आनंदाची, मनशांतीची व शरीरस्वास्थ्याची गोष्ट आहे.
    ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील १७९ व्या सूक्तामधे लोपामुद्रा आणि तिचा ‘काम’चुकार पती अगस्त्यमुनी यांच्यातील जो संवाद आहे तो सध्याच्या स्त्रीच्या मानसिकतेलाही लागू आहे. विशिष्ट पारमाíथक उद्देश नजरेसमोर ठेवून जेव्हा अगस्त्यमुनी आपल्या गृहस्थाश्रमी ‘काम’धर्माला टाळत होते तेव्हा त्यांच्यावर चिडून लोपामुद्रा म्हणते की, वयाप्रमाणे स्त्रीचे आकर्षक शरीर नष्ट होत असते. तेव्हा मला समाधान देणे हे तुमचे कर्तव्य आहे. लोपामुद्राने जसे ठामपणे सांगून पतीदेवांना प्रवृत्त केले तसे काही स्त्रियांना सध्याच्या काळातही करावे लागते. नुकतीच तिशी-पस्तिशीच्या विनया व विनयची केस आली होती. लग्न होऊन तीन वष्रे झाली होती, पण कामजीवन हे ढेपाळले होते. एरव्ही विनय तिच्याशी तसा व्यवस्थित वागायचा. पण महिन्या-दोन महिन्यांतून कधीतरी विनयाने पुढाकार घेतला तरच या ‘कामा’त विनय लक्ष घालायचा व तेसुद्धा मोजून पाच मिनिटे.
विनया त्याला वारंवार सांगून थकली व शेवटी तिने तिचा एक मित्र निवडायचा विचार पक्का केला. हा मित्र तिच्याच मित्रमंडळींपकी होता. त्याला तिच्याविषयी कधीपासूनच ‘सॉफ्ट कॉर्नर’ होता. तिला तो समजून घ्यायचा. तिला धीर द्यायचा. एक दिवस तिने तिचे दुख त्याला ऐकवलेच. विनयाविषयी त्याच्या मनाचा ओलावा जास्तच वाढला आणि विनयाही त्यामुळे ‘कोरडी’ राहू शकली नाही. विनयाला सुरुवातीला ‘गिल्टी’ वाटले पण नंतर तो अधिकारच आहे हे मानून तिने ते स्वीकारले.
माझ्याकडे येण्याचा तिचा उद्देश होता जे चालले आहे ते योग्य आहे का व त्यातून एचआव्ही, एड्सची शक्यता किती हे विचारणे एवढेच होते. पहिल्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच तिचे तिनेच शोधले असल्याने ‘माझे मत’ तिच्या दृष्टीने गौणच होते. ते बरोबरही होते म्हणा. ‘पाण्यामधे मासा राहतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या प्रमाणे तिचे दुख तिलाच माहीत व त्याची तीव्रताही तिलाच भोगावी लागत असल्याने तो प्रश्न सापेक्षच होता. व्यक्तिनिष्ठ होता. तीच योग्य निर्णय घेऊ शकणारी व्यक्ती होती. दुसऱ्याचे उत्तर मित्राच्या ‘कॅरॅक्टर’वर असल्याने तिला त्याची खात्री होती. माझ्याकडून केवळ शिक्कामोर्तब. बाकी काय?
    पंचावन्न वर्षांच्या माधवरावांची गोष्ट ही जरा ‘ट्रजेडी’च होती. गेली कित्येक वष्रे त्यांच्या बायकोने त्यांचे कामजीवन उद्ध्वस्त करून टाकले होते. आणि त्याला कारण होते ‘सासू’. माधवराव एकुलते एक. वडील नाहीत. आता आईचे वय झालेले. माधवरांवाच्या दृष्टीने बायकोच भांडखोर स्वभावाची. बायकोने सेक्स काय, पण साधा संपर्कसुद्धा कित्येक वष्रे टाळला होता. जन्माला घातलेल्या एका मुलासाठी केवळ ती माधवरावांबरोबर राहात होती. माधवराव तसे शांत व सालस स्वभावाचे दिसत होते. बरीच वष्रे स्वतचा ‘कामनिर्वाह’ स्वतच करीत होते. पण कंटाळले असतानाच त्यांच्या संपर्कात अचानक एक मत्रीण आली. तीही विनापाश. मग काय? त्यांची ही शारीरिक, मानसिक व भावनिक गरज जोडीदार मुद्दामूनच नाकारत असेल तर त्यांना दुसरा मार्गच काय होता? मत्रीण त्यांना हवी तशी मिळाल्याने तिला आपल्याकडून कामसौख्य व्यवस्थित मिळावे म्हणून माधवराव सल्ल्यासाठी माझ्याकडे आले होते.
    म्हणजेच विनया काय किंवा माधवराव काय विवाहित असूनही ‘निकामी’ जोडीदारामुळे ‘वो’ कडे ओढले गेले होते. त्याचे त्यांना वैषम्य जरी वाटत होते तरी त्यांना ते क्षम्यच वाटत होते. या सर्व घडणाऱ्या गोष्टींना आपण कारणीभूत नसून आपला जोडीदारच आहे हे ठाम मानल्यामुळे त्यांची ‘अपराधी भावना’ही नष्ट होत होती व काळाच्या ओघात ते दोघेही जीवनातील ‘मिसिंग’ कडी मिळाल्याच्या आनंदात होते.
    केवळ सेक्सची ‘मिसिंग कडी’ असल्यानेच नव्हे तर ‘वो’ चा शोध इतर कारणांनीही घेतला जातो. पण स्त्री व पुरुष यांची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. पुरुषामधे असमाधानी लंगिक जीवनच नव्हे तर रटाळ बनलेले, नीरस कामजीवन हेही महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून येते. तर स्त्रीला तिच्या भावविश्वाला पतीने ‘अस्पृश्य’ मानल्यास प्रचंड दुख होत असते. पतीकडून होणाऱ्या सततच्या दुर्लक्षामुळे वैफल्यग्रस्त होऊन सुयोग्य ‘वो’ शोधला जाऊ शकतो. वैवाहिक बंधन हे शारीरिक, मानसिक व भावनिक अशा त्रिबंधात न राहाता जर साखळदंडी बंधनच बनू लागले तर मात्र त्या पती-पत्नीमधे वैवाहिक पोकळी निर्माण होऊन ती भरून काढण्यासाठी त्यात ‘वो’चा प्रवेश होतो. किंबहुना तो अटळच असतो. आणि मग अशा परिस्थितीत  संबंधितांना  समाजमान्यतेची गरज वा कोणाच्याही संमतीची आवश्यकता वाटत नाही.
    विवाहासारखे नातेच नसíगक नाही, ते निवडलेले असते व त्या नात्यात अभिप्रेत असणारी ‘एकनिष्ठा’ही मानवात ‘व्हाजोप्रेसीन’च्या ‘रिसेप्टर्स’चे घनदाट जाळे मानवी मेंदूत निसर्गाने बनवले नसल्याने निसर्गदत्त नाही (ती जाणीवपूर्वक ठेवावी लागते), त्यावेळी नातेसंबंधात गोंधळ होणे स्वाभाविकच मानले पाहिजे आणि हजारो वर्षांचा मानवी इतिहास याला साक्ष आहे. म्हणूनच शारीरिक, मानसिक व भावनिक अशा त्रिबंध कामजीवनासाठी ‘विवाहपूर्व काउन्सेिलग’ व ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ची तत्त्वे शिकणे ही काळाची गरज आहे. नाहीतर जोडीदार नाठाळ असल्यास घटस्फोटांची मागणी किंवा अफेअर्सच्या ‘ओएॅसीस’चा शोध घेतला जाणे यात आश्चर्य ते काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा