पालकत्वाचे प्रयोग
आज माझी तीनही मुले आपापल्या क्षेत्रांत यशस्वी आहेत. लहानपणापासून अंगवळणी पडलेली शिस्त, वेळेचे व्यवस्थापन याचा उपयोग त्यांना त्यांच्या कामात वेळोवेळी होत आला आहे. मला मुलांचा अभिमान वाटतो. मी समाधानी आहे. तृप्त आहे.
सौरभला, माझ्या मुलाला कंपनीच्या कामामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल सुवर्णपदक मिळाले होते. मात्र त्याच दिवशी माझी कॉर्डिओलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती. म्हणून तो मेडल प्रदान समारंभास गेला नव्हता, हे ऐकून मला भरून आले आणि पन्नास वर्षांपूर्वीपासूनचा जीवनपट माझ्या डोळ्यांसमोरून सरकू लागला..
मी सरिताची आई झाले. डॉ. म्हसकरांची ‘आमचं बाळ’, ‘बालराजे’ ही पुस्तके आणली. ती वाचून बालसंगोपन सुरू केले. मी एक हाडाची शिक्षिका होते. यथावकाश संगीता आणि सौरभचे आगमन झाले. मुलांना वाढवताना माझ्या पेशाचा मला फायदा झाला आणि यांच्या समाजकार्याचाही.
मुलांना लहानपणापासूनच शिस्त, स्वावलंबन, व्यवस्थितपणा यांचे बाळकडू देण्यास सुरुवात केली. शाळेतून मुले परत आल्यावर दप्तर, कपडे, चपला असा पसारा व्हायचा. मला एक कल्पना सुचली. मी एक वही केली. वस्तू जाग्यावर ठेवणे, लवकर झोपणे व उठणे, दप्तर भरणे, स्वच्छ दात घासणे व आंघोळ करणे, मोठय़ा माणसांचे ऐकणे अशा गोष्टी त्यात लिहिल्या. दररोज वरील प्रत्येक गोष्ट केल्यास २ मार्क द्यायचे. दहा दिवसांनंतर हिशेब करून ९५ च्या वर मार्क असल्यास छोटेसे बक्षीस ठेवले. मुलांना चांगले वळण लागण्यास याचा फायदा झाला.
शाळा सुरू झाली की पहिल्या दिवसापासून नियमित व दररोज अभ्यास असा शिरस्ता ठेवला. एखादा धडा समजावताना विषयाची व्यवहाराशी सांगड घालण्यावर भर दिला. मुलांना परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवले. कोणताही विषय केवळ पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रात्यक्षिकामुळे चांगला समजू शकतो यावर माझा विश्वास होता. स्वत: शिक्षिका असल्याने यासंबंधी छोटे छोटे प्रयोग करून पाहिले. तिसरीच्या भूगोलातील माहिती मुलांना देताना तसेच आपल्या परिसराची ओळख करून देण्यासाठी मलबार हिल ते सीएसटी (तेव्हा व्हीटी) बसचा प्रवास व्हाया नरिमन पॉइंट असा केला. तसेच मत्स्यालय, चौपाटी, म्युझियम वगरे ठिकाणे दाखवली.
शाळेत शिकवताना मुलांना बर्फाळ प्रदेश, गवताळ प्रदेश, विषुववृत्तीय बारमाही पावसाचा प्रदेश यांची माहिती द्यायची होती. मी मुलांच्या मदतीने त्या त्या प्रदेशांचे मॉडेल तयार केले. आणि तेथील लोकजीवन, शेती, घरे, समजावून सांगितली. मुलांना तो भूगोलाचा धडा मनोरंजक वाटला. शाळेत मुलांना नागरिकशास्त्र, लोकशाही, मतदान शिकवताना मुलांच्या मदतीने मतपत्रिका, मतपेटी वगरे सांगोपांग करून गुप्त मतदान करून घेतले व मॉनिटर निवडला. मुलांना मजा आली. ‘राजकारण नि:स्वार्थ बुद्धीने व लोकांचे हित लक्षात घेऊन केले तर वेगळेच समाधान आणि आनंद मिळतो,’ या विधानाची सत्यता मुलांना प्रात्यक्षिकातून अनुभवता आली.
पाचवी-सहावीत गेल्यावर मुलांना डायरी लिहिण्यास शिकवले. त्यामुळे त्यांना आत्मनिरीक्षण आणि वेळेचे व्यवस्थापन करता येऊ लागले.
मुलांचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून आम्ही दोघांनी सांगोपांग विचार केला. मग मी नोकरी सोडायचे ठरवले. मुलांनी वक्तृत्व स्पध्रेत भाग घेतला की ते भाषण शेजारीपाजारी, घरी आलेले नातेवाईक यांना म्हणून दाखवायला आम्ही सांगायचो. मुलांची भीड चेपायची. ती स्पध्रेत सहज न घाबरता भाषण करीत. मुलींनी गाण्याच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवले. गॅदिरगसाठी मुली नाटिका, नाच बसवू लागल्या. मुलगा कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन बनला. अभ्यासात तिघेही पहिल्या नंबरात असत.
‘टीपकागदासारखे व्हा, आजूबाजूच्या लोकांमध्ये दिसणाऱ्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा, म्हणजे आपली प्रगती होते’ ही आमची शिकवण संगीताने अंगी बाणवली. तिला दहावीत सर्व शिक्षकांनी एकमताने आदर्श विद्यार्थी म्हणून निवडले. आयुष्यात, व्यवहारात चोख असणे फार महत्त्वाचे. मुलांनी मार्केटमधून काही आणले की त्याचा व्यवस्थित हिशेब द्यावयाचा, लिहून ठेवायचा अशी पद्धत ठेवली. त्याचा उपयोग झाला. सोसायटीत निरनिराळे समारंभ व्हायचे. मुले वर्गणी गोळा करायची. लोक विश्वासाने पसे द्यायचे. अजूनही हिशेबाचे काम आमच्याकडेच आहे, आमचे पाहून तर मुलेही हिशेब चोख ठेवू लागली आहेत.
शाळेला सुट्टी लागली की मुलांना उद्योगात कसे ठेवावे, हा प्रश्न पडतो. आम्ही कॉलनीतील ५-६ मत्रिणी जमलो, चर्चा केली. दररोज दुपारी एकेका मित्राकडे जमायचे ठरले. त्याप्रमाणे मुले जमली. प्रत्येक मित्राची आई त्यांचे बठे खेळ, गोष्टी, गाणी, कथाकथन घेऊ लागली. मुलांना वाचनाचीही गोडी लावली. त्यांचा वेळ मजेत गेला. बरीच वर्षे हा कार्यक्रम चालू राहिला.
संध्याकाळी देवाजवळ आजीने दिवा लावला की ती श्लोक, सुभाषिते, मुलांना शिकवायची. त्यांचे अर्थ समजावून सांगायची. नंतर आजीआजोबांसकट आम्ही सगळे टेबलावर एकत्र बसून हसतखेळत गप्पा मारीत जेवायचो. रात्री आजोबा मुलांना गोष्टी सांगायचे. मुले त्यांना हवी असेल ती मदत करून झोपायची. कधी कधी आम्ही सर्व जण मुलाच्या वडिलांच्या समाजसेवी संघटनांमध्ये जाऊन त्यांना मदत करायचो.
आज माझी तीनही मुले आपापल्या क्षेत्रांत यशस्वी आहेत. लहानपणापासून अंगवळणी पडलेली शिस्त, वेळेचे व्यवस्थापन याचा लाभ त्यांना त्यांच्या कामात वेळोवेळी होत आला आहे.
मला माझ्या मुलांचा अभिमान वाटतो. मी समाधानी आहे. तृप्त आहे!

Story img Loader