मृत्यू. त्याचं नाव जरी घेतलं तरी मनात एक नीरव शांतता निर्माण होते. अशा स्थितीत ज्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली आहे त्यांची स्थिती काय होत असेल? वयाच्या कोणत्याही टप्प्यातला मृत्यू घाबरवतोच, पण त्यातली अपरिहार्यता लक्षात आल्यावर सुरू होतो विवेकी विचार. ‘गेले द्यायचे राहून’ अशी काहींची अवस्था होऊन जाते. आणि मग सुरू होते धडपड ती पूर्ण करण्याची. अशाच या काही कथा. मृत्यूपूर्वी जगण्याला अर्थ देऊन जाणाऱ्या. माझं मीपण इथं ठेवून जाणाऱ्या.
प्रसंग असा- सजवलेला दिवाणखाना. रमेश देव आणि सीमा कौतुकानं ऐकताहेत. राजेश खन्ना आनंदी मूडमधलं उडत्या चालीचं गाणं त्यांना ऐकवतोय- ‘‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने।’’ स्वत: कर्करोगाचा रुग्ण असून दुसऱ्यांच्या जीवनात आनंदाचे कवडसे पाडणारा- आनंद!
हा होता सत्तरीच्या दशकातला ब्लॉकबस्टर. आता एक खरीखुरी गोष्ट. श्रीरंग सोहोनी, डॉक्टरी निदान- लिव्हर सिऱ्होसिस. सहा वर्षांपूर्वीच कळलेलं, पण मद्यपाशाचा विळखा तसाच. रोग बळावत गेला. वारंवार हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या. डॉक्टर म्हणाले, एकमात्र उपाय लिव्हर ट्रान्सप्लँट. पत्नी आणि आप्तेष्ट आग्रह करू लागले. मुलांचे शिक्षण अर्धवट. उरलासुरला प्रॉव्हिडंट फंड ऑपरेशनवर घालवून मुलांचं भवितव्य धोक्यात आणण्याची सोहोनींची अजिबात तयारी नव्हती. त्यांनी बायको-मुलांना जवळ बसवून घेतलं. सर्व आर्थिक व्यवहार समजावून सांगितले. पॉवर ऑफ अॅटर्नी लिहून दिली. डॉक्टरांना विनंती केली, मला फक्त गोळ्या-औषधं द्या. इथून पुढे मला हॉस्पिटलमध्ये भरती करायचं नाही. व्यसनी दारुडा म्हणून जगानं हेटाळणी केलेला हा माणूस त्या वेळी मात्र सारासार विचार आणि नि:स्वार्थी उदात्तता दाखवून त्याच महिन्यात निघून गेला, कायमचा!
जीवनाचं अटळ आणि अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. तत्त्वत: हे सगळ्यांना माहीत असलं, तरी प्रत्यक्ष मरणाची चाहूल लागली की आपली प्रतिक्रिया काय होईल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वैद्यक व्यवसायात ज्याला ‘टर्मिनल इलनेस’ किंवा ‘एण्ड स्टेज डिसीज’ म्हणतात अशा व्याधी म्हणजे हृदय, यकृत, मूत्रपिंडादी महत्त्वाचे अवयव निकामी होणं किंवा उपचार करण्यापलीकडचा कर्करोग. दोन-चारदा हॉस्पिटलच्या आत-बाहेर केलं, पुन:पुन्हा ‘जैसे थे’ अशी स्थिती झाली की एक दिवस रुग्ण सरळ प्रश्नच विचारतो- ‘‘आता हे असंच चालणार का? मी कधीच बरा होणार नाही ना?’’ इतक्या थेटपणे विचारलेल्या प्रश्नाला थातुरमातुर उत्तर देणं, विषय बदलायचा प्रयत्न करणं मला तरी कधी आवडलेलं नाही. सौम्य शब्दात सत्य परिस्थितीची जाणीव रुग्णाला करून देणं- तीसुद्धा आपली समवेदना व्यक्त करीत- हे प्रत्येक डॉक्टरचं नैतिक कर्तव्य असतं आणि बहुतेक डॉक्टर ते व्यवस्थित निभावतातसुद्धा. कधी कधी असा प्रश्न उघड विचारण्याचं धैर्य रुग्णाकडे नसते. तरीही अगदी अशिक्षित माणसालासुद्धा आतून उमगतंच, वाळल्या झाडाला कितीही खतपाणी घातलं तरी पालवी फुटेल का? आता संपलंय सारं. पुरे करा उपचारांचा छळवाद!
अशा रुग्णांच्या मानसिक आंदोलनाचा मागोवा संशोधकांनी अगदी खोलवर जाऊन घेतलाय. अगदी कोणत्याही वयात, आपण आता काही दिवसांचे/ महिन्यांचे सोबती आहोत असं कळल्यावर प्रथम बसतो प्रचंड धक्का! विश्वासच बसत नाही. हे निदान नक्की चुकीचं आहे, अशी खात्री वाटते. त्यानंतर भीती वाटायला लागते, राग यायला लागतो. ‘मीच का? मला हे झालंच कसं?’ असे प्रश्न उभे राहतात. कधी अपराधीपणाची टोचणी लागते. पूर्वी केलेल्या खऱ्या किंवा काल्पनिक चुकांची शिक्षा म्हणजे हा आजार असं वाटायला लागतं. काही जण प्राक्तन, पूर्वसंचित वगैरे संकल्पनांच्या आधारे आजाराचा संबंध थेट गेल्या जन्मापर्यंत नेऊन लावतात. मनाचा तळ ढवळून टाकणाऱ्या या कल्लोळातून शेवटी येतो स्वीकार. आजाराने एक एक क्षमता कमी होऊ लागल्या की कानात मृत्यूचे पडघम वाजू लागतात. विरक्तीची भावना- ‘आताशा मी नसतेच इथे-’ या ओळीत व्यक्त झालीय तशी येऊ शकते. अनंताचा प्रवास सुरू झाल्याची जाणीव तनमनाला व्यापून टाकते.
या आवर्तातून निर्माण होतात काही सुसंगत विचार आणि त्यांचं प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरणं. सत्य घटना सांगते, सीमा गुरेजाची. वय अवघं बत्तीस. ऑफिसमध्येच चक्कर येऊन कोसळली. अतिशय वेगाने वाढणाऱ्या अॅक्यूट ल्यूकेमियाचं निदान झालं. काही आठवडय़ांचीच सोबतीण, असं डॉक्टर म्हणाले. सीमानं बहिणीसारखं प्रेम करणाऱ्या नणंदेला बोलावून घेतलं. चाळीस वर्षांची नीला अपत्यहीन होती. सीमानं पतीच्या संमतीनं तिच्या चार वर्षांच्या पंकजला नीलाच्या ओटीत घातलं. कायदेशीर दत्तकपत्र करण्याचा आग्रह धरला. स्वत: सही केली. पतीचा हात हाती घेऊन ‘तू पुन्हा लग्न कर. तू एकाकी राहावंसं हे मला आवडणार नाही,’ असं म्हणाली, तेव्हा सर्वाचेच डोळे पाणावले. आपल्या उरलेल्या अल्पशा आयुष्यात सीमानं जो अर्थ भरला तो विस्मयचकित करणारा होता.
‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’- आरती प्रभूंची ही कविता मनातली रुखरुख, हळहळ व्यक्त करते. मरणवेळ जवळ येत चालली आणि खूप काही द्यायचं राहूनच गेलं असं नक्कीच होऊ शकतं. जुन्या दम्याच्या विकारानं हैराण असलेल्या बाबुरावांनी कधीच ओळखलं की आता उपचारांना यश येत नाही- ती वेळ जवळ येत चाललीय. जवळ फार पैसाअडका होता असं नाही. पण स्फटिकासारख्या स्वच्छ विचाराच्या त्या गृहस्थांनी आपण गेल्यावर त्या पैशाची व्यवस्था काय करायची आहे हे स्पष्ट शब्दात लिहून त्याच्या तीन प्रती आपल्या तिन्ही मुलांना दिल्या, त्यासुद्धा एकाच वेळी. यानंतर देण्यासारखं होतं त्याचं शरीर. गावातल्या वैद्यक महाविद्यालयाचा देहदानाचा फॉर्म त्यांनी त्याच वेळी भरला आणि त्यावर पत्नी आणि मुलांच्या सह्य़ा घेतल्या. विशेष म्हणजे बाबुरावांनी ही निरवानिरव केली त्यांच्या महाप्रस्थानाच्या कित्येक महिने आधी. जशी शरीराची तयारी केली तशीच मनाचीही!
पण समाजात असे किती बाबुराव असतील? दुर्धर व्याधी जडल्यानंतर कोणी आता मृत्युपत्र करा असं सुचवलं तर चांगली शहाणीसुरती माणसं कावरीबावरी होतात. मृत्युपत्र हा शब्दच अशुभसूचक वाटतो त्यांना. पण आपल्या मागून आपल्या संपत्तीचा व्यय योग्य प्रकारे व्हावा असं वाटत असेल, तर तशी काळजी आधीच नको का घ्यायला? आणि केवळ पैसाअडका, दागदागिने एवढेच द्यायचं असतं असं थोडंच आहे? आदरणीय प्राध्यापक कुलकर्णीना शेवटी शेवटी रक्तक्षय जडला. दर पंधरा दिवसांनी रक्त भरावं लागे. दोन्ही मुलं अमेरिकेत. सरांनी विचार केला आणि इतकी वर्षे अपत्यवत सांभाळलेला, वाढवलेला जवळजवळ ३००० दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह (पान १ वरून) विद्यापीठाला द्यायचं ठरवलं. पुस्तकांची नीट वर्गवारी करणं, सांभाळून पॅकिंग करून ग्रंथालयात पोहोचवणं ही कामे त्यांच्या चार-पाच आवडत्या विद्यार्थ्यांनी केली, तेव्हा त्या वृद्ध सुरकुतलेल्या चेहेऱ्यावर अपूर्व समाधान पसरलं होतं.
राहून जाणाऱ्या इतरही अनेक गोष्टी असतात. किती वेळा आपण संकल्प करतो- अमुक संस्थेला पैसे द्यायचे, तमुक शाळेतली मुलं दत्तक घ्यायची, गावच्या उत्सवाला हातभार लावायचा, कधीतरी गावजेवण घालायचं- सगळे बेत प्रामाणिक असले तरी मनातल्या मनात राहून जातात. ‘सवड’ मिळाली की मी चिक्कार भटकणार आहे, मनसोक्त प्रवास करणार आहे, उत्तमोत्तम पुस्तकं वाचायची आहेत, शाळेतल्या जुन्या मित्रांचं गेट-टुगेदर करायचंय. एक ना दोन. गरगर फिरणाऱ्या आयुष्यात ‘सवड’ कधी मिळतच नाही आणि जेव्हा मिळते, त्या वेळी खूप उशीर झालेला असतो. प्रकृतीची साथ नसते आणि मनाचीही उभारी नसते.
आयुष्यभर कष्ट आणि कष्टच केलेले कित्येक ‘वर्कोहोलिक्स’ साध्यासुध्या गृहसौख्याला पारखे झालेले असतात. आपली मुलं लहानाची मोठी होताना त्यांनी कधी पाहिलेलीच नसतात. कामात अष्टौप्रहर गुंतून गेल्यानं पत्नी-मुलांशी संवाद नसतो. आजारी झाल्यावर नव्याने हे धागे जोडण्याची खटपट खूप केविलवाणी ठरते. मनाचे भावबंध जुळलेले नसतात. उरते फक्त शुष्क कर्तव्याची भावना आणि व्यावहारिक उपचार. ‘गेले करायचे राहून’ अशा साध्या गोष्टींबद्दलची रुखरुख आपल्या वाटय़ाला येऊ नये म्हणून काय करता येईल याचा विचार प्रत्येकानं करायला हवा.
कायदेशीर बाबींची पूर्तता योग्य वेळी करणं एक वेळ सोपं आहे, पण भावनिक गुंते सोडवणं फार अवघड. शिवराम पाटील माझे खूप जुने रुग्ण. ‘शहाण्णव कुळी’ अभिमान बाळगणाऱ्या या गृहस्थांनी, ‘इतर’ जातीत लग्न केलेल्या आपल्या मुलीला कधी माफ केलंच नाही. ‘तू मला मेलीस-मी तुला मेलो’ असं दहा वर्षांपूर्वी बोलले होते ते. आणि आता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अत्यवस्थ झाल्यावर त्यांना मुलीची अतोनात आठवण झाली- खूप वाईट वाटलं. मुलगी, जावई, त्यांची दोन्ही मुलं आय.सी.यू.मध्ये विशेष परवानगी काढून आली. व्हेंटिलेटर मशिनवर असणाऱ्या शिवरामदादांना बोलता येत नव्हतं, पण डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. दोन्ही नातवंडांनी दोन हात हाती घेतले. मुलीनं बापाच्या मस्तकावर अश्रू ढाळले. या घटनेला मी साक्षीदार होते.
पुष्कळदा असं होतं, आपल्या मनात नेमकं काय आहे हे माणसं तोंड उघडून बोलतच नाहीत. एखाद्या मुलाला पेंटिंग्जमध्ये रस असतो- त्याला इंजिनीअरिंग व्हावं लागतं. एखाद्या मुलीला परिचयातला धडपडय़ा तरुण आवडत असतो, तिला आई-बापांनी आणलेल्या ‘स्थळाला’ मनाविरुद्ध होकार द्यावा लागतो. एखाद्याला स्वत:चा उद्योग सुरू करायचा असतो पण बायकोच्या सक्तीमुळे तो नावडत्या नोकरीत सडत असतो. आपल्या मनाविरुद्ध, दुसऱ्याच्या मर्जीखातर सतत वागत आल्यामुळे सातत्यानं असमाधान, वैषम्य वाटत राहतं. त्यातून गंभीर आजार उद्भवतात, तेव्हा स्वत:शी प्रतारणा करून घालवलेलं सगळं आयुष्यच बेचव-बेगडी वाटायला लागतं. आनंदी राहणं हा माझ्यापुढचा एक पर्याय होता. स्वत:शी प्रामाणिक राहणं, आपल्या मूल्यांना अनुसरून राहून त्यातून समाधानी होणं याबद्दलचा निर्णय जेव्हाच्या तेव्हा मीच घ्यायला हवा होता. पण आता वेळ उरला नाही- ही जाणीव, याचं दु:ख खरोखर दु:सह असतं, मृत्यूच्या भीतीपेक्षाही.
अपघाती मृत्यू किंवा अतितीव्र आजारानं काही मिनिटांत-तासांत येणारा मृत्यू (उदा. सडन कार्डियाक डेथ) याबद्दल मी बोलत नाहीये. ज्या आजाराचं स्वरूप गंभीर आहे- वाढत जाणार आहे. ज्याची परिणती मृत्यूत होऊ शकते, त्याचं निदान झाल्यावर, त्या निदानाचा ‘स्वीकार’ मनापासून केल्यावर रुग्णानं या लेखात सुचवलेल्या आणि अशाच आणखी कितीतरी गोष्टींचा विचार करावा असं मी सुचवते आहे.
यापुढे जाऊन असंही म्हणावंसं वाटतंय, राहून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी, कृतीत उतरवण्यासाठी अगदी असाध्य आजारच व्हायला पाहिजे असं कुठे आहे? म्हातारपण ही गोष्टसुद्धा एक प्रकारे ‘टर्मिनल’ नाही का? थांबवता न येणारी, मागे फिरून न जाणारी? तर मग आला क्षण, मनाच्या उत्कट ऊर्मीना प्रतिसाद देणं, त्यातून जीवनाचा निर्भर आनंद मिळवणं, व्यावहारिक आणि भावनिक गुंते जिथल्या तिथे सोडवून त्यातून मोकळं होणं हा आपल्यापुढे एक निश्चित पर्याय असू शकतो.
बाकी, अशी जीवन समरसून जगणारी कित्येक माणसं मृत्यूकडेही सख्यभावानं बघतात असं दिसून येतं. दुर्गाबाईंचे शब्द पुरेसे बोलके आहेत,
जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन
माझं मीपण या इथं ठेवून जाईन
माझं मीपण या इथं ठेवून जाईन
मृत्यू. त्याचं नाव जरी घेतलं तरी मनात एक नीरव शांतता निर्माण होते. अशा स्थितीत ज्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली आहे त्यांची स्थिती काय होत असेल?
First published on: 18-01-2014 at 07:35 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will left ego behind death