मी चुकते, मला शरम वाटते.. पण त्या चूक आणि शरमेसकट मला स्वीकारणारी शक्ती मला द्रौपदीला वाचवणाऱ्या कृष्णात दिसते. मी त्या शक्तीचा धावा करते आणि त्या बळावर मी न सापडणाऱ्या भूमिकेपाशी, न सुचणाऱ्या विषयापाशी, चुकलेल्या गाण्यापाशी, अपयशी नाटकापाशी आणि आयुष्यातल्या ‘माहीत नसण्या’ पाशी शांत थांबते..
कधीकधी एखादा विषय आपसूक चालत येतो जवळ. हात मिळवतो आणि माझ्याशी पहिल्या भेटीतच जुनी मैत्री असल्यासारखा बोलायला लागतो. शांतपणे बोलतो. सहज, सलग.. आणि एकटाकी मोकळा होऊन जातो. लिहिताना बहुतेक वेळेला असंच होतं.
पण काही आडमुठय़ा वेळांना समोर अंधार असतो. विशेषत: वृत्तपत्रीय लिखाण करताना, लेख द्यायची तारीख आतून टकटक करायला लागलेली असते, पण समोर काहीच, कुणीच नसतं. असतो फक्त अंधार. या अंधारात एकटक बघत विषयाच्या चाहुलीकडे कान देऊन थांबावं लागतं. हे थांबणं खूप घाबरवतं मला.
माझा एक लेखकमित्र आहे. तो नाटकं लिहितो. तो नाटक लिहायला सुरुवात तशी वेळेतच करतो. ‘वेळेत’ म्हणजे काय कुणास ठाऊक. लिखाणासाठीचं वेगवेगळं घडय़ाळ असणार प्रत्येकाचं. कुणाचं एक महिना आधी म्हणजे वेळेत तर कुणाचं एक वर्षही असेल. सात वर्षे, चौदा वर्षे एका नाटकावर काम करत राहणारे पाहिलेत. त्यामुळे ‘वेळेत’ ला इथे काही अर्थ नाही तसा. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीनं नाटकाला दोन महिने अवकाश म्हणजे ‘वेळेत’ असं समजू या. या दोन महिन्यांतला पाऊण वेळ माझा लेखकमित्र त्या नाटकाच्या विषयाच्या आसपास घोटाळत असतो. या काळात तो रोज सकाळी उठतो, पळायला जातो दोन तास. थोडासा उत्तेजित असतो. आसपासच्यांशी त्या विषयाच्या इथलं तिथलं बोलत असतो. पण अजून त्यांनी लेखणीला हात लावलेला नसतो. मला त्याच्याकडे बघताना ही उत्सुकता वाटते, की याच्या ‘आत’ आता काय नाटक चाललेलं असेल. आणि त्या ‘आतल्या’ नाटय़ाची तिसरी घंटा होऊन कधी तो लेखणी घेऊन सरसावेल. तो थांबलेला असतो. त्याला आतून त्याची लिखाणाची तिसरी घंटा ऐकू येईपर्यंत तो काही पठ्ठा लेखणीला हात लावत नाही! अशावेळी त्याच्या आतल्या त्या लिखाणनाटय़ात तो इतका रममाण होऊन जातो की त्याला नाटकाची तारीख सुद्धा दिसत नाही. तालमींना कलाकार जमायला लागलेले असतात, त्याचं त्याला दडपणही यायला लागतं थोडं, पण पठ्ठा आतल्या घंटेकडे कान लावून बसलेला असतो. ती घंटा कधी वाजेल कसं सांगणार. त्यामुळे त्याची काही नाटकं वेळेत लिहून होतात, काही नाही होत. पण तो त्याची तमा नाही बाळगत. तो थांबतो.
एक मित्र सिनेमाची कथा, पटकथा लिहितो. त्याच्या समोर शूटींगच्या तारखा, सिनेमाचं बजेट सगळ्या गोष्टी ठरत ठरत जात असतात. त्याच्यासमोर घडणाऱ्या या चर्चामध्ये ‘आता तमुक ठरवता येईल’ अशा अर्थाची वाक्यं त्याच्या कानावर पडत असतात. ती वाक्यं स्थितप्रज्ञासारखा ऐकत तो तिथंच बुद्धिबळ खेळत असतो. अगदी तन्मयतेनं. जणू संहितेचं आणि त्याचं काहीच देणघेण नसल्यासारखा. शूटींगचा दिवस जवळजवळ यायला लागतो तसं याचं बुद्धिबळ खेळणंही वाढायला लागतं. त्या खेळण्यातली एकाग्रता पण वाढत जायला लागते. इतकी, की त्याला हळूहळू आसपासच्यांचं बोलणंही ऐकू येईनासं होतं. त्याच्या त्या खेळण्याचा आसपासच्या हतबल लोकांना राग यायला लागतो. कारण संहिता पूर्ण झालेली नसते. अनेक गोष्टी पूर्ण संहितेची वाट बघत थांबलेल्या असतात. आणि मग एके दिवशी तो येतो. काहीतरी ठरल्यासारखा, आतलं काहीतरी सुटत चालल्यासारखा. बुद्धिबळातल्या हत्ती, घोडे, उंट, राजा, वजीर सगळ्यांचं बळ त्याच्या डोळ्यांत दिसत असतं आणि तो संहिता पूर्ण करायला घेतो.
माझ्या या मित्रांसाठी लिखाणाच्या काळात त्याचं भवताल, त्यांचा काळ हे थांबलेलं असतं असं वाटतं. म्हणजे, शरीरानं ते आपल्या सामान्य माणसांच्या काळानुसार वागत असतील पण त्यांची मनं एका वेगळ्याच घडय़ाळाशी जोडलेली असतात. त्या घडय़ाळाचा गजर होईपर्यंत ती मनं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या आताच्या घडय़ाळाची टिकटिक ऐकत थांबून असतात. हे सगळं माझ्यासाठी आकर्षक पण खूप भीतीदायक आहे.
वेडय़ावाकडय़ा गोष्टींना गोळा करून व्यवस्थित आकार दिला की मला हायसं वाटतं. आणि माझ्या आतल्या वेडय़ावाकडय़ाला हा आकार देत असताना मी सर्वसामान्यांच्या घडय़ाळातली सर्वसामान्य वेळ विसरू शकत नाही. मला उशीर नावाच्या गोष्टीची नेहमी भीती वाटत असते. त्यामुळे माझ्या आतल्या निर्मितीच्या घडय़ाळाचा गजर वेळेत होईल का, नाही अशी भीती वाटली तर मी आतल्या घडय़ाळाचे काटे आपोआप फिरण्याची वाट न पहाता हाताने भराभरा गोलगोल फिरवत राहीन आणि वेळेत गजर करेन.
पूर्वी ही भीती खूप जास्त वाटायची. त्यामुळे घाबरून अशा अनेक घडय़ाळांचे अनेक काटे फिरवलेत मी. आतला हा वेडावाकडा काळोख निर्मितीच्या कुठल्याही पहिल्या पावलाआधी समोर उभा ठाकतोच. मग ते एखादं नवं नाटक, चित्रपट, लेख लिहिणं असेल, गाण्यातला नवीन राग शिकणं असेल किंवा एखाद्या नव्या भूमिकेसमोर उभं राहणं असेल. ती भूमिका भली लिहिलेली असेल लेखकानं पण आता ती माझ्यातनं जेव्हा साकारायची असेल तेव्हा मला पुन्हा आतल्या वेडय़ावाकडय़ा चिखलातूनच मळायला सुरुवात करावी लागणार ना.. पुन्हा थांबणं आलंच तिच्यासमोर. ती बोलेपर्यंत माझ्याशी, तिचं माझं जुळेपर्यंत तिच्या माझ्यामधल्या वेडय़ावाकडय़ा अंधारापाशी थांबणं हे आलंच. बरं, तिला नीट लिहिली असेल तिच्या जन्मदात्यानं तर ती भूमिका आपसूक बोलेल माझ्याशी. पण तसं जर नसेल तर त्या मुक्या प्राण्यापाशी अजून थांबावं लागेल. तिचं – माझं कधी, कसं जुळेल, किती वेळ लागेल.. कसं सांगणार. अशावेळेला सगळी घडय़ाळं, आतली, बाहेरची बंद करून तिच्या – माझ्यातल्या स्तब्धतेला जेव्हा जेव्हा सामोरं जाता आलं आहे तेव्हा ती फार छान बोलली आहे माझ्याशी. तिच्या सहवासाने तिने खूप आनंद दिला आहे मला. पण जेव्हा जेव्हा मला ती आपसूक बोलेपर्यंत थांबण्याची भीती वाटली आहे तेव्हा तेव्हा ती हिरमुसून तिच्या कोषात निघून गेली आहे. घाईने ती घाबरते. घाईने माझी भूमिका घाबरते, माझा लिहिण्याचा विषय घाबरतो, माझ्या गाण्यातला रागसुद्धा घाबरतो.
प्रत्येक सुरुवातीच्या आधी एक वेडावाकडा ‘माहीत नसणं’ पणा असतो. त्या ‘माहीत नसण्या’पाशी माझ्या त्या लेखकमित्रांसारखं धाडसानं थांबायचं आहे.. आसपासचा वेळ विसरून.. ‘माहीत नसण्यातून’ आपसूक काहीतरी उगवू द्यायचं आहे. ताकातून लोणी उमलावं त्या सहजतेनं वेडय़ावाकडय़ा ‘माहीत नसण्यातून’ अलगद आकारबद्ध ‘माहीत असण्यात’ स्वत:ला वाहू द्यायचं आहे. गोलमाल सगळंच आहे. बावनकशीसाठी थांबावं लागेल. वेडय़ावाकडय़ावरच्या शांत विश्वासानं.
पण खूप भीती वाटते. थांबण्याची आणि विश्वासानं वाहण्याचीही. शंका येतात. थांबून थांबून निवडलेल्या एखाद्या वाटेनं जाऊन सुद्धा एखादी भूमिका नाहीच सापडली तर.. एखादा विषय नाहीच उतरला कागदावर मनासारखा तर.. एखादी जागा नाहीच फिरली गळ्यातनं तर.. या सगळ्या थांबण्या, वाहण्याचा माहीत नसलेला शेवट काय असेल? या सगळ्या प्रवासानंतर शेवटी बावनकशी अपयशच वाट पाहत असेल तर? हा अविश्वास थांबण्यावरचा, स्वत:वरचा, वाहण्यावरचा आणि पर्यायानं आयुष्यावरचा.. मला माझ्या ‘माहीत नसण्या’पाशी फार एकटं करून सोडतो. सैरभैर करून टाकतो. अपयशाच्या नुसत्या कल्पनेपासून सुद्धा धूम ठोकायला लावतो.
माझं अपयश.. माझ्या चुका.. मी जर त्यांच्यापाशी थांबले नाही तर पोरक्या होतात. मला त्या दोघांनाही अनुकंपेनं आपलंसं करायला हवं-आहे. चांगला विषय एकाएकी लिहिणारी जशी मी आहे तशी एखाद दिवशी काही केल्या मनासारखं न लिहू शकणारीपण मीच आहे. ‘न जमणाऱ्या’ मला एकटी सोडते मी. तिच्यापाशी नाही थांबता येत. एखाद्या हाऊसफुल नाटकाच्या प्रयोगात काम करणारी जी ‘मी’ असते तिच्याच एखाद्या प्रयोगाला समोर अनपेक्षित खूप रिकाम्याच खुच्र्या दिसतात. त्यावेळी कमी प्रेक्षकांना बघून वाईट वाटलेली, पोटात खड्डा पडलेली सुद्धा ‘मी’च असते. तिला एकटं सोडून कसं चालेल? खूप मेहनत घेऊन तयार केलेलं एखादं गाणं कुठल्याशा स्पर्धेसाठी सादर करायचं असतं. त्या गाण्याची प्रत्येक तालीम बिनचूक करणारी मी शूट होणाऱ्या फायनल टेकला गाणं उचलायलाच चुकते. सर्व प्रेक्षक घराघरात टेलिव्हीजनवर माझी ती ‘चूक’ पाहत आहेत. माझ्या अपेक्षांना पुरी न पडलेली ही जी ‘मी’ आहे, तिच्यापाशी मला थांबायचं आहे. ती ‘चुकलेली’ आहे. माझ्या ‘बरोबर’च्या साच्याला पुरी नाही पडू शकलेली, पण म्हणून ती धडपडली नाही असं कसं म्हणू. तिच्या जीवापाड प्रयत्नाचं उत्तर ‘यश’ नसलं तरीसुद्धा ते चुकलेलं उत्तर, ते अपयश माझंच. गाणं उचलताना कुठल्याशा अनामिक कारणानं एकाग्रता भंग पावलेला आणि गाणं चुकीचं उचललं गेल्याचा ‘तो’ क्षण.. तो चुकल्याचा क्षण.. ‘त्या’ क्षणापाशी तेव्हा थांबलेच नाही घाबरून. आत्ता थांबते. त्या क्षणात, त्या चुकण्यात, माझं माणूसपण आहे, त्याला मी पोरकं का सोडू? त्या चुकलेल्या क्षणी मला स्वत:ची जी प्रचंड शरम वाटली तिच्यापाशीही थांबते. ती शरम आठवली की द्रौपदीच आठवते. तिच्या आयुष्यातला ‘तो’ प्रसंग माझ्या आयुष्यापेक्षा खूपच भयंकर पण मलाच काय कुठल्याही कलाकाराला फसलेल्या कामानंतर येणारं औदासिन्य आणि चूकत असताना वाटलेली शरम ही माझ्या मते त्या द्रौपदीच्याच तोडीची.
पण परवा माझ्या सासूबाईंनी द्रौपदीच्या त्या ‘लज्जा’ क्षणाचं आगळंच वर्णन एका पुस्तकात वाचल्याचं मला सांगितलं आणि ते ऐकून माझ्या अनेक लज्जाक्षणांपाशी शांत थांबल्याचं बळ मिळालं-
दु:शासनाने द्रौपदीला दरादरा ओढत भर सभेत आणली आणि तिची वस्त्रं फेडायला लागला तेव्हा आपला पदर छातीशी घट्ट कवटाळून ती कृष्णाचा धावा करायला लागली. जोपर्यंत तिने तो पदर तिच्या हातांने छातीशी घट्ट कवटाळला होता तो पर्यंत तिच्या धाव्यात भय होतं, अविश्वास होता, ‘ती’ होती. एका ‘शरण’ क्षणी तिने भिऊन छातीशी घट्ट धरून ठेवलेला तो पदर सोडून दिला आणि ती हात मोकळे सोडून त्याचा धावा करायला लागली. त्या क्षणी ‘तो’ आला. आणि त्याने तिची लाज राखली. तिचं हातातला पदर खाली सोडणं हा तिच्या विश्वासाचा क्षण होता. तिच्या पदर पकडण्यात जे भय आणि ‘स्वत्व’ होतं. ते तिच्या पदर मोकळं सोडण्यात तिने सोडलं. तिने तिचं अस्तित्वच त्याच्यावर सोडलं आणि तो आला. त्यानंतरचं तिचं ते शांत होऊन नामस्मरण करत स्वत:भोवतीच फिरत राहणं मला आश्वस्त करतं.
मी चुकते, मला शरम वाटते.. पण त्या चूक आणि शरमेसकट मला स्वीकारणारी शक्ती मला द्रौपदीला वाचवणाऱ्या कृष्णात दिसते. मी त्या शक्तीचा धावा करते आणि त्या बळावर मी न सापडणाऱ्या भूमिकेपाशी, न सुचणाऱ्या विषयापाशी, चुकलेल्या गाण्यापाशी, अपयशी नाटकापाशी आणि आयुष्यातल्या ‘माहीत नसण्या’ पाशी शांत थांबते.
एक उलट..एक सुलट : नग्नमनस्क
मी चुकते, मला शरम वाटते.. पण त्या चूक आणि शरमेसकट मला स्वीकारणारी शक्ती मला द्रौपदीला वाचवणाऱ्या कृष्णात दिसते. मी त्या शक्तीचा धावा करते आणि त्या बळावर मी न सापडणाऱ्या भूमिकेपाशी, न सुचणाऱ्या विषयापाशी, चुकलेल्या गाण्यापाशी, अपयशी नाटकापाशी आणि आयुष्यातल्या ‘माहीत नसण्या’ पाशी शांत थांबते..
First published on: 15-12-2012 at 03:41 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I wrong i feel shy