व्यक्तिमत्त्व विकार हा काहींच्या आयुष्यात दबक्या पावलाने येतो आणि स्थिर व्हायचा प्रयत्न करतो, जर त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं तर मात्र त्या विकाराला स्वीकारून चांगलं आयुष्य जगता येतं. त्यामुळे वेळीच निदान ओळखा आणि त्यावर उपाय करा हा सल्ला देणारा हा या सदराचा शेवटचा लेख.
समुपदेशनाचं काम करताना, गेल्या पाच-सहा वर्षांत हे लक्षात येत होतं की, हळूहळू मानसिक स्वास्थ्याबाबत समाजातली जागरूकता निश्चितच वाढली आहे, परंतु नाण्याची दुसरी बाजू म्हणजे या जागरूकतेबरोबरच खूप सारे गैरसमजही वाढले आहेत. एखाद्या मानसिक आजाराचा स्वत:च स्वत:वर शिक्का मारून घेणं, इतरांकडेही ‘यांना काही मानसिक आजार तर नाही ना?’ असं म्हणून संशयानं बघणं हे प्रकारही वाढताना दिसत आहेत, त्यामुळे ‘स्वभाव-विभाव’ या सदराच्या माध्यमातून ‘व्यक्तिमत्त्व विकार’ या थोड्याशा दुर्लक्षित भागावर प्रकाश टाकला. समाजमाध्यमात आता ‘रील्स’चं महत्त्व वाढतंय, त्यात पहिल्या तीन सेकंदांत तुम्ही किती महत्त्वाचं बोलू शकता आणि ३० सेकंदांत तुमचं म्हणणं कसं लोकांपर्यंत पोहोचवू शकता यावर तुमचं यश अवलंबून असतं (यश म्हणजे तुमचा व्हिडीओ किती लोकांनी पाहिला आणि किती लोकांनी त्याला पसंती दर्शविली) सगळं कसं थोडक्यात मांडता येईल हे जमवून दाखवायचं. पण याउलट ‘चतुरंग’मध्ये लिहायचं म्हणजे वाचकांसमोर कस लागतो. वेळ काढून, लेख अभ्यासपूर्ण पद्धतीनं वाचून त्यातली नेमकी शंका विचारणारे, पटलं नाही तर आपला मुद्दा मांडणारे, काय आणि का चांगलं वाटलं ते सांगणारे असे अनेक वाचक ई-मेल पाठवून आपली प्रतिक्रिया कळवायचे. त्यामुळे सदर लिहिताना खूप जबाबदारी वाटायची.
मुख्य म्हणजे संपर्क करणाऱ्यांमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या २०-२२ वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या पंचाहत्तरीच्या सगळ्या वयोगटातील वाचकांचा सहभाग होता. अर्थात ‘व्यक्तिमत्त्व विकार’ हेच पूर्ण आयुष्य व्यापून टाकतात म्हटल्यावर हा विषय कोणत्याच विशिष्ट वयापुरता किंवा फक्त स्त्री किंवा पुरुषांपुरता मर्यादित नव्हता हेही एक कारण त्यामागे होतंच. सगळे व्यक्तिमत्त्व विकार लिहिताना एक प्रश्न वाचकांकडून सातत्याने विचारला जात होता, तो म्हणजे या व्यक्तिमत्त्व विकारावर उपचार काय? प्रत्येक विकारासोबत त्याची उपचारपद्धती स्पष्ट न करण्याची दोन कारणं होती. एक म्हणजे शब्दांची मर्यादा. एका लेखात एक व्यक्तिमत्त्व विकार, त्याची सगळी लक्षणं उदाहरणासहित समजावून घेणं हे आधी महत्त्वाचं होतं. एकाच लेखात सगळी माहिती देणं हे जागेअभावी शक्य नव्हतं आणि दुसरं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्त्व विकारासाठी कोणती एकच सायकोथेरपी वापरली जाते असं नाही तर प्रत्येक थेरपिस्ट आपापली प्रभुत्व असलेली थेरपी आणि त्या व्यक्तिमत्त्व विकाराची गरज याचे योग्य मिश्रण करून रुग्णाबरोबर काम करत असतो, त्यामुळे एकंदर व्यक्तिमत्त्व विकारासाठी कोणकोणत्या सायकोथेरपी वापरल्या जातात याची एकत्रित माहिती आपण आजच्या शेवटच्या लेखात घेणार आहोत.
आणखी वाचा-एक होतं गृहिणी विधेयक!
सगळ्यात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की, ‘व्यक्तिमत्त्व विकार’ हे धोकादायक आणि ताठर (unhealthy and inflexible) विचार, भावना आणि वर्तन यातून निर्माण होतात. यामागे आनुवंशिक कारणं, परिस्थितीतून आलेली कारणं हे तर असूच शकतं, शिवाय लहान वयात अनुभवलेले आघातही बऱ्याच वेळेला त्यासाठी कारणीभूत ठरतात. मग थेरपीमधून काय करायचे तर एक निरोगी आणि लवचीक असलेल्या विचारांचा मार्ग तयार करायचा, जेणेकरून त्या व्यक्तीचे आणि सोबत राहणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य सुखकर किंवा सुसह्य व्हावे. मग विचारांचा मार्ग कसा बदलायचा तर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी माणसाचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या विचारधारा मांडल्या, ज्याला मानसशास्त्रातील सिद्धांत म्हणतात. जसे की, फ्रॉईडचा मनोविश्लेषण सिद्धांत, वॉटसनचा वर्तन सिद्धांत, जीन पियाजे यांचा बोधात्मक सिद्धांत. या सिद्धांतात जे काही सांगितलं आहे, ते व्यक्तींच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा त्यांच्या विचारांची दिशा बदलण्यासाठी उपयुक्त तर ठरू शकतं, पण सामान्य माणसाला ते आहे तसं सैद्धांतिक भाषेत अंमलबजावणी करायला अवघड जातं. त्यासाठी काही तंत्रं (techniques) तयार केलेली असतात, ती तंत्रं जिथं व्यक्तीला शिकवली जातात त्याला थेरपी सेशन म्हणतात. हे स्पष्ट करून सांगण्याचं कारण एवढंच आहे की, नुसतं समुपदेशन करणं आणि थेरपी सेशन्स यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकारात अशा प्रकारच्या शास्त्रीय थेरपीची गरज असते, नुसतं सल्ला देणं पुरेसं नसतं.
व्यक्तिमत्त्व विकारांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या थेरपींमध्ये सगळ्यात आधी ‘डायलेक्टिकल बिहेविअर थेरपी’चं (dilectical behaviour therapy- DBT) नाव घेतलं जाऊ शकतं. याला ‘टॉक थेरपी’ असंसुद्धा म्हटलं जातं. या थेरपीचं मुख्य उद्दिष्ट हे धोकादायक वर्तन तसेच आयुष्यात अडथळा निर्माण करणारं वर्तन बदलणं हे आहे. कित्येकदा या व्यक्तींमध्ये आत्महत्या करण्याचं वर्तन दिसून येतं, त्यालाही प्रतिबंध करण्यासाठी या थेरपीची मदत होते. या थेरपीद्वारे भावनांचं नियंत्रण कसं करायचं, तणावाचं नियोजन कसं करायचं, वागण्यात सजगता कशी वाढवायची, लोकांशी चांगले संबंध कसे निर्माण करायचे या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. अर्थातच यासाठी दीर्घकाळ संयमानं, विश्वासानं थेरपी घेणं खूप महत्त्वाचं आहे. या थेरपीचं उदाहरण द्यायचं तर ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसॉर्डर’ असं निदान झालेल्या व्यक्तीच्या बायकोकडून भाजीत अगदी थोडं जरी मीठ जास्त पडलं तर एरवी ‘बीपीडी’चा रुग्ण घर डोक्यावर घेईल, तिला अद्वातद्वा बोलेल, चांगला मूड एकदम बदलून जाईल त्याचा. पण त्याला ‘डीबीटी थेरपी’मध्ये आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवलं जातं आणि दुसरं म्हणजे खरंच ही घटना एवढी राग येण्यासारखी आहे का, याचाही विचार करायला सांगितलं जातं. म्हणजेच सजगता (mindfullness) वाढवण्याचे प्रयत्न होतात.
आणखी वाचा-अधिक मुलांचा पर्याय खरंच आहे का?
ओसीपीडीसारख्या व्यक्तिमत्त्व विकारामध्ये ई.आर.पी ( ERP- exposure and response prevention) ही थेरपी खूप प्रभावीपणे काम करते. या विकारामध्ये व्यक्ती एकच विचार वारंवार करत राहते. त्या विचारावर त्यांचं नियंत्रण नसतं. एखादी भीती किंवा चिंता त्यांचा मेंदू पूर्णपणे व्यापून टाकते. अशा परिस्थितीत वरील थेरपी, व्यक्तीला ज्या गोष्टीची भीती वाटत आहे, त्याला टप्प्याटप्प्याने जाणूनबुजून सामोरे जायला लावलं जातं म्हणजेच त्या विशिष्ट घटकाला एक्सपोज केलं जातं. आणि त्यातून येणाऱ्या प्रतिसादाला(response) चिंतेमधून बाहेर पडून तणावमुक्त भावनेचा सहसंबंध निर्माण करून दिला जातो. लहानपणी मूल जर अंधाराला घाबरून रडत असेल तर त्याला आपण मुद्दाम अंधारात घेऊन जातो, थोडा वेळ तिथंच थांबून त्याला सांगतो, ‘बघ, काही झालं का? बघ, इथं कोणीच नाहीये.’ मूल आधी रडून गोंधळ घालतं, मग आपल्या कडेवर बसून हळूच डोळे उघडून बघतं, मग तिसऱ्या दिवशी हात गच्च पकडून का होईना, पण डोळे उघडून जास्त वेळ तिथं थांबायला तयार होतं. हळूहळू त्याच्या लक्षात येतं की, तो घाबरत होता तेवढा काही अंधार भयानक आणि असह्य नाही. अशाच प्रकारे प्रौढांबाबतीतही ‘ईआरपी’मध्ये काम केलं जातं. घटकांविषयी वाटणाऱ्या चिंतेची तीव्रता हळूहळू कमी करून चिंतेशी असणारा सहसंबंध तोडला जातो. आणि एका निरोगी, शांत, तार्किक भावनेशी नवीन सहसंबंध त्याची जागा घेतो.
अशाच प्रकारे वेगवेगळ्या थेरपी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्व विकारांवर मात करायला मदत करतात. इतर थेरपींमध्ये आरईबीटी, सीबीटी या थेरपीही खूप परिणामकारक आहेत. अर्थातच हे व्यक्तिमत्त्व विकार पूर्णपणे बरे होतात असं नाही, पण निदान ते नियंत्रण करण्यायोग्य तरी थेरपीच्या मदतीनं नक्की होऊ शकतात. हे झालं थेरपिस्टचं काम, आता मानसोपचारतज्ज्ञ औषधोपचारानेसुद्धा काही ठिकाणी मदत करतात. ज्या वेळी लक्षणांमध्ये चिंतेची लक्षणं दिसून येतात तेव्हा ‘अँटी अँक्सिएटी’ औषधं काही प्रमाणात देण्यात येतात. तशाच प्रकारे अँटी डिप्रेसंट, मूड स्टॅबिलायझर अशी औषधं काही प्रमाणात मदत करतात.
आणखी वाचा-सांदीत सापडलेले…!: राजीनामा
व्यक्तिमत्त्व विकाराचं निदान खूप आव्हानात्मक असतं. कित्येक वेळा दोन-दोन विकारांची लक्षणं एकत्रित दिसून येतात. निदानासाठी DSM-५ चे निकष बघण्याबरोबरच मानसोपचारतज्ज्ञ काही वेळा काही चाचण्या करतात. जेवढं निदान अचूक असेल तेवढे उपचारही अचूक मिळू शकतात. त्यामुळे योग्य मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. इंटरनेट तुम्हाला माहिती देऊ शकतं, पण ज्ञान देऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, विशेषत: ‘जेन-झी’ने अशा गोष्टींसाठी इंटरनेटवर अजिबात अवलंबून राहता कामा नये. मानसशास्त्राची पुस्तकं वाचून, सगळी सैद्धांतिक भाषा येऊन आपण माहिती तर मिळवू शकतो, पण एवढ्या माहितीवर एखाद्याचं निदान करणं खूप धोकादायक ठरू शकतं. ज्यांना आपल्यामध्ये अशी लक्षणं आढळून येतात त्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन उपचार घेतले पाहिजे. पूर्वीचा काळ वेगळा होता, अशा पद्धतीनं उपचार घेणाऱ्यांना नावं ठेवली जायची. पण आता समाजात आलेल्या जागरूकतेमुळे भेदभाव निश्चितच कमी झाला आहे. समाज नावं ठेवेल म्हणून होणारे त्रास सहन करत बसायचे की योग्य उपचार घेऊन आपलं जगणं सुसह्य करायचं? यातले सोयीस्कर काय आहे? हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे.
‘व्यक्तिमत्त्व विकार’ असणाऱ्या रुग्णाबरोबर राहणं काही सोपं नाही, पण तो एक विकार आहे, ते लोक मुद्दाम असं वागत नाहीत एवढं कळलं तरी त्यांच्याकडे बघण्याचा एक समानुभूतीपूर्ण दृष्टिकोन तयार होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला होणारा त्रास थोडा कमी आणि सुसह्य वाटू शकतो. पूर्वी मोठ्या कुटुंबात अशी एखादी व्यक्ती सहज खपून जायची, त्याचं कारण कोण्या एकावर तिला सांभाळायची जबाबदारी पडायची नाही. आता छोट्या कुटुंबात हे एक आव्हान आहे हे मात्र खरं. भारतीय संविधानाने ‘सर्वसमावेशक’ ( inclusiveness) दृष्टिकोन सांगितला आहे. त्यात जात, वंश, प्रदेश, लिंग या सगळ्यांना समान संधी मिळावी असं सांगितलं गेलं आहे. त्यात आता मानसिक आजारांचाही समावेश आहे. काही मर्यादा असतीलही, पण त्या मर्यादा सांभाळून व्यक्तिमत्त्व विकाराच्या रुग्णांना जगण्याचा सामान अधिकार मिळाला पाहिजे. या सदराच्या मदतीनं जास्तीत जास्त व्यक्तींना योग्य ते उपचार मिळावेत आणि त्यांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी जागरूकता यावी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.
‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया।’
trupti.kulshreshtha@gmail.com
(सदर समाप्त)
© The Indian Express (P) Ltd