आपल्याला हवं तसं सौंदर्य मिळवण्याचं शास्त्र.. म्हणजेच अ‍ॅस्थॅटिक सर्जरी अर्थात सौंदर्य शल्यचिकित्सा. निसर्गानं दिलेल्या रूपाला अधिक खुलविणाऱ्या या शास्त्राला सौंदर्य शल्यचिकित्सा शास्त्र म्हटलं जातं. या शास्त्राचा शोध कधी आणि कसा लागला याविषयी नेमकं सांगता येणार नाही. पण प्लॅस्टिक सर्जरी म्हणजेच सुघटन शल्यचिकित्सेपासून सौंदर्य शल्यचिकित्सा शास्त्राचा जन्म झाला आहे. म्हणूनच प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे काय हे आधी जाणून घेतलं पाहिजे.
प्लॅस्टिक सर्जरी हा शब्द ज्या ‘प्लास्टिकॉस’ या ग्रीक शब्दापासून तयार झालाय त्याचा अर्थ होतो, ‘आकार देण्यास योग्य’  या अर्थानुसारच या शास्त्राचे कामही आहे. आपल्या अवयवांना आकार देणे आणि निकामी अवयव पुन्हा कार्यरत करणे.
या शास्त्राचा शोध कसा लागला याचं कारण काहीसं विचित्रच आहे! आपल्याकडे पूर्वापार म्हणजे अगदी रामायण काळापासून ते अगदी आत्ता-आत्तापर्यंत, म्हणजे अठराव्या शतकापर्यंत शिक्षा म्हणून नाक-कान कापण्याची पद्धत होती. हे तोडलेले अवयव परत जोडण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी ज्या शास्त्राची निर्मिती झाली ते म्हणजे सुघटन शल्यशास्त्र!
सुश्रुत ऋषींनी ‘सुश्रुत संहितेत’ वर्णन केलेली गालाची चामडी वापरून तुटलेले नाक नव्याने निर्माण करण्याची शस्त्रक्रिया ही या शास्त्रातली पहिली शस्त्रक्रिया मानली जाते. त्याचप्रमाणे कपाळावरील चामडी वापरून नाक निर्माण करण्याची शस्त्रक्रियाही भारतात अस्तित्वात होती. रेनीसान्स म्हणून जो काळ ओळखला जातो त्या काळात इटलीतील अँटोनिया ब्रँका व टॅग्लिआकोझी यांनाही नाक निर्माण करण्याचे तंत्र अवगत होते.
हे शास्त्र खऱ्या अर्थाने विकसित झालं ते विसाव्या शतकात पहिल्या महायुद्धाच्या काळात. युद्धातल्या हल्ले-प्रतिहल्ले यामुळे सगळ्यात जास्त हान झाली ती मानवी देहांची. अनेक अवयव निकामी झाले, अनेकांच्या शरीराचे तर अक्षरश: लचके तोडले गेले. अशा सनिकांच्या बाबतीत तर हे फार मोठं आव्हान होतं. त्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट होती ती त्यांचे देह सुघटित करणे, त्यांना आकार देणे. मानवी बुद्धीनं हे आव्हानाचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आणि यातून जन्माला आलं ते सुघटन शल्यशास्त्र.. प्लॅस्टिक सर्जरी. युद्ध म्हणजे अपरिमित हानी. या हानीमधूनच प्लास्टिक सर्जरी या शास्त्राचा विकास झाला.  वाईटातून (पान १ वरून) चांगलं निघतं ते असं!
विद्रूप आणि निकामी झालेले अवयव जोडताना शल्यक्रियाकारांच्या लक्षात येऊ लागलं की, हे अवयव जोडले जाताना त्यांचं कार्य तर सुरळीत होतंच, त्याचबरोबर ते अधिक सुघटित किंवा सुंदर दिसू लागतात. जर निकामी झालेले अवयव सुंदर दिसतात, तर मग जे अवयव कार्यरत आहेत ते जर मोडून परत जोडले तर त्यांचं सौंदर्य नक्कीच जास्त खुलेल, हे बुद्धिवादी माणसाला सहज समजलं आणि यातूनच सौंदर्य शल्यशास्त्र म्हणजेच अॅस्थॅटिक सर्जरीचा जन्म झाला! निकामी झालेले अवयव कार्यरत करण्याच्या शस्त्रक्रियेला प्लास्टिक सर्जरी म्हणतात हे खरं, पण हे अवयव कार्यरत करताना जेव्हा सुघटित होतात तेव्हा त्या शास्त्राला मात्र अॅस्थॅटिक सर्जरी म्हणजेच सौंदर्य शल्यशास्त्र म्हणतात.
सौंदर्याची सापेक्षता जरी खरी असली तरी प्रत्येक गोष्टीचे काही ठोकताळे बांधले जातात, तसेच सौंदर्याचेही ठोकताळे आहेतच. प्राचीन काळापासून हे ठोकताळे बांधले जात असत. आपल्याकडच्या प्राचीन शिल्पांमधून जे सौंदर्य दिसतं तो नक्कीच या ठोकताळ्यांचाच परिणाम. चेहऱ्याच्या सौंदर्यासंदर्भात प्राचीन ग्रीकांचे काही ठोकताळे होते (Classical canons). बदलत्या काळाबरोबर हे ठोकताळेही बदलत गेले. पुढे रेनेसन्स (पुनरुज्जीवन) काळातल्या अभ्यासकांनी मानवी चेहऱ्याच्या प्रमाणबद्धतेचे काही नवे ठोकताळे (neo classical canons) बांधले.
फर्कास या सुघटनशल्य शास्त्रज्ञानं अनेक मानवी चेहऱ्यांचा अभ्यास केला आणि चेहऱ्यावरच्या कपाळ, नाक, कान, डोळे, ओठ, हनुवटी यांसारख्या विविध अवयवांची मोजमापे घेतली. त्या मापनांचा  संख्याशास्त्रीय अभ्यास करून त्यावरून त्याने प्रमाण मापने काढली. त्यासाठी त्याला प्रत्येक वंशातील (युरोपीयन, आशियायी, आफ्रिकन वगरे) चेहऱ्यांचा वेगळाला अभ्यास करावा लागला. त्या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांवरून या प्रमाण मापनानुसार असणारे चेहरे हे त्या वंशातील आदर्श सौंदर्य असा ठोकताळा त्यानं बसवला.
सौंदर्य खरंच अशा संख्याशास्त्रीय विश्लेषणातून निघालेल्या ठोकताळ्यांनुसार असू शकतं का? हा विचार कालांतराने जन्माला येणं स्वाभाविकच होतं. अमेरिकेतील जॉन्स्टन आणि फ्रँकलीन या दोन शास्त्रज्ञांनी ‘फेस िपट्र’चा शोध लावून जुन्या संशोधनावर विचार करायला लावला आहे. त्यांनी कॉम्प्युटर सायन्सच्या मदतीने सर्वसामान्यत: आकर्षक वाटतील अशा चेहऱ्यांची निर्मिती केली, जे आधीच्या प्रमाण चेहऱ्यांपेक्षा बरेच वेगळे होते.
तरीही सौंदर्याला अमुक एका व्याख्येत बांधणं खरंच अशक्य आहे आणि म्हणूनच सौंदर्यशल्य किंवा अॅस्थॅटिक सर्जरी या शास्त्राच्याही काही मर्यादा आहेत. मात्र पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत कुठल्याही अवयवाला हे शास्त्र आकारात आणू शकतं. सौंदर्याचा सगळ्यात जास्त संबंध चेहऱ्याशी येत असल्याने चेहऱ्यापासूनच सुरुवात करू.
वाकडं वा बसकं नाक म्हणजे सौंदर्याला फारच हानीकारक मानलं जातं. त्यासाठी सौंदर्यशास्त्रात नासिका घटन वा ‘ऱ्हायनोप्लास्टी’ (Rhinoplasty) ही शस्त्रक्रिया आहे. डोळ्याभोवती वा चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या येतात त्यासाठी कायाकल्प म्हणजे ‘ब्लेफरोप्लास्टी’ (Blephoroplasty) आणि ‘फेसलिफ्ट’ (facelift) या शस्त्रक्रिया आहेत. त्याचप्रमाणे शरीरावर ठराविक ठिकाणी चरबी साठू लागते. भारतीय ‘फिजिकल टेण्डसी’चा विचार केला तर पोट, कंबर, नितंब आणि दंडांवरचं मांस चटकन वाढतं. ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी फक्त हवा-पाण्यावर राहा किंवा जिममध्ये घाम गाळा असं केलं तरी ठराविक मर्यादेपलीकडे त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी अनावश्यक चरबी शोषून काढावी लागते. यासाठी ‘सक्शन असिस्टेड लायपोक्टमी’ (suction assisted Lipectomy) ज्याला व्यावहारिक भाषेत ‘लायपोसक्शन’( liposuction) म्हणूनही ओळखलं जातं.
उन्नत उरोज हाही एक सौंदर्याचा मापदंड समजला जातो. त्यासाठी ‘ऑगमेंटेशन मॅमोप्लास्टी’ (Augmentation Mammoplasty) ही शस्त्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे उरोजांचा आकार कमी करून त्यांना सुडौल करण्यासाठी ‘रिडक्शन मॅमोप्लास्टी’ (Reduction mammoplasty) ही शस्त्रक्रिया केली जाते.
केस गळणं, टक्कल पडणं, हा तर तमाम स्त्रियांचाच नाही तर पुरुषांचादेखील जिव्हाळ्याचा विषय. चांगल्या डॉक्टरकडे जाऊन केश पुन:स्थापन म्हणजेच ‘हेअर रिस्टॉरेशन’ (hair restoration) करून घेता येईल. डोक्यावरचे केस गळू लागले की टेन्शन येतं, पण चेहऱ्यावर इतरत्र कुठे अनावश्यक केस उगवू लागले, की तोसुद्धा चिंतेचा विषय होतो. विशेषत: स्त्रियांच्यात. त्यांच्यासाठी ‘लेझर ट्रीटमेंट’ (’lezer) आहे. अनेक कारणांनी त्वचा विशेषत: चेहऱ्याची त्वचा खडबडीत होते. सौंदर्यालयात त्यावर कितीही उपचार केले तरी त्यांची मर्यादा तितकीच. त्यासाठी सौंदर्य शल्यशास्त्रात ‘डर्माब्रेजन’ (Dermabrasion) ही शस्त्रक्रिया आहे.
हे तर एकेका अवयवासंदर्भात झालं. या शास्त्राच्या मदतीने संपूर्ण चेहरा मोडून परत बसवला जाऊ शकतो, अगदी मेकॅनोच्या खेळासारखा! त्यासाठी चेहऱ्याचा अस्थिपंजर काहीसा खिळखिळा करुन ही हाडे सलग अवस्थेत किंवा त्याचे तुकडे मागे-पुढे-तिरपे हवे तसे हलवून, नव्या प्रमाणात परत जोडून चेहऱ्याचा घाटही बदलता येतो.
या शस्त्रक्रियेत विसंगत अस्थिरचना बदलून ‘सुसंगत’ (Harmonize) केली जाते. ती रचना ‘भिन्न’ (Different) होऊच शकत नाही, म्हणजे ज्या चेहऱ्यावर ही शस्त्रक्रिया होईल तो चेहरा सुंदर होईल, पण वेगळा होणार नाही. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर, ‘अ’च्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली असता ‘अ’चा सर्वसाधारण चेहरा नीटनेटका, सुंदर किंवा अप्रतिम सुंदर होईल, पण चेहरा मात्र ‘अ’चाच राहील. तो चेहरा ‘ब’चा होणार नाही.
आता व्यावहारिक भाषेत सांगायचं तर, आजच्या किती तरी मालिकांत त्यांच्या सोईनुसार कलाकार बदलतात आणि त्याची प्लास्टिक सर्जरी झाली म्हणून लेबल चिकटवून देतात. हे असे बदल होत नाहीत हे मुद्दाम सांगावंसं वाटतं. निदान आज तरी असा चेहरा पूर्णत: बदलण्याची किमया हे शास्त्र करू शकत नाही. आज तरी म्हणण्याचं कारण आजची विज्ञानामधली प्रगती बघता उद्या काहीही चमत्कार घडू शकतात.
(लेखक अॅस्थेटिक सर्जन आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा