मुलं-मुलींना आपला जोडीदार निवडायला वेळ नसेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी. प्राथमिक निवड आणि भेटणे यासाठी जर त्यांना वेळ नसेल तर लग्न हा त्यांचा प्राधान्यक्रम नसून पालकांचा आहे हे मनोमनी लक्षात ठेवायला हवे.
‘‘गेली तीन वर्षे आम्ही स्थळे पाहात आहोत, पण कुठेच काही जमत नाही. मला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. आम्ही आम्हाला आवडलेल्या स्थळांना अ‍ॅप्रोच होतो. पण त्यांच्याकडून काही उत्तरच येत नाही. आमचं कुठे काही चुकतंय का, तेही कळत नाही.” मंदार सांगत होता.  
 “तुम्ही स्थळं कशी शोधता?” मी.
मंदारची आई एकदम उत्साहात सांगू लागली. आम्ही ज्या वधू-वर केंद्रात नाव नोंदवले आहे, ते केंद्र सोमवारी बंद असते. त्यामुळे मी मंगळवारी अगदी केंद्र उघडायच्या वेळीच तिथं जाते. तिथे काही याद्या आहेत त्यात एका वाक्यात (वन लाइन समरी ) मुलीची माहिती दिलेली असते. तिचं नाव, शिक्षण, नोकरी, पगार, जात-पोटजात, जन्मतारीख, उंची, गोत्र .. बस. एव्हढं पाहिलं आणि पटलं की मग त्या मुलींचे फोटो पाहायचे. १० मिनिटात शॉर्टलिस्ट तयार. आणि मग त्या  मुलीच्या आई किंवा वडिलांना फोन करायचे. ३/४ दिवस वाट पाहायची. बहुतेक वेळा त्यांची उत्तरं येत नाहीतच. मग परत त्या सगळ्यांना फोन करायचे. म्हणजे मुलाची बाजू असून आम्हीच फोन करायचे. तसं आता काही मुलाची बाजू मुलीची बाजू असं काही राहिलं नाहीये म्हणा, पण..”
मी विचारात पडले. संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्तीबरोबर राहायचं त्याच्या एका ओळीतल्या माहितीवर अवलंबून राहायचं? फक्त वय, उंची, शिक्षण, पगार एवढय़ाच गोष्टी पुरेशा आहेत? ३०/४० वर्षे ज्या माणसाबरोबर राहायचं त्याची पूर्ण माहिती नको असायला? मुळामध्येच तो माणूस कसा आहे? त्याच्या आयुष्याचं ध्येय काय आहे? तो / ती निव्र्यसनी आहे का? तो रसिक आहे का? आयुष्य सर्वागानं जगावं वाटतं का?  हे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत का?
माझ्या मते स्थळ शोधण्याची सर्वात चुकीची, स्वत:ची चिंता वाढवणारी आणि मुला/मुलींचे लग्न लांबवण्याची शक्यता वाढविणारी ही पद्धत आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की  पालकांना चुकीच्या पद्धतीने जाण्यात स्वारस्य आहे. भारंभार स्थळं पाहणं आणि संपूर्ण माहिती न वाचताच संपर्क करणं या गोष्टी लग्न लवकर न जमण्यासाठी कारणीभूत आहेत हे लक्षात येत नाही. उदा. नितीन. त्याचे सीए पूर्ण झालेले नाही. घरातल्या कुठल्या तरी समस्येमुळे शेवटचा एक ग्रुप राहिला आहे. पण त्याच्या कर्तृत्वाने तो एका कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. पगार उत्तम आहे. पण त्याच्याकडे कोणी जातच नाही.
सुजाताचे आई-वडील विभक्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्या माहितीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पण अनेक वेळा माहिती पूर्ण न वाचता संपर्क केला जातो. आणि मग ज्या वेळी प्रत्यक्ष याबद्दल समजतं त्या वेळी ‘‘अरे बापरे असं आहे का? नको नको ‘असलं’ स्थळ नको आम्हाला.’’ अशा शब्दांत हेटाळणी केली जाते. सुजाताच्या आई म्हणाल्या की, ‘‘माझा घटस्फोट झाला आहे म्हणजे मी फार मोठा गुन्हा केलाय असं वाटतं मला आता.’’ असे अनुभव आल्यामुळे सुजाताची आई सुरुवातीलाच विचारते की, ‘‘तुम्ही माहिती नीट वाचली आहे ना?’’
स्थळे शोधण्याची पहिली पायरी म्हणजे स्थळाची माहिती पूर्ण वाचणे. त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख असू शकतो. बहीण भावांच्या आजारपणाचा उल्लेख असू शकतो. त्या मुलाचे / मुलीचे ऑपरेशन झालेले असू शकते.
त्यानंतर त्यांच्या अपेक्षा काय आहेत याचा विचार करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले स्थळ त्याच्या अपेक्षांमध्ये बसत आहे का ते पाहणे. स्थळे निवडताना इथे सगळ्यात मोठा घोटाळा होतो, आपल्याला आवडलेली स्थळे निवडली जातात आणि त्यांना संपर्क केला जातो आणि ती त्यांच्या अपेक्षेत बसत नसल्याने ते उत्तरच देत नाहीत, मग चिडचिड व्हायला सुरुवात होते. यासाठी माझा नवरा महेंद्र एक छान उदाहरण देतो. जसे आपण एखाद्या महागडय़ा हॉटेलमध्ये गेलो आणि एखाद्या शाही डिशची ऑर्डर द्यायची असेल तर आपण मेनू कार्ड उजवीकडून डावीकडे वाचतो त्याप्रमाणे आपल्याला आवडलेलं स्थळ त्यांच्या अपेक्षांकडून वाचावे. म्हणजे भ्रमनिरास होण्याची शक्यता जरा कमी आहे.
त्याचप्रमाणे चांगल्या फोटोग्राफरकडून फोटो काढून घ्यावा. तो क्लोजअप असावा. अनेकदा वधू-वर स्वत:चे फोटो काढून घ्यायला राजी नसतात. अभिजित परदेशात काम करणारा. त्याची आई त्याचा फोटो घेऊन आली होती. त्या फोटोत तो दिसतच नव्हता. पाश्र्वभूमीवर त्याची मोठी मोटारगाडी होती. पूर्ण उभ्या आकाराचा फोटो होता. आणि डोळ्यावर गॉगल होता. एक साधारण कल्पना येण्यापुरता फोटोचा उपयोग जरूर करावा. पण फक्त फोटो पाहून स्थळ रिजेक्ट करू नये. कारण फोटोमधून फक्त फीचर्स कळतात, व्यक्तिमत्त्व नाही. अनुयाची आई कोणत्या तरी  मंडळात जाऊन स्थळं उतरवून आणत असे. घरी अनुया साइटवर ती स्थळे पाहत असे, आणि जवळजवळ प्रत्येक स्थळावर शेरे मारत असे. तिला एखादा मुलगा बावळट वाटत असे, कुणाच्या डोक्यावरचे टक्कल तिला जाणवे, कुणाचे डोळे पिचपिचे वाटत. बरं कधी मुलगा बरा वाटला तर पत्रिका जमत नसे.
अनेकदा ही फीचर्सची निवड पालक मंडळीच करतात. (त्याला / तिला कोणती व्यक्ती आवडेल ते आम्हाला ठाऊक आहे, असं छातीठोकपणे सांगणारी पालक मंडळी पाहिली की  म्हणावंसं वाटतं देवाची करणी!)
 फोटो पत्रिका हेही लग्न न जमण्यातले मोठे अडथळे आहेत. पत्रिका हा तर इतका मोठा गहन विषय आहे की त्यावर जितकं लिहीन तितकं कमीच आहे. मृत्यू षडाष्टक योग, सगोत्र, एक नाडी, अमकं नक्षत्र नको, तमका गण नको .. आता तर नवीनच .. योनीसुद्धा पाहतात म्हणे. वैशालीची आई म्हणाली, ‘‘नको, त्याची मार्जार योनी आहे. आणि माझ्या मुलीची मूषक योनी आहे. तुम्हीच सांगा कसे चालेल? ’’
तर प्रसाद म्हणाला, ‘‘मला वृषभ राशीची मुलगी नको.’’
 म्हटलं, ‘‘का रे बाबा?’’
‘‘अहो, माझ्या आईची पण वृषभ रास, दोन बल एका घरात? कसे व्हायचे? ’’
 पत्रिकेतल्या मंगळाने तर हलकल्लोळ माजवला आहे. ठराविक घरात मंगळ दिसला रे दिसला  की लोक ते स्थळ हातातून खालीच ठेवतात. पण पत्रिका पाहताना कोणताही एक ग्रह एक रास पाहून चालत नाही, असं अनेक ख्यातनाम ज्योतिषी सांगतात. आणि कितीही पत्रिका पाहिली तरी नियती बदलता येत नाही असेही सांगतात, पण लक्षात कोण घेणार? ज्या वेळी पालक मुलेमुली (सुद्धा) पत्रिका पाहण्याचे थांबवतील त्या वेळी लग्न लवकर जमण्याच्या शक्यता वाढतील.
 तसेच स्थळ नवीन असलं की भरघोस प्रतिसाद, आणि जुनं झालं की संपलं सगळं.. अशी परिस्थिती दिसते. जुन्या स्थळांच्या अपेक्षा कालानुरूप बदलतात हे लक्षात घ्यायला हवे. जोपर्यंत त्याचं व तिचं लग्न ठरत नाही तोपर्यंत ते स्थळ पाहणाऱ्याच्या दृष्टीनं नवीनच नाही का?
 अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला आरशासमोर ठेवून सर्वार्थाने नीट निरखायला हवे. नीरजा ४ फूट ११ इंच उंचीची.. पण तिला नवरा मात्र किमान ५ फूट ६ इंचवालाच पाहिजे. कारण त्यांची पुढची पिढी उंच झाली पाहिजे. इच्छा चांगली आहे, पण ५ फूट ६ इंचच्या मुलाला मुलगी किमान ५ फूट ३ इंचवाली हवी असते.
माधव सावळा, पण त्याला मुलगी मात्र उजळ गोरी हवी आहे. या त्याच्या अटीमुळे लग्न लांबणीवर.
सिद्धी फक्त बी. ए. तिला पगार ५००० रुपये, पण तिला नवरा आय.टी.मधलाच हवा. आणि तोसुद्धा ५० हजारपेक्षा जास्त कमावणारा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थळं शोधायची कामगिरी आपल्या उपवर मुला / मुलींवरच सोपवली पाहिजे.
पालकच सांगतात, अहो, त्यांना वेळ नाही. पण लग्न ही  ‘वेळ देण्याची’ गोष्ट आहे.  जर आपण त्यासाठी पाहिजे तेव्हढा वेळ देणारे नसू तर लग्नाचा योग येण्याची वेळ लांबणार आणि स्वत:वरचा ताण आपण वाढवत राहणार.
मुलं-मुलींना आपला जोडीदार निवडायला वेळ नसेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी. प्राथमिक निवड आणि भेटणे यासाठी जर त्यांना वेळ नसेल तर लग्न हा त्यांचा प्राधान्यक्रम नसून पालकांचा आहे हे मनोमनी लक्षात ठेवायला हवे.
 स्थळे गमावण्याच्या कलेतून माणसे बाहेर कधी येणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.. !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा