हेमलता ठाकूर
नाती जपणं असो की नोकरी-व्यवसाय, त्यात चढ-उतार हे असायचेच; पण त्यात यश हवं असेल तर मात्र संयम ही त्याची गुरुकिल्ली आहे.
‘‘माझा निभाव नाही लागणार या शहरात आई. सगळंच कठीण वाटतंय मला.’’ विभा फोनवर आईशी बोलत होती. ‘‘तू असं बोलायला लागलीस की माझा जीव टांगणीला लागतो.’’
‘‘काय करू मग? मला काहीच जमत नाहीये. ना प्रवास, ना काम, त्यात माझा तो बॉस म्हणजे तिरसट आहे अगदी. त्याचं नाव प्रशांत नाही अशांत असायला हवं होतं. सतत चिडलेला असतो. कुणाशी बोलू तेच कळत नाही.’’
‘‘अगं, तूच म्हणालीस ना, एकीशी ओळख झाली आहे, काय बरं नाव तिचं?’’ विभाची आई समजुतीच्या स्वरात म्हणाली.
‘‘रेवती. अगं, तिचंही काही खरं नाही. कॅन्टीनमध्ये चार दिवस भेटलो आम्ही. ती दुसऱ्या टीममध्ये आहे आणि मला तर वाटतं ती फक्त माझ्या डब्यातलं लोणचं खायला मिळावं म्हणून जवळ बसते. बाकी स्वत:विषयी ना तिनं काही सांगितलं, ना माझ्याविषयी फारसं विचारलं.’’
‘‘एक काम कर, तुझ्या सामानात एक पिवळय़ा रंगाची छोटी बरणी दिली होती मी. नुकतंच घातलेलं लोणचं आहे त्यात. ती उद्या घेऊन जा तिच्यासाठी.’’ विभाची आई उत्साहानं म्हणाली.
‘‘आई, काहीही काय! चार दिवसांच्या तोंडओळखीत भेटी देतं का कोणी?’’
‘‘अगं, तेवढंच निमित्त होईल ओळख वाढवण्याचं. घेऊन तर जा!’’
‘‘बघते मी, चल, झोप तू.’’ आईला सांगून विभानंही उशीवर डोकं ठेवलं.
ऑफिसला जाण्याची तयारी करत असलेल्या विनयकडे पाहात रेवती म्हणाली, ‘‘आपण घटस्फोट घेऊ या. आपले स्वभाव नाही जुळत.’’ रेवतीच्या अचानक आलेल्या या वाक्यावर विनय कमालीचा हादरला.
‘‘तू बरी आहेस ना? अगं, क्षुल्लक गोष्टीवरून वाद होताहेत आपले. किती टोकाला जातेस. दोघांचं चुकत असेल.. बसून बोलू आपण, सोडवता येण्यासारखे आहेत प्रश्न.’’ विनयची अस्वस्थता त्याच्या आवाजात जाणवत होती.
‘‘सहा महिन्यांत किती वेळ काढलास तू माझ्याशी बसून बोलायला?’’ रेवतीनं आवाज चढवला.
‘‘अर्धाअधिक वेळ तू तुझ्या माहेरी असतेस, मी एकटय़ानं वेळ काढून काय होणार?’’ विनयनं प्रत्युत्तर दिलं.
‘‘आलास ना माझ्यावरच शेवटी! म्हणजे माझीच चूक आहे सगळी. लग्न झालंय म्हणून मी माहेर सोडून देऊ की काय, आजही जाणार आहे मी आईकडे, तू कोण मला रोखणारा?’’ म्हणत रेवतीने दरवाजा आपटला आणि घराबाहेर पडली.
ऑफिससाठी निघताना विभानं लोणच्याची बरणी घेतली. फारसा रुचला नसला तरी त्यात काही नुकसान नसल्यानं आईचा सल्ला तिनं मानला होता. प्रशांतच्या केबिनमध्ये सकाळपासूनच मीटिंगचं सत्र चालू होतं. विभाचं लक्ष मात्र कामापेक्षा लंच टाइमकडे लागलं होतं. कॅन्टीनमध्ये बसून रेवतीची वाट पाहत विभा बराच वेळ बसून होती. खूप उशिरानं आलेल्या रेवतीला पाहून विभाला हायसं वाटलं.
‘‘हे घे, आईने केलंय. तुला लोणचं आवडतं ना, म्हणून!’’ म्हणत तिनं रेवतीपुढे लोणच्याची बरणी धरली. ती बरणी घेत रेवतीने थोडा संकोच व्यक्त केला. असं चटकन जवळीक साधणं रेवतीच्या स्वभावाला मानवणारं नव्हतं, पण इथे विषय लोणच्याचा होता! एवढय़ात विभाचा फोन वाजला. तिच्या आईचाच फोन असल्याचा अंदाज बांधून ‘माझ्याकडून थँक्यू सांग,’ असं रेवती तिला खुणेनं सांगू लागली. मात्र विभानं ‘तूच सांग’ म्हणत तिच्याकडे फोन दिला. रेवतीला जरा अवघडल्यासारखं झालं; पण तरीही तिनं फोन घेतला.
‘‘काकू, खूप खूप आभार. नुसत्या वासानंच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय! आजच ही बरणी अर्धी होईल असं वाटतंय.’’ रेवतीच्या आवाजात अधीरता होती.
‘‘पण त्यासाठी मात्र तुला जरा कळ सोसावी लागेल. नुकतंच घातलेलं लोणचं आहे ना! अजून २-३ आठवडे लागतील ते मुरायला. ते नीट मुरू दे, घाई करू नकोस, मगच खायला मजा येईल. तोवर विभा आणेल तुझ्यासाठी, दोघी भेटत जा, तेवढीच ओळख वाढेल.’’ विभाच्या आईनं त्यांचा सुप्त हेतू नकळत व्यक्त केला. पुन्हा एकदा आभार मानत विभाकडे फोन देत ती निघून गेली. अपेक्षेप्रमाणे रेवती गप्पा मारायला न थांबल्यानं विभाची मात्र चिडचिड झाली.
‘‘बघ, इथे सगळे कामापुरते वागतात. मला नाहीच जमणार इथे दिवस काढणं. मी आजच टीम लीडरशी बोलते, पुन्हा आपल्या शहरात बदली करण्याबद्दल.’’ विभाच्या नाराजीवर फारसं काही न बोलता आईनं फोन ठेवला.
संध्याकाळी उशिरा प्रशांतच्या केबिनमध्ये शिरताना विभाचा जीव खाली-वर होत होता. ‘‘नवीन आलेल्या आहात, पण साधे नियम माहीत नाहीत का? तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्याशी बोलायला मी रिकामा बसलोय का इथे? अपॉइंटमेंट घ्या आधी.’’ प्रशांतच्या या बोलण्यावर विभाला हुंदका फुटला. काहीही न बोलता ती केबिनमधून बाहेर पडली.
प्रशांतनं घडय़ाळ पाहिलं. निघण्याची वेळ झाली होती, पण त्याच्या भणभणत्या डोक्याला शांत करण्यासाठी त्याला चहाचा आधार घ्यावासा वाटला. कोपऱ्यातल्या चहाच्या टपरीवर जाता जाता निखिलनं हाक मारली. ‘‘काय रे, निघाला नाहीस अजून?’’ निखिलनं त्याला विचारलं.
‘‘चहा घेतो आधी आणि मग जातो. तू येतोस? चल एक एक कटिंग घेऊ.’’ निखिलनं हातातल्या स्मार्ट-वॉचकडे पाहिलं. ‘‘जरा घाईत आहे, पण चल येतो,’’ म्हणत त्यानं प्रशांतच्या खांद्यावर हात टाकला. त्या दोघांना पाहून चहावाला ओळखीचं हसला.
‘‘डोकं आऊट झालंय मघापासून.’’ प्रशांत रिव्ह्यू मीटिंगबद्दल बोलत असावा, याचा अंदाज निखिलला आलाच.
‘‘मलाही झापलंय त्यांनी. You can still do better म्हणे; पण माझ्या सगळय़ा डेड-लाइन मी पाळतो, त्यामुळे त्यांच्या त्या कमेंटकडे मी फारसं लक्ष नाही देत.’’
‘‘तुझी टीम तरी बरी आहे. माझ्याकडे तर सगळे बिनडोक भरलेत. घसा फोडून सांगितलं तरी कामं करत नाहीत आणि बॉस मला म्हणतो, ‘पीपल मॅनेजमेंट स्किल सुधार’ म्हणून.’’ प्रशांतनं संताप व्यक्त केला.
‘‘काय साहेब, कशाला एवढं टेन्शन घेता?’’ दोघांना चहाचे ग्लास देता देता चहावाला म्हणाला.
‘‘अरे, ऑफिसचं टेन्शन काय असतं तुला काय समजणार! चहा बनवण्याइतकं सोप्पं नाही ते.’’ प्रशांत चहावाल्यावरच चिडला.
‘‘साहेब, आपल्याला कामावरून ऐकवायचं नाही बरं का. हे बघा, ही साखर, चहा पावडर, आलं, दूध सगळय़ाचा वेगवेगळा फ्लेवर सांभाळायचा आणि चहा उकळवताना परफेक्ट टाइमाला गॅस बंद करायचा, हे टेक्निक वाटतं तेवढं सोप्पं नाही साहेब.’’ चहावाल्यानं स्वत:च्या कामावरचं प्रेम व्यक्त करत सडेतोड उत्तर दिलं. निखिलनं चटकन पैसे देत दोघांना शांत केलं आणि चहा संपवत प्रशांतचा निरोप घेतला. प्रशांत चहा संपवून सावकाश केबिनमध्ये परतला आणि बॅग घेत बाहेर पडला. त्याच्या टीममधली मंडळी कधीच निघाली होती. ती मघाशी आलेली नवीन मुलगीसुद्धा त्याला दिसली नाही. प्रशांतला विभाचं नावही आठवलं नाही. विभा मात्र ट्रेन स्टेशनवर रडत उभी होती. गाडी आली आणि गर्दीबरोबर तीसुद्धा डब्यात ओढली गेली.
‘‘बैठो ना, जगह हैं तो.’’ समोरच्या बाकावरच्या बाईनं विभाला हातानं बसण्याची खूण केली.
तीन बाकांच्या जागेत चौथी व्यक्ती बसू शकते, हे विभा गेले काही दिवस पाहात होती; पण तिला ती कल्पनाही सहन होत नव्हती.
‘‘नही मुझसे नहीं होगा, बहुत अन्कम्फर्टेबल हैं वो सीट।’’ विभानं त्या बाईकडे पाहात म्हटलं.
‘‘अरे, पहलेसेही तय कर लोगे तो कुछ भी नहीं होगा! कम्फर्टसे बाहर निकलो. दिक्कत होगी, लेकिन थोडा बरदाश्त करोगे तो धीरे धीरे सीख जाओगे।’’ त्या बाईनं स्वत:चा मुद्दा सोडला नाही. तिच्या अधिकारवाणीला मानत विभा कशीबशी बाकावरच्या त्या वीतभर जागेत बसली. ‘‘वाटलं होतं तितकं अवघड नव्हतं तर हे असं बसणं.’’ विभा स्वत:शीच कुजबुजली.
तिने पर्समध्ये वाजणारा फोन बाहेर काढला, तर आईच होती. ‘‘काय गं, बोललीस का साहेबांशी बदलीचं?’’
‘‘आई, मला काय वाटतं, जरा अजून प्रयत्न करायला काय हरकत आहे? तसंही मुंबईसारख्या मोठय़ा शहरात काम करण्याचं माझंच स्वप्न होतं ना!’’ विभा चौथ्या सीटवर आता जरा स्थिरावून बसली होती. विभाचा नूर अचानक कसा बदलला हे कोडं तिच्या आईला उलगडलं नाही.
प्रशांतनं कॅबमध्ये बसत लॅपटॉप काढून सोमवारी
१० वाजताच्या मीटिंगचा मेल टाइप केला आणि टीम-लंचच्या प्लॅनिंगबद्दल सूचनाही मागवल्या. त्याच्या जिभेवर चहाची चव आणि डोक्यात त्या चहावाल्याचे शब्द अजूनही रेंगाळत होते..
रेवती आईकडे न जाता घरी आलेली पाहून विनयला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विभानं दिलेली लोणच्याची बरणी टेबलवर ठेवत तिनं विनयकडे पाहिलं. लोणचं म्हणजे त्याचाही वीक पॉइंट! त्यानं बरणीला हात लावला तशी रेवती म्हणाली, ‘‘अरे, लगेच खाता येणार नाही ते, अजून २-३ आठवडे लागतील त्याला छान मुरायला.’’
‘‘म्हणजे तेवढा वेळ आपल्याकडेही आहे ना?’’ विनयच्या आवाजातला ओलावा रेवतीनं नजरेनं टिपला.
ठरल्याप्रमाणे निखिल वेळेत हॉटेलमध्ये पोहोचला. जवळपास आठ दिवस डेटिंग अॅपवर गप्पा मारून आज त्यांनी भेटायचं ठरवलं होतं; पण ती पोहोचली नव्हती. व्यवस्थित १० मिनिटं वाट पाहून अकराव्या मिनिटाला हॉटेलमधून बाहेर पडत निखिलनं बाइकवरून घर गाठलं. सोसायटीच्या पार्किंगमध्ये बाइक लावत असताना तिचा फोन आला. तिला बोलूही न देता तो म्हणाला, ‘‘मला दिलेल्या वेळा पाळायला आवडतात. मला वाट पाहायला अजिबात आवडत नाही.’’ निखिल अलिप्तपणे म्हणाला.
‘‘वेळ पाळायला मलाही आवडतं, पण समोरच्याची बाजू ऐकून घेणंही महत्त्वाचं असतं. ती समज कदाचित तुझ्यात नाही. गुड बाय.’’ म्हणत तिनं फोन ठेवला.
निखिलनं ‘युजलेस’ असं म्हणत मान झटकली, तर समोरून मोहनकाका येताना दिसले.
‘‘अरे काका, कुठे चाललात एवढय़ा उशिरा?’’
‘‘अरे, जरा मार्केटला जाऊन येतो, तुझ्या काकूला थोडं सामान हवंय आणि फुलंसुद्धा.’’ मोहनकाका म्हणाले.
‘‘अहो काका, मार्केटमध्ये किती वेळ जाईल तुमचा. शिवाय त्या फुलवाल्याकडच्या गर्दीत वाट पाहण्यापेक्षा इथे मिनिटात काम होईल एका क्लिकवर.’’ निखिलनं सुपरमार्केटचं अॅप सुरूसुद्धा केलं होतं.
‘‘अरे, वाट पाहण्यात पण गंमत असते वेगळी! तू आज रात्री घरी ये. तुझ्या आईला सांगितलंय मी.’’ असं म्हणत मोहनकाका निघून गेले.
निखिल लवकर आलेला पाहून त्यांची भेट लवकर आटपली की अजून काही..? असे प्रश्न त्याच्या आईला पडले, पण त्याचा रागरंग पाहून तिनं त्याबद्दल चौकशी केली नाही. तो फ्रेश झाल्यावर मोहनकाकांकडे रात्री १२ च्या सुमारास जायचंय, हे मात्र तिनं सांगितलं. ‘‘का गं, काय गडबड? काका भेटले मला आता येताना.’’ निखिल म्हणाला.
‘‘अरे त्यांच्याकडच्या ब्रह्मकमळाला आलेली फुलं आज फुलतील. ते पाहायला बोलावलं आहे. फार दुर्मीळ योग असतो म्हणे हा!’’
‘‘नक्की किती वाजता फुलतील ती फुलं ते सांग मला. मी तेव्हा येतो. आधीच जाऊन काय फायदा?’’ निखिलने पळवाट शोधली.
‘‘अरे, नेमकी वेळ सांगायला ते काय पिझ्झा डिलिव्हरी अॅप आहे का, त्याची नोटिफिकेशन दिसायला? मी सांगेन तेव्हा चल गुपचूप.’’ निखिलच्या आईनं ताकीद दिली.
१२ च्या सुमारास सगळे शेजारी मोहनकाकांच्या बाल्कनीत जमले होते. निखिलच्या हातात कॅमेरा देत मोहनकाकांनी जबाबदारी सोपवली. निखिलनं बाल्कनीत अचूक जागा पाहून कॅमेरा सेट केला. सगळेच जण त्या क्षणांची आतुरतेनं वाट पाहू लागले. मध्यरात्रीच्या गडद प्रहरी ती पांढरी शुभ्र फुलं उमलताना पाहणं हा खरंच रोमांचकारी अनुभव होता. वाट पाहण्यातलं थ्रिल निखिलनं पहिल्यांदाच अनुभवलं.
सगळे हॉलमध्ये जमले तेव्हा सर्वासाठी गरमागरम कॉफीची फर्माईश मोहनकाकांनी शुभदाकाकूंकडे केली.
वाफाळते कॉफीचे कप प्रत्येकाला देत ‘कॉफी स्ट्राँग वाटली तर सांगा, साखर आणते,’ असं काकू म्हणाल्या. निखिलच्या आईनं ‘मला लागेल हं साखर,’ म्हणत त्यांच्या हातातून कप घेतला. तोवर गरम कॉफीचा चटकन घोट घेतल्यानं निखिलला चांगलाच चटका बसला. ‘‘अरे हळू!’’ काका ओरडले.
‘‘शुभदा, जरा एक चमचा साखर आण निखिलच्या आईसाठी आणि निखिलसाठी चमचाभर संयम!’’
काकांच्या या वाक्यावर सगळेच मनापासून हसले.
hemalees@gmail.com