प्रतिभा वाघ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
plwagh55@gmail.com
‘सरगुजी शैली’ची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. सुरुवात केली ती सोनाबाई रजवारने. उपजत असलेल्या कलात्मक दृष्टीमुळे तिने मातीची खेळणी बनवायला सुरुवात केली. हळूहळू सोनाबाईने या कलेला अद्वितीय उंचीवर नेले. आणि हळहळू तिची ओळख चित्रकर्ती म्हणून झाली. राष्ट्रपती पुरस्कार तर मिळालाच, पण देश-परदेशात प्रदर्शने भरू लागली. तिच्या गावालाही ओळख मिळाली आणि अनेक कुटुंबे ही सरगुजी शैलीवर काम करू लागली.. तिच्या आणि तिच्या कलेविषयी..
मध्यवर्ती भारतातील छत्तीसगड राज्यात केनापरा नावाचे छोटेसे गाव आहे. सख्खी आणि चुलत भावंडे मिळून १६ बहीणभावात, १९२० मध्ये जन्म झालेली सोनाबाई मजेत बालपण घालवीत होती. गावातल्या इतर मुलींप्रमाणेच वयाच्या १४ व्या वर्षी तिचेही लग्न लावण्यात आले. पण ते एका ३० वर्षांच्या बीजवराशी. तिचे सरगुजा तालुक्यात सासर होते. याच सुमारास घरातील इस्टेटीच्या वाटण्या झाल्या आणि सोनाबाईच्या पतीने एकत्र कुटुंबातून बाहेर पडून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. घरात ती, नवरा आणि मुलगा दरोगाराम तिघेच. माहेर, सासर, शेजारीपाजारी यापैकी कुणाशीही संपर्क ठेवायचा नाही, असे त्याने सोनाबाईला बजावून ठेवले. सोनाबाई रजवारचे आयुष्य म्हणजे घरकाम करणे, मूल सांभाळणे, स्वयंपाक करणे आणि नवरा आणि मुलगा यांखेरीज तिसऱ्या माणसाचा चेहराही न बघणे असे झाले.
पूर्वी माणसांमध्ये रमणाऱ्या सोनाबाईला खूपच एकाकी वाटू लागले. हा बंदिवास तब्बल १५ वर्षांचा होता. ‘अखंड शांतता’ हीच तिची जणू सोबती होती. सर्वसाधारणपणे भारतीय स्त्रिया ज्या ठिकाणी राहतात, ती जागा, घर, अंगण चित्रित किंवा अलंकृत करण्याचा प्रयत्न करतात. सोनाबाईनेही तेच केले. सरगुजा रजवार जमात ही शेती करणारी असून, येथील माती ही या जमातीच्या जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. या मातीत पांढरी, तांबडी, लालसर, काळसर असे रंगही आढळतात आणि तिचे वेगवेगळे आकारही बनवता येतात. ‘छेरता उत्सव’ हा यांच्या समाजातला महत्त्वाचा उत्सव आहे. शेते पिकली की सुगीचा उत्सव साजरा होतो. डिसेंबर-जानेवारीत पौर्णिमेच्या दिवशी! त्यापूर्वी आपली घरे, भिंती यांची डागडुजी केली जाते. पुरुष दुरुस्तीचे काम करतात तर स्त्रिया भिंती रंगवून त्या सुंदर बनवितात. त्यावर झाडे, पाने, फुले, पक्षी यांची उठाव शिल्प बनवितात पण खूप मोठी आणि ठसठशीत!
सोनाबाईला व्यक्त होण्याचा मार्ग हवा होता. घराबाहेरच्या झाडांच्या खिडकीतून दिसणाऱ्या सावल्या ती पाहत बसे. त्यातून निर्माण होणारे विविध आकार, शोधत राही. विहिरीवर पाणी भरतांना, तिथला चिखल ती घरी घेऊन येई. त्यापासून आपल्या मुलांसाठी खेळणी बनवी. पण ही खेळणी जमिनीवर आपटल्यावर फुटत. मात्र त्या मातीत गवताच्या काडय़ा, धान्याची टफरले, तुसे मिसळून खेळणी बनवली तर ती तुटत नाहीत. हे लक्षात आल्यावर तिला नवे तंत्र मिळाले. माती आणि पाणी यात खेळण्यातच जणू तिचे मन रमू लागले. तिचे एकाकीपण घालवण्याचा जो मार्ग तिला मिळाला तो कलात्मक होता. आपल्या प्रतिभेची, क्षमतेची तिला अजिबात जाणीव नव्हती. माती पायाखाली रगडून त्याचे प्राणी, पक्षी, झाडे, घरे, माणसे असे कलात्मक आकार बनवू लागली. झाडाच्या डहाळ्या आणून त्यांची टोके झिजेपर्यंत चावून त्यांचे कुंचले तयार करी. घराबाहेर जाण्याची बंदी असल्यामुळे बाजारात जाऊन रंग आणणे अशक्य होते. त्यामुळे स्वयंपाकघरातील भांडय़ाची काजळी, हळद, भाजीची पाने अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर ती रंगविण्यासाठी करू लागली. कल्पकता आणि प्रयत्न यातून नवीन हस्तकला तिने निर्माण केली. पूर्वीच्या पारंपरिक, बटबटीत, मोठय़ा मूर्तींपेक्षा सोनाबाईने नाजूक, सुंदर कलात्मक मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिच्या घराचे रूपांतर एका सुंदर कलाकृतीत झाले. तिचा नवरा विक्षिप्त स्वभावाचा होता, संशयी होता. पण सोनाबाई त्याविषयी चकार शब्दही काढत नसे. तक्रार करीत नसे. फक्त जमेची बाजू इतकीच की त्याने तिच्या कलानिर्मितीला विरोध केला नाही आणि १५ वर्षांनंतर का होईना, १९६८ ला तिला बंदिवासातून मुक्त केले.
सोनाबाई निव्वळ चित्रकर्ती नव्हती तर वास्तुशिल्पकारही होती. उन्हाळ्यात घराचे तापमान ४६ ते ५२ अंश सेल्सियस असे. घरातील तप्त वातावरण थंड करण्यासाठी ती मार्ग शोधू लागली. बांधकामातले उरलेसुरले बांबू घराच्या आवारात पडले होते. त्याच्या पातळ पट्टय़ा कापून, त्या वाकवून तिने वर्तुळे तयार केली. ती एकमेकांना जोडून मध्ये मध्ये खांब उभे करून, त्याला मातीने लिंपून घेतले. पांढऱ्या चुनखडीच्या दगडाच्या वस्त्रगाळ केलेल्या भुकटीमध्ये पाणी मिसळून रंग तयार करून तो त्या जाळीला लावला. अशा प्रकारे जाळी तयार केली. ही जाळी म्हणजे कल्पकता, सौंदर्य आणि उपयुक्ततेचा त्रिवेणी संगम म्हणता येईल. जाळीत चिमण्या, पोपट हे पक्षी तिने बसविल्यामुळे त्या अधिकच शोभिवंत दिसू लागल्या. या जाळ्यांना ‘झिनझिरी कला’ असे नाव आहे. इथे सोनाबाई आपल्यासमोर येते ती चित्रकार, शिल्पकार, वास्तुरचनाकार, गृहसजावटकार आणि सौंदर्यशास्त्राचा दृष्टिकोन असलेली. सृजनकर्ती! माती, शेण मिसळून घराच्या भिंती लिंपणे, सजावट करणे हे इतर स्त्रिया पूर्वीपासून करीत होत्या, पण सोनाबाईने या कलेला अद्वितीय उंचीवर नेले. पशु, पक्षी, मानव, पाने, फुले, झाडे, जलचर यांच्या सुंदर रूपाने तिने आपल्या घराला ‘कल्पनालोक’ बनविले. सोनाबाईचे घर बाहेरून सपाट भिंती असलेले आणि आतून ‘आश्चर्यकारक दुनिया’असेच होते. तिचे व्यक्तिमत्त्वही असेच होते. बाहेरून साधे, अबोल, धीरगंभीर आणि अंतरंगी बोलके, स्वप्निल संसार असलेले! सोनाबाईचे काम साधे, सहज आणि शांत संवेदना निर्माण करणारे आहे. आजूबाजूच्या लोकांनी तिच्या घराच्या खिडकीतून जेव्हा पहिल्यांदा हा कल्पनालोक पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिच्या या कामाची चर्चा, कौतुक गावात होऊ लागले. १९८३ पर्यंत बाहेरच्या जगात तिला कुणीही ओळखत नव्हते.
दरम्यान, भोपाळमधील ‘भारतभवन’मध्ये आदिवासी आणि समकालीन कला यांचे संग्रहालय करायचे ठरविल्यानंतर दिल्ली येथील ‘क्राफ्ट म्युझियम’मध्ये कार्यरत असलेले अधिकारी मुश्ताफ खान आणि त्यांचे सहकारी कलाकृती रूपातील हे घर शोधत शोधत आले. या शोधामुळे संपूर्ण फुहपुत्रा गावातील रजवार लोकांच्या जीवनावर प्रभाव पडला. सोनाबाईच्या घराची छायाचित्रे घेण्यात आली. तिच्याकडील काही शिल्प संग्रहालयात ठेवण्यासाठी अधिकारी घेऊन गेले. त्यानंतर सहा महिन्यातच तिच्या कलाकृतींचे एकल प्रदर्शन ‘भारतभवन’मधील कलादालनात भरविण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी, १९८३ मध्ये मुलगा दरोगारामसह ती दिल्लीला राष्ट्रपती पुरस्कार घेण्यासाठी गेली. तर १९८६ मध्ये तिला ‘तुलसी सन्मान’ मिळाला.
सोनाबाईने वास्तुशिल्पाचा पाठ घालून दिला. तिचे घर म्हणजे चित्रमूर्तींचे जग. या मूर्तीना ती आपले मित्र, मैत्रिणी सहकारी म्हणते. ‘धान्याची अलंकारिक कोठी आणि त्यावरील चिमण्या’ ही तिची आवडती कलाकृती. ती म्हणत असे, ‘चिमण्या म्हणजे जीवनाचे प्रतीक आहे. त्या दाणे खाण्यासाठी येतात. दाणे असतील तर जीवन आहे.’ कळत नकळत शेतीचे आपल्या जीवनातील महत्त्व सोनाबाई सांगून जाते. आज ४० वर्षांहून अधिक वर्षे होऊनही सोनाबाईचे काम तिच्या घरात सुस्थितीत आहे. मुलगा त्यांची देखभाल करतो. दरोगाराम स्वत: कलावंत आहे. हे घर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. सोनाबाईचे घर हा गावाचा अभिमान आहे. तिची भारतात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये अनेक प्रदर्शने झाली आहेत. तिला हे तंत्र शिकविण्यासाठी सरकारतर्फे अनेक ठिकाणी पाठविले जाई. तिच्या शिष्यांपैकी पाच शिष्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. गावातील इतर लोकही याच पद्धतीने काम करीत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनाबाईची ही शैली ‘सरगुजी शैली’ म्हणून ओळखली जाते. आता संपूर्ण गावाचा कायापालट झाला आहे. पूर्वी अशिक्षित असलेल्या गावात आता शाळा आहे. गावाची सांपत्तिक स्थिती सुधारली आहे. सरगुजामध्ये ‘कलात्मक क्रांती’ घडली. विशेष म्हणजे कोणतेही प्रसिद्धी माध्यम, दलाल, व्यापारी यांच्या मदतीशिवाय!
अशक्य परिस्थितीतही तुटपुंज्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन सोनाबाईंनी सर्व स्त्रियांसाठी एका यशाचा मार्ग आखून दिला. तिच्या मृत्यूनंतर (२००७) सुंदरीबाई रजवार ही दुसरी शक्तीशाली स्त्री कलाकार फुहपुत्रा गावात उदयास आली. अर्थात दोन वेगवेगळ्या दशकात या दोन स्त्री कलाकारांनी दोन प्रकारे काम केले. सोनाबाईने कलेची नवीन भाषा शिकविली तर सुंदरीबाई रजवारने सरगुजी शैलीला वेगळी दिशा दाखवून वेगळ्या कोनातून काम केले. १९८३ च्या ‘भारतभवन’ स्थापनेनंतर मध्यप्रदेशातील अनेक आदिवासी कलावंत प्रकाशझोतात आले. त्यात सुंदरीबाई रजवारसुद्धा होती. सोनाबाई रजवारकडून प्रेरणा घेऊन तिने कलेला पुढे नेले. सुंदरीबाईच्या माहेरी मातीची घरे बांधणे, घरे दुरुस्त करणे हा कुटुंबाचा व्यवसाय होता. या परंपरागत व्यवसायामुळे सुंदरीबाईचे बालपण मातीत खेळण्यात गेले. लहानपणी ही मुलगी मातीपासून भांडी, कप अशी भांडी बनवी. नंतर हळूहळू पक्षी, पोपट, माकडे, फुले बनवू लागली. वयाच्या ११ व्या वर्षी केंदूराम यांच्याशी तिचा विवाह झाला. ते तिला खूप प्रोत्साहन देत. विविध प्रकारची अलंकृत फडताळे, भिंतीतील कपाटे सुंदरीबाई बनवीत असे. हळूहळू तिचे वैशिष्टय़पूर्ण काम पाहून तिला प्रसिद्धी मिळू लागली. १९८९-९० चा मध्यप्रदेश सरकारचा ‘शिखर सन्मान’ मिळाला. २००३ मध्ये इंग्लंड, २०१० मध्ये पॅरिस इथे तिची प्रदर्शने झाली. भोपाळचे जनजातीय संग्रहालय, राष्ट्रीय मानव संग्रहालय इथे तिच्या कलाकृती संग्रहित आहेत. सुरुवातीची हलाखीची परिस्थिती तिच्या कलेमुळेच बदलली. आता तिचे मोठे घर आहे, जे चित्रांनी भरून गेले आहे. पती, मुलगा, सून, नातवंडे सगळे ही कला शिकले आहेत. अजूनही काम करत आहेत. गेली ४० वर्षे सुंदरीबाई हा व्यवसाय करते. भित्तिचित्र हे रजवार कलेचे वैशिष्टय़ झाले आहे. देशात परदेशात त्यांच्या या प्रकारच्या चित्रांना मागणी आहे. ठरावीक काळात हे कलाकार आपल्या कलाकृती विकण्यासाठी प्रवास करतात.
सुंदरीबाईने ही व्यवसायाची दिशा ‘सरगुजी शैली’ला दाखविली. गावातील अनेक स्त्रियांना कला शिकविली. आज बॉबी आणि पवित्रा या शिष्या तरुण चित्रकर्ती हा वारसा पुढे नेत आहेत. सुंदरीबाईची शिष्या, पवित्रा प्रजापती मला २०१९ च्या डिसेंबरमध्ये रायपूरला एका प्रदर्शनात भेटली. तिथे तिने आपल्या कलाकृती विकायला ठेवल्या होत्या. आता ३० वर्षे वय असलेल्या पवित्राचा विवाह ११ व्या वर्षी झाला होता. पण नवऱ्याने दुसऱ्या बाईला घरी आणल्यामुळे ती माहेरी परत आली. आठवीपर्यंत शाळा शिकलेली ही मुलगी मुद्देसूद आणि आत्मविश्वासाने बोलत होती. सुंदर काम आहे तिचं! बंगळुरु आणि इतर ठिकाणी कार्यशाळेतून ही कला शिकवते, कलाकृती विकते. उदरनिर्वाहाचे साधन या कलेमुळे तिला मिळाले आहे. तिला सरकारी नोकरी मिळाली होती. पण गावातल्या एका पुरुष उमेदवाराने लाच देऊन ती नोकरी स्वत:कडे वळवली. ती खूप नाराज होऊन सांगत होती. आता या कलेमुळे परदेशी जाऊन यायची तिची इच्छा आहे. चांगला जोडीदार मिळाला तर विवाहही करायचा आहे तिला. भिंतीवर काम करतेच, पण छोटय़ा प्लायवूडवर खिळे ठोकून त्याला दोरी गुंडाळून, बाह्य़ाकार बनवते आणि त्यात मातीचे मिश्रण घालून, उठावशिल्प बनविते, जे घरी भिंतीवर लावता येते. छोटे पक्षी, प्राणी त्रिमितीत बनवते. सुंदर रंगाने सफाईदारपणे रंगविते.
सोनाबाईनी बंदिवासात विकसित केलेल्या सरगुजी शैलीच्या कलाकृतींमुळे आज अनेक स्त्रिया मुक्तपणे कलानिर्मिती करताहेत. स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहेत. पवित्राची ही तिसरी पिढी आहे. या पिढीची प्रगतीची स्वप्नं पुरी व्हावीत आणि नवनवीन कल्पनांनी ही कला बहरास यावी, ही सदिच्छा!!
विशेष आभार
– डॉ. सुनीता वर्मा (छत्तीसगड)