स्त्रीचे तारुण्य आणि पुनरुत्पादक क्षमतेच्या प्रारंभाचे एक महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे तिला येणाऱ्या मासिक पाळीची अपरिहार्य जैविक घटना. प्रत्येक स्त्रीला जवळजवळ ४० वर्षे मासिक पाळी येते. तिला या काळात शारीरिक आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते हे सर्वज्ञात आहेच, मात्र मुलींच्या आणि स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा आणि मासिक पाळीचा खूप जवळचा संबंध आहे, हेही आता स्वीकारले जाऊ लागले आहे. मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती यांचा मानसिक आरोग्याशी संबंध सांगणारी जगातील पहिली ‘मासिक पाळी, रजोनिवृत्ती आणि मानसिक आरोग्य परिषद’ नुकतीच ब्रिटनमधील एक्सेटर विद्यापीठात पार पडली. त्यानिमित्ताने या विषयाचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तणाव आणि मासिक पाळी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण संबंध आहे. स्त्रीच्या मासिक पाळीदरम्यानचे हार्मोनल बदल तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतातच, परंतु तिच्या मानसिक आरोग्याचाही तिच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. मासिक पाळीच्या दरम्यान तिची मानसिक आरोग्य स्थिती तात्पुरती का होईना बिघडूही शकते. अतिभावनिक तणाव मासिक पाळीचे दिवस कमी करू शकतो किंवा पाळी थांबवू शकतो तर काही वेळा ती अधिक वेदनादायकदेखील करू शकतो. वेदनादायक मासिक पाळीचा ज्यांना अनुभव आहे (डिसमेनोरिया) त्यांच्या पोटऱ्यात प्रचंड वेदना होतात, पेटके येतात, मात्र ज्या स्त्रियांमध्ये तणाव जास्त असतो त्यांच्यात डिसमेनोरिया होण्याची शक्यता दुप्पट असते.

हेही वाचा…जेंडर बजेटिंग : विनियोगावर ठरणार यशापयश!

मासिक पाळीची काही सर्वसाधारण शारीरिक लक्षणे म्हणजे पायांत पेटके येणे, ओटीपोटात दुखणे आणि मूड बदलणे पण काहींच्या बाबतीत या काळात अस्वस्थता, चिंता वाढते, निराशाही येते. मासिक पाळीविषयी, त्या वेळी होणाऱ्या रक्तस्रावाबद्दल, शारीरिक बदलांविषयी मुलींना विश्वासात घेऊन सांगितले गेले नाही तर मुलींमध्ये लज्जा, आणि भीतीही निर्माण होऊ शकते. अनेक मुलींचे पालक सांगतात, ‘पाळी सुरू झाली आणि ती अचानक शांत शांत झाली, अभ्यासात मागे पडली.’ अशा वेळी पालकांनी तिच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे.

नव्याने सुरू झालेल्या मासिक पाळीच्या वेळी बहुतेक मुली घाबरलेल्या असतात. त्यांच्या सामान्य प्रतिक्रिया चिंता आणि वेदनेच्या असतात. मासिक पाळीच्या लक्षणांचे परिणाम कमी करण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ स्त्रियांना नियमित व्यायाम, निरोगी खाणे, पुरेसे पाणी पिणे आणि भरपूर झोप घेण्यास प्रोत्साहित करतात. मात्र ज्या मानसिक आजाराशी झुंजत असतात त्या स्त्रिया पाळीच्या वेदनांमुळे कधी कधी संपूर्ण दिवस अंथरुणावर पडून राहतात, स्वत:ची काळजी घेणे त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्य होते.

एका बाजूला असा शारीरिक त्रास तर काहींच्या बाबतीत कौटुंबिक, सामाजिक दडपणाचा ताण असतो. आजही बऱ्याच मुलींना त्यांच्या घरातून, ‘आता बाहेर जरा नीट वागायचं. आमचे बारीक लक्ष असेल तुझ्यावर’ अशी धमकावणीवजा सूचना देण्यात येते. तिच्या हिंडण्याफिरण्यावर, व्यक्तिस्वातंत्र्यावर लगाम घातला जातो ज्यामुळे ती बुजते, व्यथित होते आणि पौगंडावस्थेतील निराशा तिला त्रस्त करू शकते. अशा वेळी काही तरुणी मात्र त्याला प्रतिकार करत आक्रमक बनतात, बंडखोर होतात. त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी तिच्या कुटुंबीयांनी घ्यायला हवी.

हेही वाचा…सेंद्रिय तांदळाचा शाश्वत सुगंध!

समाजात मासिक पाळी वारंवार नकारात्मक पद्धतीने अनुभवली जाते. मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबर शिक्षण आणि रोजगार यावरही ती विपरीत परिणाम करते. एका संशोधनात, तणावपूर्ण नोकऱ्या आणि लवकर येणारी मासिक पाळी (२४ दिवसांपेक्षा कमी) असलेल्या स्त्रियांमध्ये दुवा आढळला आहे. जेव्हा त्या तणावात असतात तेव्हा त्यांची एक किंवा अधिक वेळा पाळी चुकते, असेही आढळून आले आहे. तणाव आणि मेंदूतील संप्रेरकातील बदल स्त्रीचे पाळीचे चक्र थांबवू शकतात कारण स्त्री तणावाच्या वेळी शारीरिकरीत्या गर्भधारणा हाताळू शकत नाही. मंत्रचळ किंवा ओसीडी (Obsessive compulsive disorder) असलेल्या स्त्री वा मुलींमध्ये, अतिविचार आणि सक्तीचे वर्तन (compulsion) वाढू शकते. काही विचार अधिक तीव्र आणि वारंवार येऊ शकतात आणि त्यांना सक्तीचे वर्तन नियंत्रित करणे अधिक कठीण होऊ शकते. मासिक पाळीपूर्वीच्या काळातदेखील अशा मुलींची चिंता आणि तणाव वाढू शकतो. एक उदाहरण आठवतंय. एक तरुणी मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होतो आणि त्यामुळे सगळी घाण घाण होते यास्तव इतका साबण वापरून तिचे कपडे आणि अंथरूण दिवसभर धूत बसायची की घरातल्यासाठी तो एक मनस्तापच झाला होता. त्यामागचे कारण समजून न घेतल्यामुळे तिच्या घरी तिला मारहाणही होत असे. अर्थात काही काळानंतर तिच्यावर उपचार केले गेले.

मासिक पाळीतील अतिरक्तस्राव किंवा दीर्घकाळापर्यंत रक्तस्राव (मेनोरॅजिया), शारीर वेदना (डिसमेनोरिया), अनियमित चक्र, यामुळे ग्रस्त असलेल्या बहुतेक स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झालेला दिसतो आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य, आत्मविश्वास, जगण्याची गुणवत्ता अशा स्त्रिया गमावू शकतात. भारतातील डिसमेनोरिया असलेल्या स्त्रियांमध्ये इतर सामान्य स्त्रियांपेक्षा जगण्याची गुणवत्ता घसरलेली आणि अति मानसिक आरोग्य विकार दिसून आले आहेत.

याव्यतिरिक्त, पाळीच्या समस्यांमुळे कामावर आणि शाळेत जाण्यावरही मर्यादा येऊ शकतात, यासाठी नोकरदार स्त्रीला मासिक पाळीची रजा देण्यात यावी यावर गेल्या काही काळापासून आपल्याकडे चर्चा सुरू आहे.

हेही वाचा…माझं मैत्रीण होणं!

किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या आधी जाणवणारी मानसिक समस्या म्हणजे Premenstrual syndrome( PMS). यात गोंधळलेपण, थकवा, राग, चिडचिड, भीती आणि निराशा, काहींना अजिबात झोप न लागणे तर काहींचे दीर्घकाळ झोपणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता न येणे असू शकते. काही मुली फार लवकर वयात येतात. या मुलींना त्याची योग्य माहिती दिली गेली नाही तर त्या थेट नैराश्येत जाऊ शकतात, असाही अनुभव आहे. अर्थात यामागे जैविक कारणाबरोबर मनोसामाजिक घटक आणि पौगंडावस्थेतील अनुभवदेखील असू शकतात.

मासिक पाळी ही मानसिक आजाराच्या जोखीम घटकांमध्ये तीव्र बदल घडवून आणू शकते याचा सर्वांत मजबूत पुरावा म्हणजे पाळीच्या दरम्यान आत्महत्येच्या वर्तनाचा तीव्र धोका स्त्रियांमध्ये वाढतो. मला आठवतेय, एका स्त्रीचा पती तिला जवळजवळ दर महिन्याला माझ्याकडे घेऊन येत असे. तिची मासिक पाळी सुरू झाली की ती प्रचंड हिंसक व्हायची. त्या काळात घरात प्रचंड गोंधळ घालायची पण त्यावर वरताण म्हणजे ती या काळात आत्महत्येचा प्रयत्न करीत असे. एरव्ही ती अगदी शांत असे, पण त्या काळात घरातले वातावरणही खूपच अशांत होत असे.

‘संप्रेरक संवेदनशील’ स्त्रियांमध्ये, संप्रेरक एस्ट्रॅडिओल आणि प्रोजेस्टेरॉनमधील वाढीव प्रवाहामुळे अशा प्रकारची जोखीम वाढू शकते.

मासिक पाळी ही स्त्रीच्या एकंदरीत आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकते. तारुण्य आणि रजोनिवृत्तीदरम्यान मासिक पाळीचा नियमित कालावधी म्हणजे शरीर आणि मन सक्षमतेने काम करत आहे याचा पुरावा असतो. २०२२ च्या पाश्चात्त्य देशातील सर्वेक्षणात, सुमारे ४० टक्के ‘प्रिमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (पीएमडीडी) असणाऱ्या रुग्णांनी सांगितले की, त्यांच्या या स्थितीबद्दल वैद्याकीय क्षेत्रात फारशी संवेदनशीलता दिसत नाही. मासिक पाळीचा निराशा वा इतर मानसिक समस्यांचा संबंध असतो, हे गांभीर्याने घेतले जात नाही. यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.

हेही वाचा…सांधा बदलताना : मन करा रे थोर!

शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी नियमित मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीचा आरोग्य हक्क आहे आणि ती व्यवस्थित यावी, या दरम्यान कोणताही त्रास होऊनये त्यासाठी प्रत्येकीने स्वत:च सजग राहणे गरजेचे आहे.

(लेखिका मनोचिकित्सक असून केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता होत्या.)