श्रीपाद टेंबे
नवरात्र हा सर्जनाचा उत्सव मानला जातो. स्त्री आणि भूमी या दोघीत विलक्षण साम्य आहे. दोघीही निर्मात्या आहेत. सृजनशील आहेत. दोघीही पोशिंद्या आहेत. अवघ्या सजीव सृष्टीचं असणं हे या दोघींवरच अवलंबून आहे. या दोघी सजीवांना जन्म देतात. पोसणाऱ्या आणि रक्षणकर्त्यांही याच. माती आणि माता या दोघींमध्ये विलक्षण साम्य आहे. मातीच्या गर्भातून उगवलेलं पीक हे मातीचं जणू अपत्यच आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्ताने..
आपला देश पूर्वापार कृषिप्रधान आहे. आजही आपल्या देशातील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पावसाच्या या चार महिन्यांतच आपले सण का असावेत याचं उत्तर शेती आणि पाऊस यांच्या संबंधातच आहे. या काळात झाडन्झाड पानाफुलांनी बहरून गेलेलं असतं. पावसामुळे अवघी धरित्री हिरवा शालू नेसून उभी असते. अवघ्या आसमंतात चैतन्य भरून राहिलेलं असतं.
याच दरम्यान वटसावित्रीपासून सुरू होणारे आपले सण, नाव कुठल्याही देवाचं असलं तरी, सृजनाची पूजा करणारे आहेत. असंस्कृत, भरकटलेल्या मानवाला स्थिर करून, कुटुंब व्यवस्थेच्या आणि संस्कृती निर्मितीच्या दिशेने एक मोठी झेप घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या शेतीची व जिच्यामुळे ते शक्य होते त्या भूमातेची कृतज्ञता व्यक्त करणारे आहेत. असंस्कृतीकडून संस्कृतीकडे माणसाने घेतलेली ही एक फार मोठी झेप होती. एका अर्थी माणूस सुसंस्कृत झाला तो स्त्रीमुळे. आजही नवजात बाळाला आपापल्या संस्कृतीचं बाळकडू पाजलं जातं, ते त्याच्या आईकडूनच. माणसाला स्थिर करणारी भूमी आणि सुसंस्कृत करणारी स्त्री या दोघींना देवी स्वरूप न मिळतं तरच नवल!
स्त्री आणि भूमी या दोघीत विलक्षण साम्य आहे. दोघीही निर्मात्या आहेत. सृजनशील आहेत. दोघीही पोिशद्या आहेत. अवघ्या सजीव सृष्टीचं असणं हे या दोघींवरच अवलंबून आहे. पोसणाऱ्याही आणि रक्षणकर्त्यां याच. माती आणि माता या दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे. मातीच्या गर्भातून उगवलेलं पीक हे मातीचं जणू अपत्यच आहे. स्त्री आणि जमीन यांच्यातलं हे साम्य मनाला नक्कीच मोहवणारं आहे. सौभाग्याचा हिरवा रंग फळलेल्या- फुललेल्या निसर्गातून, सृष्टीतून घेतला आहे.
आपले सण वर्षां ऋतूमध्येच का यावेत आणि यातील बहुतेक सर्व सण स्त्रीप्रधान का असावेत, याचं उत्तर माती आणि महिला या दोघींमधील साम्यात आहे. वटसावित्रीपासून सुरू होणाऱ्या आपल्या सर्वच सणांमध्ये स्त्रियांची भूमिका फार महत्त्वाची असते.
हेही वाचा : इतिश्री : अशुभाची भीती
गणपतीनंतर सुरू होणारा नवरात्रोत्सव तर साक्षात स्त्रीच्या ‘स्त्रीत्वा’चा. तिच्या सर्जनशीलतेचा उत्सव. सबंध देशात साजरा होणारा नवरात्रीच्या नऊ दिवसांचा तो सोहळा. स्त्रीच्या गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचं ते पूजन आहे. त्या नऊ महिन्यांची पूजा या नऊ दिवसांत आपल्या संपूर्ण देशात केली जाते. सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रं वजा केली की उरतं ते फक्त शून्य हे बिरबलाचं उत्तर जेवढं भूमी-शेतीच्या संबंधात खरं आहे, तेवढंच ते स्त्रीच्या मातृत्वाच्या बाबतीतही सत्य आहे. पावसाच्या नऊ नक्षत्रात भूमी प्रसवते, तशीच स्त्री नऊ महिन्यांनंतर नवीन जिवाला जन्म देते, आणि माणसाचे वंशसातत्य टिकवते. स्त्रीच्या आयुष्यातले हे नऊ महिने वजा केले तर पृथ्वीवरील मानवाचं अस्तित्वच नाहीसं होईल.
नवरात्रोत्सव दुर्गा, भवानी, लक्ष्मी, सरस्वती आदी देवींच्या पूजनाचा सोहळा असला तरी, ती पृथ्वीतलावरच्या तमाम स्त्रीत्वाच्या गौरवाचा आणि पूजनाचा सोहळा आहे. मातृत्वाची ही महापूजा आहे. सृष्टीतील सर्वच सजीवांचं अस्तित्व अवलंबून असलेल्या सर्जनाच्या उत्सवाचा हा सोहळा आहे.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या दिवशी एक कलशात धान्य आणि पाणी भरून त्यामध्ये एक सुपारी, एक हळकुंड, अक्षता, थोडेसे पैसे इत्यादी ठेवलं जातं. या कलशावर आंब्याचे किंवा विडय़ाचे पण ठेवून त्यावर नारळ ठेवतात. काही ठिकाणी मातीच्या घटात दिवा लावला जातो. हा दिवा नऊ दिवस सतत तेवत असतो. या कलशाला नऊ दिवसाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळय़ा पाना-फुलांनी पुजलं जातं. यात प्रांताप्रांतानुसार फरक असला तरी भावना तीच, वंशसात्यताची, मातृत्वाच्या पूजनाची असते. घरी स्थापन केलेला कलश अथवा मातीचा घट म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक आणि त्यात नऊ दिवस सातत्याने मंदपणे तेवत असलेला दिवा म्हणजे त्या ‘गर्भाशयात फुंकला गेलेला प्राण’ असे मानले जाते. दिवा हे प्राणाचं प्रतीक मानलं गेलं आहे. परातीत रुजत घातलेलं धान्य आणि शेजारच्या मातीच्या घटात तेवत असलेला दिवा भूमीच्या उदरातून येणारं धान्य आणि स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेला गर्भ यातील साम्य दर्शवतात.
नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीच्या नऊ महिन्यांच्या गर्भार अवस्थेचा सन्मान असून दहाव्या दिवशी साजरा होणारा दसरा नवजात बाळाचं गर्भाशयातून या जगात होणाऱ्या सीमोल्लंघनाचं प्रतीक आहे. नऊ महिन्यांचं गर्भारपण संपवून बाळाचा होणारा जन्म मातीच्या उदरातून तरारून येणाऱ्या पिकापेक्षा वेगळा नाही. म्हणून तर दसऱ्याला दरवाजावर लावल्या जाणाऱ्या तोरणात आंब्याची पानं, झेंडूची फुलं असं काही असलं तरी शेतात नुकत्याच तयार झालेल्या भाताच्या ओंबी म्हणजे मातेच्या उदरातून सीमोल्लंघन करून कुटुंबात आलेल्या नवीन जीवाचं प्रतीक आहे.
हेही वाचा : मेंदूचे स्वास्थ्य
नवरात्रातल्या प्रत्येक माळेचं वैशिष्टय़ वेगवेगळं असलं तरी आठव्या माळेला म्हणजे अष्टमीला विशेष महत्त्व आहे. असं का याचा विचार करताना ज्येष्ठ स्त्रिया आठव्या महिन्यातील बाळंतपण म्हणजे कठीण असं म्हणायच्या. नवमी तर साक्षात बाळ जन्माचा दिवस आणि दसऱ्याला आईच्या उदरातून सीमोल्लंघन करून जगात आलेल्या बाळाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीय असतो. उगाच नाही दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जातो. असा हा नवरात्रोत्सव मातृत्वाचा उत्सव आहे.
‘‘या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।’’
असं म्हणून सर्व चराचर व्यापून राहिलेल्या स्त्रीच्या सर्जनशक्तीला, आपल्या संस्कृतीने मातृरूपात गौरवलेलं आहे.
shripad.tembe@gmail.com