योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येकाला जीवनात कोणत्या गोष्टीमुळे आनंद आणि समाधान मिळतं याच्या व्याख्या ज्याच्या-त्याच्या वेगळ्या असतात. मग तो एखादा लहानसा छंदच का असेना! पण आपल्या आजूबाजूच्या मंडळींची, प्रियजनांची नावड आपल्या आवडीवर अतिक्रमण करू लागली तर? नाती दुखवायला नकोत म्हणून आपण आपल्या आनंदाला कायमची मुरड घालणार, की हा आनंद आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे प्रामाणिकपणे पटवून देणार? आयुष्यात घडणाऱ्या कोणत्या ना कोणत्या प्रसंगात असा निर्णय आपल्याला घ्यावाच लागतो.

एका रविवारी सकाळी ऑफिस नसल्यामुळे तो जरा नेहमीपेक्षा जास्त वेळ अंथरुणात आपला फोन बघत लोळत पडला होता. चाळिशी जवळ आली असली तरी उबदार पांघरुणातून बाहेर पडणं, हे आजही त्याच्यासाठी कर्मकठीण कामांपैकी एक होतं. तेवढय़ात मित्रांच्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वर कॉलेजमध्ये त्याच्याबरोबर असणाऱ्या एका मित्राचा मेसेज आला. त्या दिवशी संध्याकाळी ‘ऑनलाइन’ होत असलेल्या एका गाण्याच्या कार्यक्रमाचं ते निमंत्रण होतं.

मित्रानं पाठवलेला मेसेज वाचून त्याला तीन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. तेव्हा कॉलेजच्या शंभराव्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं सगळ्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी एक जंगी संमेलन करायचं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमाच्या संयोजन समितीत तो होता. या संमेलनाचा भाग असलेल्या विविध कार्यक्रमांत अनेक वादकांची आणि खास करून एका उत्तम पेटीवादकाची गरज होती, म्हणून तो या मित्राला भेटला होता. हा मित्र कॉलेजमध्ये असताना त्याच्या पेटीवादनामुळे चांगलाच विद्यार्थिप्रिय होता. त्याच्या वादनातील सफाईमुळे शहरातल्या काही नामवंत गायकांच्या कार्यक्रमात साथ देण्यासाठी त्याला बोलावलं गेलं होतं. कॉलेज संपल्यानंतर हा मित्र पूर्णवेळ पेटीवादनावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यातच करिअर करेल असं सर्वानाच वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नव्हतं. या मित्राला भेटल्यावर त्यानं त्याला कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगितली आणि त्यातल्या काही भागांसाठी पेटीवादन करण्याची मित्राला विनंती केली.

सगळं ऐकून घेतल्यावर मित्र शांतपणे म्हणाला, ‘‘मी पेटी वाजवणं कधीच बंद केलं.’’ मित्राचं हे बोलणं त्याच्यासाठी कल्पनेपलीकडचं होतं. त्यानं आश्चर्यानं त्याला विचारलं, ‘‘पण का?’’ त्यावर मित्र थंडपणे म्हणाला, ‘‘इच्छा मेली म्हणून.’’ त्या टोकाच्या बोलण्यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला समजेना. काही क्षणांच्या शांततेनंतर मित्रानंच बोलायला सुरुवात केली, ‘‘शाळेत असताना माझी पेटीबरोबर तोंडओळख झाली. तेव्हा माझ्या घरी पेटी नव्हती. शाळेतल्या पेटीवर जेवढा सराव करता आला तेवढा मी केला. मात्र अकरावीत कॉलेजच्या कलामंडळात माझ्यासारखंच वादनाचं आकर्षण असणारे मित्रमैत्रिणी मिळाले आणि एक नवीन जग मला गवसलं. कलामंडळातल्या सगळ्या कार्यक्रमांत मग मी असायचोच. तेव्हा मी माझ्या साठवलेल्या पैशांमधून पेटी घेतली आणि घरी न सांगता क्लासही लावला, कारण आमच्या घरातल्या मंडळींचा माझ्या पेटीवादनाला कायमच विरोध होता. पहिल्या दिवसापासून त्यांचं आपलं एकच म्हणणं होतं, की वाद्य वाजवून असं काय मिळतं? संगीताच्या क्षेत्रात फक्त गायक नावारूपास येतात. वादकांच्या बाबतीत असं काही होत नाही. तेव्हा मी त्यांना म्हणायचो, की पेटी वाजवल्यानं मला आनंद मिळतो म्हणून मी वाजवतो. छंद जोपासताना त्याच्याकडे गुंतवणूक आणि परतावा इतक्याच मर्यादित दृष्टीनं का बघायचं? अर्थात आमच्याकडे कु णालाही ते पटायचं नाही. एखाद्या परीक्षेत गुण कमी पडले की, ‘आयुष्यभर पेटी गळ्यात अडकवून फिरावं लागेल’ अशा शब्दांत उद्धार व्हायचा. त्यांचं बघून नात्यातही काही मंडळींनी याबद्दल माझी चेष्टा करायला सुरुवात केली. अकरावीपासून ते माझं पदवीचं शिक्षण संपेपर्यंत हेच सुरू होतं.’’

‘‘मग?’’ त्यानं काहीशा अधीरतेनं मित्राला विचारलं. तेव्हा आपला चेहरा शक्य तेवढा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करत मित्र म्हणाला, ‘‘पदवीच्या अखेरच्या वर्षी शेवटच्या परीक्षेत माझा नेमका एक विषय राहिला. खरं म्हणजे तो राहायचं काहीही कारणच नव्हतं हे मला पक्कं माहिती होतं. तेव्हा निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मी विद्यापीठात जाऊन फेरतपासणीचा अर्ज भरून आलो; पण तोपर्यंत घरातल्या मंडळींनी माझी पेटी एका ट्रंकेत घालून आणि त्या ट्रंकेला भलंमोठं कुलूप लावून ती माळ्यावर ठेवून दिली होती. त्याच्याच जोडीला मी आता कसं जबाबदारीनं वागलं पाहिजे, याबद्दल मला एक व्याख्यानही देण्यात आलं. फेरतपासणीचा निकाल येण्यासाठी काही दिवस जातात. त्या दरम्यान घरी आलेल्या नातेवाईकांसमोर मला टोमणे मारण्यात आले. विशेष गोष्ट अशी, की फेरतपासणीत त्या विषयात मी उत्तीर्ण असल्याचं समोर आलं; पण त्यानंतरही माळ्यावरून माझी पेटी खाली काढून मला देण्याची तसदी कु णी घेतली नाही. त्या सगळ्या प्रकारानंतर माझी पेटी वाजवण्याची इच्छाच मेली. तेव्हापासून माझी पेटी सुटली ती सुटलीच.’’

मित्राचं बोलणं ऐकल्यावर त्यानं काही वेळ जाऊ दिला आणि मग तो म्हणाला, ‘‘छंदाकडे गुंतवणूक किंवा परताव्याच्या दृष्टीनं बघणं हे अपयश आहेच, पण त्यांच्या अशा वागण्यामुळे तू पेटी वाजवायचं बंद करणं हे त्यांना त्यांच्या उद्देशात यश मिळवून दिल्यासारखं आहे असं तुला वाटत नाही का?’’

त्यावर मित्र म्हणाला, ‘‘असेलही; पण इतक्या वर्षांत माझ्यासाठी माझा छंद किती महत्त्वाचा आहे, हे मी माझ्याच घरातल्यांना समजावू शकलो नाही, हे माझ्या दृष्टीनं सर्वात मोठं अपयश होतं. माझा विषय राहण्यामागे बाकी इतर कोणतीही गोष्ट नसून फक्त आणि फक्त माझं पेटीवादनच होतं, असं समजून मला जी वागणूक दिली गेली ते सहन करण्यापलीकडचं होतं.’’

मित्राच्या बोलण्यातला धागा पकडत तो म्हणाला, ‘‘तुझा निर्णय तू घेतलेला आहेस; पण तरीही मला दोन गोष्टी बोलाव्याशा वाटतात, म्हणून बोलतो. पहिली गोष्ट- तुझ्या पेटीवादनाला असलेला घरातल्यांचा विरोध हा पहिल्या दिवसापासूनच होता. तेव्हा तुझा विषय राहिल्यावर त्यांचं असं वागणं हे अपेक्षितच होतं, असं म्हणायला हवं ना? दुसरं म्हणजे आपली आनंदाची जागा ही आपणच जपून ठेवायची असते. दुसऱ्या कु णाच्याही विचारांचं, मतांचं, अपेक्षांचं किंवा वागणुकीचं अतिक्रमण त्यावर होऊ द्यायचं नसतं. आपला छंद हा पूर्णपणे आपला असतो. तो निवडताना आपल्याला कुणाच्या मताची गरज नसते. तो जपताना, त्यात नवं काही करून बघताना कु णाच्याही संमतीची आवश्यकता नसते. तेव्हा अशी टोकाची भूमिका घेणं हे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असं झालं.’’ त्यावर ती चर्चा थांबवत मित्र म्हणाला होता, ‘‘ हे बघ, माझ्यासाठी ‘पेटी’ हा विषय संपलेला आहे. तेव्हा कॉलेजच्या कार्यक्रमासाठी दुसरं कु णी तरी बघ. बाकी कार्यक्रमाच्या संयोजनात काही मदत हवी असेल तर त्यासाठी मी नक्की येईन.’’

तीन वर्षांपूर्वीच्या त्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आज संध्याकाळी असणाऱ्या त्या ऑनलाइन कार्यक्रमात पेटीवादक म्हणून त्याच मित्राचं नाव वाचल्यावर तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला समाधान वाटलं. हे सगळं नेमकं कशामुळे घडलं हे मित्रालाच फोन करून विचारावं असा विचार तो करत असताना समोरून त्या मित्राचाच फोन आला.

मित्र म्हणाला, ‘‘माझा मेसेज वाचून तुझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले असतील, याची मला कल्पना आहे. म्हणून मी फोन केला.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘हो,  जे झालं ते चांगलंच झालं. फक्त कसं?’’ तेव्हा मित्र म्हणाला, ‘‘अरे, या टाळेबंदीत आम्ही सगळे घरातच होतो. तेव्हा घरातला टीव्ही सतत सुरू असायचा. एक दिवस गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना माझा सहा वर्षांचा मुलगा त्यात दिसणारी पेटी बघून म्हणाला, की मलाही पेटी वाजवायची आहे. पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं; पण तो मागेच लागला. काही महिन्यांपूर्वी त्या माळ्यावरच्या ट्रंकमधून काही तरी हवं म्हणून कु णी तरी त्यालाच माळ्यावर चढवलं होतं. तेव्हा त्यानं पेटी पाहिली होती. त्याचा हट्ट बघून माझा भूतकाळ माझ्यासमोर उभा राहिला. घटनांची पुनरावृत्ती होत होती, फक्त पात्रं बदलली होती. शेवटी ठरवलं, त्याला जे करावंसं वाटतं आहे ते करू द्यावं. भले मग त्यानं आठवडाभरच का ती पेटी वाजवेना. किमान आपल्यामुळे तरी कु णाची इच्छा मरता कामा नये. या सगळ्यामुळे अनेक वर्षांनी ती पेटी माळ्यावरून खाली आली.’’

‘‘वा! क्या बात है.’’ त्यानं मनापासून दाद दिली. मग मित्र म्हणाला, ‘‘गोष्टी जेव्हा जुळायच्याच असतात तेव्हा त्या कशाही जुळतात याचा अनुभव इथेही आला. गेल्याच वर्षी आमच्या इमारतीत वाद्यांच्या दुरुस्तीचा आणि खरेदी-विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या एकांनी फ्लॅट घेतला. टाळेबंदीमुळे ते काकाही घरातच होते. त्यांनी मोजून चार दिवसांत इतकी र्वष बंद असलेली पेटी पहिल्यासारखी करून दिली. नंतर ती माझ्या चिरंजीवांनी ज्या पद्धतीनं हाताळली, ते पाहून माझ्या पोटात गोळाच आला आणि मग त्याला शिकवण्यासाठी शिक्षकाच्या रूपानं मला मैदानात उतरावंच लागलं; पण खरं सांगू? जेव्हा मी अनेक वर्षांनी पेटी वाजवली, तेव्हा जे काही वाटलं ते शब्दांच्या पलीकडचं होतं.’’

मित्राचं बोलणं ऐकून तो समाधानानं म्हणाला, ‘‘ हरकत नाही. उशिरा का होईना, पण गोष्टी मार्गावर आल्या हे महत्त्वाचं.’’ तेव्हा मित्र म्हणाला, ‘‘तीन वर्षांपूर्वी आपलं बोलणं झालं होतं, तेव्हा तुला नेमकं काय सांगायचं आहे हे मला कळत होतं; पण वळत नव्हतं. बहुतेक सारासार विचार करण्यापेक्षा घरातल्या मंडळींवर मी धरलेला राग त्यासाठी जास्त कारणीभूत होता. तू म्हणाला होतास तसंच, आपल्या प्रत्येकाला आयुष्यातली आनंदाची जागा शोधावी लागते आणि एकदा ती सापडली की जपावी लागते. त्याचं मोल आपल्यासाठी किती आहे, हे आपण सोडून दुसऱ्या कु णालाही कधीच पूर्णपणे समजत नाही. घरातल्यांबद्दलच्या रागाचं माझ्या आनंदाच्या जागेवर झालेलं अतिक्रमण मी तेव्हा काढू शकलो नाही; पण माझ्या मुलामुळे ते मला काढावं लागलं. मात्र ज्या क्षणी हे अतिक्रमण निघालं, त्या क्षणी गोष्टी आपोआप घडायला लागल्या. आज संध्याकाळी जो कार्यक्रम आहे तोही अगदी सहजपणे मिळाला.’’

मग संध्याकाळी ठरलेल्या वेळी तो संगणकासमोर बसला. ऑनलाइन कार्यक्रम सुरू झाला. त्याच्या कानांना परिचित असणाऱ्या त्या पेटीच्या सुरांनी आसमंत बहरला. या खेपेस त्या सुरांमध्ये पेटी वाजवणाऱ्याचा प्रामाणिकपणा काकणभर जास्तच आहे, हे त्याला जाणवलं आणि तो स्वत:शीच हसला. आता कुठे खऱ्या अर्थानं मैफलीला सुरुवात झाली होती!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of own habit apayashala bhidatana dd70